मी तुमच्यासाठी परकी भाग 3
©️®️शिल्पा सुतार
दुसऱ्या दिवशी सचिनला सुट्टी होती. ते सगळे फिरायला जाणार होते. येतांना खरेदी करणार होते.
सकाळी इडलीचा बेत केला. श्रुतीला आवरायला उशीर झाला. सगळे तयार होऊन बाहेर बसलेले होते. तिचा नाश्ता बाकी होता. तिला खायला वेळ मिळाला नाही. तिने कपडे बदलले.
सचिन आत मध्ये आला. "काय चाललं आहे? इतकं हळूहळू आवरते का? केव्हा जायचं आहे. आटोप."
" हो पाच मिनिट द्या. थोड खाते." श्रुती म्हणाली.
" आमच्या सोबत खायचं ना." सचिन म्हणाला.
" सगळ्यांना वाढता वाढता जमतं का? तुम्ही बघितलं नाही का माझी धावपळ होते आहे. घरात किती लोक आहेत. सहा मोठे चार मुलं व परत कोणाची मदत नाही. सगळ्यांना हातात वस्तू द्या. सकाळ पासुन दोन तीन वेळा चहा झाला. वेळ होणारच. " श्रुती चिडली. एवढं करा तरी यांना किंमत नाही.
" हातात वस्तु द्यायच्या म्हणजे? तू काय बोलतेस समजत ना. थोड काम केलं तर काही बिघडणार नाही. तुझ घर आहे. जरा नीट वाग श्रुती. आटोप आता. " तो ओरडला.
" मी नाश्ता करू नको का? नाहीतर तुम्ही जा. " आज तर तिला या सगळ्यांच्या वागण्याचा कंटाळा आला होता.
" तुला ना मी नंतर बघतो. " सचिनने चिडून तिला धमकी दिली. पूर्ण ट्रिप मध्ये सचिन तिच्याशी बोलला नाही. दिवसभर भरपूर खर्च झाला. संध्याकाळी सुद्धा खूप खरेदी झाली. रात्री ते घरी आले. दुपारीच बाहेर खाल्ल्यामुळे संध्याकाळी घरी जेवण होतं.
सगळे थकून बसलेले होते. श्रुती सगळ्यांचा स्वयंपाक करत होती. कामाचं काही वाटत नाही. पण एवढ्या दोन-तीन दिवसात सचिन तिच्याशी जे वागत होता त्याने ती दुखावली गेली होती. रमाताई सुद्धा इतर वेळी नीट वागत होत्या. मुली आल्या आहेत तर मला असा त्रास देतात.
आज चांगलेच पंधरा-वीस हजार रुपये खर्च झाले. श्रुती विचार करत होती. जाऊदे पण यांना बोलण्यात काही अर्थ नाही.
मागच्या महिन्यात मी पुस्तक घ्यायला हजार रुपये मागितले तर यांनी दिले नाहीत आणि आता फालतू खर्च करायला एवढे पैसे आहेत. हे हेच खर आहे की मी इकडे परकी आहे आणि ते सगळे एकत्र आहेत मला वेगळं पाडतात. तिला वाईट वाटत होतं.
आज एवढी खरेदी झाली पण माझ्यासाठी काही घेतलं नाही. की कोणी मला काही म्हटलं सुद्धा नाही. मी फक्त यांची सगळ्यांची मोलकरीण झाली आहे.
तिने शांतपणे ताट केले. जेवण झालं. नेहमीप्रमाणे आवरून ती तिच्या रूम मध्ये जाऊन झोपली.
प्रिया, प्रीती सचिनच्या आजुबाजूला बसल्या होत्या.
"आम्ही उद्या निघतो." प्रीती म्हणाली.
"काय झालं ताई?" सचिनने विचारल.
"आम्हाला वाटत श्रुतीला आम्ही आलो ते आवडलं नाही."
"अस काही नाही ताई."
"आता बघितल ती एकटी आत आहे. दिवसभर ही ती आमच्याशी विशेष बोलली नाही." प्रिया म्हणाली.
"मी बघतो."
"नको झोपू दे. ती दमली असेल. आम्ही म्हणतो मदत करू का? ती कशाला हात लावू देत नाही."
सचिनला माहिती होत. तो सकाळी तिला बोलला म्हणून श्रुती शांत होती. पण तिने दोघी ताईंशी नीट वागायला हवं. तो चिडला होता.
थोडा वेळाने आत आला. श्रुतीला हाताने धरून उठवलं. ती दचकली होती. " खूपच थकली ना तू माझ्या घरच्यांची सेवा करत करत. तुला आराम साठी पाठवतो."
त्याने तिच्या माहेरी फोन केला. " श्रुती नीट वागत नाही. हिला घेवून जा."
" सचिन तुम्ही ऐका ना. अस करु नका. माझ्या घरी काही सांगू नका. आई मी काही केल नाही. यांच्या घरचे मला त्यांच्यात येवू देत नाही. ओरडतात. म्हणतात आम्हाला बोलू दे मी खूप प्रयत्न केला. तुम्ही कोणाला ही विचारा." ती रडत होती. विनवण्या करत होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा