Login

मी तुमच्यासाठी परकी भाग 1

कितीही प्रयत्न केले तरी मी तुमच्यासाठी परकी आहे
मी तुमच्यासाठी परकी भाग 1

©️®️शिल्पा सुतार

नुकतीच दिवाळी झाली. श्रुतीच्या दोघी नणंद माहेरी आल्या होत्या. प्रिया, प्रीती. दोघींना दोन दोन मुल होते. घर भरलं. छान आनंदी वातावरण होतं. रमाताई ,आण्णा खुश होते. दोन मुली एक मुलगा छान संसार होता.

सचिन, श्रुतीच नवीनच लग्न झालं होतं. ही श्रुतीची पहिली दिवाळी होती. छान पूजा झाली. सचिनने आई, बाबा, श्रुती साठी छान कपडे घेतले. ती पण माहेरी जाणार होती. पण नणंद बाई येत असल्याने तिने नाही सांगितलं. हीच वेळ आहे. मला त्यांच कराव लागेल. सचिनच्या बहिणींशी चांगले संबंध हवेत. श्रुतीने पाहुणे येण्याआधी खूप तयारी केली होती. घर आवरलं किराणा भरला. खूप प्रेमाने ती सगळं करत होती. सचिन तिच्या करण्यावर खुश होता.

प्रिया, प्रीती माहेरी येवून आरामात होत्या. त्या रमाताईं जवळ बसल्या होत्या.

" सचिन केव्हा येईल ग?" प्रीतीने विचारल.

" तो रात्री येईल. त्याला ऑफिस काम खूप आहे." रमाताई म्हणाल्या.

श्रुती चहा घेवून आली. त्यांच्यात बसली. ती गप्पा मारत होती. त्यांची चौकशी करत होती. ती त्यांच्यात आलेली रमाताईंना आवडलं नाही.

" श्रुती आटोप स्वयंपाकाच बघ." रमाताई मोठ्याने म्हणाल्या.

" हो करते आई. आता तर नाश्ता झाला. ताई कोणती भाजी करू. तुम्ही सांगा." श्रुती नीट विचारत होती.

" आत जा. फ्रीज मधे काय आहे ते बघ. सारखं आमच्यात काय आहे ? आम्हाला मोकळ बोलता येत नाही ." त्यांनी फटकारलं.

" मला पण दोघी ताईंशी बोलायच आहे." श्रुती म्हणाली.

हे रमाताईंना आवडलं नाही. त्यांच्या चेहर्‍यावर नापसंती बघून श्रुती आत गेली. स्वयंपाकाला लागली. आई कश्या वागता आहेत. मला जवळ जवळ तिथून घालवलं. ती वाट बघत होती. कोणी मदतीला आलं नाही. निदान किचन मधे येवून तरी गप्पा मारायच्या ना. बाहेरून हसायचे आवाज येत होते. मी या लोकांसाठी माझ्या आईकडे गेली नाही ते असे वागतात. त्यांना मी त्यांच्यात नको आहे. जावू दे. त्यांना त्यांच त्यांच बोलायच असेल. तिने विचार झटकले.

दुपारच जेवण झालं. श्रुती मुलांमधे रमली होती.

"कपडे वाळत टाक श्रुती. घरचे काम पडले. ही नुसता टाइम पास करते." रमाताई ओरडल्या.

" हो आई."

ती टेरेसवर गेली. तिथून तिने आईला फोन केला. तिची बहीण आलेली होती. " नीताताई तू कधी आली? "

" आजच आली."

"मला पण तिकडे यावसं वाटतं आहे."

"ये ना मग मी अजून आठ दिवस आहे ."

" मला इकडे अजिबात करमत नाही. आमच्या घरी विचित्रपणा सुरू आहे. माझ्या सासुबाई अस का करतात ते समजत नाही. त्यांच्या मुली आल्या आहेत तर मला नुसत ओरडत आहेत. आधी ही फटकून वागत होत्या. पण आता जास्त झाल आहे." श्रुती नाराज होती.

" असच असत श्रुती. त्या लोकांमधे जास्त मन गुंतवून उपयोग नाही. " नीता म्हणाली. तिला ही असाच अनुभव होता.

ती रूम मधे गेली थोडा वेळ आराम केला. सचिनचा फोन आला." काय करतेस? "

" काही नाही. आता काम आटोपले."

" प्रिया, प्रीती काय करताय? "

" दोघी ताई आराम करत आहेत. "

" ठीक आहे."

"अहो लवकर या."

" हो. काही आणायचं का? "

" हो भाजी घेवून या. "

" लिस्ट दे."

"हो." त्यातल्या त्यात सचिन तरी चांगला आहे. तिला बर वाटलं.

ती संध्याकाळचा चहा घेवून रमाताईंच्या खोलीत गेली. प्रिया, प्रीती टीव्ही बघत होत्या. रमाताई मुलांजवळ होत्या. अण्णा पुस्तक वाचत होते. सगळं घर एका बाजूला ही एकटी एका बाजूला अस झालं होतं. तिने सगळ्यांना चहा दिला.

"बिस्किट आण." रमाताई म्हणाल्या.

" फराळ नाही केला का?" प्रीतीने विचारल.

" केला ना."

"थोडी चव तर बघू दे."

"श्रुती फराळ घेवून ये."

श्रुती किचन मधे गेली. ती फराळ घेवून आली. ती आत येत होती. तिने ऐकलं.

" आई ही श्रुती काय ग सारखी इकडे येवून बसते? आपल्याला बोलू देत नाही. किती मधे मधे करते. " प्रीती म्हणाली.

" हो ना आपल ऐकेल गावभर करेल. आई तिला समजून सांग." प्रिया म्हणाली.

"हो. " रमाताई म्हणाल्या.

श्रुती आत आली. ती चहा घेत होती.

"श्रुती स्वयंपाक कर. मुलांना लवकर जेवायला लागत. " रमाताईंनी तिला आत पाठवलं.

ती पटापट आटपत होती. मुलांसाठी पावभाजी केली. बाकीच्यांसाठी पुलाव ही होता. आईस्क्रीमही फ्रीजमध्ये तयार होतं .पाव शेकायचे बाकी होते .सचिन ऑफिसहून आला की पाव शेकते. त्यानंतर ती सगळ्यांना वाढणार होती.

🎭 Series Post

View all