"काय कळवायचं ताई, मी महिन्याभरात परत आलेले तेव्हा तुमच्या सासूबाईंनीच मला येऊ नको म्हणून सांगितलं ना?"
मानसीला ऐकून धक्का बसला..
"काय सांगतेस?"
"हो, धीरज भाऊ पण होते घरी..दोघांचं बोलणं झालं की आता स्वयंपाकिण परत आली नाही तर मानसी घरातच थांबेल, नोकरीचा विषय काढणार नाही म्हणून...म्हणून त्यांनी मला परत यायला नाही सांगितलं.."
मानसीला प्रचंड राग आला, तिला घरी बसवण्यासाठी धीरज आणि सासूबाईंनी मिळून हा कट रचला होता तर...
ती घरी आली, सासूबाई आणि धिरज ला याबद्दल जाब विचारला तेव्हा ते गांगरले, पण तरीही आपला हट्ट धरून ठेवला..
"हे बघ मानसी, नोकरी वगैरे नाद सोड आता...तुझी हुशारी घरी वापर, काहीही झालं तरी आता तू घराबाहेर पडायचं नाही..काही गरज नाही नोकरीची..माझ्या आईने कधी नोकरी केली नाही, काही बिघडलं?"
मानसीचा संयम सुटला, ती गरजली..
"नोकरीची गरज नाही काय बोलतोय धीरज, हे मी तुला म्हणायला हवं...माझी कमाई तुझ्याहून जास्त आहे..मला बोलायला आवडत नाही पण तू भाग पाडतोय.. तुझा इगो दुखवायला नको म्हणून घरीही मी तुझ्याहून कमी पगाराचा आकडा सांगितला...आणि सासूबाई, तुम्ही कसली नोकरी केली असती हो? शिक्षण काय तुमचं? आणि कधी इच्छा तरी होती का नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं राहायची?"
धीरज आला आणि तिच्या कानशिलात भडकवणार तोच तिने हात पकडला आणि झटकून दिला..मनाशी ठरवलं, आणि आत जाऊन बॅग भरून आली, बाळाला कडेवर घेतलं आणि बाहेर पडली..
धीरजला काहीसं वाईट वाटलं, तो थांबवायला निघाला..पण सासूबाईनी अडवलं..
"कुठे जाईल ती? नोकरीची हौस आहे ना तिला? बाळाला घेऊन कुठे कुठे भटकेल? येईलच परत बघ तू...आता तर एकटी आहे, आई वडील लांबच्या गावात...काय करेल ही एकटी?"
मानसीला आपण अजूनच दुबळी केली असं त्यांना वाटू लागलं...आणि ती लाचार होऊन परत येईल या आशेवर ते राहू लागले.
काही दिवस सरले, धीरज आणि घरच्यांना घर खायला उठलेलं. बाळाचा आवाज नाही, घरात चैतन्य नाही. धिरजला आता काळजी वाटू लागलेली. त्यांना वाटलं ही आई वडिलांकडे गेली असेल पण नंतर समजलेलं की ती तिथे नाही. धिरजला आईचा राग येऊ लागला, आपण आईचं ऐकून बायको मुलाला वाऱ्यावर सोडलं..
आईच्या नकळत तिला भेटायचं त्याने ठरवलं...तिला फोन लावला,
"हॅलो मानसी, मला तुझी माफी मागायची आहे..आपण भेटू शकतो?"
मानसीला माहीत होतं की याला एक दिवस नक्की जाणीव होईल.
ती म्हणाली संध्याकाळी माझ्या फ्लॅट वर ये भेटायला, पत्ता पाठवते.
धिरजला आनंद झाला, कितीतरी दिवसांनी तो बायको मुलाला भेटणार होता..ठरलेल्या वेळेत तो फ्लॅटवर गेला.पण दार सुधा ने उघडलं..
"धीरज भाऊ तुम्ही? या, ताई येतीलच इतक्यात.."
धीरज आत आला, आल्या आल्या मुलाला जवळ घेतलं आणि कडकडून भेटला...डोळ्यातून अश्रू ओघळू लागले..
काही वेळाने मानसी आली. तिला धिरजच्या डोळ्यात पाश्चातापाचे अश्रू स्पष्ट दिसत होते त्यामुळे तिनेही जास्त ताणलं नाही.
"धीरज, मी तुला माफ करेन पण तू आणि सासूबाईंनी मिळून जे केलं ते खूप चुकीचं होतं... मला घरी बसवण्यासाठी काय काय कट रचले.. आणि मी घर सोडलं तेव्हा काय म्हणाले? की मी लाचार होऊन परतेल असं? ...बघ, आज मी स्वतःचा फ्लॅट घेतलाय, गाडी आहे..सुधाला कामाची गरज होती, ती दिवसभर इथे राहते, बाळाला सांभाळते, घर आवरते..मी घरी आले की मग तिच्या घरी जाते. नवीन नोकरीच्या आधी महिनाभर मी तिला इथे बोलावून घेतलेलं, बाळाला तिची चांगली ओळख झाली, सवय झाली..आणि म्हणूनच मी निश्चिन्तपणे कामावर जाऊ शकले. कोण कुठली ही सुधा,तिने माझी अडचण ओळखून मला साथ दिली..आम्ही दोन्ही बायकांनी एकमेकींना मदत केली आणि स्वतःच्या पायावर आम्ही उभे राहिलो. आणि दुसरीकडे घरी, तुझी आई, स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाईला आधार द्यायचं सोडून खाली खेचण्याचं काम केलं...आणि तुम्हाला वाटलं मी लाचार बनेन...बघ, आज माझी अवस्था काय आणि तुझी काय.."
"मानसी मला माफ कर, मी आईचं ऐकून भुललो आणि तुला त्रास दिला..यापुढे असं होणार नाही..तू घरी चल.."
सारासार विचार करून मानसी घरी गेली, सुधा ला सुद्धा सोबत नेलं..सासूबाई मौन होत्या, पश्चाताप नव्हता ना आनंद. फक्त मुलाने न सांगता तिला भेटणं त्यांच्या जिव्हारी लागलेलं..
काही दिवस सरले, सासूबाईंनी पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली...
"धीरज, अरे बाळाला ताप आलाय...आईचं लक्ष बाहेर असेल तर लेकरू आजारी पडणारच ना.."
"तुम्ही असायच्या ना घरी, मग धीरज ला कधीच ताप आला नसेल ना?"
मानसीने अजून त्वेषाने उत्तर दिलं..
"बघा...असंच त्रास द्यायचा असेल तर मला पर्याय आहेत बरं का..स्वतःचं घर आहे, गाडी आहे, सोबतीला सुधा आहे..माझं सगळं रुळावर असेल, तुमचा मुलगा फक्त माझ्याकडे परत आला कायमचा तर मात्र.....अवघड होईल..."
सासूबाईंनी धसका घेतला...दुर्गेचा अवतार त्यांनी आज पाहिला...
एक स्त्री कधीच लाचार होऊ शकत नाही...
तिला तुम्ही कितीही बंधनं घाला...
तिच्या पायात कितीही बेड्या अडकवा...
तिला घर, संसार, बाळ, नाती अश्या कितीही जंजाळात अडकवा...
तिने ठरवलं तर ती मार्ग काढतेच...!!!
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा