Login

मीच आहे मार्ग माझा - भाग 1

तिला लाचार बनवण्यासाठी झाले अनेक प्रयत्न, पण ती उभी राहिली दुप्पट ताकदीने

"कशाला उगाच हट्टीपणा करतेस? तुला माहितीये ना की आता ते शक्य नाही म्हणून.."

"सगळं शक्य आहे धीरज, जर तू आणि घरच्यांनी मला आधार दिला तर.."

धीरज न ऐकल्यासारखं करून तिथून निघून गेला आणि इकडे मानसी अश्रू ढाळत बसली.

(7 वर्षांपूर्वी)
"यावेळेस सारंग बहुदा टॉप करणार, मागच्या वेळचा त्याचा स्कोर जास्त होता.."

"तो दुसरा येणार...मानसीची जागा आजवर कुणी घेऊ शकलं आहे का?"

आणि नेहमीप्रमाणे मानसी कॉलेजात अव्वल आली. सर्वत्र कौतुक झाले, घरी आनंदी आनंद. गुणवत्तेप्रमाणे कॉलेज मधूनच तिचं प्लेसमेंट झालं आणि मोठं पॅकेज तिला मिळालं. नंतर कामातही तिने आपली हुशारी दाखवली आणि पटापट बढती मिळत गेली, पगार वाढत गेला..कोलेजनंतरची ही चार वर्षे तिने कार्पोरेट जगात आपली जबरदस्त ओळख बनवली होती. खूप कंपन्या तिला जॉब ऑफर देण्यासाठी मागे लागलेल्या. तिच्या यशाचा आलेख या चार वर्षात खूप वाढलेला.

पण जसं लग्नाचं वय जवळ येऊ लागलं तसं घरच्यांनी स्थळं शोधायला सुरवात केली. मानसी म्हणजे एक balanced व्यक्तिमत्त्व. कुणाच्या प्रेमात पडून घरी सांगायची हिम्मत नव्हती पण कुणाशीही लग्न करून गपगुमान संसार करण्याइतकी ती लेचीपेचीही नव्हती.

एक श्रीमंत घरातला मुलगा वडिलांनी शोधला,- धीरज. धीरजकडे सगळं आहे या आशेने वडिलांना स्थळ पसंत होतं..पण मानसीला चिंता तिच्या करियर ची..तिने मुलाला त्याबद्दल सांगितलं, त्याने सांगितलं की मी तुला नक्की सपोर्ट करेन. बस त्याच्या या शब्दावर विश्वास ठेवून ती सासरी आली..

सासरी नव्याचे नऊ दिवस. सासू सासरे मानसी अन धीरज..असं चौघांचं ते कुटुंब. नवीन आलेल्या नवरीला सासूने आधी पारखून घेतलं. ही सगळं सहन करतेय का? की जशास तसं आहे हिचं? पण मानसी संयमी होती. कदाचित इतकी वर्षे कार्पोरेट मध्ये वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येऊन कसं वागायचं हे तिने चांगलंच जाणलं होतं. सासूचं योग्य असेल तर ऐकून घेत होती पण चुकलं तर चार शब्द सुनावत सुद्धा असे. तिची सासू तशी विचित्र होती, आधीपासूनच श्रीमंती पाहिलेली, शिक्षण कमी, घरात फारसं काम नाही..म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर..तसं काहीसं.. सुनेने काहीतरी वागावं आणि आपण तिच्या चुगल्या करत सुटाव्या याची ती वाटच पाही..पण काही जमेना..सुनेशी सूत जुळवण्याची तिला गरज वाटत नव्हती, कारण मुलगा माझा आहे..माझ्या हातातून जाऊ देणार नाही असा अट्टाहास...

मानसी घरातलं आवरून ऑफिसला जाई. घरात श्रीमंती, कामाला माणसं.. म्हणून फारसं काम पडत नसे. स्वयंपाकिण सकाळीच येऊन डबे आणि जेवण बनवत असे, बाकीच्या बायका इतर कामे उरकत. मानसीला ऑफिसला जाताना सगळं आयतं मिळे.

2 महिने झाले, स्वयंपाकिण अचानक गावाला निघून गेली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all