मिळावे तुझे तुला भाग १

जोडीदाराच्या सुखासाठी धडपडणाऱ्या त्या दोघांची कहाणी
मिळावे तुझे तुला..
भाग १
"अहो मी काय म्हणते? मुलं नाराज होतील तुमच्या या निर्णयाने."

"चांगली आहेत हो आपली मुलं. आपापल्या जबाबदाऱ्या कसोशीने सांभाळतात, मग त्यांच्यावर असा अविश्वास का?"

"ते काही नाही? तुम्ही तुमचा निर्णय बदला बरं. मालमत्तेत हिस्सा यावरून त्यांच्यात भांडण नको. उगाच मतभेद नकोत आणि मनभेद ही नकोत."

"शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला पेन्शन आहे. पुरेशी आहे ती आपल्याला. मालमत्तेत माझा हिस्सा कशाला?" आज ना उद्या त्यांचचं तर आहे सगळं" सुमनताई, बोलण्यातून आक्षेप नोंदवत होत्या.

"अगं वेडे, साधी गं खूप तू? आज आपण कुणावर अवलंबून नाही. पण उद्या कोणी पाहिला?"

"वाऱ्याची दिशा बदलते तसे आजकाल माणसं हि दिशा बदलताना बघितलीत मी. आज आपण ठणठणीत आहोत. आपल्या मर्जीनुसार जगू शकतो. खाऊ पिऊ, फिरू शकतो. उदया कोणी पाहिला? त्यामुळे मी जो निर्णय घेतलाय, खूप विचार करून घेतलाय. माधवरावांनी स्वतःच ठाम मत व्यक्त केलं.

"जशी हाताची पाच बोट सारखी नसतात तशी प्रत्येक वेळ आपली राहीलचं कशावरून?"

"मागच्याच महिन्यात तुझी अचानक तब्बेत बिघडली. चार दिवस हॉस्पीटलमध्ये ऍडमिट होतीस. हातातून सारं निसटत असल्यासारखं वाटलं. तुला गमवतोय ह्या गोष्टीची प्रचंड भीती वाटली. तूझ्या पुढे हे माझं आयुष्य, हा पैसा, ही संपत्ती सगळं निरर्थक वाटलं. खरं सांगू, जगण्याला पैसा लागतो ते खरं असलं तरी आपल्या माणसांशिवाय आयुष्याची किंमत शून्य. त्यालाच आली माझी दया." माधवरावांनी भगवंताचे आभार मानले.

सुमनताई आणि माधवराव यांचा लोणच्यासारखा मुरलेला संसार. माधवरावांची सरकारी नोकरी तर सुमनताई गृहिणी. दोन मुलं, मोठा प्रथमेश, लहान सिद्धेश. दोन्ही मुलं आईवडिलांच्या संस्कारात वाढलेले. खुप समजदार आणि जबाबदारही. दोघे ही इंजिनिअर असून आज यशाच्या शिखरावर नाव कमवत होते.

प्रथमेशच्या लग्नाच वय झालं होतं. मुलींचे निरोप यायला लागले होते. रिया एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करणारी दिसायला सुंदर, उच्चशिक्षित, सुस्वभावी मुलगी. कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात बघता क्षणी सर्वांना रीया पसंत पडली. दोन्ही कुटुंबाच्या सहसहमतीने उंबरठा ओलांडून रीया सासरी आली. सुमनताईंना रियाच्या रुपात मुलगी मिळाली.

स्वयंपाकाची सुमनताईंना विशेष आवड. निरनिराळे पदार्थ बनवून गरमागरम खावू घालायला आणि खाणाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला तृप्तीचा भाव बघून त्या भरून पावत.
'टम्म फुगलेली, तव्यातली गरमागरम पोळी, अशी ताटात आली की, दोन घास जरा जास्तीच जातात.' मुलांना आईच्या हातच्या गरमागरम जेवणाचं विशेष कौतुक होतं. परगावी राहत असलेला सिद्धेश मात्र तिकडे हे सगळचं मिस करत होता.

रियाच्या येण्याने सुमनताईंच्या दैनंदिन आयुष्यात तसा फार बदल झाला नव्हता. स्वयंपाक घरातली संपूर्ण जबाबदारी त्या एकहाती सांभाळत. सकाळी धावपळीच्या वेळी, गरमगरम नाष्टा आणि जेवणाचा डब्बा जसा त्या प्रथमेशला देत तसा रियालाही देत. रीया, ऑफिसमधून येइस्तोर सुमनताईंचा स्वयंपाक आवरलेला असायचा. कूकर उघडून ताटात वाढलेला गरमागरम वरण भात त्यावर तुपाची धार आणि आयत्या वेळी बनवून वाढलेली गरम पोळी. "आहाहा! हेचं काय ते, स्वर्गसुख" म्हणत.. माधवराव आणि प्रथमेश उलट्या हाताने जेवणाचा फडशा पाडत. "तू ही बस गं जेवायला", रियाला ही त्या गरमागरम वाढायच्या. रियाला या गरमागरम जेवणाचं मुळीच अप्रूप नव्हतं. 'जीभेचे चोचले पुरवण्यासाठी, फुकट जाणाऱ्या वेळेचा सदुपयोग आणि त्यासाठीचा खटाटोप, असच तिला वाटत होतं. 'सासूच्या हातच गरम खायला नशिब लागतं' ते तिच्या वाट्याला आलं होतं, तो आनंद मात्र मोठा होता.

"सुमा, झाली का गं तयारी? आवर लवकर." आज माधवराव सुमनताईंना, हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रूटीन चेकअपसाठी घेऊन जाणार होते. कामात व्यस्त सुमनताई, 'आज नाही उद्या.. उद्या नाही, परवा' हॉस्पीटलमध्ये जाण्याचं पुढे ढकलण्याच्या तयारीत होत्या.

"अहो, मी काय म्हणते, डॉक्टरांनी दिलेलं औषध गेले महिनाभर गिळतेच आहे की. आता मला बरं वाटतेय. सध्या तरी गरज वाटत नाही. वाटलं तर जावू, चार दिवसांनी?" "आज नको खरंच," सुमनताई विषय टाळत बोलल्या.

"बघ सुमा, वेळेत औषध घेतेयस म्हणून बरी आहेस."
"मागच्या महिन्यात अचानक काय झालं? विसरलीस का? ते काही नाही. डॉक्टरांनी तपासून, औषध घेऊ नका सांगितलं, की खुशाल बंद कर ती औषध. स्वतःच्या मताने औषध बंद करायला डॉक्टर समजतेस की काय स्वतःला? चल तयार हो लवकर" माधवराव दम देत बोलले.

"स्वतःवर ओढवून घेतलेल्या, दुखण्या खूपण्याच्या खऱ्या भागीदार तर तुम्ही बायकाच असता. दुखणं अंगावर काढायचं, औषध वेळेत घ्यायची नाही. खाण्यापिण्याकडे, व्यायामाकडे दुर्लक्ष. वय वाढतयं.. आजारपण पाठी येणारच. विसरून कसं चालेल. इतरांना पोट फुटेस्तो खाऊ घालतेस. स्वतः मात्र, उपासतापास करून स्वतःची भूक मारतेस."

"एका वयानंतर, शरीरातले हाड ढीसुळ होतात. कुरकुर करायला लागतात. हार्मोन्स बदलाचा त्रास संभवतो. आजकाल थकवा तर स्पष्ट दिसतो तूझ्या चेहऱ्यावर. थोडंसं चाललं की फसफस दम टाकतेस. घामेजून जातेस. सांगून थकलो पण "पालथ्या घड्यावर पाणी."

"काही ऐकून घेणार नाही तुझं, हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणजे जायचं." माधवरावांनी ठणकावून सांगितलं."

छान फिक्या गुलाबी रंगाची बारीक फुलांची डिझाईन असलेली आकाशी रंगाची साडी सुमनताईंनी परिधान केली. जाड केसांची लांब सडक वेणी गुंफली. छोटासा बटवा घेतला आणि त्या बाहेर आल्या.

"मी तयार आहे, चला.. काढा तुमची रामप्यारी?

"आहे का तयार ती दोघांचं ओझं वाहायला." सुमनताई गंमतीत बोलल्या.

"म्हणजे काय? तय्यार एकदम"... त्यांनी गाडी सुरू केली.

"बघ एका किकने सुरू होतेय अजूनही. गाडी असो की शरीर, काळजी घ्यावी लागतेच गं. वेळेत सर्व्हिसिंग, ऑयलिंग केलं की गाडी कशी रुळावर धावते. शरीररुपी मशीनचं ही तसच असतं. व्यवस्थित काळजी घेतली तर ते ही निरोगी राहतं." माधवरावांच्या बोलण्यावर सुमनताईंनी होकारार्थी मान डोलावली.

दोघे हि हॉस्पिटलमध्ये पोहचले. "अरे वाह, छान प्रोग्रेस आहे. बीपी तसं बऱ्यापैकी नॉर्मल आलंय. असचं सगळ नियमित सुरू ठेवलंत तर लवकरच गोळ्या कमी करता येईल." डॉक्टरांच्या बोलण्यावर सुमनताई खूश झाल्या.

"दररोज नित्यनियमने अर्धा तास, कोवळ्या उन्हात फिरायचं. शक्य असल्यास, कुणाच्या तरी मार्गदर्शनात थोडा व्यायाम आणि प्राणायाम करायला हरकत नाही. दिलेली औषध वेळच्या वेळी घ्या. खायचं प्यायचं आणि टणाटण राहायचं." डॉक्टर बोलत होते तशा, सकाळचा मॉर्निंग वॉकच्या, विचाराने सुमनताईला हसू आलं.

"अहो, महाग असतील इथे, पुढे बघू"... डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध हॉस्पिटलच्या फार्मसीतून न घेण्याबद्दल सुमनताई सुचवत होत्या.

"सर सलामत तर पगडी पचास" एव्हढा विचार नाही करायचा. म्हणत माधवरावांनी सगळी औषध एकाच वेळी खरेदी केली.

"सुमा, चलं डोसा खाऊया का?" माधवरावांनी विचारलं.

"अहो, घरी स्वयंपाक बनवलाय. डोसा खाल्ल्यावर भूक मरून जाईल. बनवलेल्या स्वयंपाकाच काय?" सुमनताई बोलल्या.

"चल गं!" माधवरावांनी, मोठ्या रेस्टॉरंटसमोर गाडी पार्क केली.

दोन मसाला डोसा आणि सुमनताईंना आवडते तशी भरपूर मलई घातलेली लस्सी माधवरावांनी ऑर्डर केली.

"अहो, घरच्यासाठी घेऊया लस्सी? चव छान आहे!" सुमनताईंनी फर्मान सोडलं.

"मुलांना खाऊ घातल्याशिवाय तूझ्या पोटात घास उतरायचा नाही. पोर बाहेर जातात. त्यांना खरचं अप्रूप असणार का या लस्सीच पण तुझं आपलं काहीच?" बोलता बोलता माधवरावांनी घरच्यासाठी लस्सी ऑर्डर केली.

संध्याकाळची जेवण आटोपल्यानंतर, सुमनताईंनी सर्वांना लस्सी दिली.

"अरे, वाह!! लस्सी".. प्रथमेश पहिला सीप घेत बोलला.

"हॉस्पीटलमध्ये गेलेलो आज. येताना आणली." सुमनताईंनी सांगितलं.

"टेस्टी आहे छान!" प्रथमेश एव्हढच बोलला.

"डॉक्टर काय बोलले?" एवढं विचारायची तसदी सुद्धा पठ्ठ्याने घेतली नव्हती....

काय होईल पुढे, कसा असेल प्रथमेश...