मिळावे तुझे तुला भाग २

एकमेकांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या त्या दोघांची कहाणी
मिळावे तुझे तुला
भाग २

सुमनताईंना औषध सुरू होती. सकाळची आन्हिक, अंगणातली झाडलोट, सडा रांगोळी, कामाची धावपळ या सगळ्यात, मॉर्निंग वॉकला जायचं रूटीन काही केल्या फिक्स होत नव्हतं.

सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरल्याने, जीवनसत्व ड मिळतं. जे हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक असतं. बीपी शुगर नियंत्रणात राहतं. सकाळी फिरण्याचे फायदे समजावून सांगून माधवराव थकले होते. त्यामुळे त्यांची चिडचिड हि होत होती.

"वेळच नसतो.एकमेव कारण सांगून त्यांची चलढक्कल चालू होती.

आजकाल मात्र, माधवरावांना काही चैन पडत नव्हतं. माधवरावांना समाधान मिळावं म्हणून, दुध आणि देवासाठी फुलं आणायच्या निमित्ताने का होईना, आजकाल सुमनताई घराबाहेर पडतं. ते ही नसे थोडके, तेवढं तरी समाधान मिळतं म्हणून. ह्या सगळ्यात सकाळचा चहा, नाष्टा, स्वयंपाक आवरताना मात्र सुमनताईंची दमछाक व्हायची.

एक दिवस रीया ऑफिसमधून घरी आली. जेवणाची वेळ झालीच होती. सुमनताईं सर्वांना गरमागरम जेवण वाढलं.
"रीया तू पण ये पट्कन आवरून" सुमनताई रियाला म्हणाल्या.

रिया, नेमकी ऑफिसमधून येताना छान काहीतरी चटपटीत खावून आली होती. फ्रेश होऊन लगेच ती पलंगावर पहुडली.

"रिया ये गं जेवायला." सुमनताईंनी पुन्हा आवाज दिला.

"अरे यार! यांना सदानकदा खायचं पडलेलं असतं. खाण्याशिवाय अजून हि बरच काही आहे आयुष्यात" रीया पुटपुटली.

रिया मैत्रिणीसोबत मस्तपैकी हादडून आलेली होती त्यामुळे तिला भूक नव्हती. "मला भूक नाही. मी जेवणार नाही. माझ्यासाठी स्वयंपाक बनवू नका." सांगण्याच सौजन्य हि तिने दाखवलं नव्हतं.

"आई अगं, नसेल तिला भूक. तसं ही ती आज मैत्रिणींबरोबर बाहेर जाणार होती. नक्कीच काही तरी खावून आलेली असेल. तू कशाला उगाच तिच्या मागे रक्त आटवतेस?"

"अरे सांगायचं ना तसं, मी तिच्यासाठी स्वयंपाक नसता न बनवला." सुमनताईं नाराज सुरात पुटपुटल्या.

"प्रत्येकच गोष्ट काय गं सांगायची? व्यक्तीस्वातंत्र्य नावाची काही गोष्ट आहे की नाही घरात." प्रथमेशने सुनावलं. आणि सुमनताईंच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं.

"रियाने सांगितलं असतं, तिने विचारलं नसतं."
"तूझ्या आईची सवय माहिती आहे ना तुला. तुझ्यात आणि रीयामध्ये री कधी दूजाभाव करत नाही?"
"तिने जेवायला ये म्हणून विचारलं. रियाने सांगितलं नाही. म्हणून तिने पुन्हा पुन्हा आवाज दिला. बास्स एवढच!!.. इथे व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे कुठे आलं?" माधवराव समजावण्याचा सुरात बोलले.

"आता जेवू की नको. जेवणाच्या ताटावर दोन घास सुखाचे गिळायला मिळत नसतील तर काय अर्थ आहे." ताटात वाढलेलं मुकाट्याने खावून संपवलं आणि प्रथमेश तावातावाने रूममध्ये निघून गेला.

"अहो तुम्ही कशाला, उगाच बोललात आमच्यामध्ये. आम्ही आमचं आमचं बघून घेतलं असतं ना." इति सुमनताई.

"तू काळजीपोटी सगळं करतेस. त्यांना मात्र त्याचं ओझ वाटतंय? कळतंय का?"

"आणि हो.. उद्यापासून सकाळ संध्याकाळ फिरायला यायचं माझ्यासोबत." माधवरावांनी स्पष्टच सांगितलं.

"स्वयंपाक!"
"आणि स्वयंपाक कोण बनवणार?" सकाळी किती धावपळ असते. त्या धावपळीत जमणार आहे का मला." सुमनताई पुटपुटल्या.

"चुलीत गेला तो स्वयंपाक आणि ती काम. पाचवीला पुजलीत ती तूझ्या." माधवराव फणफणत खोलीत निघून गेले.

"माझं काय चुकलं?" अनुत्तरीत प्रश्र्नासह दोन घास कसेबसे सुमनताईंनी पोटात ढकलले. सगळं आवरून त्या ही खोलीत झोपायला निघून गेल्या.

"सुमा, माझ्यासकट सर्वांच्याच सवयी बिघडवून ठेवल्यास तू."अंगावर पांघरून घेत माधवराव बोलले.

"पण आता या प्रपंचातून थोडी मोकळी हो. मोठी झालीत आता मुलं. त्यांच त्यांचं आयुष्य आहे. उगाच त्यांच्या आयुष्यात लुडबूड कशाला?" माधवरावांच्या बोलण्यावर, सगळं समजल्यागत सुमनताईंनी फक्तच मान डोलावली.

दुसऱ्या दिवशी.. माधवराव सकाळी सकाळी उठले. दोन ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून, एक ग्लास त्यांनी स्वतः तर एक ग्लास सुमनताईंना दिला. पायात बूट घालून सुमनताई पण माधववांसोबत फिरायला निघाल्या.

"वाह!! आज जोडीने फिरायला." रस्त्यात चालताना, चार जणांनी तरी कौतुकाने विचारलं होतं.

"आई, चहा दे गं..!"
सकाळच्या कामात व्यस्त तरी, ब्रश झाल्या लगेच गरमागरम वाफाळत्या चहाचा कप हातात देणारी आई आज अवतीभोवती नव्हती. कालचा प्रकार आठवून प्रथमेशला कसनुसच झालं.

सुमनताई फिरून घरी आल्या. झोपाळ्यावर प्रथमेश पेपर वाचत बसला होता. आल्या लगेच त्या स्वयंपाक घरात शिरल्या. एका शेगडीवर चहाचं अंधण ठेवलं तर दुसरीकडे भाजीला फोडणी दिली आणि हात लागल्या पोळ्यांची कणीक मळायला घेतली.

चहा गाळाला आणि चहाचा कप बाहेर बसलेल्या प्रथमेशला नेवून दिला.

"आई अगं, कामाचं टेन्शन असतं खूप. तरी काल चुकलंच माझं" उगाच कारणं नसताना, शब्दाला शब्द वाढला. प्रथमेश झल्यागेल्या प्रसंगाची स्वतःलाज लाज वाटली.

"टेंशन काय फक्त तुम्हालाच असतात काय रे? आम्हाला नसतात?"

"आजवर, एकदा तरी तुझे बाबा.. एवढ्या चढत्या आवाजात बोलले का माझ्याशी कधी?"

"प्रेम काय असते?तुमच्या लेखी प्रेमाची परिभाषा काय? माहिती नाही. पण आमच्या वागण्या - बोलण्यात एकमेकांप्रती आदर आणि सन्मान, तेच आमचं प्रेम...
एकमेकांच्या सुखासाठीची धडपड, तेच आमचं प्रेम.
एकमेकांसाठी झटतो. सुख दुःख वेचतो, वाटून घेतो.
अडीअडचणींना एकत्र सामोरे जातो.
आपल्या जोडीदाराचा अनादर झाला तर होईल का बरं सहन... यापुढे लक्षात असू दे. बोलताना विचार कर." शब्द शास्त्रासारखे असतात, घाव करतात. एकदाची जखम भरून निघेल पण काळजात रुतलेला शब्द, ती जखम नाही बरी होत कधीच." एवढं बोलून सुमनताई मुकाट्याने स्वयंपाक घरात शिरल्या.

"सुमा, भाजी आणली गं. ताजी ताजी अंबाडीची भाजी पण आणली, तुला आवडते ना. अंबाडीची भाकर आणि लाल मिरचीचा ठेचा छान बेत होऊ दे आज रात्रीच्या जेवणात." माधव रावांनी भाजीची पिशवी, घरात नेऊन ठेवली. आल्या आल्या त्यांनी पेपरच पहिलं पान प्रथमेशकडून मागून घेतलं. "आज काय विशेष" नेहमीसारख्या बातम्यांवर चर्चा हि झाल्या. काल काही न झाल्यासारखं, वातावरण पुन्हा तयार झालं. प्रथमेशला बर वाटलं होतं.



🎭 Series Post

View all