मिळावे तुझे तुला भाग ३

एकमेकांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या त्या दोघांची कहाणी
मिळावे तुझे तुला
भाग ३


"सुमा, चल आवर लवकर, सहा वाजता निघूया!"

"अहो कुठे?" कुठे जायचंय? सुमनताईं विसरल्या होत्या.

"सायंकाळचं फिरायला. बघ कसा गारवा आलाय वातावरणात" माधवराव.

"दिवेलाणीच्या वेळी, असं कोणी फिरायला जातं का? तुम्ही बरे संटे बाई बंटे निघू शकता. मला नाही जमायचं." सुमन ताईंनी नाही म्हणून सांगितलं.

"तुला म्हणालो ना जायचं म्हणजे जायचं. तुझा तो स्वयंपाक आधी कर किंवा आल्यानंतर कर."

"तुझा देव फिरायला नाही म्हणणार आहे का? तसं ही आमचं ठरलंयं. यापुढे मी तुझी काळजी घेईल. तूझ्या स्वस्थ्याकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. त्याने संधी दिलीय मला. तुझी काळजी घेण्याची."

"देवाला तेव्हाच सांगून टाकलंय, तूझ्या वाट्याचे सारे... देईल मी तुझे तुला..."
"तू काय मला देवासमोर तोंडघशी पाडणार आहेस का?"

"चल आवर लवकर! नाही तर तो तुझा देव माफ करणार नाही मला".. माधवरावांची बडबड सुरु होती.

"काही तरीच तूमचं" माधवरावांच्या बोलण्यावर सुमनताई गोड हसल्या.

"सुमा, हसलीस की काय गोड दिसतेस गं आजही. आजही तूझ्या गालावरची खळी काय सुंदर खुलते."

"लग्न ठरल्यानंतर.. मैत्रिणीच्या घोळक्यात बसलेली तू. तिरक्या नजरेने, मधूनच माझ्याकडे बघत होतीस. ती भेदक नजर आणि तूझ्या लांब सडक केसात माळलेला, कानामागून डोकावणारा तो लाल गुलाब...अहाहा!"

"ओ मेरी जोहरो जबी.. तुझे मालूम नहीं.. तू अभी तक हैं हसी, औंर मैं जवा... तुझपे कुरबा हैं मेरी जान मेरी जान।" मानेला झटके देत, माधवराव तालासुरात गुणगुणत होते.

"इश्शSS" काहीतरीच तुमचं".. सुमनताई गोड लाजल्या.

"तुमचं आपलं काहीच, शोभत का या वयात"
"आणि हो, हेकेखोर झालात बर का हल्ली?"
"चिडचिड ही वाढलीय म्हटल"
"जिद्दी झालात अगदी. नातवंडं खेळवण्याच्या वयात जिद्द कसली करता." गालातल्या गालात हसत सुमनताई बोलत होत्या.

"दोन पिढ्या एकत्र राहणार, विचारांमध्ये तफावत असणारचं. शब्दाने शब्द वाढत जातो त्यापेक्षा आपण मोठे.. आपण गप्प बसायचं. काल विषय टाळता आला असता." सुमनताई शांतपणे बोलत होत्या.

"दिवसागणिक शरीराबरोबर मन ही थकत गं माणसाचं."

"शरिरापेक्षा, या मनाला आता जास्ती जपावं लागतयं असं हि वाटतं कधीकधी."

"आजपर्यंत आत्मसन्मानाने जगलेलो आपण आता यानंतर दुसऱ्यांच्या अधीन होणार, ही भावना कातर करून जाते."

"लवकरच मी रिटायर्ड होणार. सेवापूर्ती माझी!!"

"पण तू....!!" माधवराव बोलताना हळवे झाले.
"म्हणतात ना, घरची स्त्री रिटायर्ड होतच नाही कधीच."

"आपण सततच अवैलेबल असण्याची एकदा का इतरांना सवय झाली की, आपली किंमत उरत नाही. मग हळूहळू आपल्याला गृहित धरायला लागतात. तुझ्या बाबतीत तेच झालेलं नकोय मला."

"तुझा सन्मान तो माझा सन्मान. आजवर केलस खूप सर्वांसाठी. पण आता यापुढे, थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा. आयुष्याच्या शेवटी, दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगलोच नाही असं वाटायला नको!"

"खूप करतेस तू, जरा जबाबदाऱ्या झटकायला शिक. आणि हो, तुझा अपमान झालेला मी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही."

तूझ्या वाट्याचा मान, सन्मान तुला मिळायलाच हवा. तेव्हा जमेल तेवढं स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न कर" माधवराव काकुळतीने बोलत होते.

"अहो आपण स्वावलंबीच आहोत? आतापासून असा अविश्वास दाखवून, नात्यात परकेपणा आणायचा का?"

"आज ना उद्या आपलं ते त्यांच" सुमनताई बोलल्या.

"सुमा अगं, एक वय झालं की, प्रपंच थोडा दूर सारून स्वतःसाठी जगायला शिकता यायला हवं. बाकी मरेपर्यंत हा रहाटगाडा ओढणे आहेच की."

"आज प्रत्येकाला त्यांची त्यांची स्पेस हवी असते. ती आपण द्यायला हवी. मुलाचं लग्न झालं सून घरात आली. काहीच दिवसात आपल्या सिद्धेशच लग्न होईल. त्यांच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ करतोय असं त्यांना कदापि वाटायला नको. तेव्हा आज, आतापासून.. थोड सोडून द्यायला शिकायला हवं."

"दिवसागणिक प्रत्येकाच्या गरजा बदलतात. कशाला आणि कोणाला प्राधान्य द्यायचं? याला सुद्धा महत्व आहेच."

"आज आई आई करत मागे धावणार लेकरू... उद्या बायकोशिवाय पान हलणार नाही. त्यात वाईट काहीच नाही." मनाची तयारी करून आपण या सगळ्यासाठी सज्ज असायला हवं "माधवराव निर्वाणीचं बोलल्यागत बोलत होते.

सुमनताईंना कुठे तरी त्यांचं असं निर्वाणीच बोलणं खटकलं होतं. 'त्यांच्या मनात नक्की काय चाललयं' याचा थांग मात्र लागतं नव्हता. सुमन ताईंना आता, त्यांच ही मन सांभाळावं लागणार होतं.

स्वयंपाकाची थोडी थोडकी तयारी करून, हल्ली दोघे ही नियमित संध्याकाळी फिरायला जात. आता हे रोजचंच झालं होतं.

प्रथमेश ऑफिसमधून आज जरा लवकरच घरी आला. बघतो तर, घराला लॉक. त्याने त्याच्याजवळ असलेल्या किल्लीने दरवाजा उघडला.

"आई बाबा, तुम्ही कुठे गेला होतात." दोघांना असं एकत्र बहरून आत येताना बघून त्याने विचारलं.

"का रे?" सुमनताईंनी काळजीच्या सुरात विचारलं.

"अगं दाराला कुलूप बघायची सवय नाही. तू घरीच असतेस ना. थकून भागून ऑफीसमधून आल्यानंतर एक कप चहा ही नशिबात नव्हता आज?"

"फिरायला घेऊन जातोय हल्ली रोज हिला. आज आमच्यातल्याच एका नव्वद वर्षाच्या आजोबांचा वाढदिवस. म्हणून उशीर झाला. माधवरावांनी सांगितलं.

"नव्वद वर्ष.. बापरे!" एवढं लांब आयुष्य? आणि आमचं इथे, टेंशनने अर्ध आयुष्य सरल्यासारखं वाटतेय. काहीशा नर्व्हस सुरात प्रथमेश बोलत होता.

सुमनताई पटकन आत गेल्या. प्रथमेशला आवडतो तसा, आल टाकून कडक चहा त्यांनी प्रथमेशसाठी चटकन बनवून आणला. गरमागरम वाफाळत्या चहाचा कप आणि सोबत फरसाण ही दिलं.

"बरं झालं गं फरसाण दिलंस, आज नेमकी खूप भूक लागली होती." प्रथमेशने लगेच फरसाण चा एक बुक्का तोंडात टाकला.

सुमनताईंचा आता नवीन टाईम टेबल तयार झाला होता. बीपी, शुगर नॉर्मल येत होती. तुमच्या आहार विहारात केलेल्या बदलामुळे हे शक्य झालंय. डॉक्टरांनी त्यांचं कौतक केलं होतं. खरं तर, माधवरावांच्या जागरूक हट्टामुळे हे शक्य झालं होतं. हे त्यांना ही मान्य होतं.

क्रमशः



🎭 Series Post

View all