मिळावे तुझे तुला भाग ४

एकमेकांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या त्या दोघांची कहाणी
मिळावे तुझे तुला
भाग ४

माधवरावांना रिटायर्ड होऊन आज चार महिने झाले होते. वाऱ्याच्या तालावर फडफडणाऱ्या, दारावर लटकलेल्या कॅलेंडरच मागच्या महिण्याच पान त्यांनी हलकेच बदललं. येत्या महिन्यातल्या तारखांकडे आशाळभूत नजरेने एकटक बघत राहिले.

"बाजूला व्हा हो बाबा? असे काय तुम्ही मध्येच रस्त्यात उभे. पटापटा आवरून ऑफिसला पळायचंयं. घाईत तुम्ही काय असे अध्येमध्ये लुडबूड करता" प्रथेमश ची जराशी चिडचिड होतेय, त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

"अरे कॅलेंडरचं पान बदलतोय?" इति माधवराव.

"आता यापुढे तुमचे सगळे दिवस सारखे असणार आहेत बाबा. कॅलेंडरचं पान बदलवून काय मोठा फरक पडणार आहे. तुम्ही आता, खायचं प्यायचं आणि गप्पा ठोकत बसायचं.
"ईट्स कॉल्ड रिटायर्ड लाईफ."
" लकी यू आर"
"आणि अख्खा दिवस पडलायं तुमच्यापाशी. आम्ही गेल्यावर निवांत करा की ही काम. वेळच वेळ तर असतो तुमच्यापाशी. सकाळी आमच्या धावपळीत, बसून राहतं जा तुम्ही एका जागी." उगाच आमच्या घाईत अडखळलात, काही झालं तर... आम्हाला काही ते परवडायचं नाही." प्रथमेश बोचऱ्या शब्दात बोलला.

प्रथमेशच्या बोलण्याने जरासे विचलित माधवराव. शब्द, त्यांच्या मनात जावून रुतले होते जणू.

" हे घ्या... कॅलेंडर आणि जा तुमच्या रूममध्ये." तसाही आम्हाला काहीच उपयोग नाही त्या कॅलेंडरचा." प्रथमेशने दारावरच कॅलेंडर काढून, माधवरावांच्या हाती दिलं. घाईघाईत पायात बूट सरकवले आणि ऑफिसमध्ये पळाला.

'एक एक दिवस सरतो, आठवडा, महिने आणि वर्ष ही सरत जातात. आपलं आयुष्य ही एक एक क्षणाने कमी कमी होत जातं. वर्ष संपलं की नवीन कॅमेंडर घरात येतं आणि वर्षभर दिशा दाखवणार, साथ देणारं.. सुख दुःखाचं भागीदार जुनं कॅलेंडर, उचलून बिनदिक्कत आपण ते रद्दीत फेकून देतो. काय काय बघितलं असतं या कॅलेंडर ने. त्याचा विचार माञ कुणीच करत नाही.
माणसाचं, रिटायर्ड लाईफ म्हणू की म्हातारपण.. असचं तर असतं. या फडफणाऱ्या निरुपयोगी कॅलेंडरसारखं... काहीसं अपेक्षित' कॅलेंडर खोलीत नेऊन त्यांनी एका भिंतीवरच्या खिळ्याला टांगलं. फडफडणाऱ्या कॅलेंडरकडे एकटक बघत राहिले. सुमनताईंच्या नजरेतून हे सुटणार थोडीच होतं.

"अहो, एव्हढ काय आपल्या पोटच्या पोरांच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायचं. त्यांना ही त्यांचे त्यांचे व्याप असतात. कामाच टेन्शन असतं. बढतीची काळजी असते. तुम्हीचं म्हणता, आजकाल स्पर्धा खूप वाढलीय. या स्पर्धेत टिकायच म्हणजे पावलोपावली स्वतःला सिद्ध करावं लागतं. क्षणाक्षणाला परीक्षा असते" सुमनताईंचा बोलण्याचा ओघ प्रथमेशच्या दिशेने झुकत चालला होता.

"माहिती आहे गं मला. त्यांना त्यांची त्यांची टेन्शन असतात. पण, मी पण केलीच ना नोकरी एवढी वर्ष. आठवत असेल तुला? मुलं लहान होती. हाच आपला प्रथमेश, मी ऑफिसला जायच्या वेळी जवळ येऊन माझ्या पायाशी लोटांगण घालायचा. दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवायचा. त्याला गाडीवरून चक्कर मारली, की मगच सोडायचा. अगदी रोजच होतं हे."

"मी नाही, केली कधी चिडचिड." माधवरावांनी लांब उसासा टाकला. "घाई असायची, तरी तेवढ्या घाईत त्याला गाडीवर चक्कर मारून आणायचो. मगच ऑफिसला जायचो. कधीकधी खूप धावपळीच नाहीच शक्य झालं तर किती रडायचा? धुमाकूळ घालायचा. रडून रडून तुला भरीस पाडायचा. मुलांसाठी तू तरी काही कमी केलंस का? शिकलेली होतीस पण बाहेर जावून नोकरी करता आली नाही तुला."

"मुलांसाठी आपण काय केलं. त्याचा हिशोब नाही बरं का मांडत मी. जशी आपण आपली कर्तव्य चोखपणे बजावली. आता मुलांनी त्यांच्या कर्तव्यात चूकू नये, एव्हढी त्यांच्याकडून अपेक्षा करणं ते ही चुकीचं का ग"...

"सुमा, मुलं मोठी होतात. काळानुरूप बदलतात. आपण मात्र तिथेच राहतो!"... माधवरावांना दाटून आलं होतं.

'दिवसागणिक माधवराव जरा जास्तीच हळवे होत आहेत की काय?' धीर खंबीर धाड धिप्पाड नवऱ्याचं हे हळवं रूप बघून, सुमनताईंना त्यांची आजकाल जास्तीच काळजी वाटत होती.

सिद्धेश आणि सूप्रिया... दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी एक होण्याचा निर्णय घेतला. "मिय्या बिबी राजी तो क्या करेगा काजी" नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. सर्वसहमतीने खूप आनंदात लग्न सोहळा संपन्न झाला. घरात लक्ष्मीच्या रुपात सूप्रियाचा गृहप्रवेश झाला. दोन्ही मुलांच्या कर्तव्यातून आता मोकळं झाल्याची भावना आणि मुलं आपल्या संसाराला लागली याच समाधान घेऊन दोघांचा ही आला दिवस आनंदात जात होता.

सिद्धेश आणि सूप्रिया दुसऱ्या शहरात नोकरी करत असल्याने काही दिवसांसाठी दोघे, त्यांच्याकडे पण जावून आणि राहून घरी परतले होते.

"बऱ्याच दिवसांपासून फिरणं बंद झालंय. आजपासून सुरू करूया पुन्हा, चलतेस का फिरायला?" माधवरावांनी सुमनताईंना विचारलं.

"प्रवासाचा शीण आहेच. मी उद्यापासून येते" सुमनताईंनी सांगितलं.

माधवराव, खूप दिवसानंतर आज एकटेच फिरायला निघाले होते. सगळ्या ओळखी पाळखीच्या लोकांची विचारपूस करत फिरणं सुरू होतं. फिरून माघारी घरी आले तर माधवराव कुठल्याशा विवंचनेतच दिसले. काहीशा विचारात गढलेले. जेवढ्या उत्साहात ते गेले होते तो उत्साह घेऊन परतले मात्र नव्हते. दुपारी वकिलाला फोन करून त्यांनी बोलवून घेतलं. प्रॉपर्टीच्या वाटण्या करायचा निर्णय त्यांनी घेतला होता.

"वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे दोन मुलांसाठी त्यांनी सारखे हिस्से करून दिले होते. उभ्या आयुष्यात कमावलेली मालमत्ता त्यात त्यांनी तीन सारखे हिस्से केले होते. घर म्हणजे फक्त या भिंती नाहीत तर आमची खरी समृद्धी आहे. तुम्ही आमची मुलं त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बायका पोरांचा या घरावर अधिकार आहे. पण या घरातून आम्हाला, बाहेर काढण्याचा अधिकार तुम्हाला नाही. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात नमूद केलं होतं."

सुमनताईंना हे मुळीच आवडलं नव्हतं. आपल्याला पेन्शन आहे मग तिसरा हिस्सा का आणि कशाला? हा आपल्या मुलांवर अविश्वासच नाही का? उगाच आपल्यानंतर त्या तिसऱ्या हिस्स्यासाठी त्यांच्यात भांडणं कशाला? त्यांनी शांतपणे विचारलं.

"आज मी आहे, उद्या मी नसेन. तुझं मनापासून करणाऱ्यांनाच तुझा हिस्सा मिळेल. मुलांची जबाबदारी, करायचं म्हणून करणं ते वेगळं आणि कर्तव्य समजून मनापासून आईवडिलांची सेवा करणं वेगळं." यातला फरक त्यांनी सुमनताईंना समजावून सांगितला.

"आपलं आयुष्य किती? ते किती लांब असणार हे त्या विधात्यालाच माहित. आजवर मी बाहेर जावून नोकरी केली आणि तू संसार सांभाळलास. आज आपली दोन्ही मुलं आपापल्या पायावर उभी आहेत. खऱ्या अर्थाने तू त्यांना सक्षम बनवलंस." त्यांनी, सुमन ताईंना जवळ बसवलं.

"सुमा, आजवरच्या तूझ्या आयुष्यात अपेक्षेप्रमाणे तुला हवं ते मी देऊ शकलो का माहिती नाही? परंतु माझ्यानंतर तुला काहीच कमी पडू नये. तूझ्या वाट्याचं सारं काही तुला सहज मिळावं, ह्याची तरतूद मात्र मी करून जाईल." काही काय बोलता? म्हणत, सुमनताईंनी त्यांना बोलता बोलता थांबवलं.

"गप्प बसा!" असं निर्वाणीच काय बोलता. सुमनताईंनी स्पष्टच बजावलं.

"आज ना उद्या दोघांपैकी, एक लवकर तर एक आठवणीत जगण्यासाठी मागे राहाणार."

"उद्या कोणी पाहिला?" बोलताना माधवरावांच्या कपाळावर आठयांच जाळ जास्तच गडद झालं आणि क्षणात विरलं ही. माधवराव शांतपणे खुर्चीला टेकले आणि त्यांनी हळूच डोळे मिटले.
क्रमशः

🎭 Series Post

View all