मिळावे तुझे तुला भाग ५ अंतिम

जोडीदाराने घेतलेल्या निर्णयाच फलित
मिळावे तुझे तुला
भाग ५

माधवराव खुर्चीला मागे टेकले आणि त्यांनी हळूच शांतपणे डोळे मिटले. बसल्या बसल्या त्यांना दरदरून घाम फुटला होता. त्यांची ती अवस्था बघून, सुमनताई घाबरल्या त्यांनी लगेच प्रथमेशला आणि अँब्युलन्सला फोन केला.

"अहो, काय झालं... काय झालं तुम्हाला..?" त्यांना हलवून हलवून उठवत होत्या. माधवरावांना हॉस्पीटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. पण काळाला काही तरी वेगळंच मान्य होतं. क्षणांत होत्याच नव्हतं झालं होतं. बीपी, शुगरचं काय? पण कुठलाच आजार नसलेल्या माधवरावांना हार्ट अटॅक येऊन गेला होता. दूरच्या प्रवासाला ते एकटेच निघून गेले होते.

'असे कसे तुम्ही अचानक निघून गेलात. काहीच न सांगता.' माधवराव आता या जगात नाही,à यावर विश्वास ठेवायला सुमनताई मुळीच तयारच नव्हत्या.

क्षणभंगूर या आयुष्याचा
न लागे कधी ठाव
नशिबाने मांडला का?
आगळाच डाव

उभ्या या आयुष्याला
नसे दिडदमडीचा भाव
निघून गेला श्वास अन्
रिता झाला गाव

जोडीदाराचं असं अनपेक्षितपणे आयुष्यातून निघून जाणं सुमनताईंसाठी पचवणं जरा कठिण जाणार होतं. त्यांनी केलेल्या वाटण्या. आपल्या अर्धांगिनीला दिलेला हिस्सा. घरावर पहिला हक्क. सगळं सगळं डोळ्यांसमोरून तरळलं आणि डोळ्यात आटलेल्या अश्रूंचा अखेर बांध फुटला.

'काय करू मी या सगळ्याचं?' सगळं च व्यर्थ होतं.

'तुम्ही मला एकटे सोडून निघून गेलात. आता मी कसं जगायचं आणि कुणासाठी?' पडलेल्या प्रश्नांचं उत्तर द्यायला माधवराव मात्र नव्हते.

डोळे नुसते झरत होते. एवढ्या दिवसात सुमन ताईंच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. पाझरणाऱ्या डोळ्यातल्या अश्रू सवे, बऱ्याच दिवसांनंतर आज त्यांचा डोळा लागला.

"सुमा, अशी कशी गं तू...
"बघ कशी अवस्था करून घेतलीस स्वतःची."
"तू असे हातपाय झटकले तर, मला मिळेल का मुक्ती."
"एक ना एक दिवस दोघांपैकी कोणा एकाला जावं लागतचं" "मी आधी गेलो, बसं इतकचं!"
"सावर स्वतःला.. काळजी घे, स्वतः कडे लक्ष दे, बघ डोळ्यांखालची वर्तुळ कशी गडद झालीत"... उशाशी बसून, माधवराव त्यांच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत होते.

"अहो, आलात तुम्ही!" त्या हळूवार स्पर्शाने, सुमनताई खडबडून जाग्या झाल्या.

भिंतीवर टांगलेला, हार घतलेला फोटो समोर बघून..
हा तर फक्त भास होता, सुमनताईंना जाणीव झाली.

अवघ्या एका क्षणात
जीवन ज्योत मालवली
आठवांच्या पैलतीरी
तू अश्रूंची सरिता वाहिली....

"येणारा एक दिवस जाणारच". एवढंच सांगायला, माधवराव आले होते बहुतेक.

तेरा दिवसांचे कार्य पार पडले. हळूहळू आलेले सगळे पाहुणे पांगले. प्रथमेश, सिद्धेशने या दिवसांत आईला खूप जपलं होतं. रीया सूप्रिया दोघी त्यांना, एकटं वाटू नये म्हणून काळजी घेत होत्या. रोजचा सकाळचा चहा, प्रथमेश आईसोबतच घ्यायचा. फरक मात्र एव्हढा होता चहा प्रथमेश ने बनवलेला असायचा. आलं आणि वेलची घालून बनवलेला, आईला आवडतो अगदी तसा. दोन्ही सूना, कर्तव्यदक्ष सुनेच्या भूमिकेत खऱ्या उतरण्याचा प्रयत्न करत होत्या.

आज, प्रथमेश रोजच्या वेळेवर उठला. चहा ठेवणार तोच... "आई ग.. ये आई" प्रथमेशच्या हाकेला "ओ" आली नाही. प्रथमेश ने इकडे तिकडे बघितलं. आई नव्हतीच. तो सैरभैर झाला. सुमन ताई कुठे गेल्या? विचाराने सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

"बाबा, गेल्यापासून आई गप्प गप्प असते. कुणाशी फार बोलत नाही. शून्यात हरवल्यासारखी एकटीच एकटक बाबांच्या फोटोकडे नजर खिळवून असते बसलेली."
"आई कुठे गेली असेल?" सगळ्यांना प्रश्न पडला.
मन चिंती ते वैरी न चींती म्हणतात तेच खरं होतं. वेगवेगळे विचार क्षणात डोकावून गेले. प्रथमेश आणि सिद्धेश शोधायला बाहेर निघणार तोच, सुमनताई समोरून येताना दिसल्या.

पायात स्पोर्ट्स शूज बघून, सर्वांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

"आई, अग फिरायला गेली होतीस."

"हो," म्हणत सुमन ताईंनी हलकेच मान डोलावली.
"मी स्वतःची काळजी घेत नाही, तूझ्या बाबांची तक्रार असायची नेहमी आता त्यांना तक्रार करण्याची वेळ मी येऊ देणार नाही." सुमनताई खंबीरपणे बोलल्या.

आई स्वतःला सावरू बघतेय, बघून सर्वांना समाधान वाटलं होतं.

रीया आणि सूप्रियाने संपूर्ण स्वयंपाक घराचा ताबा घेतला होता. सकाळचा नाष्टा झाला, दुपारची जेवणं आटोपली आणि सगळे दुपारी हॉलमध्ये एकत्र बसले होते. सिद्धेश आणि सूप्रियाला आता दोन दिवसांनी निघाव लागणार होतं.

"प्रथमेश, सिद्धेश.. हे तुमच्या बाबांचं मृत्युपत्र..!" सुमनताईंनी एक फाईल समोर धरली.

"बाबांच मृत्युपत्र!" दोघांना बघून आश्चर्याचा धक्का बसला होता.

'प्रॉपर्टीचा बराचसा हिस्सा बाबा आईच्या नावावर करून गेले होते. आईच्या नावे असलेल्या, प्रॉपर्टीच पुढे काय? कोणाला द्यायची? हा निर्णय सर्वस्वी त्यांनी आईवर टाकला होता. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नाही तर विचारांती सगळे निर्णय तिने घ्यायला हवेत असं मृत्युपत्रात स्पष्ट नमूद केलं होतं.' मृत्युपत्र वाचून सगळे थक्क झाले.

"मला एक, "ओल्ड एज होम" काढायचं आहे." जिथे आमच्यासारखी घरातली, जुनी खोड सन्मानाने राहू शकतील." सुमनताई शांतपणे बोलल्या.

"आई अगं, तू.. हा असा.. निर्णय का? आणि कशासाठी? आई तुला विश्वास नाही का आमच्यावर. बाबा आम्हाला सोडुन गेले आता तू परक करणार का आम्हाला." सिद्धेश आणि प्रथमेश सुमनताईंच्या पायाशी येऊन बसले. त्यांनी हळूच दोन्ही मुलांकडे बघितलं.

"असं काही नाही रे लेकरांनो." तुम्ही तर आमचे दोन हात आहात.

"परदेशात स्थायिक झालेला मोकादमांचा मुलगा आला आणि आपल्याच नाही तर आईवडिलांच्या वाट्याच ही विकून दूरदेशी निघून गेला. अंगावरच्या कपड्यांशिवाय त्यांच्याजवळ आता काहीच उरलं नाही.
त्यांच्यासाठी......

"तिन्ही मुलांना, प्रॉपर्टीत हिस्सा सारखा मिळाला मग, "मीच का? करायचं तुमचं.. तो ठेका, माझाच का?" दिवसरात्र मुलाच्या बोलण्याने, तीळ तीळ तुटणाऱ्या
सरनोबतांसाठी...

"घर छोट पडत म्हणून, रुखामाबाईंची रवानगी स्वतःच्याच घरात अडगळीच्या खोलीत केली गेली. आता या अडगळीच्या खोलीत चार चार महिने कोणी साधं डोकावून देखील बघत नाही. मेली की जीवंत आहे याची मोजदाद नाही" त्या रखमासाठी....

दारूच्या व्यसनातं डूबलेल्या... नशेत आई वडील आहेत याचं ही भान विसरलेल्या.. आईवडिलांना मारणाऱ्या, दारुड्या प्रकाशच्या आईवडिलांना आपलसं वाटावं म्हणून... सन्मानाने राहता यावं म्हणून..
त्यांच्यासाठी......

"आई अशी कशी गं तू साध्या साध्या गोष्टी तुला कळतं नाहीत. मला माझी खूप काम असतात? आता यापुढे फोन करायचा नाही म्हणून दम देत, आईचा नंबर ब्लॉक करून टाकला. उच्च पदावर असलेल्या त्या उच्चशिक्षित लेकीच्या,
आईसाठी......

"घरी मोठं पॉश महागड हॉटेल.. देशविदेशातून आलेल्या मोठमोठ्या लोकांच्या पार्ट्या होतात. चार भिंतींच्या आत मात्र.. आवडीच्या पदार्थांचे चार घास ही नशिबात असलेल्या त्या श्रीमंत,
माऊलीसाठी....

घरात मुलं, सूना, नातवंडं असताना, आपल्याच हक्काच्या घरात एकटेपणाची भावना सतावणाऱ्या, हतबल, असहाय्य, अगतिक, प्रत्येकांसाठी असेल हे "आपुलकीचं घर!"
सुमनताईंचे डोळे पाणावले होते....

आई, आम्हाला तुम्ही दोघांनी खूप शिकवलं. मोठ केलं.. आज आम्ही यशस्वी आहोत ते तुमच्यामुळे.
"आपुलकीचं घर"
"तुझा निर्णय अंतिम असेन."
"तू एकटी नाहीस, मी तूझ्यासोबत असेन नेहमी" बाबांना गमावलयं आता मला तुला जमवायचं नाही." म्हणत प्रथमेशने सुमनताईंचा हात हातात घेतला आणि आईला घट्ट कवटाळून घेतलं.

"आई, पण यात बराच खर्च होणार. आता आमच्या लग्नानंतर तुम्ही दोघे ही तिकडे येत जात राहाल म्हणून आम्ही थ्री बीएचके डुप्लेक्स बंगलो बुक करणार होतो. आता माझं ते स्वप्न मागे पाडणारं असं दिसतेय."
"मी काय म्हणतो, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग असतात ते. आपणच का म्हणून? सरकार आहे अशांना वृध्द वंचितांना मदत करायला. वृध्दाश्रम वगैरे, मला तरी ही कल्पना फार काही आवडली नाही." आणि घरात मुलं असताना, वृद्धाश्रमाची गरज च का पडावी? पकडलेल्या हाताची पकड सिद्धेशने सैल केल्याचं सुमनताईंना लक्षात आलं.

"एका हाताची पाच बोट सारखी नसतात. एकाच आईच्या पोटातून जन्म घेतलेली मुलं सारख्या विचारांची कशी असतील?" माधवरावांच वाक्य सुमनताईंना आठवलं.

"बघितलंत, आज मी माझा निर्णय घ्यायला सक्षम आहे. आज खऱ्या अर्थाने मी कुणावरच अवलंबून नाही." शक्य झालं केवळ तुमच्यामुळे. हार घातलेल्या माधवरावांच्या फोटोकडे बघून, सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

सोडूनिया जाता जाता
सहजीवनाचा अर्थ कळला
सखे आस एक मनीची
मिळावे तुझे तुला
मिळावे तुझे तुला......

हार घातलेल्या फोटोत, माधवरावांच्या चेहऱ्यावर समाधानाच गोड हसू होतं आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाचा तृप्त भाव होता.
समाप्त....




🎭 Series Post

View all