Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी 33

Kamal Ved
मिळावे तुझे तुला आस ही ओठी

भाग ३३

पूर्वार्ध :

कमलचा वाढदिवस असतो. ती सगळ्यां जवळ आज सगळे मिळून देवळात जायची इच्छा व्यक्त करते. सगळे आनंदाने ते मान्य करतात. तयारी करून घराबाहेर पडतात आणि सिटी बसच्या स्थानकावर उभे होते.

आता पुढे ..

“यार ही बस कधी येईल?” वेमिका.

“किती कुरकुर करतेय? हे तुझे आता पंधराव्यांदा विचारून झाले आहे.” कमल.

“मग, अजून बस आली नाही. आता पाय पण दुखू लगतलेत..” वेमिका.

“तीन बस येऊन गेल्या पण.. आपल्यालाच पटकन चढता आले नाही.” कमल.

“हु..” तिने तोंड वाकडे केले आणि इकडेतिकडे बघू लागली.

“यार, असा कसा अजीब देव आहे यार तुझा, असे बसने तेही सिटी बसनेच देवळात गेले तर पावतो? इतके कष्ट घेण्याची खरंच गरज आहे का?” थोड्या वेळाने वेमिका परत सुरू झाली.

“आम्हा गरिबांना देव असे कष्ट घेतल्यावरच पावतात. “ कमल.

“काहीही असतं तुझं..” वेमिका.

“देव लवकर पावला असता तर ते गरीब लोकं, गरीब असते काय? त्यांना जगण्यासाठी झगडावे लागले असते काय?” कमल.

“यू आर इम्पोसिबल, आधीच बोर होत आहे, त्यात तुझे लेक्चर… ईsssss..” वेमिका वैतागत होती. कमलला तिला असे वैतागलेले बघून हसू येत होते.

“तुझे ना ते सीरियल बघणेच बंद करावे लागते.. कटकट, नुसती कटकट करत असतेस..” वेमिका.

“मी करतेय की तू करतेय? कधीची कुरकुर करतेय, कधी बस येईल? कधी जाऊ? कधी परत येऊ… किती प्रश्न? जरा शांततेने बस थोडी. बघ बाकी कोणीच एक पण शब्द बोललेले नाही, पिहु सुद्धा शांत बसलीय..” कमल.

वेमिका ने बघितले तर पिहू, आजी आणि कमलच्या मधात बसून, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या बघत होती. अधेमधे एखादे प्राणी गाय, कुत्रा तिला दिसायचे, ते बघून ती टाळ्या वाजवत होती. आजी, तिच्या शेजारी बसलेल्या मध्यम वयीन स्त्री सोबत मस्त गप्पा करत होत्या.


“ही रमा आजी पण ना अशी बोलत सुटलीये जसे काही हिला घरात कोणी बोलूच देत नाही अन् ही पिहु, घरात एवढी खेळणी आहेत, पण तिला हे कुत्र मांजर बघून मजा येतेय.” वेमिका डोळे फिरवत म्हणाली.

“ते हा पण अनुभव एन्जॉय करतात आहेत.”

“याला एन्जॉय नाही म्हणत. तुझ्यासारखेच बाकीचे पण पागल..” वेमिका.

“खरा आनंद यातूनच मिळत असतो, जिवंत लोकांमध्ये, निसर्गामध्ये.. ना की त्या निर्जीव वस्तूंमध्ये..” कमल.

“व्हॉटएव्हर!” वेमिकाने डोळे फिरवले. तेवढयात तिचे लक्ष वेद कडे गेले,

“कमल, भैय्या बघ, स्वतःशीच हसतोय..” वेमिकाने हळूच कमलला हाताचा कोपरा मारून वेदकडे बघ म्हणून खुणावले. कमलने सुद्धा त्याच्याकडे बघितले तर तो पुढे असलेल्या एका कॉलेज गोईंग प्रेमी युगलला बघत उभा होता.

“चल..” वेमिका कमलचा हात पकडत वेद जवळ जायला निघाली.

“ये भैय्या..” वेमिकाने आवाज दिला, पण त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो पुढे असणारे कपल बघत, स्वतःच्याच विश्वात हरवला होता, ज्यात फक्त तो आणि कमल होते आणि तो त्या विश्वात खूप आनंदी होता.

“कुछ तो हुवा है, कुछ हो गया है….
दो चार दिन से लगता हैं जैसे,
सबकुछ अलग है, सबकुछ नया है…” असेच काहीसे त्याचे झाले होते.. त्याला सगळं अगदी गुलाबी गुलाबी भासत होते..

“भैय्याsss..” वेमिकाने परत आवाज दिला तरी त्याचे तिच्याकडे लक्ष नव्हते.

“ही सगळी लोकं घराबाहेर पडल्यावर अशी विचित्र का वागत आहेत?” त्याचे लक्ष नाहीये बघून वेमिका विचित्रपणे बघत होती. कमल त्याला निरखून बघत होती. तिला सुद्धा तो वेगळा भासत होता.

“तुझी लक्षणं काही ठीक दिसत नाहीत.. “ वेमिका वेदच्या कानाजवळ जात जरा मोठ्यानेच ओरडली.

“ह?” तिच्या असे ओरडण्याने तो एकदम दचकला आणि आपल्या विश्र्वातून बाहेर येत गोंधळून दोघींकडे बघत होता.

“ योग्यवेळी लक्ष दिले असते तर तुझ्याकडे पण तशी गर्लफ्रेंड असती..” वेमिका त्याला चिडवत म्हणाली.

“काय?” तो काही न समजून म्हणाला.

“ते.. ते ज्यांना तू कितीतरी वेळेपासून एकटक बघत आहेस.. “ ती समोर असलेले कॉलेज गोइंग कपलकडे इशारा करत म्हणाली.

“पण काही हरकत नाही, तुला आता सुद्धा गर्लफ्रेंड भेटू शकते.. तू आता सुद्धा प्रेमात पडू शकतो.. तू अजून फार काही म्हातारा नाही झालाय.. हो ना ग कमल?” वेमिका.

कमलकडे बघत तो आणखीच स्वतःशीच लाजला.. केसातून हात फिरवत नजर चोरत इकडेतिकडे बघत होता. त्याच्या ओठांवर गोड असे हास्य पसरले होते.

“ ओये होये भैय्या, तू ब्लश करतोय! कमल, लूक एट हिम, बघ कसला गुलाबी गुलाबी झालाय..” वेमीका.

कमल त्याच्याकडे एकटक बघत होती. “ हम्म बदलले तर दिसतात आहेत.. काहीतरी छान घडलेले दिसतेय.. पण काय?” त्याच्याकडे बघत ती स्वतःशीच विचार करत होती.

“भैय्या, कोण आहे सांग ना?” वेमिका.

“कोण?” वेद.

“ती ssss.. तीच, जिला आठवून तू चक्क लाजतोय?” वेमिका.
या प्रश्नाने आपोआप कमलचे सुद्धा कान टवकारले. वेद काय उत्तर देतोय, याकडे तिचे लक्ष लागले होते.

“असे काही नाही.. ते जोडपं छान वाटत होतं सोबत, म्हणून सहज बघत होतो..” वेद.

“तुला कधी पासून अशी जोडपी बघायला आवडायला लागले?” वेमिका.

तो विचित्र नजरेने तिच्याकडे बघत होता. “न आवडायला काय झाले? ती दोघं भांडत होती, ते बघत होतो.” वेद.

“तुला ऐकू आले?” ती आश्चर्य वाटतेय, असे नाटकी भाव आणत त्याच्याकडे बघत होती.

“ऐकू नाही आले, पण त्यांच्या एक्स्प्रेशन वरून तसे वाटते आहे. त्याची ती रुसलीआहे आणि तो तिचा रुसवा घालण्याचा प्रयत्न करतोय बहुतेक.” तो सहजपणे म्हणाला.

“टिप्स घेतोय आ हा..” भुवया उंचावत ती परत त्याला चिडवू लागली.

“दुसऱ्याकडून टिप्स कशाला घेऊ? मी माझं माझं ओरिजनल ट्राय करेल, फक्त ती माझ्यावर रुसली तर पाहिजे.. तिचं माझ्यावर रुसणे, त्यासाठी पण नशीब लागते यार..” तो बोलण्याच्या ओघात बोलुन गेला.

त्याचे बोलणे ऐकून ती आवासून त्याच्याकडे बघत होती.

“ती.. कोण?”

“हिचा डीटेक्टिव्हपणा परत सुरू झाला..” विचार करत तो बिचाऱ्या नजरेने वेमिकाकडे बघत होता.

“म्हणजे अशी चांगली, रुसणारी मुलगी भेटायला हवी, असे म्हणायचे मला..”

“ रुसणारी मुलगी हवीये तुला?” वेमिका तोंड दाबून हसत होती.

तेवढयात कमल ला बस येताना दिसली आणि ती आजीला आवाज द्यायला गेली.

“कमल, याला भूतप्रेतबाधा झाली ग.. तुला कुठले मांत्रिक तांत्रिक माहिती असेल तर तिकडे पण जाऊ..” वेमिका ओरडून कमलला आवाज देत होती..

तिला बघून वेदने डोळे फिरवले अन् डोक्यावर हात मारला.

“चला बस आली, परत सुटायची नाही तर..” पिहूचा हात पकडत कमलने आवाज दिला. ते ऐकून वेमिका अक्षरशः पी टी उषाच बनली होती.

“भैय्या, चल पटकन.. आता जर ही बस सुटली ना तर ती कमल खरंच आपल्याला पायी घेऊन जाईल..” वेमिका पळतच बसमध्ये चढली.

कमलने पटकन दोन सीट पकडल्या होत्या. एक सीट वर तिने पटकन पिहूला बसवले आणि दुसऱ्या सीटला घेरून उभी राहत सगळ्यांची वाट बघत होती.

वेमिका, तिच्या पाठोपाठ आजी आणि वेद सुद्धा बस मध्ये चढले. वेमिका पिहूच्या बाजूला जाऊन बसली. थोडे पुढे कमलने अडवून ठेवलेल्या सीटवर तिने आजीला बसवले. आता मात्र एकच जागा उरली होती..

“भार्गव, बसा..” कमल त्याला बसण्याचा इशारा करत म्हणाली.

एवढयात बस प्रवाशांनी खचाखच भरून गेली होती. अगदी उभे राहण्यासाठी सुध्दा नीट जागा नव्हती.

“तू बस, मी ठीक आहे.” तो आजूबाजूला बघत म्हणाला.

“अहो, एकदा काय बस सुरू झाली की फार धक्के लागतात.. तुम्हाला आपले रस्ते तर माहितीच आहेत, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यातून रस्ता आहे, हे तर अजूनही न सुटलेलं कोडं आहे. तुम्हाला असे उभे राहून नाही जमायचे, मागची पुढची लोकं अंगावर पडतात अन् ड्ब्रेक लागला की आपण पण पुढे जाऊन पडतो. तुम्ही बसा इथे, मला बसची सवय आहे..” कमल.

त्यावर तो थोडा हसला. त्याला तिची काळजी कळली होती आणि तिला आपली काळजी वाटतेय, या विचारानेच तो सुखावला होता.
“ कमल, आय एम फाईन, ओके, बस तू..”

“कित्ती गोड.. मला असाच नवरा हवा..” पलीकडल्या सीटवर बसलेली एक मुलगी त्या दोघांना बघून म्हणाली.

“असा नवरा भेटण्यासाठी त्यांच्या बायको सारखे तसेच गोड वागावे लागते.” त्या मुलीच्या शेजारी बसलेला तरुण म्हणाला. त्यावर त्या मुलीने नाक मुरडत परत आपली नजर कमल आणि वेदवर स्थिरावली.
“असे वाटतेय, देवाने अगदी मन लावून ही जोडी बनवली आहे.. जस्ट मेड फॉर इच अदर..” तो पुटपुटला. तिने परत त्याच्याकडे खुन्नसने बघितले.

त्यांचे बोलणे ऐकून कमलचे हृदय जोरजोराने धडधड करू लागले होते. ती वेदकडे एकटक बघत होती.

“ते.. ते माझे पती ना...”

“कमल, बस..” कमल त्या दोघांना काही बोलणार, त्याआधीच वेदने तिला तिकडे दुर्लक्ष कर म्हणून खुणावत बसायला सांगितले. ती पण मग चुपचाप आजीच्या शेजारी जाऊन बसली. तिच्या डोळ्यात दाटून आलेली दुःखाची एक लकेर, त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. पण त्याला मात्र त्या दोघांचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला होता. तो मनातून खूप सुखावला होता.

किती अजब आहे ना, तेच सारखे शब्द, एकाला खूप आनंद देऊन गेले तर दुसऱ्याला दुःखाची, आयुष्यातील कमतरतेची जाणिव करून गेलेत. तेच शब्द, पण दोघांच्या ही मनात वेगवेगळे भाव निर्माण करून गेले होते.