Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ३४

कैसा येह प्यार है
मिळावे तुझे तुला आस ही ओठी ३४


पूर्वार्ध

कमलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळे तिच्या इच्छेचा मान राखत सिटी बसने तिच्या आवडीच्या देवळात जाण्यासाठी बसमध्ये बसतात.


आता पुढे….

आजी आणि कमल एका सीटवर तर पलिकडील त्यांच्या थोड्या मागच्या सीटवर पिहू आणि वेमिका बसल्या होत्या. पण बस मधे खूप गर्दी असल्यामुळे वेदला मात्र बसायला जागा मिळाली नव्हती. तो तिथेच सीट जवळ उभा होता. कमल आणि आजी आपल्या गप्पांमध्ये व्यस्त होत्या तर पिहु खिडकीतून बाहेर बघत होती. तिला खूप मज्जा वाटत होती. वेमिका मात्र बोअर होत होती. तिचे कंटाळून इकडेतिकडे बघणे सुरू होते. वेद मात्र मागूनच कमलकडे बघत उभा होता. बोलतांना तिच्या गुलाबी ओठांची हळूवारपणे होणारी हालचाल, बोलतांना होणारे तिचे हातवारे, मानेची लयबध्द सुरू असलेली हालचाल.. अगदी टक लावून बघत होता. तिच्याकडे बघत तो आपल्याच गुलाबी विश्वात रमला होता.

गर्दीमुळे कोणाचे कोणाकडेच लक्ष नव्हते. त्यामुळे तो बिनधास्तपणे कमलकडे बघू शकत होता. हा बसचा प्रवास कधीच संपू नये, असे पण त्याच्या डोक्यात येऊन गेले आणि तो स्वतःशीच त्याच्या स्टूपिड वाटणाऱ्या विचारांवर हसत होता. वेमिकाला मात्र बस प्रवास खूप बोअर होत होता. पिहूच्या बडबडीला सुद्धा ती कंटाळली होती. बस मधून नजर फिरता फिरता तिचे लक्ष वेदकडे गेले. त्याला एकट्यालाच हसतांना बघून तिला अजब वाटले.

“या भैय्याला काय झालेय, काल परवा पासून असा विचित्र वागतोय.. स्वतःच काय हरवतोय.. दया कूछ तो गडबड हैं, नजर रखणी पडेगी..“ स्वतःशीच विचार करत ती बारीक डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती.

कुछ तो हुआ है, कुछ हो गया है
दो चार दिनसे लगता है जैसे
सबकुछ अलग है, सबकुछ नया है… वेदचा असा मोड ऑन झाला होता.

वेद कमलकडे बघतच होता की त्याचे लक्ष त्याच्या पुढे उभ्या असणाऱ्या एका तरुणाकडे गेले. तो कमलच्या सीटला मागे हात ठेऊन पकडून, समोर बघत होता. तिच्या केसांचा स्पर्श त्या तरुणाच्या हातावर होत होता. वेदच्या हाताची हळूच दोन बोटं त्या सीटच्या दांडावरून चालवत त्याच्या हाता जवळ आली आणि पुढे जाण्यासाठी त्याच्या हाताला हळूहळू धक्का देऊ लागली. त्या तरुणाच्या हाताला स्पर्श होत होता म्हणून त्याने मागे वळून बघितले तर वेद त्याला इशाऱ्याने हात काढ म्हणत होता. बाजूला बसलेल्या जोडप्यातील मुलीला ते बघून खूप हसू येत होते..

“पझेसिव्ह हजबंड…” ती हसतच बोलून गेली.
ते ऐकून त्या तरुणाला सुद्धा वेदकडे बघून हसू येत होते. हसतच त्याने कमलच्या सीटला पकडून ठेवलेला हात काढला आणि वरती दांड्याला पकडले.

पझेसिवह ‘ शब्द ऐकून वेद गालातच हसत, केसातून हात फिरवत मागे घेतला.

“लाजातोय…” ती पलिकडील मुलगी हळूच म्हणाली. तसे वेदने तिच्याकडे बघितले. तिने हातानेच कमलकडे बघून ती सुंदर आहे असे खुणावले..

वेद स्मित करत डोळ्यांनीच धन्यवाद म्हणाला. त्याच्या ओठांवरील हसू मात्र कायम होते. त्याच्या चेहरा पार गोरा मोरा झाला होता.

कण्डक्टरने बसस्टॉपचे नाव घेतले आणि एकदाची बस थांबली.

“हुश्श! ए चला चला, पटकन उतारा.. ए भैय्या या पिहूला उचलून घे रे.. गर्दीत दबायची अन् हळूहळू उतरेल तर वेळ पण लागेल..” वेमिकाची घाई गडबड सुरू झाली. तिचा गोंधळ बघून कमलला हसू येत होते.

वेद आणि कमलने सर्वांना व्यवस्थित हात धरून बसमधून खाली उतरवले. थोडे पुढे चालत गेल्यावर गणपती बाप्पांचे देऊळ आले.


“ओ माय गॉड!” भाविकांची तिथे असलेली मोठी रांग बघून आता वेमिकाचे डोळे पांढरे व्हायचे बाकी राहिले होते.

“कुठे चालली?” वेमिकाला देवळाच्या दुसऱ्या बाजूला जातांना बघून कमलने आवाज दिला.

“मी जरा तिथे ऑफिसमध्ये बोलून बघते.. म्हणजे काही पैसे.. तिकीट वगैरे काढून लगेच नंबर लागतोय का..” वेमिका.

“अजिबात नाही, चल इकडे ये..” कमल तिचा हात पकडत, तिला ओढत येत रांगेत उभी राहिली.

“कुठल्या जन्माचे कर्म माझे.. हिला पदरात घातले देवा..” वेमिका पार वैतागून गेली होती. तिला बघून सर्वांना हसू येत होते.

देव दर्शनासाठी रांगेत एक एक करत, थोड्या वेळाने कमल आणि सर्वांचा नंबर लागला. वेमिकाने हात जोडले आणि गर्दीतून वाट काढत ती एका बाजूला जाऊन उभी राहिली. पिहू मात्र तिथेच एका जागेवर उड्या मारत होती.

“काय झाले?” कमल तिची सुरू असलेली गडबड बघून म्हणाली.

“मला बाप्पांचा चेहरा नीट दिसत नाही..” पिहू ओठ बाहेर काढत म्हणाली. वेदने तिला आपल्या कडेवर उचलून घेतले. ती आनंदाने टाळ्या वाजवत होती.

“ही एक अन् ती एक..एकीला दर्शन घेता येते तर तिकडे जाऊन बसली.. आणि ही दिसत नाही म्हणून गोंधळ करतेय..” आजी पिहू आणि वेमिकाला उद्देशून म्हणाली.

“रमाआजी आयुष्यात आलेल्या अनुभवांतून विचार बदलत जातात ना.. वाईट अनुभव आलेत की नकळत देवावर नाराज व्हायला होते. आणि ठीक आहे ना, जेव्हा आयुष्यात कुणी उरत नाही तेव्हा तोच आपल्या हक्काचा असतो.. त्याच्यावर नाही रागवायचे तर कोणावर? आणि देवबाप्पा घालवेल तिचा रुसवा.. काहीतरी, कोणीतरी छान येईल तिच्या आयुष्यात. असू द्या, वेमिका इथे आली, हेच महत्वाचे.” कमल आजीला समजावत म्हणाली.

“तू नाही नाराज झाली तुझ्या बाप्पांवर?” आजीने गमतीने विचारले. कारण तिच्या आयुष्यात सुरू असलेल्या वाईट गोष्टी कोणाकडून लपल्या नव्हत्या.

“आज्जी तोच तर एक आहे ना ज्याच्या सोबत मी हितगुज करू शकते.. आणि त्याने मला तुम्ही, हा गोड परिवार दिला आहे.. सांगा बरं त्याच्यावर कसं नाराज व्हायचं?” कमल.

आजींना तिच्या एवढया समजादरिने बोलण्याचे कौतुक वाटत होते. वेद सुद्धा खूप मन लावून तिचे बोलणे ऐकत होता.

आजीने हातातील फुलं आणि प्रसादाची टोपली गुरुजींकडे दिली. टोपली देताना आज कमलचा वाढदिवस आहे हे सांगायला सुद्धा विसरल्या नाहीत. सर्वांनी हात जोडून, डोळे मिटून मनोभावे पूजा केली. वेद मात्र जोडून कमलच्या निश्चल आणि शांत चेहऱ्याकडे बघत होता.

“ती जे मागतेय, ते तिला द्या..”
वेद हात जोडत समोर गणपती बाप्पांकडे बघून, डोळे मिटत मनोमन म्हणाला. असे तर त्याचे वडील गेल्यापासून त्याने पूजाअर्चा बंद केले होते. त्याचे मन या देवांच्या गोष्टीत लागत नव्हते. पण आज त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला कमलसाठी काही मागायची इच्छा झाली होती. तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, आयुष्यात तिला सर्व सुख मिळावे, हेच आता त्याचे ध्येय झाले होते आणि ते पूर्ण करायला तो सगळे प्रयत्न करणार होता. पण त्याला काय माहिती सगळंच आपल्या विचारांनी चालत नसते.

“बाप्पा, माझ्या या परिवाराला कायम आनंदी ठेव.” वेद जेव्हा डोळे मिटून उभा होता तेव्हाच कमल सुद्धा बाप्पांकडे आपले मागणे मागत होती. दोघेही वेडे, स्वतःसाठी मागायला विसरली होती. त्यांची मन तर एकमेकांच्या आनंदात गुंतली होती.

कमल मधात, तर एका बाजूला आजी, एका बाजूला वेद पिहुला घेऊन तिच्या शेजारी उभा होता. गुरुजींनी त्यांच्यापुढे आरतीचे पात्र धरले. त्यांना तीर्थ प्रसाद दिला. कमलने त्यांना वाकून नमस्कार केला.

“आयुष्यमान भव.. सौभाग्यवती भव.. ” गुरुजींनी एकदा वेदकडे बघत तिला आशीर्वाद दिला.

ते ऐकून कमलच्या मनात खूप कालवाकालव झाली. “खरंच माझं सौभाग्य इतकं सुंदर असतं तर...” मनोमन विचार करत ती वेदकडे बघत होती. तिच्या ओठांवरील स्मितच्या पलिकडील तिच्या डोळ्यातील वेदना तो बघू शकत होता.

गुरुजींच्या शब्दांनी कमल थोडी गोंधळली, पण वेद मात्र मनोमन खुश झाला होता. हा आशीर्वाद नक्कीच पूर्ण करेल, त्याने मनोमन होकार भरत, तो ओठांवर स्मित आणत तिच्याकडे बघत होता. वेदला तसे शांत, त्याचा प्रसन्न चेहरा बघून आजींना पण त्याच्यात बदल जाणवत होता.

“गुरुजी, ते माझे पती..”

“कमल कमल, मला आणखी प्रशाद पाहिजे.. “ कमल काही बोलणारच होती की पिहूने प्रसादाच्या चिरांजीच्या दाण्यांसाठी हट्ट केला. गुरुजींना हसत परत तिला प्रसाद दिला आणि नारळ, फुलं कमलच्या पदराच्या ओटीत दिली.

बाप्पा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन चौघेही वेमिका बसली होती तिथे गेले.

“आपल्या पूर्ण परिवारासोबत देवळात येऊन दर्शन घ्यावे, अशी माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. पण राधिकाला कधी वेळच नव्हता. नंतर परिवार कधी पूर्ण झालाच नाही..” आजींच्या डोळ्यात अश्रू तरळले..

“आपला परिवार पूर्ण आहे आणि हाच आहे, रमाआजी..” वेदने आपले दोन्ही हात पसरवत वेमिका, आजी, पिहूला आपल्या मिठीत घेतले. कमल बाजूला उभी त्यांना बघत होती. त्याला कमलला पण त्याच्या मिठीत घ्यायचे होते, पण ती थोडे दूर उभी असल्याने त्याचा हात तिच्यापर्यंत पोहचला नाही.

“कमल, अगं ये इथे.. तुझ्यामुळेच माझी वर्षानुवर्षांची ईच्छा आज पूर्ण झालीय..” आजीने तिला आवाज दिला. ती लगेच समोरून येत आजींच्या गळ्यात हात टाकत, त्यांना बिलगली. वेदने सुद्धा आपल्या हातांचा पंजा तिच्या डोक्यावरून मायनेने फिरवला.

दर्शन आटोपल्यावर पुढे काय करायचे याचा प्लॅन करता सगळे मंदिराच्या बाहेर पडत होते.

“आ ssssss ह् !” कमल मानेला हात लावत कळवळली. सगळे तिच्याकडे बघायला लागले.

“कोणीतरी मंगळसूत्र..” बोलतच ती गर्दीतून नजर फिरवत बघत होती. तर एक मुलगा पळताना दिसला. वेदच्या लक्षात आले तसेच तो सुद्धा त्या मुलाच्या मागे पळायला लागला. त्याच्या मागे अजून एक दोन पुरुष बघायला आलेत. पण गर्दीचा फायदा घेऊन तो मुलगा क्षणात तिथून गायब झाला होता. वेद परत आला.

“ सापडला?” आजीने विचारले. वेदने नकारार्थी मान हलवली. त्याने कमलकडे बघितले तर ती रडत होती. मानेवर सुद्धा छोटासा घाव झाला होता. थोडे रक्त येत होते. त्याने सर्वांना एका कोपऱ्यात सुरक्षित जागेवर आणले.

“मंगळसूत्र.. ते.. ते .. साहेब रागावतील.. खूप महाग होते..” कमल रडत रडत बोलत होती.

“खा मग ओरडा.. इथे येण्याची तुझीच इच्छा होती ना.. लोकं गर्दीचा फायदा नाही घेणार तर काय? आता चूप बस, कधीची रडत आहेस..” वेमिका वैतागून बडबडत होती. पिहुला तर काहीच कळत नव्हते, ती गप्पपणे आजीचा हात पकडून उभी होती. आजी सुद्धा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या मानेवर झालेल्या जखमेतून येणाऱ्या रक्ताकडे कोणाचेच लक्ष नव्हते.

यांची बडबड सुरू होती तेवढयात वेद बाजूला असलेल्या दुकानातून पाणी आणि क्रीम घेऊन आला होता. त्याने लगेच खिशातून रुमाल काढत, तो पाण्याने ओला करून तिच्या जवळ जात तिच्या मानेवर असलेली जखम पुसू लागला.

जखमेवर अचानक थंडावा जाणवला, तसे रडणाऱ्या कमलचे लक्ष वेदकडे गेले. वेमिकाची सुद्धा कामलच्या नावाने सुरू असलेली बडबड अचानक थांबली. तिघीही त्याच्याकडे आ वासून बघत होत्या. तो हळूवारपणे फुंकर मारत तिची जखम पुसत होता. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की कमलला तिथे लागले आहे.

जखम पुसून तो तिच्या दूर झाला आणि हातातील क्रीमची ट्यूब त्याने वेमिका पुढे धरली. त्याने स्वतःच लावली असती पण जागेचे भान ठेवून तो मागे सरकला होता.

“तू काय ट्यूब घेऊनच फिरतो काय?” वेमिका तिच्या जखमेवर मलम लावत म्हणाली.

“नाही, ते इथे बाजूला मिळाली..” तो दुकानाकडे बोट दाखवत म्हणाला. वेमिकाची नजर त्याला संशयित वाटू लागली.

“बरं चला आता घरी जाऊया..” वेद.

तेवढयात कमलने आणखी रडायला सुरुवात केली.

“नाही, मला नाही जायचं घरी. ते मंगळसूत्र..” कमल रडत रडत बोलत होती.

“त्या मंगळसूत्राला जाऊ दे खड्ड्यात.. तुझ्या देवाचाच इशारा आहे हा की तू मुव्ह ऑन कर. सोड त्या राक्षसाला..“ वेमिका.

“ते.. ते मंगळसूत्र हीर्यांचे होते. साहेब रागावतील.. मार..” भीतीने तिने परत रडायला सुरुवात केली.

“हो आता घरी चल. आपण दुसरे घेऊया. तसेही पुरुषांचे एवढे लक्ष नसते.” आजी तिला समजावत म्हणाल्या.

“नाही.. माझ्या शरीराकडे त्यांचे बारीक लक्ष असते. आपण, आपण त्या चोराला शोधुया..” कमल.

“हो तो तर तिकडे देवळाच्या पायथ्याशी बसलाच असेल. मंगळसूत्र हातात घेऊन, तुझ्या येण्याची वाट बघत.” वेमिका खूप त्रासाली होती.

“ते मला .. ते चटके…” बोलतांना अक्षरशः तिचे अंग थरथरत होते. वेदला तिच्याकडे बघावल्या जात नव्हते.

“रमाआजी, तुम्ही घरी जा. मी कमल सोबत दुकानात जातो आणि सेम मंगळसूत्र घेऊन येतो.” वेद तिची हालत बघून म्हणाला.

“बरं, हेच ठीक राहील.” आजी.

वेदने त्या तिघींना टॅक्सी करून दिली आणि त्यांना घरी पाठवले. त्याने आणखी एक दुसरी टॅक्सी केली आणि ते दागिन्यांच्या दुकानात गेले. त्यांनी चारपाच दुकाने पालथी घातली, तरी सेम डिझाईनचे मंगळसूत्र कुठेच मिळाले नाही. आता परत तिचा धीर सुटत चालला होता. ती रडकुंडीला आली होती.

“कमल, प्लीज रडू नको..” तिला समजावत, काहीतरी विचार करत त्याने टॅक्सीवाल्याला एका शोरुमचा पत्ता सांगितला आणि गाडी तिकडे घ्यायला सांगितली.

“मिळेल ना?” त्याच्या हाताच्या दंडाला पकडत त्याच्याकडे खूप आशेने बघत म्हणाली.

“हम्म, नको काळजी करू.” तिच्या डोळ्यात बघत शांतपणे म्हणाला. तरी तिच्या चेहऱ्यावरील चिंता काही दूर होत नव्हती. त्याने एका हाताने तिच्या डोक्यावर हळूहळू थोपटायला सुरू केले. थोड्या वेळातच तिची मान त्याच्या खांद्यावर पडली. कितीतरी वेळापासून तिचा गोंधळ सुरू होता. तिच्या झोपल्यामुळे त्याने एक सुस्कारा सोडला. तिला स्वतःचे बनवायचे होते अन् काय तर दुसऱ्याच्या सौभाग्याचा अलंकार घ्यायला जात होता. ..त्याचेच त्याला नवल वाटले. जणूकाही तिच्या वेदनांचे औषध तो बनला होता.

“कसं हे प्रेम आहे?” विचार करत तो स्वतःशीच हसला..

*****

क्रमशः