Login

मिळावे तुझे तिला आस ही ओठी ३५

Birthday Celebration
मिळावे तुझे तुला आस ही ओठी ३५

भाग ३५

भरपूर दुकानात शोधून सुद्धा कमलला हवे असलेले डिझाईनचे मंगळसूत्र मिळाले नव्हते. वेद तिला दुसरे घ्यायला सांगत होता, पण तिला तेच डिझाईन हवे होते. सगळी मोठी मोठी डिझायनर शोरुम पालथी घातली होती, पण मनासारखे काहीच होत नव्हते. आणि जोपर्यंत मंगळसूत्र घेत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही, याचा तिने नांदाच लावला होता. राजीव कुठल्या शॉप मधुन ऑर्डर करू शकतो, याचा वेद खूप वेळ विचार करत होता. छोट्यामोठ्या दुकानात तर तो जाणार नव्हता, त्याच्या स्टेटसचा प्रश्न होता. खूप वेळ विचार केल्यावर त्याला राधिका ( वेदची सावत्र आई, वेमिकाची आई) आठवली. ती नेहमी एक्सक्लूजीव डिझाईन्स घालत होती. आणि त्याला ती नेहमी जायची ती डायमंड ज्वेलरीची शोरुम आठवली. इथे मिळाले तर ठीक नाहीतर कमलला कसे समजवायचे, याचा तो विचार करत होता.

दोघेही त्या शोरुम मध्ये पोहचले. तिथे वेदला ओळखत होते. कमलने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे डायमंडचे मंगळसूत्र दाखवायला सांगितले. सगळे डिझाईन्स बघून झाले होते, पण त्यात कुठेच तसे डिझाईन सापडले नाही.

सापडले काय, असे वेदने इशाऱ्याने विचारले, कमलने नाकरार्थी मान हलवली. परत तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले. वेदने थकून सुस्कारा सोडला.. कपाळावर दोन बोटं घासत काहीतरी विचार करत होता.

“सर, एनी प्रोब्लेम? तुम्ही काही शोधत आहात काय?” वेदला काळजीत बघून तिथला मॅनेजर स्वतः त्याच्यावर आला.

“अ.. हो.. एक मंगळसुत्र घ्यायचे आहे. पण एक होते, तसेच सेम हवे आहे.” वेद कमलकडे बघत म्हणाला.

“ गेल्या काही महिन्यात आमच्या घरून ज्वेलरी शॉपिंग झाली काय इथे?” वेद.

“एक मिनिट, चेक करतो.” मॅनेजर म्हणाला आणि चेक करायला गेला.

“कमल, प्लीज काम डाऊन.. काहीतरी नक्कीच करूया आपण. नाहीच मिळाले तर त्याच्या फोटो देऊन बनवून घेऊ.” वेद.

“फोटो? फोटो नाहीये.” कमल.

“तुमचे लग्न झाले, तेव्हा काढला असेल?” वेद.

“नाही. काहीच फोटो नाही काढले. मंगळसूत्र पण माईने घालून दिले होते. आणि तेव्हा साहेबांनी दुसरे मंगळसूत्र दिले होते. नंतर त्यांच्यासोबत पार्टीला जायचे होते म्हणून हे हिर्यांचे दिले होते. मी नको पण म्हणाले होते, तर ते म्हणाले मोठ्या लोकांमध्ये असेच घालतात. ते घालावेच लागेल, त्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे ..” कमल.

ते ऐकून वेदने डोळे फिरवले.

“कधीतरी फोटो काढले असतील ना?” वेद.

तिने नकारार्थी मान हलवली. तो एकटक तिच्याकडे बघत होता.

“म्हणजे घरात कधी फोटो काढायचे काम नाही पडले.. म्हणजे फोटोग्राफरला बोलवावे लागेल, असे काही कार्यक्रम नाही झाले. वेमिकाकडे आहे कॅमेरा, पण तिचे ते बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झाले तेव्हापासून ती तो बाहेर काढत नाही. तिकडे पार्टीला साहेबांसोबत गेली होती, तिथे काढले असतील तर माहिती नाही..” कमल.

“हम्म.. “

“साहेब मला मारतील..” ती कळवळून म्हणाली.

“नाही.. आपण करू काहीतरी..” तिचा अवतार अस्ताव्यस्त झाला होता. तो तिचे केस तिच्या कानाच्या मागे सरकवत, तिचे डोळे रुमालाने पुसत म्हणाला.

“येस सर.. राजीव सरांच्या नावावर झाली आहे.” तेवढयात मॅनेजर तिथे येत म्हणाला.

“त्यात मंगळसूत्र घेतले आहे का? इट्स क्वायट इंपॉर्टन्ट.” वेद.

“अ हो. एक डायमंड मंगळसूत्र, पण त्यांच्या सेक्रेटरी आल्या होत्या.” मॅनेजर.

ते ऐकून वेदचा जीव भांड्यात पडला. आतापर्यंत रडून रडून सुजलेल्या कमलच्या डोळ्यात थोडीशी चमक दिसत होती.

“राधिका मॅडम नेहमी इथूनच ज्वेलरी घेत होत्या. राजीव सर नेहमी त्यांच्या सोबत येत होते. ते पण मोस्टली इथूनच ज्वेलरी ऑर्डर करतात.” मॅनेजरने माहिती पुरवली.

“आम्हाला ते मंगळसूत्रांचे डिझाईन्स बघायचे आहे.” वेद.

मॅनेजर कॅटलॉग घेऊन आला. कमलने अधिरतेने कॅटलॉग हातात घेतले आणि एक एक पान पालटत डिझाईन्स बघू लागली. शेवटी एक्सक्लूजीव सेक्शन मध्ये तिला तिच्याकडे होते ते सेम मंगळसुत्र दिसले.

“हे..” वेदकडे बघत तिने दाखवले.

“हुश्श!” त्याने सुटकेचा श्वास सोडला.

“मला सेम हे मंगळसूत्र हवे आहे, नाऊ..” वेद.

“सॉरी सर, पण हे आता इथे अवैलेबल नाही.” मॅनेजर.

“मग कुठे आहे?” वेद.

“म्हणजे ते exclusive डिझाईन्स आहेत, तर एका शोरुमला एकच पीस ठेवत असतो. “मॅनेजर.

“ओके, मग आता कुठे मिळेल?” वेद.

“आमचे दुसरे शोरुम आहे, तिथे असेल तर बघावे लागेल. मी चेक करतो.” मॅनेजर.

“ओके.” वेद.

पाचच मिनिटात मॅनेजर विचारपूस करून परत आला. वेद भुवया उंचावत त्याच्याकडे बघत होता.

“सर, तिथे अवैलेबल आहे.”

ते ऐकून कमलला खूप आनंद झाला होता.

“ठीक आहे ऑर्डर करा.” वेद.

“सर आता वेळ लागेल, मी ऑर्डर करून उद्या तुमच्या घरी डिलिव्हरी देतो.” मॅनेजर.

“न.. नाही… म्हणजे.. ” कमल ते ऐकून बोलण्याचा प्रयत्न करत वेदकडे बघत होती.

“किती वेळ लागेल?” वेद.

“दोन तास तरी.. “ मॅनेजर .

“चालेल, आम्ही वेट करतो. “ वेद.

रात्रीचे ९ वाजले होते. ते शोरुम तसे १०-१०.३० पर्यंत उघडे राहत होते. त्यानंतर सुद्धा आतमध्ये त्यांचे काही काम सुरू राहत. आणि वेदचे घर म्हणजे त्यांचे पिढीजात कस्टमर होते. त्यामुळे त्याला बकर देणे त्यांना जमले नव्हते.

“ओके सर, तुम्ही इथे बसून वेट करा.” म्हणत मॅनेजरने चहा, कॉफी वगैरे आणायची ऑर्डर दिली आणि त्यांची रजा घेऊन दुसरे कस्टमर बघायला गेला.

“कमल, तुला त्या राजीवला एवढे घाबरण्याची गरज नाही. आता कायद्याने सुद्धा तू सज्ञान झाली आहे. आता तू अठरा वर्षाची झाली. कायदा पण तुझ्याकडुन आहे. स्वतः साठी बोलायला शिक. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” वेद तिला तिचे हक्क सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याच्या बोलण्याचा तिच्यावर काही परिणाम होतांना दिसत नव्हते. ती मात्र पुढे कुठेतरी बघत हरवली होती.

“कमल, इकडे बघ, माझ्याकडे..” तिचे लक्ष नाही बघून त्याने परत आवाज दिला.

“ह? तुम्ही काय म्हणत होते?” ती त्याच्याकडे बघू लागली.

“मी कायम तुझ्यासोबत आहे. अजिबात कोणाला घाबरायचे नाही. “ तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

ती आनंदाने हसली. आता बऱ्यापैकी ती शांत दिसत होती.

मंगळसूत्र चोरी गेल्यापासून तिने जो गोंधळ घातला होता, तो आता कुठे दूर झाला होता. तिच्या घाबरण्याचे कारण पण तसेच होते, राजीव जरी दिवसभर तिला काही फार बोलत नव्हता, पण तिची थोडीशीही चूक झाली की रात्री मात्र तो तिला ओरबाडून टाकायचा. मंगळसूत्र मिळत आहे, यामुळेच ती थोडी काळजीमुक्त झाली होती.

बराच वेळ असल्यामुळे ती तिथल्या शोकेस वरून नजर फिरवत होती. तिथले ते दागिन्यांचे सौंदर्य बघून तिचे डोळे दिपले होते. बघता बघता तिची नजर एका ठिकाणी येऊन थांबली होती. ते बघताना तिच्या ओठांवर किंचितसे हसू उमलले होते. तिच्या ओठांवरील हसू आणि स्थिरावलेली नजर बगून वेद सुद्धा ती कुठे बघतेय, ते बघू लागला.

“एक्सक्युज मी, द्याट बॉक्स प्लीज..” त्याने तिथल्या एका स्टाफला आवाज देत पुढे ठेवलेला बॉक्स मागितला. स्टाफने तो बॉक्स त्यांच्याजवळ आणून दिला.

“पॅक धीस..” वेद.

“अ.. कशाला?” कमल बावरून त्याच्याकडे बघत होती.

“तुला आवडले ना?” वेद.

“हो, पण पॅक कशाला करायला सांगत आहे? वेमिका असे डिझाईन्स घालत नाही.” कमल.

“तुझ्यासाठी..” वेद.

“नाही नाही… मला नको..” कमल.

“तुला आवडले ना.. घे.” वेद.

“नाही, माझ्याकडे पै…”

“प्लिज पॅक धिस..” कमलचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत वेद स्टाफकडे बघत म्हणाला. तशी स्टाफ होकारार्थी मान हलवत तिथून निघून गेली. कमल मात्र प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत होती.

“ते ईअरींग्ज छान आहेत, मला पण आवडले. त्यातले कमळ सुंदर आहे.” वेद.

“हो, पण मला कशाला?” कमल.

“तुझं बर्थडे गिफ्ट.. “ तो स्मित करत म्हणाला.

“तुम्ही आधीच खूप काही करत आहात. आता परत हे.. नको.” कमल.

“घे, अजिबात महाग नाहीये.”
स्टाफने तो बॉक्स आणि त्याचे बिल वेदला दिले. तो बॉक्स तिच्या हातात देत तो म्हणाला.

“खूप सुंदर आहे ना..” ती तो बॉक्स उघडून , त्या कानातल्या वरून हात फिरवत म्हणाली.
ते सोन्याचे छोटेसे, नाजूक असे कानातले होते. वरती अँटीक असे कोरलेला सोन्याचा मोती आणि त्याला खाली पाच पाकळ्या असलेले छोटेसे कमळाचे लटकन..

“तुझ्या पेक्षा नाही..” तो तिच्याकडे बघत मनातच स्वतःशी म्हणाला. त्याच्या नजरेला आता कमल पेक्षा सुंदर असे काही दिसतच नव्हते अन् उरलेही नव्हते.


“काहीतरी बघावे, ते आवडावे आणि लगेच ते हातात यावे.. हे आयुष्यात पहिल्यांदा घडतेय…” तो कानातल्यांचा बॉक्स आपल्या छातीशी कवटाळून ती म्हणाली.