Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी 36

Lost Mangalsutra
मिळावे तुझे तुला आस ही ओठी 36

“खूप सुंदर आहे ना..” ती तो बॉक्स उघडून , त्या कानातल्या वरून हात फिरवत म्हणाली.
ते सोन्याचे छोटेसे, नाजूक असे कानातले होते. वरती अँटीक असे कोरलेला सोन्याचा मोती आणि त्याला खाली पाच पाकळ्या असलेले छोटेसे कमळाचे लटकन..

“तुझ्या पेक्षा नाही..” तो तिच्याकडे बघत मनातच स्वतःशी म्हणाला. त्याच्या नजरेला आता कमल पेक्षा सुंदर असे काही दिसतच नव्हते अन् उरलेही नव्हते.


“काहीतरी बघावे, ते आवडावे आणि लगेच ते हातात यावे.. हे आयुष्यात पहिल्यांदा घडतेय…” तो कानातल्यांचा बॉक्स आपल्या छातीशी कवटाळून ती म्हणाली.

“कमल, तुझ्या आनंदाची चावी तुझ्याकडेच असायला हवी. एटलिस्ट अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तरी तू दुसऱ्या कोणावर अवलंबून राहायला नको. तू बेस्ट लाईफ डीझर्व्ह करते.“ वेद.

“मी खुश आहे.” कमल.
कमलला त्याचे बोलणे कळत होते. राजीवला सोड, हे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय, तिला समजत होते.

“तुला पुढे शिकायला हवे.” वेद सरळ मुद्द्यावर आला.

कमलने त्याचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि परत हातात असलेल्या बॉक्सकडे बघत बसली.

“असे दुर्लक्ष नको करू, तुझ्या आयुष्याची आता कुठे सुरुवात झाली आहे.. खूप दूर पर्यंत जायचे आहे.. “ तो कळकळीने सांगत होता.

मॅनेजर बॉक्स घेऊन त्या दोघांकडे येताना दिसला, तसे कमल घाईघाईत जागेवरून उठून त्याच्याकडे जाऊ लागली.

तिने परत वेदच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. ते बघून त्याने नकारार्थी मान हलवत सुस्कारा सोडला. तो पण जागेवरून उठत त्यांच्या जवळ गेला.

“मॅडम, हेच आहे का ?” मॅनेजर बॉक्स तिच्यापुढे धरत म्हणाला. तिने अधिरतेने त्याच्या हातातून तो बॉक्स घेतला आणि उघडून बघू लागली. ते बघत तिने होकारार्थी मान हलवली. ती एकटक त्याकडे बघत होती. डोळ्यात परत पाणी तरळले होते. खूप मोठी शिक्षा होता होता त्यातून वाचली होती, असे भाव तिच्या चेहऱ्यावर होते.

“मॅडम, तुम्ही ट्राय करा.” मॅनेजर एका स्टाफला आवाज देत कमलला म्हणाला.

“हो..” कमल.

“बील बनवा प्लीज..” वेद.

“येस सर. “ म्हणत मॅनेजर तिथून निघून गेला.

ती लेडीज स्टाफ कमलला ते मंगळसूत्र घालून द्यायला मदत करत होती.

“स्सssss..” कमलला ते मंगळसूत्र तिला गळ्याला झालेल्या जखमेवर घासल्या गेले होते.

“वेट, आय विल हेल्प..” कमलचा आवाज ऐकून वेदने पटकन त्या स्टाफच्या हातातून मंगळसूत्र काढून घेतले. तो तिच्याकडे थोडे रागानेच बघत होता. तशी ती बाजूला झाली.

“सॉरी मॅडम, सॉरी सर.. मला ते दिसले नाही. .” स्टाफ घाबरून म्हणाली.

तो कमलच्या अगदी पुढ्यात उभा होता. तिच्या माने भोवती हात गुंफत, त्याने ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. मंगळसुत्राची कडी फिट्ट करतांना तो तिच्या खूप जवळ गेला होता. त्या दोघांमध्ये अगदीच काही इंचाचे अंतर होते. त्याच्या बाहुंचा न झालेला स्पर्श सुद्धा ती अनुभवू शकत होती. तिचे अंग मोहरुन आले. त्याच्या जवळ येण्याने तिचे डोकं सुद्धा काम करायचे बंद झाले होते. मंगळसूत्राची कडी फिट्ट करतांना त्याच्या गरम बोटांचा स्पर्श तिच्या गळ्याला झाला आणि आपोआप तिचे डोळे बंद झाले. कधीतरी टीव्ही मालिकेत हिरो हिरोइनच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतांनाचे बघितलेले सीन आज तिच्या बाबतीत पूर्ण झाले होते. तिच्या डोक्यात लग्नाची असलेली संकल्पना, आज पूर्ण झाली होती. तिच्या कानात सौभाग्य मंत्रांचे सुर घुमू लागले होते. तिच्या ओठांवर हसू उमलले तर बंद पापण्यांच्या मधुन गालांवर अश्रू ओघळले. आता या क्षणी तिच्यासाठी जग इथेच, याच क्षणात थांबले होते.

“झालं..” तो तिच्या थोडे दूर होत, तिला बघत म्हणाला तर त्याला तिच्या डोळ्यात अश्रू दिसले.

“अजूनही दुखतेय का?” त्याने काळजीने विचारले. पण ती मात्र त्याच्याकडे एकटक बघत होती. सध्यातरी त्याने आता काय केले, हे त्याला कळले नव्हते. त्याच्या मते त्याने फक्त ते मंगळसूत्र घालण्यात तिची मदत केली होती.

तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, त्यामुळे तिला मानेवरील जखम दुखत आहे, असेच वाटले आणि त्याला परत त्या स्टाफचा राग आला.

“ फर्स्टएड बॉक्स..” तो त्या स्टाफकडे बघत म्हणाला.


“हो..” म्हणत अगदी काही सेकंदात ती बॉक्स घेऊन आली. तिने कापूस घेऊन त्यावर डेटॉल घेतले आणि कमलच्या गळ्यावर लावायला जात होती.

“वेट..” वेदने हात पुढे केला. तिने चुपचाप तो कापूस त्याच्या हातात दिला. एकदा तिच्याकडे बघत एक हात तिच्या माने जवळ पकडत तो थोडासा खाली झुकला. हातातील कापूस तिच्या जखमेवर ठेवला आणि हळूवारपणे फुंकर मारत ती जखम स्वच्छ करत होता. त्याचे असे जवळ येण्याने आपोआप तिचे श्वास मंद झाले झाले होते. आता कधीही ते बंद पडतील, असे तिला वाटत होते. त्याचे त्या हळूवार फुंकरने तिच्या शरीरावर शिरशिरी येत होती. ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याला न्यहाळत होती.

त्याने स्टाफच्या हातातील बॉक्स मधुन हांसप्लास्ट पट्टी घेतली आणि ती जखमेवर लावली.

“बेटर?” वेदने कमलकडे बघत विचारले.

आताच्या त्याच्या सोबत घालवलेल्या काही क्षणांमुळे तिचे शब्द तर गोठले होते.. तिने फक्त डोकं हलवत होकार दिला.

“सर, बिल इज रेडी..”

“येस, कमिंग..” “आलोच..” म्हणत तो बिलिंग काऊंटरकडे गेला आणि त्यांच्यासोबत काहीतरी बोलत होता. ती तर फक्त त्याची एक एक हालचाल बघत होती.

“मॅडम, तुम्ही खूप लकी आहात.. तुम्हाला खूप प्रेम करणारे पती भेटलेत. तुमच्या बद्दलची काळजी, प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसते..” ती स्टाफ म्हणाली.

“पती..?” पती शब्द ऐकून स्वप्नात हरवलेली कमल एकदम भानावर येत वास्तवात आली. कुणीतरी हृदयावर चाकूने वार करावा, असे तो पती शब्द ऐकून तिला झाले होते.

“मूर्ख मुली, काय विचार करतेय? त्यांच्या मदतीला तू लग्न समजून बसली? आपली औकात विसरू नका..” ती स्वतःलाच खडसावत होती.

“कुणी गळ्यात मंगळसूत्र बांधले तर लग्न होत असते काय? पण साहेबांनी तर माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले नाही की भांगेत कुंकू भरले की स्पत्पदी चालले..फक्त फक्त ते मधुचंद्र… मधुचंद्र तरी कसा म्हणावा त्याला…” तिचे डोकं बधीर व्हायला लागले.

“भार्गव…” मंगळसूत्राचे पदक तिने हातात गच्च आवळून धरले.

“कमल, let's go..” वेदने आवाज दिला.

“गुड नाईट मॅडम आणि परत एकदा सॉरी.” ती स्टाफ दिलगिरी व्यक्त करत म्हणाली.

कमल तिच्याकडे बघून कसेनुसे हसली आणि वेद सोबत शोरुमच्या बाहेर पडली.

“कमल,रात्र झाल्यामुळे आपल्या लगेच टॅक्सी मिळणार नाही. थोडे तिकडे चौकापर्यंत चालत जावे लागेल.” वेद.

तिने होकारार्थी मान हलवली आणि तिच्या साडीचा पदर दुसऱ्या खांद्यावरून, गळा दिसणार नाही अशा पद्धतीने ओढून घेतला आणि इकडेतिकडे बघत त्याच्या सोबतीने चालू लागली.

“काय झाले? भीती वाटतेय का?” वेद तिला तसे घाबरून चालतांना बघून म्हणाला.

तिने नकारार्थी मान हलवली. तो किंचित हसला आणि त्याने तिचा हात आपल्या हातात पकडुन घेतला.

“रिलॅक्स! तुला माहिती, तुझ्या सीरियल मधल्या हिरोईन सुद्धा अशा चोराबिराला घाबरत नाही.. मस्त दे दणादण धुलाई करतात.. तू अशिकशी भागुबाई झाली?” तो किंचित हसत म्हणाला.

“मी.. मी पण कोणाला घाबरत नाही.” ती एकदम म्हणाली.

“मग अशी अडखळत का चालतेय?”

“मी तर त्या चोराला कसे पकडायचे, विचार करत होती.”

“अच्छा, ओके, कर कर..” तो हसत टॅक्सी बघत चालत होता.

ती चालतांना कधी त्याच्याकडे तर कधी त्याने पकडलेल्या तिच्या हाताकडे बघत होती.

“भार्गव..”

“हो बोल..” तो पुढे बघत चालत म्हणाला.

“मंगळसूत्र कितीचे झाले?”

“तीन लाख एंशी हजार..”

“काय?” तिचा आ आणि डोळे मोठेच्या मोठे झालेत.

“एवढे ओरडायची गरज नाही. इट्स वेरी नॉर्मल अमाऊंट.”

तिने तिच्या गळ्याभोवती असलेल्या पदराने गळ्याभोवती आणखी दोन तीन वेटोळे मारले.

“अगं ये, आधीच त्या गळ्याला जखम झालिये..सैल कर तो पदर..”

“आपण, आपण पोलीस कंप्लेंट करू? म्हणजे चोराला असे कसे सोडायचे?

“हो.. मी बघतो. तू यात पडू नको. नाहीतर उगीच राजीवला माहिती व्हायचे आणि त्रास द्यायचा.. “ वेद.
राजीवचे नाव ऐकून ती परत गप्प झाली.

थोड्या वेळाने त्यांना टॅक्सी मिळाली आणि ते घराकडे निघाले.


तिचा वाढदिवस तर खूप छान गेला होता.. शेवट सुद्धा खुप गोड झाला होता.. अगदी तिच्या मनाला स्पर्शून गेला होता. नकळतपणे का होईना पण तिच्या गळ्यात कोणीतरी, कोणीतरी पण कशाला, तिच्या आवडत्या व्यक्तीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले होते.. तिचे एक स्वप्न तरी पूर्ण झाले होते.. जरी तिचे शरीर राजीवचे होते.. पण मनाने ती हे नाजूक बंध जपणार होती.. फक्त वेदचे एवढे पैसे आपल्यामुळे खर्च झालेत.. ते कसे परत करावे याच विचारत ती होती.

*****


वेदला त्याच्या प्रेमाची जाणीव तर झाली होती. आता कमल सुद्धा पूर्णपणे १८ वर्षाची झाली होती. स्वतःचे प्रेम तिच्यापुढे तो कबूल करणार होता, पण त्या आधी काही गोष्टी पडताळून बघणार होता. तिला आपले करायचे असे तर आधी राजीव पासून तिला वेगळे करणे, कायदेशीर वेगळे करणे गरजेचे होते. त्यासाठी तिला सुद्धा तयार करणे गरजेचे होते. त्यामुळे ती नकार देईल अशी कुठलीच घाई करणार नव्हता.

“केतन, मला मिस्टर राजीव यांच्या सेकंड मॅरेज बद्दल सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे, लवकरात लवकर..” वेदने त्याच्या सेक्रेटरीला जो वेदची सगळी कॉन्फिडेंशिल कामे बघत होता.

“येस सर..मला दोन दिवस द्या..” केतन.

“शुअर..” वेद.

“कमल, बस थोडेच दिवस..” तो स्वतःशीच हसला.