Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ३८

कमल वेद
मिळावे तुझे तुला आस ही ओठी 38

पूर्वार्ध :

कमलच्या इच्छेनुसार सगळे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बाप्पाच्या देवळात जातात. देवदर्शन, सगळे मनासारखे होते. पण गर्दीचा फायदा घेत एक चोर कमलच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेतो..ते राजीवने दिलेले असल्यामुळे कमल खूप घाबरली असते. शेवटी वेद तिला तसेच सेम मंगळसुत्र घेऊन देतो आणि अनवधानाने तिच्या गळ्यात घालतो. दुसऱ्यादिवशी रात्री राजीव कमलसोबत बार एरियामध्ये एकांत क्षण घालवत असतो, ते वेद बघतो. वेद चिडून राजीवला खडसावत बोलतो. पण राजीव परत त्याचा अपमान करता निघून जातो. वेद कमलवर चिडतो. तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. पण ती घाबरून निघून जाते.

आता पुढे…


आपल्या रूम मध्ये जाऊन वेदने होता तश्याच अवतारात स्वतःला पलंगावर झोकून दिले.. त्याचे शरीर तर खूप थकले होते, मात्र हृदय आणि डोकं त्याच्या डोळ्यांना बंद होऊ देत नव्हते. आपल्या प्रेमाला, जिच्या केसांना सुद्धा दुसऱ्या कुणाचा स्पर्श त्याला सहन होत नव्हता, तिला दुसऱ्याच्या बाहुपाशात बघतांना त्याचा जीव निघत होता. कोणीतरी त्याची हाडं मोडत आहेत, इतक्या जास्त वेदना त्याला होत होत्या. पलंगावर पालथा पडला तो बाल्कनी मधुन दिसणारा तिने लावलेला टपोरा गुलाब एकटक बघत पडला होता.

****

“पिहू, चल पटापट आटप, नाहीतर शाळेला उशीर होईल..” सकाळी कमल पिहुला ब्रेकफास्टसाठी बोलवत होती, पण पिहू मात्र मस्ती करत घरभर पळत होती आणि कमल तिला पकडत होती.
वेमिका आणि आजी डायनिंग टेबलवर बसल्या त्यांची मस्ती बघत होत्या.

राजीव हातात फाईल बघत ब्रेकफास्टसाठी टेबलकडे जात होता. कमल आणि पिहू दोघीही आपल्याच तालात पळापळी करत होत्या आणि त्यातच कमल राजीवला जाऊन धडकली. त्याचा हातातील फाईल खाली पडली. झाले, राजीवचा पारा चढला.

“कमल…” तो रागात ओरडला आणि कमलकडे एकटक पाहत होता.

त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने पिहू घाबरून पटकन आजीच्या कुशीत जाऊन शिरली. कमल मात्र घाबरून जागीच उभी होती. तिचे लक्ष खाली पडलेल्या फाईलकडे गेले. २-३ पेपर फाईल मधुन थोडे बाहेर आले होते. कमल पटकन खाली वाकली आणि पेपर गोळा करत, फाईल नीट करण्याचा प्रयत्न करत, राजीवला देऊ लागली. पण तो इतक्या रागाने तिच्याकडे बघत होता की ती फाईल देताना पण तिचे हात थरथरत होते. त्यामुळे परत ती फाईल खाली पडली आणि आता त्यातील पेपर जास्तीच अस्ताव्यस्त होत विखुरले होते.

“स्टॉप…. अँड गेट लॉस्ट..” ती परत फाईल उचलायला जाणार होतीच की परत राजीव ओरडला आणि त्याने तिच्या हाताला धरून तिला बाजूला करत, मागे भिरकावले.

“आह्…” वेद कळवळला.

जेव्हा राजीवने कमलला धक्का देत मागे भिरकावले, तेव्हा वेद पायऱ्या उतरत खाली येत होता की तेव्हाच कमल त्याच्या अंगावर जाऊन आदळली होती आणि तिचे डोकं वेदच्या नाकावर आपटले होते.
खरे तर जेव्हा राजीवने तिला धक्का दिला होता, तेव्हा पायऱ्यांच्या कठड्यावर तिचे डोकं आपटणार होते, पण वेदचे लक्ष गेले आणि त्याने तिच्या हाताला धरून स्वतःकडे ओढले होते. तिच्या त्याच्या छातीवर आदळली. तिच्या डोक्याला लागेल, या विचारानेच त्याची हार्ट बिट स्किप झाली होती. जवळ जवळ तो २-३ पायऱ्या सोडून एकदम उतरला होता.

इकडे कमलला धक्का दिल्यावर, ती पडली की काय झाले? याच्याकडे काहीच लक्ष न देता राजीव आपली फाइल घेऊन तनतन करत, ब्रेकफास्ट न करताच घराबाहेर पडला.

वेदने तिला पडण्यापासून वाचवले तर होते, त्याचा एक हात तिच्या कंबरे भोवती होता तर दुसरा हाताने तो आपले नाक चोळत होता. त्याने तिला स्वतःजवळ पकडून ठेवले होते, पण तिच्याकडे रागाने बघत होता.

“मी, मी मुद्दामून नाही मारले..…तू…तुम्हाला..” त्याचे लाल झालेले नाक बघत कमल अडखळत म्हणाली.

“तू मुद्दाम थोडीच करते काही… “ त्याने चिडतच तिला आपल्या पासून दूर केले आणि नाक चोळत डायनिंग टेबलवर येऊन बसला.

राजीवला बाहेर जातांना बघून वेमिका हसत होती.

“वाह राक्षसाला घराबाहेर काढण्याची काय आयडिया आहे… वाह कमल वाह! असेच रोज त्याला बाहेर काढत जा, मग भैय्याचे नाक, कान.. ज्याचे बलिदान द्यायचे, देऊ आपण.. पण हा ब्रेकफास्टला इथे नकोच..” वेमिका हसत होती.

“कोण राक्षस?” पिहू.

“तुझा बा…”

“शूsss…” वेमिका बोलतच होती की आजींनी तिला डोळे दाखवत चूप बसवले.

“ते एक मूव्ही मधला… तू इकडे बघ, भय्याचे नाक बघ…” वेमिका पिहूचे लक्ष दुसरीकडे करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

“वेद, काय रे आज ऑफिसला जायचं नाही का?” आजी.

“उशिराने जाईल.” तो सुस्तपणे म्हणाला.

“छाया ते थोडा बर्फ आण..” आजीने आवाज दिला होतच की त्या आधीच कमल एका ट्रे मध्ये बर्फ घेऊन आली होती. आजीने त्यातील एक बर्फ घेतला आणि वेदच्या नाकावर चोळत होत्या.

“रमा आजी , ठीक आहे..” त्याने आजीच्या हातातील बर्फ घेतला.

“दुखत तर नाहीये?” आजी.

“नाही.” वेद

“मग असा का दिसतोय? तब्येत वगैरे बरी वाटत नाहीये का?” आजी त्याच्याकडे बघत म्हणाल्या. त्याचे कपडे अगदीच चुर्गळलेले दिसत होते. कपाळावर केस विखुरलेले होते. डोळे सुजलेले, चेहरा निस्तेज जसे काही रडून खूप थकला असावा, असा दिसत होता.

“बरी आहे, रात्री झोप नाही झाली, म्हणून असेल. ऑफीसचे थोडे काम राहिले होते, रात्री तेच करत बसलो होतो. ” वेद.

तेवढयात कमलने त्याच्या पुढे अद्रक घातलेला, वाफाळलेला चहा आणून ठेवला. त्याने मात्र तिच्याकडे बघितले सुध्दा नाही.

“छाया ताई, मला ब्लॅक कॉफी..” चहाकडे दुर्लक्ष करत त्याने कॉफी सांगितली.

“अरे घे चहा, सुस्तपणा वाटणार नाही. “ आजी.

“नको, डोकं जड वाटतेय, ब्लॅक हॉट कॉफीच हवी..” वेद.

परत लगेचच कमलने त्याच्या पुढे त्याला हवी तशी कॉफी आणून ठेवली.

“अगं आज एवढया बांगड्या?” कमलच्या हातात खूप बांगड्या बघून आजींनी विचारले.

“असेल एखाद्या सीरियलमध्ये बांगड्यांचा नवस.. हीची ती फेवरेट कोकिलाबेन सांगत असते ना काही ना काही…” वेमिका तिला चिडवत म्हणाली. त्यावर कमल फक्तच हसली.

“छाया ताई नाश्ता द्या..” वेद कॉफीला हात न लावता परत म्हणाला.

कमल पटकन पुढे गेली आणि टेबलवर ठेवलेला नाश्ता त्याच्यासाठी प्लेट मध्ये काढू लागली.

“स्टॉप इट..तुला कळत नाही का? मला तुझ्या हातून नकोय. काही मागितले की लगेच पुढे येत आहे. तुझ्या हातून नकोय मला काही.. आधीच डोकं दुखतेय, त्यात ती बांगड्यांची किणकिण, इरिटेट होतेय..” वेद कमलकडे बघून थोडे जोरानेच ओरडला.

बऱ्याच दिवसांनी वेद असा ओरडला होता, त्यामुळे सगळे स्तब्ध होत त्याच्याकडे बघत होते. त्याच्या रागवल्याने कमलच्या डोळ्यात पाणी तरळले होते.

“अरे भैय्या, एवढे चिडायला काय झाले? दोन दिवस आधीच तू तिला तुझी फ्रेंडशिप दिली आणि आज एवढा रागावतोय? ऑल राईट ना?” वेमिका.

“तुला आवडतो ना तिच्या हातचा चहा/नाश्ता आणि राजीवचा सोडून ती सर्वांसाठी बनवते. तिला आवडते ते..” आजी त्याला समजावत म्हणाल्या.

तो इतका का चिडला आहे, ते कोणालाच कळले नव्हते.

“तिला तेच आवडते, दुसऱ्यांचे नोकर बनायला.. कामवाली बनुनच राहणार ती..” तो त्याच्या समोरील नाश्त्याची प्लेट बाजूला सारत, जागेवरून उठत म्हणाला.

“अरे आपल्या लोकांची कामं करणे म्हणजे नोकर नसते होत.. तिला सर्वांची काळजी, प्रेम आहे..” आजी.

“मला नकोय कुणाचे काही…ना मैत्री ना काळजी ना प्रेम..” वेद चिडत म्हणाला आणि आपल्या रूमकडे जायला निघाला.

त्याचे बोलणे ऐकून कमलचे अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यातून पाणी गालांवर ओघळू लागले.

“त्याचे बोलणे मनाला लावून घेऊ नको, काहीतरी कामाचा ताण असेल..” आजी तिला समजावत म्हणाल्या. एका हाताने डोळे पुसत तिने होकारार्थी मान हलवली. डोळे पुसायला तिने हात थोडा वरती केला तर हातातील बांगड्या खाली सरकल्या होत्या.

“कमल, हे हाताला काय झालेय? हे निशाण कसले?”