Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी 40

कमल वेद
पिहू गेली तसे तिथे खोलीत एकदम शांतता पसरली. वेद एकटक तिच्याकडे बघत होता. ती बऱ्याच वेळ मान खाली घालून उभी होती. कोणीच काही बोलत नाहीये बघून ती खाली बघतच बाहेर जाऊ लागली. तेवढयात त्याने तिचा हात पकडला. झालं, परत तो चिडतोय का म्हणून तिच्या हृदयाची धडधड दुप्पट गतीने वाढली.

“ मी.. मी तुम्हाला बरं वाटावे म्हणून तो चहा.. म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणून आणला होता. आता जोपर्यंत तुम्ही काही सांगाल नाही, तोपर्यंत अजिबात मध्ये मध्ये करणार नाही.. तुम्ही थकले वाटत आहात, तुम्ही आराम करा.. तुम्हाला ..” ती अडखळत बोलतच होती की त्याने तिला तिथे पलंगावर बसवले आणि तिचा उजवा हात हातात घेतला आणि तिच्या हातातील बांगड्यांना हात लावत तिच्याकडे बघत होता.

पिहुला उशीर का होतोय बघायला तिथे आजी येतच होत्या की ती पळताना दिसली. परत जातच होत्या की त्यांचे लक्ष खोलीकडे गेले. वेद परत कमलवर रागावतो की काय म्हणून त्या आतमध्ये जाणार की त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून तिथेच दाराच्या पलीकडे थांबल्या.

“मी.. मी.. बांगड्या काढते. मला माहिती नव्हते तुम्हाला त्रास होतो.. काढते मी..” म्हणत ती झटकन जागेवर उठून उभी राहत, तिचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत होती; पण त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि एक एक करत तिच्या हातातील बांगडी काढू लागला. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. तो तिचे काहीच ऐकत नव्हता. चेहऱ्यावरून तो रागात आहे, हेच दिसत होते. त्याचे नाक अजून पण लाल दिसत होते.

“मी.. मी मुद्दामहून तुमच्या अंगावर नाही पडली.” त्याच्या नाकाला लागल्यामुळे त्याला तिचा राग आला आहे, असेच तिला वाटत होते. तिच्याकडे एकदा बघून त्याने परत आपले लक्ष तिच्या हातावर केंद्रित केले. शेवटी त्याने पूर्ण बांगड्या तिच्या हातावेगळ्या केल्या.

“त्रास होत होता तर लगेच सांगता नाही आले? इतकी वळ उमटेपर्यंत चुपचाप होती.” त्याने त्याच्या खिशातून एक क्रीमची ट्यूब काढली आणि तिच्या मनगटावर असलेल्या काळया निळ्या वळांवर हळूवारपणे लावू लागला.
काल रात्री जेव्हा त्याने रागाने तिचा हात पकडला होता, तेव्हा तिच्या मनगटावर त्याच्या हाताची चारही बोटं उमटली होती.

“जास्त त्रास नव्हता झाला..” ती त्याची नजर चोरत, खाली बघत म्हणाली.

“हो बरोबर आहे तुला तर आता सवय झाली असेल ना? आणि मी मूर्ख, सगळं बघून त्रास करून घेतो.” वेद थोडा चिडत म्हणाला.

ती एकटक त्याच्याकडे बघत होती.

“काल रात्री तो, तुझा सो कॉल्ड नवरा, माझ्या असल्या नसल्या गर्लफ्रेंड सोबत तुला एक्सचेंज करतो म्हणाला. काल मी होतो, उद्या तो दुसऱ्या कोणासोबत तुला एक्सचेंज करेल.. जाशील तू? पण येस, तू जाशीलच, पतिव्रता पत्नी ना तू..”

ती घाबरत नकारार्थी मान हलवत होती.

“तुला माहिती याचा अर्थ काय होतो? तुला तो बाजारातील स्त्री समजतो, जसा फायदा असेल, तसा वापर करायचा. उद्या जर बिजनेससाठी काही गरज पडली तर तो तुला विकायला सुद्धा मागेपुढे बघणार नाही. तो माणूस फक्त आपला फायदा बघतो. बायको नाहीये तू, भोगवस्तू आहेस.. तुझ्या या डोक्यात जात का नाही?” तो दातांवर दात घासत बोलत होता.

“तसे नाही…”

“काल त्याच्या कानाखाली वाजवून द्यायची तर तो जसे म्हणत होता, तशी वागत होती.. दारु काय, ते नसल्यासारखे घातलेले कपडे काय? आणि आज तर त्याने हद्द पार केली हा.. जर मी नसतो तिथे तर तुझे डोकं आपटणार होते.. तुला काही झाले असते तर, मी कसे जगा…” बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला होता.

त्याच्या आवाजाने, शब्दांनी तिच्या हृदयात कालवाकालव व्हायला लागली. तो जे बोलतोय, त्यापलीकडे काहीतरी वेगळे आहे असे तिला जाणवत होते. त्याच्या आवाजाने तिचे मन व्याकूळ व्हायला लागले होते.

“मी म्हणजे आम्ही.. ती पिहू, तिचा जीव आहे तुझ्यात.. तुझा चेहरा बघून तिची सकाळ, रात्र होते. एक तर पाऊल उचल, कर डिव्होर्सला अप्लाय, मी आहे ना.. तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी सोबत करेल, काढेल त्यातून, शेवटपर्यंत साथ देईल, एकदा तर विश्वास ठेव.” तो कळकळीने म्हणत होता.

तो शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात असेल, या विचारानेच ती आनंदली होती. बस तो कायम सोबत असावा, सोबत नसला तरी आपल्या डोळ्यांपुढे असावा, हीच तिची इच्छा होती. ही अशी इच्छा तिची कधी आणि कशी झाली होती, हे तिला सुद्धा कळले नव्हते. ना प्रेम हवे होते, ना कुठले नाते, बस तो असावा, हेच तिला हवे होते. त्याचे बोलणे ऐकून आपोआप तिचा हात तिच्या गळ्यात असलेल्या मंगळसुत्रवर गेला आणि तिच्याही नकळत तिच्या ओठांवर खूप छान हसू पसरले.

“मला इथून कुठेच नाही जायचे. मी कुठेच जाणार नाही.” ती ठामपणे म्हणाली. तिचे ऐकून आपोआप त्याच्या कपाळावर तीन आठ्या आल्या होत्या.

“ तुम्हीच म्हणालात ना पिहू, ती माझ्यावर जीव ओवाळून टाकते, आणि सगळे.. माझा परिवार आहे हा, मी इथून कुठेच जाणार नाही. “ ती त्याच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाली. एक क्षण डोळे मिटून, नकारार्थी मान हलवत त्याने सुस्कारा सोडला.

“तुला तुझा सेल्फ रेस्पेक्ट महत्वाचा नाहीये?” तो.

“माझ्या परिवाराच्या आनंदापुढे मला काहीच महत्वाचे नाही.”

“तुला तुझी काही स्वप्न नाहीत? भविष्य सुखकारक व्हावं, वाटत नाही?”

“आहेत ना, माझी खूप स्वप्ने आहेत.. वेमिका, तीचे मोठे फॅशन हाऊस बघायचे आहे, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा असा तिचा साथीदार बघायचा आहे. पिहू, मला तिला मिस इंडिया, (काहीतरी विचार करून) नको नको, मला तिला मोठे डॉक्टर झालेले बघायचे आहे.. रमाआजी, त्यांचे म्हातारपण आनंदी आणि सुखकारक, अगदी त्यांना पाहिजे तसे बघायचे आहे.. आणि तुम्ही, तुमची कंपनी खूप मोठी झालेली, तुम्ही टॉप मध्ये आलेले बघायचे आहे. तुमचे लग्न, तुमची मुलं.. मी त्यांच्यासाठी छान छान झबले शिवेल, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवेल..त्यांना गोष्टी सांगेल..” ती आनंदाने बोलत होती.

ये ऐकून त्याने कपाळावर हात मारला.

“कमल, हे आयुष्य वारंवार नसते मिळत. प्रत्येकाला आपल्या आवडीने जगण्याचा हक्क आहे.”

“मी माझ्या आवडीनेच जगते आहे. ती कशीश, तिचे तरी सुद्धा कुठे तिच्या आवडीने लग्न झाले आहे. प्रेम सुजलवर केले आणि लग्न पियूष सोबत झाले. आयुष्य असेच असते, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नसते होत, पण म्हणून आपण आपली कर्तव्य नसते सोडायची.”

“कोण कशीश?” कमलचे सगळे बोलणे त्याच्या डोक्यावरून गेले होते.

“थोडासा प्यार हुवा हैं, थोडा हैं बाकी वाली.. खरं प्रेम कधीच पूर्ण होत नाही, ते अपूर्णच राहते..” ती आपल्या टीव्ही सीरियलवाल्या ओघाओघात बोलून गेली.

“तुझ्या बकवास आणि फालतू सीरिअल्स..” तो एकदम म्हणाला. खरं प्रेम अपूर्ण राहते, हे त्याला अजिबात आवडले नव्हते.

“कमल, आपण प्रयत्न केले, तर सगळे पूर्ण होते, प्रेम असो, स्वप्न असो वा करिअर.. आधीच हार मानून कसे बसायचे? बरं ते सोड, सध्यातरी मला वाटतेय, तू तुझे शिक्षण पूर्ण करावे, कमीत कमी ग्रॅज्युएशन तरी.”

“साहेब परवानगी नाही देणार.”

“म्हणून म्हणतो, आधी तर त्यालाच सोड.” त्याचा परत चिडका टोन वापस आला होता. तिच्यासोबत बोलता बोलता, तो तिच्यावर तो रागावला आहे, हे सुध्दा विसरला होता. त्याचे असेच व्हायचे, तिच्यावर कितीही राग आला असला तरी तिचे गोंडस रूप, गोड हसू आणि ते चमकदार डोळे बघितले की तो सगळे विसरून जायचा.

“मला तुझी बारावीची मार्कशीट आणि ट्रान्स्फर सर्टिफिकेट दे, तुझ्या साहेबाचे काय करायचे ते मी बघून घेतो.” तो दात ओठ खात म्हणाला.

तिने नकरार्थी मान हलवली.

“म्हणजे? इथे नाही काय? आपण तुझ्या गावाला जाऊन घेऊन येऊ.”

“मी बारावी शिकली नाही.”

“नो प्रोब्लेम, दहावीची दे. आपण बारावीचा फॉर्म भरू आणि मग पुढले शिक्षण घेऊ.” तो तोडगा काढत म्हणाला.


“मी दहावी पण शिकली नाही.” बोलतांना तिचा चेहरा एकदम पडला होता.

“व्हॉट?” तिच्या उत्तराने तो जवळजवळ उडालाच होता.

“गावात सातवीपर्यंत मोफत शिक्षण होते, तेवढे शिकले. बापू तर शाळेत जाऊच दे नव्हता, खूप मारत होता; पण माईने सगळ्यापासून लपवून शाळेत जाऊ दिले. त्याच्या पुढे गावात शाळा नव्हती. शिकायचे असेल तर दुसऱ्या गावाला जावे लागत होते. तिकडे गावच्या पोरी मोठ्या झाल्या की शिकत नव्हत्या. माई सोबतच कामावर जात होती आणि माझे लहान भावंडं आहेत त्यांना सांभाळत होती.”

काहीकाही लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी सुद्धा किती झगडावे लागते, हे तिच्या बोलण्यावरून त्याला समजत होते. तिच्या लहानपणापासूनच तिला तिच्या आवडीप्रमाणे, मनासारखे जगता आलेच नव्हते. तो खूप वेळ तिच्याकडे एकटक बघत, तिच्या विचारात हरवला होता.

“काय झाले?” तो काहीच बोलत नाहीये बघून तिने आवाज दिला.

“ह, काही नाही. तू दहावीची परीक्षा देऊ शकते. त्या नंतर बारावी आणि मग नंतर ग्रॅज्युएशन.”

“पण मी इतकी मोठी, माझे शाळेत जाणे कसे वाटेल? त्या लहान मुलांमध्ये जर मी बसेल, तर सगळे माझ्यावर हसतील.”

“कमल, तू रिअल मध्ये लहानच आहे.”
ती त्यावर कसेनुसे हसली.

“तू फक्त अठरा वर्षाची आहे, ना की एंशी वर्षाची. दुसरं म्हणजे तू दिसायला सुद्धा खूप लहान दिसते, वेळ पडल्यास ती दहावीची मुलं तुझ्यापेक्षा मोठी दिसतील. आणि शिक्षणाला वयाचे बंधन नसते. पण काळजी करू नको, तुला शाळेत जावे लागणार नाही. दहावी आणि बारावीचा फॉर्म भरायचा आणि फक्त परीक्षा द्यायला एक्झाम सेंटरला जावे लागते. बाकी अभ्यास घरी राहूनच करावा लागतो. तुला अभ्यासात मदत करायला मी आणि वेमिका आहोत. त्यामुळे इथे त्या राजीवची परमिशन वगैरे घेण्याचा प्रश्न येतच नाही. तू हो म्हण, मी पुढील सगळी तयारी करतो.” वेद खूप उत्साहाने सगळी माहिती सांगत तिला समजावत होता. ती त्याच्या चेहऱ्यावरील बदलेले भाव बघत होती.

“ट्रस्ट मी, तुझी स्वतःची ओळख असेल, तू खूप मोठी होशील.” वेद.

“तुमच्यासारखी?”

“माझ्यापेक्षा पण.. मग तुझा शिक्षणासाठी होकार समजू?” तो खूप स्वप्नवत नजरेने तिला बघत होता.

तिने होकारार्थी मान हलवली.

“येस..” तो खूप आनंदी झाला होता. आनंदाच्या भरात तो आपले हात पसरवत तिला मिठी मारायला जातच होता की ती दोन पाऊले मागे सरकली. ते बघून तो स्वतःशीच हसला. तो तिला तिचा वेळ घेऊ देणार होता आणि म्हणून मागे हटला. परत जाणार तोच त्याला काहीतरी आठवले आणि तो मागे फिरत तिच्याजवळ गेला.

“एक रिक्वेस्ट करतो, प्लीज काल रात्री सारखे बाहेर नको येत जाऊस. जे आहे ते रूमच्या आतमध्ये.. कळतेय ना मी काय म्हणतोय?” त्याला कसे बोलावे कळत नव्हते. ती फक्त त्याच्याकडे बघत होती.

“खूप त्रास होतो..” त्याचा आवाज जड झाला होता. तो पुढे काही न बोलता, क्षणात बाहेर पडला होता.

“त्यांच्या डोळ्यात पाणी होते काय? की मला भास झाला?” ती जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत, विचार होती.

तो हलकेच डोळ्यांच्या कडा पुसत बाहेर पडला होता, जे अलीकडे उभ्या असलेल्या आजीला दिसले होते. पण तो आपल्याच घाईत होता, त्याला आजी दिसली नव्हती.

“कमल..” आजी आवाज देत तिथे खोलीत आली.

“वेद रात्रीच्या कुठल्या गोष्टीबद्दल बोलत होता? नाही म्हणजे मी इथून जात होते तर माझ्या कानावर पडले आणि तो पण जरा नाराज वाटला म्हणून विचारत होते.” आजी.

“अम् ते.. ते रात्री सा..साहेब ते बारच्या तिथे माझ्या सोबत.. म्हणजे माझ्या ज.. जवळ..” ती अडखळत बोलत होती. तिला खूप कसेतरी वाटत होते. विषयच असा होता की बोलणं खरंच अवघड होते आणि त्यातल्या त्यात त्या गोष्टीला सामोरे जाणे तर तिला त्याहून अवघड आणि विचित्र वाटत होते.

“हम्म, कमल राजीवला तर काही समजत नाही पण तू लक्ष ठेव बाळा, आपल्या घरात लहान मूल आहे, वेमिका आहे..” आजी तिला समजावत म्हणाल्या. तिने होकारार्थी मान हलवली.

****

वेदने तिचे दहावीच्या परीक्षेसाठी फार्म भरण्यासाठी केतनला सगळी माहिती काढायला आणि प्रमाणपत्रे तयार करायला सांगितले.

******

वेद त्याच्या केबिन मध्ये काम करत बसला होता. तेवढयात केतन तिथे आला.

“सर, तुम्ही मिस्टर राजीव यांच्या लग्न बद्दल माहिती काढायला सांगितली होती.” केतन.

“हो.. “ वेदने आपल्या हातातील फाईल बाजूला केली आणि आता त्याचे पूर्ण लक्ष केतनच्या बोलण्याकडे होते.

“सर, त्यांचे लग्न कुठेही रजिस्टर झालेले नाही.” केतन.

“व्हॉट?” ते ऐकून वेद अक्षरशः उडालाच होता.

******

क्रमशः