Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४२

Ved Propose Kamal
मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४२

राजीवच्या बोलण्याचा वेदला खूप राग आला होता, पण कमलचा शांत चेहरा बघून त्याचे मन शांत झाले होते.

“माझी चिऊ..” स्वतःशीच पुटपुटला. तिचा तो गोड भासणारा चेहरा बघून त्याला तिच्या कपाळावर किस करण्याचा मोह झाला. तो तिच्या शेजारी, खाली गुढग्यावर बसला आणि तिच्या कपाळावर झुकला.

“असं चोरून नाही.. पुर्ण हक्काने, सर्वांसमोर करणार.. प्रॉमिस..” हसतच तो जागेवरून उठला. एकदा तिच्याकडे बघून खोलीच्या बाहेर पडला.

पिहूला शाळेत सोडून तो आपल्या ऑफीसमध्ये चालला गेला. तो त्याच्या कंपनीमध्ये खूप मेहनत घेत होता, म्हणून आता कंपनीला बरीच प्रोजेक्ट मिळायला सुरुवात झाली होती. कंपनीचे नाव हळूहळू वर येत होते. बिजनेस वर्ल्डमध्ये आता त्याला बरेच लोकं ओळखू लागले होते.

वेद त्याच्या केबिनमध्ये काम करत बसला होता तेवढयात केतन तिथे आला.

“सर, तुम्ही मिस्टर राजीव यांच्या लग्न बद्दल माहिती काढायला सांगितली होती.” केतन.

“हो.. “ वेदने आपल्या हातातील फाईल बाजूला केली आणि आता त्याचे पूर्ण लक्ष केतनच्या बोलण्याकडे होते.

“सर, त्यांचे आताचे लग्न कुठेही रजिस्टर झालेले नाही.” केतन.

“व्हॉट?”

“एस सर..” केतन.

“मग लग्न वैदिक पद्धतीने झाले असावे. मंदिर, पंडितजी, नातेवाईक..?” वेद.

“नो सर, तसेही काही झालेले नाही.” केतन .

“हाऊज् इट्स पॉसिबल?” ते ऐकून वेद अक्षरशः उडालाच होता.

“मिस्टर राजीव आणि कमल मॅडमचे आपल्या हिंदू कायद्यानुसार ना वैदिक, ना रजिस्टर पद्धतीने लग्न झालेय. मिस्टर राजीव कामानिमित्त बाहेर साईट वर गेले होते. काही दिवस तिथे राहिले होते. कमल मॅडम यांच्या आई साईटवर काम करत होत्या. तिथे कमल मॅडम त्यांच्या लहान भावडांची काळजी घेत होत्या. तिथेच राजीव सरांनी त्यांना बघितले. त्यांना कमल मॅडम काही तासांसाठी हव्या होत्या, पैश्याचे आमिष पण दाखवले पण त्यांच्या घरून नकार आला होता. अर्थातच हे मिस्टर राजीव यांचे नाव लपवून विचारले गेले होते. पण मिस्टर राजीव यांना कमल मॅडम हव्याच होत्या. नकार आल्यामुळे ते आणखीच जिद्दीला पेटले. कमल मॅडमच्या परिवाराची माहिती काढण्यात आली. तर त्यांच्या त्या लोकांमध्ये मुली मोठ्या झाल्या की त्यांना काही पैशांसाठी विकल्या सुद्धा जाते. कमल मॅडमचे वडील खूप लोभी माणूस, ते कमल मॅडमला विकायला तयार झालेत. पण कमल मॅडमच्या आई तयार नव्हत्या. पण नंतर काय झाले माहिती नाही, त्यांच्या आई तयार झाल्या. मिस्टर राजीव यांनी कमल मॅडमसाठी नववधूच्या सर्व वस्तू पाठवल्या, त्या ते घालून आल्यात आणि त्यांची सर्वांसमोर बिदाई झाली. मिस्टर राजीव यांनी त्यांच्या पूर्ण परिवाराची म्हणजे कमल मॅडम यांच्या बहीणभावांच्या भविष्याची जबाबदारी घेतली, म्हणून त्या या लग्नाला तयार झाल्या, एवढे कळले. पण मुळात लग्न म्हणून असे काहीच झाले नाही. मिस्टर राजीव यांना सुद्धा लग्न करायचे नव्हते, पण अचानक ते त्यांना घरी का घेऊन गेले, माहिती नाही. कदाचित त्यांच्या मुलीसाठी केअरटेकर म्हणून पण विचार केला असू शकतो. पण सगळीकडे कमल मॅडम त्यांच्या वाइफ म्हणूनच ओळख आहे.” केतनने त्याला जेवढी माहिती मिळाली होती, ती सांगितली.

ते सर्व ऐकून वेद शॉक झाला होता. कमल बद्दल विचार करून त्याला खूप वाईट वाटत होते, पण त्यांचे लग्न झाले नाही, या विचाराने सुद्धा तो थोडा खुश झाला होता. कारण लग्नच रजिस्टर नाही तर घटस्फोट घेण्यासाठी काहीच करावे लागणार नव्हते.

“कमलच्या नावाने काही शेअर्स, प्रॉपर्टी?” वेद.
राजीव प्रॉपर्टीसाठी किती लोभी आहे, हे त्याला माहिती होते. त्यामुळे तो कमलच्या नावे काही करणार नाहीच, याचा सुद्धा अंदाज होताच, तरी कमलचे राजीवला सोडतांना काही प्रोब्लेम नको म्हणून विचारले.

“नो सर आणि सगळ्या लिगल डॉक्युमेंट्समध्ये त्यांच्या वाइफच्या जागेवर अजूनही राधिका मॅडमचेच नाव आहे.” केतनने माहिती पुरवली.

“ओके. कमलच्या पुढील शिक्षणासाठी सांगितले होते, झाले काय ते काम?” वेद.

“सर, कमल मॅडमचे डॉक्युमेंट्स मिळत नाही आहेत.” केतन.

“त्यांच्या घरून घ्या.” वेद.

“प्रयत्न करून झाला, पण मिळाले नाहीत. त्यांच्या आईने नाही आहेत असे कळवले. असले तरी ते देणार नाहीत.” केतन.

“हम्म.. नो प्रोब्लेम. नवीन डॉक्युमेंट्स तयार करा.” वेद.

“ओके सर.” बोलून केतन निघून गेला.

कमलचे लग्नच झाले नाही आहे, या विचारानेच वेद खूप खुश झाला होता. तिला राजीव पासून वेगळं करणे आता आणखी सोपे झाले होते. कधी कधी ऑफिसचे काम संपवून, घरी जाऊन सगळ्यांना सांगतो, असे त्याला झाले होते.

“आता आणखी वेळ नाही कमल, आजच तुला मी माझ्या भावना सांगणार आहे. आता अजून वाट बघू शकत नाही. कमल, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार.. तुझ्या लग्नाची.. सगळं अगदी तुझ्या मनासारखे, तुझ्या टीव्ही सीरियलमध्ये दाखवतात तसेच आणि मी सुद्धा तुला तसेच प्रपोज करणार आहे.” तो स्वतःशीच विचार करत स्वतःवरच हसला.

“कुठला नायक आवडतो तिला”..विचार करत त्याने लॅपटॉप उघडला.

“हा ते काय नाव सुजल..” त्याने गूगलमध्ये टाकून सर्च केले. ‘ कही तो होगा..’ त्याला सीरियलचे नाव मिळाले. ते यूट्यूबमध्ये टाकले अन् सीरियल बघू लागला.

“वॉव, कपल रेन डान्स, नाइस आयडिया.. नोटेड..” तो आणखी पुढे बघू लागला. “ पण त्या सुजलने तर कशिशला प्रपोज करायच्या आधीच तिचे पियूष सोबत लग्न ठरले.. बकवास सीरियल.. दुसरी बघतो..” स्वतःशीच बडबडत त्याने दुसरी सीरियल ‘कसौटी जिंदगी की ‘ सुरू केली.

“मूर्ख अनुराग..आईच्या आवडीनेच लग्न करायचे होते तर प्रेम तरी का केले? नुसते प्रेमाचे नाटक.. शेवटपर्यंत एकमेकांचे होऊन राहता येत नाही तर काय अर्थ त्या प्रेमाला.. कमोलिकाच बरी म्हणावं त्यात..” स्वतःशीच बडबडत मग त्याने दुसरी सीरियल सुरू केली. असे करत त्याने जवळपास चार पाच सीरिअल्स बघितल्या.

“काय भंकस आहे.. या..या असल्या सीरिअल्सचा आदर्श घेते ही? एकाही सीरियल मध्ये आवडीच्या व्यक्ती सोबत लग्न नाही.. सगळी फालतुगिरी..“ बोअर होऊन त्याने लॅपटॉप बंद केला आणि स्वतःच कसे प्रपोज करायचे त्याचा विचार करू लागला.

पटापट कामं आटोपून तो ऑफिसच्या बाहेर पडला ते थेट ज्वेलरीच्या दुकानात गेला. खरेतर त्याला तिच्यासाठी खूप मौल्यवान अशी सगळ्यात सुंदर अंगठी घ्यायची होती, पण त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी तिचे मंगळसुत्र हरवले होते. त्या दिवशी ती खूप जास्त घाबरली होती, टेन्शनमध्ये आली होती. त्यामुळे त्याला खूप महागडे काही देऊन तिचा ताण वाढवायला नको वाटले आणि तिला साधे, नाजूक डिझाईन्स आवडतात हे सुद्धा कळले होते. त्याने खूप साधीशी पण अगदी नाजूक अशी सोन्याची रिंग घेतली. त्यावर त्याने एक नाजूक कमळ कोरून घेतले. स्वतःसाठी सुद्धा अगदी तशीच रिंग घेतली. दोन्ही रींग्ज बघून तो स्वतःशीच लाजत गालात हसला.

“कमल .. माय हार्टबिट..” म्हणत रिंगवर त्याने ओठ टेकवले.

“हाऊ क्यूट?” दुकानातील मुलींची नजर त्याच्यावरून हटत नव्हती एवढा तो त्या रिंग बघतांना गोड वाटत होता. त्याच्या त्या गोड लाजण्यामुळे त्या साध्याश्या अंगठ्यांची किंमत सुद्धा एकदम वाढली होती.

“कमल, आता फक्त तू आणि मी.. आपल्या मध्ये आता मी कोणालाच येऊ देणार नाही, त्या राजीवला सुद्धा नाही. आपल्या दोघांची छोटीशी दुनिया, ज्यात फक्त प्रेम असेल तुझं नी माझं.” आपल्याच विचारात तो गाडी चालवत होता. रस्त्याच्या कडेने फुलवाली आजी दिसली. ती सुंदर सुवासिक फुलं बघून त्याला पूर्ण टोपले घ्यायची इच्छा झाली.

“वेद नको, प्रेम अगदीच उतू जातेय असे वाटेल..” केसातून हात फिरवत तो स्वतःच्याच विचारांवर हसला आणि जाईजुईंच्या फुलांचा एक नाजूक गजरा घेतला.

“हे कमल, मी येतोय.. बस थोड्या वेळ वाट बघ..” म्हणत त्याने हातातील गजऱ्याचा सुगंध घेत आपल्या श्वासात भरून घेतला.


*****