Login

मिळावे तुझे तुला आस ही ओठी ४३

मिळावे तुझे तुला.. कमल
मिळावे तुझे तुला आस ही ओठी 43


पूर्वार्ध:

वेद त्याच्या पर्सनल सेक्रेटरीला कमल आणि राजीवच्या लग्नाचे सगळी माहिती काढायला सांगतो. त्यात त्याला कळते की त्या दोघांचे लग्न कुठेच रजिस्टर झालेले नाही आणि वैदिक किंवा इतर कुठल्याही पध्द्तीने त्यांचे लग्न झालेले नाही. ते ऐकून तो खूप आनंदी झाला होता. आता त्याला तिला राजीव पासून वेगळे करणे सोपी जाणार होते आणि कदाचित कमल पण लवकर राजीव पासून वेगळे होण्यासाठी लवकर तयार होईल असे वाटत होते. तो त्याचे प्रेम तिच्या समोर व्यक्त करणार होता आणि लवकरच घरी पण सांगणार होता.
तिला प्रपोज करण्यासाठी त्याने एक नाजूक अंगठी आणि जाईच्या फुलांचा गजरा घेतला होता आणि आपल्या बाईकवरुन घरी जायला निघाला.

आता पुढे:

वेद अगदी आपल्याच तालात गाडी चालवत होता. गाडी चालवताना मध्येच गाणे काय गुणगुणत, तर मध्येच कमलला आठवत केसातून हात फिरवत स्वतःशीच लाजत होता. त्याला स्वतःचेच आश्चर्य आणि कौतुक वाटत होते. तो प्रेमात पडेल, एवढा बदलेल, त्याला सुद्धा आश्चर्य वाटत होते. पण म्हणतात ना प्रेमात माणूस अगदीच बदलून जातो, वेडाच होतो, तसेच काहीसे त्याच्या बाबतीत घडत होते. त्याला आता फक्त तो - कमल आणि कमलचे सुख, आनंद दिसत होते. काहीही करून तिची सगळी स्वप्ने पूर्ण करायची आणि तिला खूप आनंदी ठेवायचे, हेच भविष्य तो बघत होता.

स्वतःच्याच विचारात तो घरी पोहचला. घाईघाईतच गाडी पार्क करून तो घरात शिरला आणि तिला शोधू लागला. कधी कधी एकदाचे तिला तिचे आणि राजीवचे लग्न झालेले नाही, ते पतिपत्नी नाही, हे सांगतो, असे झाले होते. घरात शिरल्या शिरल्या त्याची पाऊले किचनकडे वळली. रोज वेद घरी येण्याच्या वेळी कमल किचनमध्ये असायची. त्याच्या बाईकचा आवाज आला की ती गॅसवर चहाचे आधण ठेवायची आणि तो फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत त्याचा आवडता आलं, गवती पात घातलेला वाफाळलेला चहा त्याच्या पुढ्यात असायचा. त्याने किचनमध्ये वाकून बघितले पण कमल तिथे नव्हती. त्याने वरती जाऊन बघितले, सगळ्या खोल्या बघितल्या, पण ती तिथे पण नव्हती.

“कमलsss, कमलssss…” आवाज देत तो खाली आला.

“सविता ताई, कमल कुठेय?” वेदने घरात काम करण्याऱ्या मावशींना विचारले.

“काय रे भैय्या काय झाले? एवढे कमल कमल काय करतोय?” त्याचा आवाज ऐकून वेमिका बाहेर आली.

“ते मला कमलला काहीतरी सांगायचे आहे. कमल कुठे आहे?” वेद अधिरतेने विचारत होता.

“कमल आजीसोबत..”

“वेमिकाsssss…” वेमिका वेदला सांगणारच होती की तेवढयात कमल मुख्य दारातून पळत आता आली. ती खूप आनंदी दिसत होती.

“कमल, मला तुला काहीतरी सांगायचे आहे.” वेद तिच्याजवळ येत म्हणाला. त्याच्या हातात असलेला फुलांचा गजरा त्याने हातात पाठीमागे पकडून ठेवला होता.

“कमल हळू.. आता असे पळायचे नाही..” तिच्या पाठीमागून येत आजी तिला थोड्या रागावत म्हणाल्या. त्यांच्या असे बोलण्याने वेमिका आणि वेद थोडे गोंधळले.

“मला, मला पण तुम्हाला खूप मोठी आनंदाची बातमी द्यायची आहे.” म्हणत तिने वेमिकाला घट्ट मिठी मारली.

“अगं हो हो.. आधी नीट उभी तर रहा. आल्यापासून हवेतच आहेस.. पडशील अशाने..” वेमिका तिच्या हाताला पकडून तिला शांत उभे करण्याचा प्रयत्न करत होती.

“रमाआजी, आधी हीची दृष्ट काढ बाबा.. बघ ना ती कशी करतेय..” वेमिका हसत म्हणाली.

“मी.. मी.. मी आई होणार आहे..” पळत आल्यामुळे कमलला सुद्धा धाप लागली होती. ती मोठमोठ्याने श्वास घेत म्हणाली. ते ऐकल्या बरोबर वेदच्या हातात असलेली गजऱ्याची पुडी खाली गळून पडली. डोकं गरगरत आहे, वाटू लागले. श्वास घश्यात येऊन अडकला. जीव जातोय की काय असे त्याला होऊ लागले.

“ तू मस्करी करतेय ना? हे बघ हा फार bad joke होता.” ते ऐकून वेमिका म्हणाली.

“नाही नाही, मी इतक्या मोठ्या, माझ्या आयुष्यातील इतक्या सुंदर गोष्टीचा जोक करणार का? हे खरंय, मी आई होणार आहे. मला.. मला बाळ होणार आहे. इथे.. माझ्या पोटात आहे ते आता.” बोलतांना तिच्या डोळ्यात जणू चांदण्या लुकलुकत होत्या. वेद तिची प्रत्येक हालचाल बघत होता. ती ज्या दिशेने जाईल, आपोआप त्याचे डोळे त्या दिशेने वळत होते.

“सविता मावशी, मी आई होणार आहे..” कमल घरात काम करणाऱ्या मावशी जवळ जात खूप आनंदाने सांगत होती. ती कमलकडे बघून कसेनुसे हसली. तेवढयात पिहू सुद्धा तिथे आली होती.

आजी, वेमिका सुद्धा तिच्याकडे बघत होत्या. थोड्या वेळसाठी घरात काय चालले आहे, कुणालाच काही कळत नव्हते.

“पिहू, तू दीदी होणार आहेस.. आपल्या घरी एक छोटेसे बाळ येणार आहे.” ती पिहू जवळ जात तिच्या गालांवर किस करत म्हणाली. पिहुचे डोळे तिच्याही डोळ्यांपेक्षा मोठे झाले.

“मला बेबी दीदी म्हणेल का? पण बेबी कोण आणणार आहे? डॉक्टर अंकलने हॉस्पिटल मधुन बेबी न्यायला परमिशन दिली का? गर्ल बेबी की बॉय बेबी? पण मला गर्ल बेबी पाहिजे. मी तिला केसांच्या अशा दोन दोन फाऊंटेन घालून देईल आणि टिटू पण लावून देईल..” लहानग्या पिहूच्या डोक्यात प्रश्नाची भरिमाड सुरू झाली होती.

“अ… गर्ल बेबी नाही बॉय बेबी.. आपल्याकडे बॉय बेबी येणार आहे.” पिहूने गर्ल बेबी म्हटले, तेव्हा ती आनंदली होती. पण लगेचच तिच्या डोळ्यांपुढे आतापर्यंतच्या तिच्या आयुष्यातील सगळ्या मुली/ स्त्रियांची ऊभी आयुष्य येऊ लागली आणि शेवटी तिचे स्वतःचे आयुष्य उभे ठाकले. आणि तिला आता मुलगी नको होती, मुलगाच हवा होता आणि म्हणून तिने पिहूला बॉय बेबीच येणार सांगितले.

“मला तो दीदी म्हणेल?” पिहूने परत तिचा इवलासा प्रश्न केला.

“हो..” कमल.

“मग चालेल मला. तसे पण आपल्या इथे सगळ्या गर्ल गर्लच आहे. वेद भैय्या एकटाच बॉय आहे. त्याच्या सारखा बेबी असेल ना, तसाच पाहिजे मला. स्कूल मधला तो रोमु खूप त्रास देतो मला.. मला वेद भैय्या सारखा बेबी पाहिजे..” पिहू.

त्यावर कमल वेदकडे बघत खुद्कन हसली. जसे की काय पिहू अगदी तिच्या मनातील बोलली होती.

“हो, तुझ्या वेद भैय्या सारखाच बेबी आणू.” कमल.

“मग कुठे आहे बेबी? दे ना लवकर..” पिहू.

“अगं आता तो इथे माझ्या पोटात आला आहे. डॉक्टर म्हणाले त्याला मोठे व्हायला थोडे दिवस लागेल. थोडी काळजी घ्यावी लागेल, मग देतील.” कमल आपल्या पोटावर हात ठेवत तिला सांगत होती.


ते सगळं ऐकून वेमिकाच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर राग दाटून आला. तिने आजीकडे बघितले आणि इशाऱ्यानेच कमल जे बोलतेय ते खरे आहे का? म्हणून विचारले. तर आजीने सुद्धा होकारार्थी मान हलवली. ते बघून वेमिकाचे अवसान गळून पडले. वेमिकाचा सुद्धा कमलवर एक मैत्रीण म्हणून जीव होता. तिला सुद्धा कमलने नेहमी आनंदी, सुखी राहावे, असेच वाटत होते. पण ते या अशा पद्धतीने नको होते. त्यामुळे तिला ही बातमी अजिबात गोड वाटली नव्हती.

“काय बकवास करतेय?” वेमिका थोड्या कठोर शब्दात म्हणाली.

वेमिकाचा आवाज ऐकून कमल एकदम भानावर आली. ती आतापर्यंत स्वतःच्याच आनंदात घरभर फिरत सर्वांना ती गर्भवती असल्याचे सांगत सुटली होती.

आजींनी सविताला इशारा केला तसे ती पिहूला घेऊन तिथून बाहेर निघून गेली.


“मी खरंच.. ते साहेब…”

“यू शट अप..” कमल बोलतच होती की वेमिका चिडून म्हणाली. तिच्या आवाजाने कमल थोडीशी घाबरली आणि चूप झाली. रडावलेल्या नेत्रांनी ती आळीपाळीने आजी, वेद तर वेमिकाकडे बघत होती.

“हे बघ, हे असे घडले असेल तरी आपण आताच्या आता हॉस्पिटल मध्ये जाऊ आणि ओबॉर्शन करून घेऊ. आपल्याला नकोय ते..” वेमिका तिचा हात पकडत म्हणाली.

“नाही, माझं बाळ आहे ते.. मी कुठे नाही जाणार..” कमल.

“ते त्या राजीवचे आहे, तुला कळत नाहीये का काही? त्या घाण माणसाचे आहे ते बाळ..” वेमिका चिडत होती. कमल मात्र नकारार्थी मान हलवत होती.

“तू मुर्खासारखे का वागतेय? तुला कळत आहे का, यामुळे तू या पिंजऱ्यातच अडकून पडशील. यातून कधीच बाहेर पडू शकणार नाहीस. तू तुझ्या हक्काचे, आवडीचे आयुष्य कधीच जगू शकणार नाहीस. तू या कष्टातून कधीच मोकळी होणार नाहीस. हट्ट करू नकोस, तू लहान आहेस.. तुला सध्या काहीच समाजात नाहीये. “ वेमिका.

“वेमिका बरोबर बोलतेय कमल.. काही क्षणिक सुखासाठी तू तुझं आयुष्य घालवून बसशील बाळा आणि अजून तीन महिने झालेले नाहीत, आता बाळत जीव आलेला नसतो. आता गर्भ पाडला तरी काही पाप लागत नाही.” आजी पण तिला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या.

काही दिवसांपासून कमलची तब्येत खराब राहत होती. वारंवार ॲसिडिटी, उलट्या होत होत्या. आजींच्या अनुभवी नजरेतून ते सुटले नाही. आजही तिला खूप गरगरल्या सारखे वाटत होते म्हणून शेवटी त्यांनीच तिला दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला होता. तिथे जेव्हा ती गर्भवती असल्याचे कळले, तेव्हा त्यांना सुद्धा आनंदच झाला होता. पण नंतर जेव्हा राजीव त्यांच्या डोळ्यापुढे आला, तेव्हा मात्र कमलचे पुढील आयुष्य त्यांना अंध:कारमय जाणवू लागले. जर ती यात अडकून पडली तर ती तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात कधीच करू शकणार नव्हती. त्यांना माहिती होते राजीव पासून वेगळे होणे सोपी नाही तरी सुद्धा मनात कुठेतरी एक आशा होती की या पोरीचं आयुष्य सुखी व्हावे, म्हणून त्या सुद्धा वेमीका प्रमाणे तिला समजावून बघत होत्या.

“नाही, माझं बाळ आहे ते, मला हवे आहे.” कमल त्या दोघींना उद्देशून म्हणाली. तिचा आवाज थोडा कापरा झाला होता.

“हे बघ, घाई करू नकोस. ही प्रेग्नंसी अबॉर्ट केली तर तू पुढे आई होऊ शकणार नाहीस, असे नाही. पुढे पण तुला बाळ होऊ शकते. मला एवढेच म्हणायचे आहे की तुला योग्य जोडीदार भेटला की तू हा निर्णय घे. आता हे बाळ त्या माणसाचे आहे, आम्हाला कुणालाच ते आवडलेले नाही. ते घाण बाळ काढून टाक.” कमल ऐकत नाहीये बघून वेमिका तिच्या थोडी जास्तच चिडली होती आणि थोडे ओरडतच बोलत होती.

आजी आणि वेमिका ऐकत नाहीये, तिला समजून घेत नाहीये म्हणू ती वेदच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.

“माझं बाळ घाण नाहीये. ते फक्त माझं बाळ आहे, ते घाण नाहीये.” ती त्याच्या डोळ्यांत बघत बोलत होती. तिचा आवाज जड झाला होता. तिच्या बाळाला घाण म्हटल्यामुळे ती खूप जास्त दुखावले गेली होती. ती वेदना तिच्या आवाजात जाणवत होती. आतापर्यंत आनंदी असणारी कमल आता खूप दुःखी झाली होती. तिच्या शब्दात ओलावा, डोळ्यात खूप अश्रूंनी गर्दी केली होती. वेद खूप स्तब्ध उभा, तिच्या डोळ्यांच्या आरपार बघत होता.

“ मी घाण आहे का?” तिने त्याला प्रश्न केला, तसे त्याने त्याच्याही नकळत नकारार्थी मान हलवली. शब्द तर त्याचे केव्हाच गोठले होते. तो एकटक कमलकडे बघत होता. हळूहळू कमलचा चेहरा त्याला धूसर होऊ लागला होता. डोळ्यांतील अश्रू, डोळ्यांच्या कोनात जिरवण्याचे खूप अवघड आणि असह्य असे काम तो करत होता.

“नाही ना, मग माझ्या पोटात वाढणार आहे ते बाळ, ते घाण कसे होईल? मी मन मारून जगत होते, पण मला आता खरंच मनापासुन जगावेसे वाटतेय. या बाळामुळे माझं काही अस्तित्व आहे, हे जाणवले मला. माझ्या जवळ तर माझे काहीच नाही, पण हे बाळ माझे असणार आहे. मी त्याच्यावर प्रेम करू शकणार आहे, त्याला रागावू शकणार आहे, त्याच्यावर ओरडू शकणार आहे. कुणाला लपून, घाबरून मला प्रेम करावे लागणार नाही..माझं शरीर तर माझे नव्हतेच, माझ्या मनावर पण माझा हक्क राहिलेला नाही. पण हे बाळ माझे अस्तित्व आहे. माझी खरोकर कुणाला गरज असणार आहे, ते बाळ माझं ऐकेल, माझ्यासाठी थांबेल, माझ्यासाठी रडेल.. माझ्यासाठी हसेल..”

“मी पण ऐकले असते तुझे कमल.. एकदा बोलून तर बघायचे होते..” ती बोलत होती तेव्हा वेद तिच्याकडे बघत मनोमन बोलत होता.

“आतापर्यंत माझे कोणीच नव्हते, जे होते त्या सगळ्यांनी मला त्यांच्या दासी प्रमाणे वागवले, माझ्यावर हुकूम सोडला.. पण हा बाळ तसा नसेल.. माझा अंश, माझं बाळ.. मला हवयं माझे बाळ..” कमल तो काय उत्तर देतो, ते बघत होती. त्याचे उत्तर तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे, तिचे मन म्हणत होते. का म्हणत होते, ते तिला पण नव्हते कळले.

“आम्ही कुठे तुला बाळ करू नको म्हणतोय. आम्ही बस म्हणतोय की हे बाळ नको. एक योग्य पुरुष, जो खरोखर एक पती बनाण्या योग्य असावा.” वेमिका मध्येच म्हणाली.

“नको..” वेदचा हात आपल्या दोन्ही हातात पकडत ती जोरजोराने नकारार्थी मान हलवत होती. तिच्या स्पर्शाने त्याला त्याच्या शरीराला मुंग्या जाणवू लागल्या.

“आता दुसरा पुरुष नको. परत तेच, तसे स्पर्श नकोत. मला खूप घाण वाटतात ते स्पर्श, नाही आवडत काहीच.. खूप त्रास होतो, खूप दुखते, वेदना होतात.. बाळ हवे म्हणजे हे सर्व आले. मला आता ते कुठल्याच पुरूषासोबत नको. चांगला, वाईट दुसरा कुठलाच पुरुष नको. खूप थकलीय मी, परत दुसऱ्या कुणाकडून असे काहीच सहन होणार नाही. मला लग्न नको, घर नको की कोणाचे प्रेम नको. भार्गव, मला फक्त माझे हे बाळ हवे आहे.” ती कळवळून बोलत होती. आता तिचा घसा सुद्धा दुखायला लागला होता.
बोलत ती होती पण त्रास त्याला व्हायला लागला होता.तिचा त्रास तो अनुभवू शकत होता. तिला आपल्या कुशीत घट्ट पकडुन तिचा त्रास वाटून घ्यावा, असे त्याला वाटत होते. तिला गोंजरावे, मायेने थोपटावे, वाटत होते. पण तो बांधल्या गेला होता. त्याला असह्य वाटत होते.

ते ऐकून आजी आणि वेमिकाचे सुद्धा डोळे ओलावले होते.

“हे बाळ आले तर तू खुश राहशील?” वेद तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला. त्याच्या डोक्याने कितीही बंड पुकारले तरी त्याने मन मानत नव्हते आणि आपोआप त्याचा हात तिच्या गालांवर विसावला.

ते ऐकून तिने होकारार्थी मान हलवली.

“तुझ्या या निर्णयात मी तुझ्या सोबत आहे. अगदी शेवट पर्यंत मी असेल आहे. फक्त एक अट आहे, रडायचे नाही.” वेद शांतपणे म्हणाला.

त्याच्या होकाराने तिच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याच्या हातावर डोकं ठेऊन ती रडत होती. रडतारडता आनंदाने हसतही होती. रडतारडता, हसताहसता तिच्या दोन्ही हातांच्या मुठीत बंद असणाऱ्या त्याच्या हातावर ती कितीतरी किस करत होती. हवा होता त्याला तिचा हा स्पर्श, पण या अशा पद्धतीने नको होता. तो फक्त तिच्याकडे बघत होता.

“मला अजूनही नाहीच आवडले हे काही, पण तरीही मी तुझ्या सोबत आहे.” वेमिकाने तिला मागून मिठी मारली. कमलने सुद्धा वेदचा हात सोडत, सरळ होत तिला करकचून मिठी मारली.

“माझं बाळ घाण नसणार आहे. या घरात त्याला छान संस्कार मिळणार आहेत. आजी, तू मी, त्याला छान छान गोष्टी शिकवू. आजींच्या संस्कारात ते खूप सुसंस्कारी बाळ असेल.. “ कमल बडबड करत होती.

“मी नाही जाऊ शकत हेंघर सोडून, मला तुम्ही सगळे हवे आहेत.. तुमच्या शिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे..” ती बोलत होती.

तिला खुश बघून वेदने डोळे बंद करत एक असह्य असा श्र्वास सोडला. आतापर्यंत डोळ्यात अडवू बघणारे त्याचे अश्रू त्याच्या बंद डोळ्यातून बाहेर पडलेच. तो आपले अश्रू पुसत, भरभर मोठमोठी पावले टाकत त्याच्या खोलीत निघून गेला.

“राधिका मॉम, इट्स ऑल बिकोज ऑफ यू..यू रुईन माय लाईफ. माझ्या लाईफमध्ये काहीच उरले नाही. का आणलेस तू त्याला आमच्या आयुष्यात? इट्स ऑल बिकोज ऑफ यू.. तुझ्यामुळे.. फक्त तुझ्यामुळे..” तो खिडकीत उभा, बाहेर कुठेतरी बघत मनातच बोलत होता. वारंवार डोळ्यातील अश्रू पुसत होता पण ते मात्र थांबत नव्हते.

“वेद..” त्याला आवाज आला तसे त्याने मागे वळून बघितले तर दारात आजी उभ्या होत्या.

“रमा आजी..” त्याने काठोकाठ डोळे कोरडे केले.

“काय झाले?” आजी आतमध्ये येत म्हणाल्या.

“काही नाही..” मनाला कसेतरी आवरले आणि ओठांवर उसने हसू आणत त्यांच्याकडे बघत होता.

“शेवटी प्रेमात पडलासच ना? कमलवर खूप प्रेम करतो ना..” आजी त्याच्यावर नजर रोखत म्हणाल्या.

*********

क्रमशः

©️®️ मेघा अमोल

कथा कशी वाटतेय, नक्की कळवा.
आतापर्यंत दिलेले कॉमेंट्स, लाईक्स साठी खूप धन्यवाद!


🎭 Series Post

View all