मिळावे तुझे तुला आस ही ओठी 44
पूर्वार्ध:
वेद कमलला प्रपोज करायचे म्हणून सगळी तयारी करून घरी येतो. तेवढयात कमल आणि आजी हॉस्पिटल मधुन घरी येतात आणि सर्वांना कळते की कमल गर्भवती आहे. वेमिका आणि आजी तिला गर्भपात करण्यासाठी सांगतात. यामुळे तिचे पुढील आयुष्य कसे विस्कळीत होईल, हे पण समजावतात पण कमलला आई व्हायचे असते. ती सर्वांना समजवून सांगते आणि वेद तिची साथ द्यायला तयार होतो.
आता पुढे…
“राधिका मॉम, इट्स ऑल बिकोज ऑफ यू..यू रुईन माय लाईफ. माझ्या लाईफमध्ये काहीच उरले नाही. का आणलेस तू त्याला आमच्या आयुष्यात? इट्स ऑल बिकोज ऑफ यू.. तुझ्यामुळे.. फक्त तुझ्यामुळे..” तो खिडकीत उभा, बाहेर कुठेतरी बघत मनातच बोलत होता. वारंवार डोळ्यातील अश्रू पुसत होता पण ते मात्र थांबत नव्हते.
“वेद..” त्याला आवाज आला तसे त्याने मागे वळून बघितले तर दारात आजी उभ्या होत्या.
“रमा आजी..” त्याने काठोकाठ डोळे कोरडे केले.
“काय झाले?” आजी आतमध्ये येत म्हणाल्या.
“काही नाही..” मनाला कसेतरी आवरले आणि ओठांवर उसने हसू आणत त्यांच्याकडे बघत होता.
“शेवटी प्रेमात पडलासच ना?” आजी त्याच्यावर नजर रोखत म्हणाल्या.
आता मात्र त्याने रोखून ठेवलेला अश्रूंचा बांध सुटला आणि पळत जात त्याने आजीला मिठी मारली आणि खूप रडायला लागला. त्यांचा २५-२६ वर्षाचा नातू, जो बिजनेसमध्ये मोठमोठ्यांना चाट पाडत होता, एवढा पुरूषासारखा पुरुष अगदी लहान मुलाप्रमाणे आपल्या आजीच्या कुशीत शिरून, हुंदके देत रडत होता. आजी त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होती. त्याला मोकळे होऊ देत होती.
“ कमलवर खूप प्रेम करतो ना?” तो थोडा शांत झालेला बघून आजी म्हणाल्या.
“कळलेच नाही ग कधी प्रेम झाले ते..” तो आपले अश्रू पुसत म्हणाला. त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावरील त्याचे नाक रडून रडून अगदी लाल झाले होते. डोळे पण सुजले होते. डोळे कितीही पुसले तरी अश्रू सरत नव्हते.
“वेळ चुकली बाळा..” आजी.
“माहिती आजी, पण काय करू, झाले प्रेम..तिच्याशिवाय राहणे आता खूप कठीण होतेय.. जीव जातोय माझा.. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. असे वाटतेय कुणीतरी माझा गळा दाबत आहे.” तो खूप कळवळून बोलत होता.
“मग तरी तू तिला तिच्या प्रेग्नंसी मध्ये साथ का दिली?”
“आजी, ते बाळ तिला हवे होते. बघितले ना किती खुश होती? ती या घरात आल्यापासून आज पहिल्यांदा मी तिला इतके खुश, इतके आनंदी बघितले. आज पहिल्यांदा ती खूप मनापासून हसत होती. कसा नकार देणार होतो? तिच्या ओठांवरील हसू कसे हिरावून घेणार होतो? नाही जमलं ते मला..”
“तिला झेपेल प्रेग्नंसी? ती किती अल्लड आहे, त्यापेक्षा किती लहान आहे.”
“हो. जे आपल्याला मनापासून आवडते, ते करण्याचा आपल्याला कधीच त्रास होत नाही आणि आपोआप शक्ती एकवटून येते. आणि मी आहे तिच्या सोबत.. तिला काही होऊ देणार नाही.”
“तिचं शरीर तिचे राहिले नाही. आणि वरतून तिच्या गर्भात राजीव म्हणजे दुसऱ्या कुणाचेच बाळ आहे.”
“प्रेम आणि शरीराचा काय संबंध आजी?”
त्याचे ते बोलणे ऐकून आजी एकदम स्तब्ध झाली. वेदचे प्रेम शरीर वगैरेच्या मोहाच्या पलीकडे गेलेय, त्याचे प्रेम खूप पवित्र आहे, आजीला कळले होते. पण तरीही एवढे पूर्ण आयुष्य फक्त प्रेमावर काढता येत नाही, आयुष्याचा जोडीदार लागतोच, म्हणून आजीला आता त्याची खूप काळजी वाटायला लागली होती.
“तू तिच्यात वहावत चाललाय वेद. थांबव, ती तिच्या त्या नात्यात खूप पुढे गेलीय, ती तुझ्याकडे नाही येणार..”
त्याला ते समजत होते, तो सुन्न मनाने कोपऱ्यात कुठेतरी नजर लावून बसला होता. डोळे वाहत होते.
“वेद, तिला सांभाळणार म्हणतोय ना? इथे तर तू स्वतःलाच सांभाळू शकत नाहीये.” आजी थोड्या कठोर शब्दात म्हणाली तसा तो भानावर आला.
“येईल, बाळ झाल्यावर येईल ती.. मी तिला सांगेल माझे तिच्यावर प्रेम आहे.. येईल ती.”
“आणि नाही आली तर?”
“काही प्रोब्लेम नाही. ती माझ्या डोळ्यांसमोर, माझ्या आजूबाजूला हसत खेळत असली तरी मला पुरेसे आहे.” तो ठामपणे म्हणाला.
“ आणि तुझे आयुष्य? तुझा परिवार? तुझ्या गरजा?” आजी थोडे स्पष्टपणेच म्हणाली.
“रमाआजी, ती माझी आहे. हे बाळ होऊन जाऊ दे, ती येईल.”
“ठीक आहे, बाळ होईपर्यंत वाट बघू. पण ती जर आली नाही, तर तुला तुझ्या आयुष्यात पुढे जावे लागेल. तुला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करावे लागेल. मला वचन दे.” आजी आपला उजवा हात पुढे करत म्हणाली.
“हे असे कसले वचन मागतेय? मी असे वचन नाही देऊ शकत.”
“मग तुझा आणि माझा संबंध संपला.” आजी खूप कठोरपणे म्हणाली.
आजीचे शब्द ऐकून तो खूप हतबल झाला. एक एक करून सगळी जवळची नाती हातून निसटून जात होती. जवळचे कोणीच उरत नव्हते.
“ठीक आहे, माझे प्रयत्न हारले तर तू म्हणशील तसेच सगळे होईल.” त्याने आजीला वचन दिले.
त्याच्या कडून असे वचन घेतांना आजीला खूप वाईट वाटत होते, पण तिचा नाईलाज झाला होता. त्याने एकाच ठिकाणी गुंतून पडू नये, हेच तिला वाटत होते.
“आजी मी तुला वचन तर दिले आहे पण तिची काळजी घेण्यापासून तू मला थांबवणार नाहीस. तुला वचन देतो, मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही, पण मी कायम, माझ्या आयुष्याच्या शेवट पर्यंत तिच्यासोबत राहील आणि मला कोणीच थांबवणार नाही.”
ते ऐकून आता आजीचेच डोळे पाणावले होते. तिने होकारार्थी मान हलवली.
“ देवा, ही कसली परीक्षा बघतोय माझ्या लेकराची? नकोरे इतका त्रास देऊ..” मनोमन देवाजवळ प्रार्थना करत आजीने त्याला परत आपल्या कुशीत घेतले.
“आजी, आय एम फाईन..” तो हसत म्हणाला आणि लॅपटॉप उघडून आपले काम करत बसला.
आजी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून निघून गेली.
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे नाश्त्यासाठी जमले होते. राजीव सुद्धा नाश्ता करत होता. कमल खुणेनेच आजीला बोला म्हणून खुणावत होती. वेद आणि वेमिका आळीपाळीने त्यांच्याकडे बघत होते.
“राजीव, मला थोडे महत्वाचे बोलायचे आहे म्हणजे सांगायचे आहे. सविता पिहूला शाळेची तयारी करून दे.” आजी म्हणाली आणि तिने सविताला इशाऱ्याने पिहूला आतमध्ये न्यायला सांगितले.
“हो बोला..” तो खाता खाता म्हणाला.
“कमल प्रेग्नंट आहे.” आजीने सरळ स्पष्टपणे सांगितले.
“ऑबोरशन करून घे. मी डॉक्टरची ओप्पॉइंमेंट घेऊन ठेवतो.” राजीव कमलकडे बघत म्हणाला.
“ऑबो……..रशन म्हणजे?” कमलला काही कळले नव्हते. तिने अडखळत विचारले. मात्र राजीवचे बोलणे ऐकून वेमिका खुश झाली होती.
“म्हणजे गर्भ म्हणजे बाळ पाडून घे, म्हणजे काढून घे..” वेमिका तिला समजावत म्हणाली.
“न.. न.. ना.. नाही.” कमल बोलतांना अडखळत होती.
“तिला ते बाळ हवे आहे.” आजीने सांगितले.
“व्हॉट? नो नीड. आताच डॉक्टरला कॉल करतो.” राजीव म्हणाला.
“मला एवढे फक्त एवढे द्या.” कमलचे डोळे परत पाणावले. आवाज कातर झाला.
“नाही. मला माझ्या लाईफमध्ये काही अडथळे नकोत.” राजीव थोडे रागावून म्हणाला.
कमलच्या डोळ्यांतून अश्रू तिच्या गालांवर घरांगळू लागले. ती अश्रूपूर्ण नजरेने वेदकडे बघत होती. ते बघून वेदचा जीव घशात अडकला. त्याला तिच्याकडे बघणे सुद्धा होत नव्हते. तिचा रडावलेला चेहरा, तिचा तो गहिवरला आवाज त्याला सहन होत नव्हते. त्यालाच त्याच्या हृदयात दुखत आहे, जाणवत होते.
“मिस्टर राजीव, आय गेस तुम्ही ही डील नाकारून लॉसमध्ये जात आहात. तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीसाठी वारसदार नको का? मुलगा नको का? नाही म्हणजे तुम्हाला मुलगा नसला तर माझ्यासाठी ते उत्तमच असणार आहे. पुढे जाऊन हे सगळं मलाच बघायचं आहे, आपोआप मीच वारसदार होणार आणि मग हे सगळं माझं होणार.. वॉव!” वेद थोडासा अजिबपणे हसत म्हणाला.
आजी आणि वेमिका खूप अजीब नजरेने त्याला बघत होत्या.
पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यमागे हे सगळे बोलताना त्याच्या हृदयावर किती घाव होत होते, हे त्यालाच काळात होते.
पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यमागे हे सगळे बोलताना त्याच्या हृदयावर किती घाव होत होते, हे त्यालाच काळात होते.
*****
क्रमशः
खूप जणांना हा टर्न आवडलेला नसेल. पण कथेचे नावच आहे मिळावे तुझे तुला.. आस ही ओठी..
Thank you..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा