Login

मिळून साऱ्याजणी (सेतूबंध)

.

'वैशाली देवरे'

ईरा चॅम्पियन ट्रॉफी 2023 या स्पर्धेत मी प्रथम सहभागी झालो. ईराची स्पर्धा फारच निराळी असते असे माझ्या लेखक मित्रांकडून ऐकून होतो. नाव तर दिले मग नंतर थोडेसे टेन्शन पण येऊ लागले. त्या नंतर उत्सुकता वाटू लागली कि आपण कोणत्या ग्रुप मध्ये फेकले जाऊ. तेथील लेखक लेखिका कशा असतील त्यांच्या बरोबर स्पर्धे पर्यंत का होईना आपल्याला कसे जमवून घेता येईल? अशा अनेक प्रश्नांनी मी घेरलेलो असतानाच एके दिवशी संजना मॅडमने ऑनलाइन येत ग्रुप घोषित केले आणि माझी रवानगी ग्रुप नंबर सात मध्ये झाली.

मला तर स्पर्धेचे स्वरूप पण माहित नव्हते मी कल्पना पण केली नव्हती की व्हाट्सअप ग्रुप बनवला जाईल, वॉट्सअप ग्रुप झाला, लिस्ट प्रमाणे एक एक जण ऍड होत गेले. ग्रुप मध्ये एकूण नऊ महिला आणि मी एकटा या एकटेपणाचे पण मला टेन्शन आलेले होते. संघात सगळेच नवीन असल्याने प्रथम आपापली ओळख परेड झाली, आमच्या ग्रुपला दिशा दर्शवणारा मार्गदर्शक म्हणून 'सोनल' ताईची निवड झाली आणि ग्रुपचे नामकरण 'टीम सोनल' असे झाले. कॅप्टन सोनल शिंदे, वैशाली देवरे, वैशाली मंठाळकर, प्राजक्ता पाटील, स्वप्नाली कुलकर्णी, प्रिया देशपांडे, अश्विनी डांगे, गीतांजली जोशी, वृषाली गुडे आणि मी असे दहा जण झालो.

सोनल ताईने अगदी समंजसपणे सगळ्या ग्रुपला सांभाळून घेतले. सगळ्या सूचना प्रथम समजून घेऊन आम्हाला समजावून सांगितल्या. नियम पुन्हा विस्तृत मध्ये समजावले. प्रसंगी उदाहरणे दिली. हे सगळे होत असताना माझा सगळ्यांबरोबर चॅट संवाद होऊ लागला आणि बघता बघता आमचा ग्रुप एक परिवार झाला. स्पर्धेचे नियम आणि लिखाण यावर चर्चा होता होता उलगडत गेला एकेकाचे स्वभाव. पहिल्या फेरीपर्यंत सगळ्यांची चांगलीच गट्टी जमली होती सुरुवातीला ग्रुप मधील लेखिका मला सगळ्या जणी सरसर संबोधू लागल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्यावर रुसून सांगितले की मला सर बोलू नका आणि मग मी त्यांचा सगळ्यांचा किरण दादा झालो. आता मला मात्र ग्रुपमध्ये अगदी घरच्यासारखे वाटू लागले, नऊ बहिणींमध्ये एक भाऊ म्हणून मी स्वतःला स्पेशल फील करू लागलो. जवळ असतो तर माझ्या नऊ बहिणींच्या हातचे चविष्ट पदार्थ पण खायला मिळाले असते.

सुरवातीला स्पर्धेपुरते होणारे चॅट नंतर संसाराच्या काही गोष्टी, मुलाबाळांच्या तब्येती विषयी पण होऊ लागल्या. मध्येच एखादीच रुसवा, फुगवा, मग तिला समजावणे... एखाद्या ताईच्या घरची आनंदाची बातमी आणि मग आमच्या ग्रुपमध्ये पसरणारे आनंदाचे इमोजी. ग्रुपची म्हणजे सगळ्यांना आपल्या ग्रुपला जिंकवून देण्याची धडपड आणि मेहनत मी पाहू लागलो. मी स्वतः इतकी मेहनत घेतली नाही जितकी माझ्या या संसारी तायांनी घेतली आहे. घरचे सगळे काम करून, मुलाबाळांचे शाळा कॉलेज सांभाळून, मिस्टरांचे मुड सांभाळत अगदी वेळेत सगळ्या फेऱ्यांचे लिखाण करत होत्या. स्वतः आजारी असतानाही आपल्यामुळे ग्रुपच्या इमेजला बाधा येऊ नये म्हणून माझ्या या बहिणी लिहीत होत्या, आणि स्पर्धेचे नियम पाळत होत्या. मी एकदा म्हणालो पण होतो की जर मी आपल्या सगळ्यांचे चॅट संवाद व्यवस्थित मांडले तर एक मोठी दीर्घ कथा होईल. या सगळ्यांबरोबर ईरा स्पर्धेत कार्य करताना माझे मी पण केंव्हाच गळून गेले होते आणि मी नऊ स्त्रियांमध्ये स्वतःला त्यांच्यातलीच एक समजू लागलो, म्हणून मी माझ्या संबंध सेतू ला नाव दिलेय 'मिळून साऱ्या जणी'

या सगळ्या बहिणींमध्ये माझे 'वैशाली देवरे' या माझ्या नाशिकच्या बहिणीबरोबर वेव्हलेन्थ जुळू लागली, तिसऱ्या फेरीत चारोळी लेखन हे व्हिडिओ फॉरमॅटमध्ये सादर करायचे होते तेव्हा वैशालीने पुढाकार घेऊन मला इन शॉट या ॲपची ओळख करून दिली. तो ॲप कशा प्रकारे वापरायचा कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा ते पण तिनेच मला शिकवले. मी प्रयत्न केला परंतु तिच्यासारखा व्हिडीओ मला बनवता आला नव्हता, तेव्हा तिनेच माझ्या चारोळींवर तिच्या आवाजात एक मस्तपैकी व्हिडिओ बनवून दाखवला. तेव्हा मला खरेच खूप आनंद झाला होता.

गावावरून मुंबईच्या एसएनडीटी कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आलेल्या वैशालीने झगडत स्वतःला शोधले हे तिच्या कथांमधून दिसून येते. जशी ती ग्रुपमध्ये सगळ्यांना सामावून घेण्यासाठी बोलते त्यावरून तिला माणसाच्या आयुष्यात नात्यांचे महत्व किती हे समजते. तिच्या बऱ्याचशा कथांमधून नात्यांचे महत्व प्रकर्षाने जाणवते, त्यामध्ये 'धागे नात्यांचे', 'आईबा', 'मतलबी नाती गोती', 'चार दिवसांचे माहेरपण हवेच', इत्यादी कथा आहेत. तिच्या कथांमधून वैशाली जितकी समजली होती त्यापेक्षाही मला ती जवळची वाटू लागली जेव्हा मी तिची कविता 'दुःख सांडायला हवं' वाचली.

मन हलकं करायचं तर
दुःख सांडायचं असतं
मनाच्या बंद गाभाऱ्यातील सल
मोकळी करायची असते

या कवितेत व्यक्त होणाऱ्या वैशालीने तिच्या आत्मचरित्रात मनाच्या बंद गाभाऱ्यातील सल मोकळी करून मनातील सगळ्या दुःखाचा निचरा करून टाकला आहे, आणि मी सुद्धा कोणाला काय वाटेल कोण काय म्हणेल ही सगळी बूज बाजूला ठेवून माझे आत्मचरित्र लिहून पोस्ट केले आणि त्याची लिंक ग्रुप वर टाकली. मनात धाकधूक होती की माझे आत्मचरित्र वाचून माझ्या ग्रुप मधून काय प्रतिक्रिया उमटेल, परंतु वैशालीताई सहित ग्रुपवरच्या सगळ्यांनी माझे कौतुक केले, परंतु वैशालीताईची कमेंट मला फार आवडली.

"किरण दादा ! आपण माणूस बघतो पण माणसाच्या मनातलं कधी दिसत नाही बघा, घुसमट आणि काट्यांची टोचण असते, जीवनात त्यासाठी माणूस वाचावा लागतो त्यासाठी लेखकाची नजर लागते. वैशालीने शंभर गोष्टींची एक गोष्ट मांडली होती. जसे आपण म्हणतो ना की 'जे न देखे रवी ते देखे कवी' तशीच ती म्हणून गेली होती. तिच्या आत्मचरित्रावरून ती आणखीन समजली, खूप लढा देऊन तिने मिळवलेली आत्ताची सुखी संसाराची अवस्था वाचून खूप आनंद वाटला.

'जीवनात मिळालेले अनमोल ऋणानुबंध जपायचे, साथ देणाऱ्यांच्या ऋणात स्वतःला अडकून घेत मार्गक्रमण करायचं. जीवनाच्या कॅनव्हास वर पुन्हा आपुलकीने आयुष्यात रंग भरायचे. श्रीमंती नाही पण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मनामनात शिल्लक राहायचं' बस हे तिच्याच शब्दात सांगून मी वैशाली देवरे आणि माझ्या टीम मधील सगळ्या लेखिकांना अनेक शुभकामना देतो.