Login

मनातले विचार(विनोदी लघुकथा)

जोडप्यांच्या मनातील विचार सांगणारी विनोदी कथा !
मनातले विचार(विनोदी लघुकथा)

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

आज निनावे यांच्या घरी महिला मंडळाचा कार्यक्रम होता. तर त्यावेळी प्रत्येक महिला सदस्याने आपल्या नवऱ्याला घेवून यायचे नाहीतर प्रवेश नाही हा नियम त्या कार्यक्रमाचा नियम होता.

मग नवरा बायको असे एक एक करून जोडपे आत मध्ये येत होते.

सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यातले काही जण स्वतःहून तर बरेचसे चेहऱ्यावर खोटा आनंद दाखवून बायकोच्या जबरदस्तीमुळे सुट्टी फुकट जाईल हे दुःख मनात ठेवून तिथे आलेले.

"आज तुम्ही इथे आला आहात तर मी सांगते की, आज आपल्याकडे एक महान योगी बाबा आलेले आहेत. त्यांची खासियत ही आहे की ते मनातील ओळखतात." असे निनावे वहिनी म्हणाल्या.

सर्वांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिले.

चला तर मग एक एक जोडी इथे येईल आणि मग बायकोने एक प्रश्न विचारायचा आणि त्याचे उत्तर नवऱ्याने मनात द्यायचे. योगी बाबा लगेच तुम्हाला खरे काय ते सांगतील."

झाले अशी घोषणा झाली आणि तिथे उपस्थित सर्व नवरे आता काय म्हणून प्रश्न चिन्ह मनातच ठेवून शांत बसले.

पहिला क्रमांक आला कोडे जोडप्यांचा.

"मला सांगा मी परफेक्ट बायको आहे ना?" अगदी लाजतच त्यांनी विचारले.

"उत्तर मनात सांगा." योगी बाबा बोलले.

मिस्टर कोडे 'परफेक्ट मधला प तरी माहीत आहे का ? म्हणे परफेक्ट बायको आहे का. सगळे मलाच पाहावे लागते. एक काम नीट करत नाही.'

योगी बाबा "ते परफेक्ट म्हणत नाहीत." असे त्यांनी उत्तर दिले.

कोडे वहिनी रागाने त्यांच्या नवऱ्याकडे पाहत होत्या.

"म्हणजे तुम्ही परफेक्ट नाहीतर बेस्ट बायको आहात असे ते म्हणाले." पुढे ते उत्तरले आणि मिस्टर कोडे ह्यांनी खोटे हसून प्रतिसाद दिला.

पुढे दुश्मन दाम्पत्य आले.

"मला हा प्रश्न आहे की परवा त्यांनी जेवण जेवले नाही ते खरचं पोट दुखत होते की दुसरे काही कारण होते?" त्यांचा प्रश्न.

'मी बाहेर जेवून आलो आणि तुला हे आधी सांगायला विसरलो. हे सांगितले असते तर दुसऱ्या दिवशी डब्याला तीच भाजी दिली असती म्हणून मी थाप मारली ' मिस्टर दुश्मन म्हणाले.

"त्यांनी तुमच्यासाठी उपवास ठेवला होता असे ते म्हणत आहेत." योगी बाबा म्हणाले.

मिसेस दुश्मन ह्यांना खूप आनंद झाला.

असे एक एक करून सर्व महिला प्रश्न विचारत होते आणि त्यांचे नवरे काय बोलत आहेत ते बाबा सांगत होते.

शेवटी निनावे जोडपे आले.

"माझ्यावर ह्यांचे किती प्रेम आहे?" मिसेस निनावे ह्यांनी खूप सोपा प्रश्न विचारला.

'खूप जास्त आहे.' मिस्टर निनावे मनातच म्हणाले.

"तुम्ही करता त्यापेक्षा कमीच." योगी बाबा म्हणाले.

आणि हे ऐकून मिस्टर निनावे ह्यांना घाम फुटला कारण ह्यानंतर त्यांना त्यांच्या बायकोचा रागाचा सामना करावा लागेल म्हणून त्यांना त्याबद्दल भीती वाटत होती.

हा कार्यक्रम संपल्यावर सगळे आपल्या घरी गेले आणि हळूच मिस्टर कोडे ह्यांनी कोणाला तरी फोन लावला.

"तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील."असे म्हणून आनंदात फोन ठेवला.

तर हे सर्व मिस्टर कोडे आणि इतर नवऱ्यांनी मिळून योजना बनवली होती. कारण त्यांच्या बायका सारखे मिस्टर निनावे किती परफेक्ट आहेत हे महिला मंडळ सभेतून आल्यावर ऐकवायचे त्यामुळे त्यांनी त्यांना मुद्दाम संकटात पाडले होते.

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

0

🎭 Series Post

View all