Login

मीराचा घटस्फोट

स्वविवाह वर भाष्य
*घटस्फोट*

नमस्कार वकील साहेब!

नमस्कार! नमस्कार!! बोला मॅडम?

मी मीरा! मीरा लक्ष्मण जाधव!!

हा! बोला काय करु शकतो मी तुमच्यासाठी?

वकील साहेब मला घटस्फोट हवाय!

घटस्फोट घेण्याचे कारण?

वकील साहेब!कारण मी ऐका मुलावर प्रेम करते!

अच्छा! नाव काय त्या मुलाचे?


साहेब! समीर वाघ आमच्याच ऑफीस मध्ये काम करतो!

अच्छा! कधी लग्न झाल होत तुमचे?

वकील साहेब एक वर्ष झाले!

अच्छा! तुमचे वय?

वकील साहेब! हा प्रश्न?

मॅडम ! गैरसमज नको घटस्फोटा साठी वय गरजेचा प्रश्न आहे! आणि हो! मी वकील आहे तुमचा फेसबुक मित्र नाही!

सॉरी! वकील साहेब सहज शंका म्हणुन विचारले!

अच्छा! तुमच्या घरात किती माणस आहेत?

वकील साहेब! मी माझे आई वडील आणि दोन लहान भाऊ!

अहो! मॅडम मी तुमच्या सासरच्या घराची माणस विचारतोय! माहेरची नाही?

वकील साहेब! हिच माणस आमच्या घरात राहतात!

अच्छा! अच्छा!! म्हणजे तुमचा नवरा घरजावई आहे तर?

वकील साहेब! तस नक्की सांगता येणार नाही!!

अच्छा! म्हणजे बाहेरच लफड?

वकील साहेब तसं नाही हो!


अच्छा! ठीक आहे. तुमच्या पतीच नाव काय?


वकील साहेब! त्यांचे नाव मीरा लक्ष्मण जाधव!

मॅडम ! काय बोलताय हे? मी तुमच नाही तुमच्या मिस्टरांच नाव विचारल?

वकील साहेब! तेच मी संगितले मीरा लक्ष्मण जाधव!


मॅडम ! तुम्ही शुद्धीवर आहात का? काय बोलताय तुम्ही? तुमचे नाव मीरा लक्ष्मण जाधव व तुमच्या नवऱ्याच नाव देखिल मीरा लक्ष्मण जाधव! हे कस शक्य आहे?


वकील साहेब! जे खर आहे तेच संगितले! आणि या मीरा लक्ष्मण जाधव पासुन मला आता घटस्फोट पाहीजे.


मॅडम ! खर सांगु !! तुम्हांला ना वकिलाची नाही तर एखाद्या डॉक्टरची गरज आहे!

वकील साहेब! मला त्या मीराला घटस्फोट द्यायचा आहे! आणि हे काम एखादा वकिलच करु शकतो! डॉक्टर नाही?

(वकील साहेब समजले काहीतरी गडबड आहे. या बाई विषयी आणखी महिती काढली पाहीजे.)

ठीक आहे मॅडम ! तुम्ही तुमच्या आईचा किंव्हा वडिलांचा नंबर दया! आणि याच वेळेला उद्या या तो पर्यत मी बेसिक कागदपत्र तयार करतो.

चालेल! वकील साहेब! उद्या याच वेळेला येते मी धन्यवाद!

हॅलो ! मीराच्या आई का? मी वकील मोहन घोडे बोलतोय!

हो! मी मीराची आईच बोलतेय! काय झाल वकील साहेब?

अहो! तुमची मुलगी माझ्या कडे आली होती एकटीच होती त्यांना घटस्फोट हवा आहे! त्यांच बोलण मला जरा संशयास्पद वाटल म्हणून मी आपला नंबर घेतला. सगळ ठीक आहे ना?

कसल काय ठीक? या पोरीने आम्हांला फार-फार बदनाम केलंय हो! वकील साहेब तुम्ही तरी काही मार्ग सुचवा हो! तुमची काय असेल ती फी आम्ही देवू! मीराची आई हुंदके देत म्हणाली.

ठीक आहे! ठीक आहे!! तुम्ही रडू नका! हे नक्की काय प्रकरण आहे ते मला व्यवस्थित सांगा!

मग आपण काहीतरी मार्ग काढू यातुन!


वकील साहेब! मीरा लहानपणापासून हुशार पण अतिशय शांत व अबोल. तिला फारस कोणी मित्र मैत्रिणी नाही. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीला लागली. सगळे सुरळीत होत. मात्र लग्नाचा विषय काढला की चिडायची.आम्ही फार समजावण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.गेल्यावर्षी अचानक तीच्या मनात काय संचारल काय माहीत. तीन लग्न करायचे ठरवले. खरतर तिचा लग्नाचा निर्णय ऐकून आम्हांला आनंद व्हायला पाहीजे होता. पण तस काहीच घडले नाही. कारण तीने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

तिचा निर्णय ऐकून आम्ही घरातील सर्वच अवाक झालो. त्यात कहर म्हणजे तिने तिचा निर्णय समाजमाध्यमांवर टाकला. त्यामुळे आमच्या कुठूंबाची फार फार बदनामी झाली. काहींनी तर मीराला मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याचा सल्लाही दिला. आम्ही तिला फार समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मीराची आई हुंदके देत बोलत होती.


अच्छा! अच्छा!! तर असा प्रकार आहे तर? तुम्ही काही काळजी करु नका! यावर माझ्याकडे उपाय आहे! वकील साहेबांनी मीराच्या आईला धीर दिला.

नमस्कार वकील साहेब!

या! या!! मीरा मॅडम अगदी कालच्या वेळेत आलात!

हो वकील साहेब! मी वेळेची पक्की आहे!

अच्छा! मी तुमची बेसिक कागदपत्र तयार केलीत! उद्या जज मॅडमची मी दहाची वेळ घेतली आहे. त्यांच्या समोर मीराने तुमच्या घटस्फोट संमती पत्रावर सही केली की, तुमचा घटस्फोट होईल! त्यामुळे तुम्ही उद्या आपल्या आई वडिलांसोबत ठीक दहा वाजता या! हा घ्या त्यांचा पत्ता!

आणि हो! तुमच्या त्या मित्राचा नंबर दया मला गरज पाडली तर मॅडम त्यांना बोलवतील! मीराने समीरचा नंबर दिला.

फार फार धन्यवाद वकील साहेब! पण वकील साहेब उद्या मी एकटीच आले तर नाही चालणार का?

नाही! नाही!! मॅडम तुमच्या आई वडिलांना आणणे गरजेचे आहे. साक्षीदार म्हणून त्यांच्या सह्या लागतील. नाहीतर जज मॅडम तुमचा घटस्फोट मंजूर करणार नाही!

ठीक आहे वकील साहेब! मी आणते त्यांना सकाळी ठीक दहा वाजता! धन्यवाद !!


या! या!! मी आणि जज मॅडम आपलीच वाट पाहत होतो!

वकील साहेब! मॅडम कुठे आहेत? मीराने विचारले.

आहेत! आहेत!! त्यांच्या आतल्या खोलीत आहेत!

नमस्कार मॅडम ! या मीरा लक्ष्मण जाधव आणि हे त्यांचे आईवडील! मी ज्या केस बद्दल आपल्याशी काल बोललो होतो ते!

ओ! बसा बसा!

खोली ऐसपैस होती. मोठ्या टेबलाच्या मागे मॅडम बसल्या होत्या. त्यांनी त्यांच्या बाजुला वकील साहेबांना बसायला संगितले मीराला त्यांच्या समोर बसवले. व आईवडिलांना थोडावेळ बाहेर बसायला संगितले.

मग! मीराबाई कश्या आहात? मॅडमचा प्रश्न

या प्रश्नाने मीरा थोडीशी विचलित झाली. बहूतेक असा प्रश्न तिला अपेक्षित नसेल.

मॅडम ! मी ठीक आहे! फक्त मला मीरा पासुन घटस्फोट दया! मग मी सुखी आणि आनंदी होईन!

अग! हो! हो!! सरकारी काम आहे इतक्या घाईत होत नसत! मला सगळी माहिती करायला हवी! तुमच्या घटस्फोटाची कारण जाणून घ्यायला हवी तेव्हाच काय तो मी निर्णय घेईन! मॅडम मीराला
समजवत म्हणाल्या.

मीरा! कधी लग्न झाल होत तुमच?

मॅडम ! एक वर्ष आणि साधारण दोन महिने झाले!


कुठे केले लग्न?

आम्ही मंदिरात लग्न केले!

त्या लग्नाचे कोणी साक्षीदार?

नाही कोणी नाही मॅडम !

का?

कारण माझ्या स्वलग्नाचा निर्णय फेमिली मधे कुणालाच मान्य नव्हता. म्हणून आम्ही गुपचुपपणे मंदिरात लग्न केले!

ओ! तु असा स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेण्याच काही कारण?

हो! एक नाही तर दोन कारण होती! एकतर मला पुरूष आवडत नव्हते आणि दुसरे म्हणजे मी स्वतःवरच प्रेम करते!

मीरा! तूझ व्याकरण कच्च आहे की आता तु जाणूनबुजून बोललीस?

मॅडम म्हणजे! मी समजले नाही?

मीरा! म्हणजे तु स्वतःवर प्रेम करतेस! पण पुरुष तुला आवडत नव्हते! नव्हते म्हणजे? आता आवडतात?

हो! मॅडम लग्न केले तेव्हा नव्हते आवडत ! पण आता आवडतात! कारण मी आमच्या ऑफीस मध्ये असलेल्या समीर वर प्रेम करतेय! आणि म्हणुनच मला घटस्फोट हवाय!

ओ! अस आहे तर! पण तूझ्या बरोबर लग्न झालेल्या मीराच काय? घटस्फोटा नंतर ती तर एकटी पडेल?


ती एकटी पडु दे! मला काय त्याच? कारण ती नेहमीच सांगते. की,पुरुष सगळे वाईट असतात! पण जेव्हा पासुन समीर माझ्या आयुष्यात आलाय तेंव्हापासुन माझे जीवन पार बदलले.कारण तो माझ्याशी खुपच प्रेमान बोलतो.आतापर्यंत कोणताही पुरुष इतक प्रेमान माझ्याशी बोलला नव्हता.

ओ! आज पर्यत कोणी पुरुष तूझ्याशी प्रेमाने बोलत नव्हता म्हणुन तूझा पुरूष जातीवर राग होता तर?

हो! कारण आमच्या समाजात पुरुष प्रधान संस्कृती आहे.आमच्या घरात तर स्रीला कोणताही अधिकार नाही. मग मी असो वा आई! सगळे निर्णय वडील घेणार सगळे लाड दोन भावांनाचेच! मला घरात कोणी विचारत नाही. थोडक्यात घरात माझे अस्तिवच नाही!


मीरा! म्हणुन तु स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतलास तर?

हो! मॅडम !! यात माझ काही चुकल का?


मीराच्या या प्रश्नाने मॅडम व वकील साहेब सुन्न झाले.

नाही मीरा! तस तूझा स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय थोडा वेगळा होता मात्र योग्य होता. पण समाजाचे काय?

हो! मॅडम!! म्हणून माझा हा निर्णय मी सोशल मीडियावर टाकला. यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे जाणून घेण्यासाठी?

मीरा! तो निर्णय समाज माध्यमांवर टाकण्याचे कारण फक्त लोकांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी की, फुकटची प्रसिध्दी मिळवण्यासाठी?


मॅडम ! तुम्ही कस ओळखले?

मीरा! मी जज आहे माझ्या कडे अश्या अनेक केस येतात!

हो! मॅडम!! खरा उद्देश फुकटची प्रसिध्दी मिळवणे हाच होता. कारण मला शाळेत, कॉलेजला कोणी फारस ओळखत नव्हते. मलाही लोकांनी ओळखावे असे मनोमन वाटे. अशातच एक दिवस मी नेट वर स्वविवाह विषयी माहिती वाचली की,परदेशात अश्या प्रकारचे स्वविवाह लोक करतात. तेंव्हा पासुन मी मनात ठरवले की, आपण देखिल स्वविवाह करायचा.म्हणजे आपली इच्छाही पुर्ण होईल आणि प्रसिध्दीही मिळेल. म्हणजे ऐका दगडात दोन पक्षी!


ओ! मीरा!! तु तर खुपच हुशार आहेस! तु ऐका दगडात दोन पक्षी तर मारलेस! पण यामुळे तूझ्या कुठूंबाला किती त्रास झाला असेल? खास करून तूझ्या आईला? याची कल्पना आहे तुला?

हो! मॅडम!! याची पुर्णकल्पना आहे मला! पण मी काय करु? मीरान माझ काहीही ऐकल नाही.

आणि मीराने तिच्या सोबत लग्न करायला भाग पाडले!

मीरा! मला एक समजत नाही तूझ्या घरी स्त्रीला काही अधिकार नाही मग तुला नोकरी करायला कशी काय परवानगी?

मॅडम ! तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. मला नोकरी काय पण कॉलेजला जायलाही परवानगी नव्हती. हट्ट करून करून कॉलेजला गेले. नोकरीच्या वेळेस तर आत्महत्या करेन अशी धमकी दिली तेंव्हा कुठे नोकरी करण्याची परवानगी मिळाली.

ओ! म्हणजे तु सुरवाती पासूनच बंडखोर व्रुत्तीची होतीस तर?

हो! मॅडम !! मात्र ही बंडखोरी स्त्रीच्या हक्का साठी होती!

ओके! आपण आपल्या विषयावर येवू! समीर देखिल प्रेम करतो तूझ्यावर?

हो! मॅडम !! अगदी मनापासून प्रेम करतो आम्ही एकमेकां वर!

मॅडमनीं इशारा केल्या बरोबर वकील साहेबांनी लगेचच फोन करून तातडीने समीरला यायला संगितले. समीर येई पर्यंत मॅडमनी मीराची बरीचशी माहिती विचारली.

नमस्कार! मी समीर वाघ!


या समीर! मॅडमनीं समीरला मीराच्या बाजुला बसायला संगितले.

मग ! समीरजी कधी लग्न करणार आहात आपण मीरासोबत?

मॅडमच्या प्रश्नाने समीर उत्साहात .. कधीही! मीरा सांगेल तेंव्हा?

मग! आत्ताच करा की?

मॅडम! आत्ता ?

का नाही? मी आहे! वकील साहेब बाजुला बसलेत! मीराचे आई वडील देखिल हॉल मध्ये बसलेत! आणखी कोण हवय?

मॅडमनीं वकील साहेबांना इशारा केला तसा त्यांनी मीराच्या आई वडिलांना आत मध्ये बोलवले व मॅडमच्या नोकराला हाक मारली.


तसा नोकर दोन हार व ताटात मंगळसुत्र घेवून आला.

हे काय चालले आहे मीराच्या आई- वडिलांना काहीच समजत नव्हते.


मिस्टर अँड मिसेस जाधव! हे समीर वाघ तुमच्या मुलीचे होणारे मिस्टर म्हणजे तुमचे जावई बापू!

मॅडमच्या या वाक्याने मीराच्या आई वडिलांना हसु की रडू अस झाल. कारण मीरा एखाद्या पुरुषाशी लग्न करतेय याच त्यांना समाधान . मात्र हे सगळं अचानक कस झाल याच काहीस आश्चर्य.


चला! दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घाला!मॅडम म्हणाल्या. इतक्यात वकील साहेबांनी हटकले.

ओ! सॉरी हां! मी या आनंदात विसरलेच! वकील साहेब ते घटस्फोटाचे मीराच संमती पत्र दया!

मॅडमनीं संमती पत्र मीरा समोर ठेवले.मीरा ने हातातला हार बाजुला ठेवून कसलाही विचार न करता फटाफट त्या घटस्फोट संमती पत्रावर सही केली.कारण तिला समीर सोबत लग्न करायची घाई झाली होती.


दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. नंतर समीरने मीराच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. ते मंगळसूत्र पाहुन मीरा भावुक झाली. तिच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले.

विवाह संपन्न झाला. सगळ्यांनीं टाळ्या वाजवल्या.

मिस्टर अँड मिसेस जाधव! हा साधा विवाह झाला तुम्हांला या दोघांचा धुमधडाक्यात विवाह करायचा असेल तर एखादा शुभ मुहूर्त पाहून करु शकता. मॅडम वधू -वराला आशिर्वाद देत म्हणाल्या.

चला मॅडम ! चला वकील साहेब! आम्ही निघतो हनिमूनची तयारी करावी लागेल ना? समीर गंमतीने म्हणाला.


मीरा! समीर! तुम्ही निघा मला आई वडिलांशी थोड बोलायच आहे... मॅडम बोलल्या


मग! मिस्टर अँड मिसेस जाधव तुमच्या मुलीने शेवटी ऐका मुला सोबत लग्न केल. आता तर तुमची काळजी मिटली ना?


हो! मॅडम !! तुमचे आणि वकील साहेबांचे आभार कसे मानावे तेच समजत नाही!

अहो! आभार कसले त्यात कामच आहे ते माझ!

वकील साहेब किती फी झाली आपली? मीराच्या आईने विचारले.

माझी वकीलाची आणि जज मॅडमची फी धरून डबल फी द्यावी लागेल तुम्हांला!

जज देखिल फी घेतात? मिराच्या वडिलांनी काहीस आश्चर्ययाने विचारले.

अहो! जाधव साहेब! जज फी घेत नाही पण डॉक्टर तर घेतात ना?

म्हणजे? मी समजलो नाही वकील साहेब?

अहो! जाधव साहेब! हया मॅडम जज नसुन डॉक्टर आहेत. डॉ. मालिनी चौधरी प्रसिध्द मनोविकार तज्ञ आणि माझ्या जवळच्या मैत्रीण.

मानसोपचार तज्ञ म्हणून आज पर्यत त्यांनी अश्या अनेक केसेस यशस्वीपणे हाताळल्या आहेत.


मीराच्या आईला जेव्हा मी फोन केला तेंव्हा मला मीराची खरी समस्या कळली. त्यामुळे मी लगेचच डॉ. मालीनीनां या विषयी संगितले. मग पुढचे बाकीचे सर्व नियोजन डॉ. मालिनी यांनीच केले. मीराला संशय नको म्हणून क्लिनिक ऐवजी तिला घरी बोलवले आणि या जजच्या खोलीचा तत्परता सेट केला.

कारण दुसऱ्या मीराला घालवण्यासाठी आजच तीच दिखावू का असेना पण लग्न कारण गरजेच होत. कारण मीराच लग्न म्हणजे आधी मीराला घटस्फोट आणि एकदा का घटस्फोट झाला म्हणजे ती मीरा परत येण अशक्य!


बाप रे! अस आहे तर हे सगळ? मीराची आई आश्चर्य व्यक्त करत म्हणाली.

वकील साहेब! तुमच्या आणि डॉक्टरांच्या फी बद्दल नाही संगितले? मीराची आई विनंती स्वरुपात.


अहो! त्याची तुम्ही अजिबात काळजी करु नका आमच्या कामाची पुर्ण फी आम्हां दोघांनाही मिळाली आहे!

कोणी दिला फी? आई पुन्हा आश्चर्याने

अहो! तुमचे जावई समीर वाघ यांनी दिली!

म्हणजे?

म्हणजे! समीर वाघ आमच्या या योजनेत पुर्ण सामील होते. त्यांना आम्ही आधिच माहिती व भूमिका दिली होती.आणि त्यांनी ती यशस्वी रित्या पार पाडली.


तुम्ही व मीरा खरच भाग्यवान आहात तुम्हांला समीर सारखा जावई आणि मीरला पती मिळाला. मीराच्या मनस्थिती विषयी पुर्ण कल्पना असताना तो तिच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. याचा अर्थ तो मीरावर खरच मनापासून प्रेम करतोय.

मिस्टर अँड मिसेस जाधव!
खास करून मिस्टर जाधव तुम्ही मीराला लहानपणापासुन चांगले प्रेम दिले असते तर ही वेळच आली नसती. कारण घरातल्या घुसमटी मुळे ती दुसरी बंडखोर मीरा तयार झाली.


हो! खरं आहे डॉक्टर तुमचे! माझी चूक झाली. मी मान्य करतो. मात्र या पुढे चूक दुरुस्त करेन!


मग!. लागा तयारीला आटपून टाका लग्न!धूम धडाक्यात !!
डॉ. मालीनीच्या या वाक्यावर सगळे हसले.


मीराच्या लग्ना नंतर समीरने मीराला इतके प्रेम दिले त्यामुळे घटस्फोटीत मीरा तिच्या आयुष्यात परत कधी आली नाही.

इकडे डॉ. मालिनी मात्र काहीश्या चिंतातुर होत्या. त्यांना भीती होती की, आज आपल्या समाजात अश्या कितीतरी मीरा असतील.... त्यातली एखाद दुसरी बंडखोर मीरा परत तयार होईलच....