Login

मिस लिली! भाग -४(अंतिम )

कथा.. एका सुडाची!


मिस लिली!
भाग - चार. (अंतिम)

"हो. मीच मारलं पारकरला." विक्रम शांतपणे.

"ते आता जुनं झालं हो. कारण काय ते सांगा." राणे.

विक्रमने आपल्या पाकिटातून एक फोटो काढून टेबलावर ठेवला.
"ही निकी.. निकिता. माझी बहीण."

"तिचं काय मध्येच आता?" राणेच्या डोक्यावर आठया होत्या.

"हिचा मृत्यू झालाय. सहा महिन्यांपूर्वी. ऍक्सीडेन्टली." विक्रम

"सो सॅड. पण त्याचा काय संबंध?" -राणे.

"निकी माझी जुळी बहीण. जुळी केवळ म्हणायला. पण आमच्यात काहीच जुळत नव्हतं. दिसण्या बघण्यातही खूप फरक. काहीच पटायचं नाही आमचं लहानपणापासून.

मागच्या सात महिन्यापूर्वी अचानक ती शांत शांत राहू लागली. तिच्यातील बदल जाणवत होता.पण कारण कोणाला कळेना.

मग एक दिवस तिनंच प्रस्ताव ठेवला..चिखलदऱ्याचा. चेंज म्हणून आम्ही सगळेच गेलो. आणि तिथेच एका सेल्फी पॉईंटवर पाय घसरून ती खोल दरीत कोसळली.

ऍक्सीडेन्टल मृत्यू म्हणून तिची केस क्लोज झाली.

वयाची तेवीस वर्ष सोबत होतो आम्ही. पण ती गेल्यावर मला तिचं महत्त्व जाणवायला लागलं. आठवणीने रात्र रात्र झोप नाही लागायची. एक दिवस असंच झोप लागेना म्हणून तिचं कपाट बघत होतो तर ही डायरी मिळाली. त्यात नेहाच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे लिहिले होते.

नेहा निकीची मैत्रीण. त्यामुळं तिचं नेहमी जाणं येणं असायचं. सात महिन्यापूर्वी अशीच त्यांच्याकडे गेली असता नेहा आणि सुरभीआंटी घरी नाही बघून पारकराने डाव साधला.
तेव्हापासूनच ती शांत झाली.


चिखलदरा.. सेल्फी पॉईंट वरील पाय घसरणे.. हा योगायोग नव्हता. मरण्यापूर्वी सगळ्यांसोबत आनंदाने काही क्षण घालवण्यासाठी तिनं प्लॅन केला होता. ती आत्महत्या होती तिची. हे सगळं ह्या डायरीत तिनं आधीच नमूद करून ठेवलंय."
डायरी टेबलवर ठेवत विक्रम म्हणाला.

"पण तू पोलिसात जायचंस ना भावा. कायदा का हाती घेतला?" -सावंत.

"ह्या डायरीला पुरावा मानला असता तुम्ही? आणि असताही तरी जास्तीत जास्त कोणती शिक्षा दिली असती? केव्हा?
म्हणून मग मी नेहाशी जवळीक साधली. तीही माझ्यावर प्रेम करायला लागली. मनात आलं असतं तर मी कधीही गैरफायदा घेऊ शकलो असतो. पण बापाची शिक्षा तिला का म्हणून?

लिली नावाची फेक आयडी वापरून त्याला जाळ्यात ओढलं. त्या दिवशी दोघी लग्नाला जाणार म्हणून बंगलोरच्या मिटिंगचं खोटं बोलून तो घरीच थांबला. आणि रात्री मला बोलावलं.
पुढचं तुम्हाला ठाऊकच आहे."

"ह्याची शिक्षा काय आहे, माहित आहे तुला?" दीर्घ श्वास सोडून राणेने विचारले.

"जी शिक्षा मिळेल ती भोगायला तयार आहे मी. तसंही दोन दिवसांनी स्वतःच सरेंडर करणार होतो. पण म्हंटलं बघूया तुमचं डोकं कुठवर चालतं." तो हसून म्हणाला.


सावंत आणि राणे एकमेकांकडे पाहून हसले.

"काय भावा? आमच्या डिपार्टमेंटवर संशय घेतो होय? चला आता सासरचा पाहुणचार चाखा जरा."
राणे हसून म्हणाले..


"इन्स्पेक्टर, आम्हाला ही केस क्लोज करायची आहे." इतकावेळा गप्प असलेली सुरभी म्हणाली.

"अहो मॅडम, मरणारा नवरा होता तुमचा." राणे.

"तो मेलाय केव्हाचाच." डोळे पुसत सुरभी बोलली.

"इन्स्पेक्टर, निकी मला मुलीसारखी होती. शाळेपासून नेहा आणि ती सोबत होत्या. तिच्यासोबत मधुकरने असं करावं? शी, मलाच किळस येतेय हे ऐकून. त्याच्यासारख्या माणसाला अशीच शिक्षा व्हायला हवी होती. मला विकीबद्दल कोणतीच तक्रार नाहीये."

"ओके मॅडम, जशी तुमची इच्छा." राणे म्हणाले.

सुरभी, नेहा, आणि विक्रम पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले.

दूर कुठेतरी समोर निकी हसत उभी आहे, असा तिघांनाही भास झाला.


**समाप्त **
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

रहस्यकथा लिहायचा माझा पहिलाच प्रयत्न. कथा कशी वाटली नक्की सांगा.


0

🎭 Series Post

View all