मिशन मुंबई (भाग-४)

Hard work of police to save our Mumbai.

मिशन मुंबई (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)

(मागच्या भागात आपण पाहिलं, ती चिठ्ठी टिशू पेपर वर लिहिली होती आणि त्यावर काहीतरी दिसत होतं, विक्रम ला सुद्धा एका माणसाचा सुगावा लागला आहे... आता पुढे...)

विक्रम त्या माणसाच्या शोधात निघतो..... आधी तो त्याच्या खबऱ्याला पिंट्या ला एका क्लब मध्ये भेटतो! खोट्या दाढी, मिश्या आणि गॉगल लावून पूर्णपणे वेष बदलून तो आलेला असतो....

"ते बघा सर तुमचं कबुतर...." पिंट्या विक्रम ला इशारा करून दाखवतो.

तो माणूस क्लब मध्ये एका कोपऱ्यातल्या टेबल खुर्ची वर बसलेला असतो! त्याचे हाव भाव बघून तरी असंच वाटत होतं; तो कोणाची तरी वाट बघत बसला आहे....

विक्रम त्या माणसावर नजर ठेवून होता....
**************************
इथे पोलीस स्टेशन मध्ये सोनाली ने त्या कागदावर काय आहे हे बघितलं.... त्यावर '6 15 18 20' असे काही आकडे लिहिले होते...

"सर! हा नंबर मिळाला आहे..." सोनाली ने सुयश सरांना तो कागद दाखवत सांगितलं.

"नक्कीच हा काहीतरी कोड आहे.... विचार करा काय असेल..." सुयश सर म्हणाले.

सगळे विचार करायला लागले.... फोन वरच्या नंबर पॅड वरून अक्षरांची जुळवा जुळव करून झाली.... जुने पेपर काढून त्यात काही बातमी मिळते का पाहून झाले.... पण, हाती काहीही लागत नव्हतं!

एवढ्यात फॉरेन्सिक लॅब मधून डॉ. विजय अभिषेक ला फोन करतात.... कुणाल ने डिफ्युज केलेल्या बॉम्ब बद्दल सांगण्यासाठी आणि खोट्या बॉम्ब च्या बॅगेबद्दल सांगण्यासाठी  त्यांनी फोन केलेला असतो! दोघांचं फोन वर बोलणं होतं....

"सर! आत्ता डॉ. विजय नि फोन केलेला त्यांच्या म्हणण्या नुसार जो बॉम्ब कुणाल ने डिफ्युज केला, तो आधी रिमोट ने ऍक्टिव्ह करावा लागणारा होता, साधारण एक किलोमीटरच्या परिसरातून तो ऍक्टिव्ह होऊ शकेल अशी त्याची कॅपॅसिटी होती..... आणि जी बॅग आपल्याला कबुतर खान्याच्या इथे मिळाली त्या बॅगेच्या आत लेबल होतं, त्यावर असणाऱ्या QR कोड प्रमाणे ती मुंबई मधल्याच फॅशन बॅग नावाच्या दुकानातून खरेदी केलेली आहे...." अभिषेक ने सगळं सांगितलं.

"Very good! एक काम कर तू त्या दुकानात जा आणि बघ काही हाती लागतं का... तोवर आम्ही कोड शोधतो..." सुयश सर म्हणाले.

"जय हिंद सर!" अभिषेक सॅल्यूट करून निघाला.
************************
क्लब मध्ये त्या खोट्या पोलिसाला अजून एक व्यक्ती भेटायला आली.... काळी टोपी, गॉगल, लेदर च जॅकेट आणि मानेभोवती स्कार्फ गुंडाळला होता.... पिंट्या आणि विक्रम बरोबर दोघांवर नजर ठेवून होते.... पण, ते दोघं एवढं हळूहळू बोलत होते की काही ऐकायला येत नव्हतं.... शिवाय क्लब मध्ये म्युसिक सुद्धा सुरु होतं त्यामुळे अजून प्रॉब्लेम होत होता.... या साठी विक्रम ने एक शक्कल लढवली; तो तिथून उठला आणि वेटर चे कपडे घालून त्यांची ऑर्डर घ्यायला गेला.... कॅमेरा असलेलं पेन त्याच्या जवळ होतं..... ऑर्डर घेता घेता त्याने त्या व्यवस्थित दोघांचं रेकॉर्डिंग करून घेतलं.... जेव्हा तो पुन्हा ऑर्डर घेऊन आला तेव्हा सर्व्ह करताना हळूच टेबल वर असणाऱ्या त्याच्या बॅगेवर एक ट्रेसिंग बग लावलं! थोड्यावेळात ते दोघं तिथून निघून गेल्यावर विक्रमने पिंट्याला दोघांवर नीट नजर ठेवायला सांगितली आणि तो पुन्हा पोलीस स्टेशनला यायला निघाला....
*************************
इथे पोलीस स्टेशन मध्ये तोवर सोनाली, निनाद, गणेश आणि सुयश सरांनी मिळून कोड क्रॅक करायचा प्रयत्न करत असतात.....

एवढ्यात सुयश सर म्हणतात; "मिळाला कोड! हे बघा... हे आकडे नीट बघितले आणि इंग्लिश अल्फाबेट्स चे क्रम मिळाले तर फोर्ट (FORT) शब्द तयार होतोय..."

"हो सर! बरोबर!" गणेश म्हणाला.

"सर, पण याचा काय अर्थ असेल? आता फोर्ट एरिया धोक्यात असेल का?" सोनाली ने विचारलं.

"आत्ता आपण ठोस असं काही सांगू शकत... पण, सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला नीट पडताळणी करावीच लागणार आहे!" सुयश सर थोडे चिंतेने म्हणाले.

एवढ्यात विक्रम पोलीस स्टेशन ला पोहोचला...
"जय हिंद सर!" त्याने सॅल्यूट केला आणि त्याच्या पेन कॅमेरा मधलं रेकॉर्डिंग दाखवायला सुरुवात केली...

"सर! एक मिनीट! या माणसाचा हात पुन्हा दाखवा.." गणेश गडबडीत म्हणाला.

विक्रम ने पुन्हा रेकॉर्डिंग रिवाईंड करून स्लो मोशन मध्ये दाखवलं...

"सर! हा तोच आहे जो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होता! याच्या डाव्या हाताच्या अंगठ्या पाशी बघा टाके घातल्याची खूण आहे, ती मी त्या हॉस्पिटल मधल्या माणसाच्या हातावर सुद्धा बघितली होती!" गणेश ने सांगितलं.

"काय? पण, तू म्हणाला होतास ना त्याचा पूर्ण चेहरा खराब झालाय... ओळखता पण येत नाहीये... मग हे कसं शक्य आहे?" निनाद ने विचारलं.

"मला वाटतंय यात तो डॉ. रवी सामील असणार!" विक्रम रागाने म्हणाला.

सुयश सरांच्या आदेशावरून निनाद आणि विक्रम डॉ. रवींवर नजर ठेवायला गेले... ते नेहमी प्रमाणे कामाला आले होते...काहीही संशयास्पद वाटत नव्हतं! त्यांचे कॉल डिटेल्स आणि बँक डिटेल्स सुद्धा दोघांनी चेक केले पण, ऑल क्लीअर होतं! दोघं मिळून डॉ. रवींच्या घराच्या इथे सुद्धा चौकशी करतात..... सगळ्यांचं त्यांच्या बद्दल चांगलंच मत असतं! पुन्हा ते दोघं पोलीस स्टेशन ला येतात....
***********************
अभिषेक ला ते बॅग घेतलेलं दुकान सापडतं!

"हि बॅग गेल्या दोन ते तीन दिवसात कोणी घेतली काही सांगू शकाल?" अभिषेक दुकानदाराला बॅग दाखवून विचारतो.

"हे बॅगेचं दुकान आहे! इथे असे कितीतरी लोक अश्या बॅगा घेऊन जातात... कोणा कोणाला लक्षात ठेवायचं? आणि कोण तुम्ही एवढी चौकशी का करताय?" दुकानदार थोड्या उद्धटपणे बोलतो.

अभिषेक त्याचं आय.डी. कार्ड दाखवतो तसं तो नरमतो!
"सॉरी सर! एक मिनीट सांगतो! ती बॅग द्या..... बारकोड वरून कोणी विकत घेतली त्याचं नाव कळेल..." असं म्हणून दुकानदार अभिषेक कडून ती बॅग घेतो.

बारकोड स्कॅन केल्यावर दुकानदाराने सगळे कस्टमर डिटेल्स अभिषेक ला दिले..... त्या एकाच व्यक्तीने तीन बॅग खरेदी केल्या होत्या... ते घेऊन तो सुद्धा पोलीस स्टेशन ला आला...
***********************
सगळ्यांनी जी काही माहिती मिळाली ती एकमेकांना शेअर केली... आता सगळ्यांचा मेन फोकस फोर्ट वर होता....

"सर! बबन ने जे वर्णन करून स्केच काढलं होतं, तो माणूस कोण ते आठवलं मला... हे बघा, जर या माणसाला दाढी, मिशी लावली तर तुफान न्युज चॅनेल चा जो रिपोर्टर आहे त्याच्या सारखा दिसतो!" अभिषेक ने सांगितलं.

"हो सर! खरंच.... आणि ते चॅनेल पण आत्ता आत्ता च आलं आहे.... आधी कधी या चॅनेल बद्दल ऐकलं पण नव्हतं." विक्रम दुजोरा देत म्हणाला.

"तू म्हणतोयस त्यात तथ्य आहे.... डॉ. विजय पण म्हणाले होते ना, त्या हॉल मध्ये जो बॉम्ब लावला होता तो एक किलोमीटरच्या आतून ऍक्टिव्ह केला होता.... त्या रिपोर्टर वर संशय घेऊच शकतो आपण... कारण सगळे बाहेर पडल्यावर आपण आणि कुणाल च तर आत राहिलो होतो, त्याने बाहेर जाऊन फक्त रिमोट च बटन दाबलं असेल आणि केला असेल बॉम्ब ऍक्टिव्ह!" सुयश सर म्हणाले.

"सर! आपण यात कुणाल ची मदत घेतली तर? तो सुद्धा रिपोर्टर आहे तर त्याच्यावर एवढा संशय नाही येणार..." सोनाली ने सुचवलं.

"हम्म! पण, आता आपल्याला जे काही करायचं आहे ते एकदम सावध राहून आणि त्या दहशदवाद्यांना बेसावध ठेवून!" विक्रम ने सुद्धा सोनालीच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"ठीक आहे! आपल्याला आता बरेच धागे मिळाले आहेत....आत्ता पर्यंत हि खोट्या बॉम्ब ची बॅग मिळाली आहे, दुसरी नक्कीच फोर्ट ला सापडेल आणि तिसरी बॅग कुठे असेल हे पाहावं लागेल...  शेवटचे ३६ तास हातात आहेत! आता आपण फोर्ट एरिया वाचवू तेव्हाच हा सगळा डाव हाणून पाडायचा.... जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा आपसूकच तो तुफान चॅनेल चा रिपोर्टर येईल तेव्हा त्याला पकडायचं! त्याला नक्कीच माहित असणार ती तिसरी बॅग कुठे ठेवणार आहेत! शिवाय विक्रम ने ट्रेसिंग वर ठेवलेला माणूस पण हाती लागेल तर गँग पर्यंत पोहोचणं सोपं जाईल." सुयश सर म्हणाले.
क्रमशः.....
***********************
आता पुढील भागात पाहूया तो रिपोर्टर हाती लागतो का.... तिसरी बॅग कुठे ठेवली असेल आणि पोलीस यातून कसा मार्ग काढून मुंबईच रक्षण करतात... तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा...

🎭 Series Post

View all