चूक कोणाची ?
आज तिच्या लेकीचा सत्कार सोहळा चालू होता, ते पाहून तिच्या डोळ्याचे पारणेच फिटले होते. एवढा मोठा तो भव्य दिव्य सोहळा पाहून, मागून टोचून बोलणारे आज सगळेच तिच्या लेकीचं कौतुक करत होते. IAS असलेल्या तिच्या मुलीने भारत सरकारच्या गुप्त खात्यासाठी एक महत्वाची कामगिरी केल्यामुळे आज हा समारंभ, तिचा कौतुक करण्यासाठी म्हणजेच पारितोषिक देण्यासाठी आयोजित केला होता. तिच्या मुलीला ते पारितोषिक घेताना पाहून तिला तिच्या जीवनाच सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या दुधाची जणू तिने परतफेडच केली होती.

आज तिच्या त्या पंचवीस वर्षापूर्वीच्या निर्णयाचा तिला मनापासून अभिमान वाटत होता. तिच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, जेव्हा तिची मुलगी म्हणाली...
"आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे आणि म्हणूनच हे अवॉर्ड मी तिला समर्पित करते."
किती खुश झाली ती हे ऐकून... जर तिने तो निर्णय घेतला नसता तर हा दिवस तिला आज बघायला भेटलाच नसता ना... आज पहिल्यांदा ती एवढ्या ताठ मानेने लोकांच्या नजरेला नजर देत होती.
तिची मुलगी आभा तिच्या जवळ आली, तिच्या हातात ते अवॉर्ड देत तिच्या पायाशी वाकली आणि म्हणाली...
"आई..., चल दिवाळीची खरेदी करूया ना? ह्या वर्षी तरी दिवाळी साजरी करायची ना...तू प्रॉमिस केल होतस "
तिने तिच्या लेकीला तिच्या ही नकळत होकार देऊन टाकला. तस पाखी ने तिचा हात पकडला आणि ती तिच्या सोबत चालू लागली. गाडीत असताना पाखीची, तिच्या लेकीची अवांतर बडबड चालू होती. पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं, ती हरवली होती तिच्या भूतकाळात. तिच्या डोळ्या समोर पंचवीस वर्षापूर्वीचे तिचं आयुष्य उभे राहिले होते.....
विभा ... नावाप्रमाणेच हुशार .. आताच तिशीमध्ये झुकलेली .. लेटेस्ट आलेली प्रत्येक फॅशन करणारी आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी परिधान करणारी.. परफेक्ट राहायला आवडायचं तिला .. दिसायला सुंदर आणि गोरीपान, आत्मविश्वासू.
ती एक स्वतंत्र विचारांची मुलगी होती .. हुशारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर ती मुंबईमध्ये आपले नशीब अजमावण्यासाठी गावावरून आली होती व एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ती चांगल्या पोस्टवर job करत होती.
तिची प्रगती पाहून तिला एक नवीन प्रोजेक्ट देण्यात आला होता, आणि त्या साठी एक नवीन मॅनेजर म्हणून रिषभला हायर करण्यात आलं होतं. दोघंही कामाची आवड असल्यामुळे रात्री उशिरा पर्यंत थांबून ते काम पूर्ण करत असत...
दिवस रात्र एकत्र असल्यामुळे त्याने तिच्या मनात घर केलं .. विषय वाढत गेले तस गप्पा आणि जवळीक वाढली. विचार जुळत गेल्यामुळे दोघांना एक अनामिक ओढ लागत गेली एकमेकांबद्दल ....
रिषभ एक आर्टिस्ट सुद्धा होता .. त्याच्यातल्या कलेला समजून घेणारी भेटल्यामुळे तो देखील तिच्याकडे ओढला गेला. त्यामुळे त्या एकाच ओढीने त्या दोघांना एकमेकांशी घट्ट बांधले गेले. मग नवीन साहित्य, त्यावर मत आणि अवांतर चर्चा होऊ लागल्या. दोघेही एक समृद्ध पार्टनर मिळाल्यामुळे खुश होते ... त्याची अडजस्टमेंट करण्याची वृत्ती, अनरस्टॅंडिंग नेचर, एकाग्रता, कामात वाहून जाण्याची वृत्ती ह्या सगळ्यामुळे विभा त्याच्यात वाहत गेली.
त्याच्या प्रेमात अगदीच आकंठ बुडाली होती विभा. जेव्हा तिला समजलं की त्याचं लग्न झालं असून त्याला दोन मूल देखील आहेत, तेव्हा ती फार कोलमडली. पण रिषभने तिला चांगलंच पटवून दिलं की त्याची पत्नी राधा एकदम साधी आहे, जिला कला म्हणजे काय तेच समजत नाही. ह्या अरसिक स्त्रीसोबत लग्न करून तो अजिबात खुश नाही.माझा तिच्या सोबत असताना कोंडमारा होता. पण तेच, मी तुझ्या सोबत असेन तर माझ्या बुद्धीला चालना मिळते. तुझ्या सोबत मला पूर्णत्व जाणवते तर तिच्या सोबत मला अपूर्ण वाटल्यासारखं भासते."
ह्यात तो यशस्वी ठरल्यामुळे घरच्यांच्या विरोधात जाऊन ती त्याच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.
"आपल्याला मुलं आहेत आणि त्यांची जबाबदारी माझी आहे. बायकोशी पटत नाही, ह्यात त्या चिमुकल्यांचा काय तो दोष."
हे त्याने बरोबर तिच्या मनावर बिंबवले. त्यामुळे तो शनिवार-रविवार आपल्या पत्नीला मुलांना भेटायला जायचा. कारण त्याच्या घरी ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कंपनीच्या कामासाठी तो बाहेर राहतो एवढंच काय ते त्याच्या पत्नीला माहित होतं. त्यामुळे तो ना धड विभाचा ना राधाचा होता.
असेच दोघेही मजेत राहत होते. काम सोबत त्यामुळे एकमेकांची कंपनी एन्जॉय करायचे. आता काही दिवसातच दिवाळी येणार होती आणि रिषभ जवळपास एक महिन्यासाठी जाणार होता. म्हणून आधीच दिवाळी त्याच्या सोबत साजरी करावी म्हणून ती शॉपिंगसाठी बाहेर पडली होती. बऱ्यापैकी खरेदी झाल्यावर घरी येत असताना ती चक्कर येऊन खाली पडली. बाजूच्या लोकांनी मदत करून तिला बाजूला बसविले आणि थोडा वेळ तिथे बसून ती निघून गेली. रस्त्यात गाडी चालवत असताना तिच्या डोक्यात आले,
"अरेच्या..! मला ह्या महिन्याचे पिरेड्स आले नाहीत."
तिने डेट आठवून पहिली तर वीस तीस दिवस जास्त झाले होते ...
"शीट...यार , कामाच्या गडबडीत आपल्या लक्षात कस नाही आलं ..."
गाडी थांबवून पटकन ती एक प्रेग्नेंसी किट घेऊन आली .... ती रात्र तिने कशीबशी घालवली आणि सकाळीच टेस्ट केली तर त्यावर दोन रेषा उमटल्या ....
"ओह्ह ... माय गॉड ... आय आम प्रेग्नंट .... व्वा "
ती खूप खुश झाली, स्वतः भोवतीच एक गोल गिरकी मारली तिने .... नेहमी वेगळे क्रीएशन करणारी ती आज तिच्यात निसर्ग एक गोड क्रीएशन निर्माण करणार होता. दिवाळीच्या वेळेस तिला ही गुड न्युज मिळाली होती. तिने स्वतःला आरशात पहिले. एवढ्या दिवस कामाच्या गडबडीत तिच्या चेहऱ्यावरचं तेज आज तिला जाणवलं होत. तिने सावकाशपणे आपल्या पोटावरून हात फिरवला आणि जणू तिला त्या बाळाची जाणीवच झाली ...."
"कस दिसेल माझं बाळ माझ्यासारखं की रिषभसारखं, त्याचे डोळे, नाक कस असेल? .. तो सुद्धा आमच्या सारखाच कलाकार होईल का ...?
ह्याच विचारात ती स्वतःशी हसली...
"मुलगा होईल की मुलगी... मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर... तिच्या डोळ्यासमोर चार-पाच नावे येऊन देखील गेली... "
पण लगेच तिच्या डोक्यात विचार आला... रिषभ ह्याला त्याच स्वतःचं नाव देईल का? काय प्रतिक्रिया असेल त्याची? तो स्वीकार करेल का? एक ना अनेक विचार तिच्या मनात आले पण सध्या तरी एका ही प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे समाधानकारक नव्हतं... तिने विचार करून झोपलेल्या रिषभला उठवलं...
"रिषभ, उठ ना..."
"विभा, झोपू दे ना..."
"रिषभ... आय आम प्रेग्नंट."
ती अतिशय क्षीण आवाजात म्हणाली...
"अग, पण मागच्या महिन्यात आपल्यात काहीही झालं नाही... आणि मी नेहमी प्रोटेकशन वापरतो ... मग हे कस शक्य आहे??..."
त्याची झोप उडालेली होती. तो एकदम अस्वस्थपणे उठून बसला आणि हाताशी चाळा करू लागला.
"रिषभ, इट्स अल्मोस्ट थ्री मन्थ्स, मला पिरेड्स नाही आलेत तेव्हापासून आणि कामाच्या गोंधळात मला काही लक्षात देखील आलं नाही."
ती एकदम हळू आवाजात, जणू काही तिनेच गुन्हा केला आहे अशा स्वरात म्हणाली.
"मूर्ख! तुला एवढं साधं समजलं नाही? कामापुढे तुला काहीच समजत नाही. पण एवढा हलगर्जीपणा कसा काय होऊ शकतो तुझ्या कडून?"
त्याचा मूड बदलून आवाज वाढला होता. तो देखील घाबरला होता.
त्याचा तो पवित्रा पाहून ती आलेला आवंढा गिळून हळूच म्हणाली.
"झाली चूक. पण आता काय करायचं ...?"
"काय करायच म्हणजे ..आजच पाडून टाक हे पाप..."
त्याचे हे बोलणे तिला खूपच लागले ..
"रिषभ, तू आपल्याला बाळाला पाप कस काय म्हणू शकतोस. आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे ही. मी वाढवेन ह्याला. वाटल्यास माझं नाव देईन ..."
ती हे म्हणाली खरं पण तिचीच हिम्मत नव्हती, गळून गेली होती ती रिषभच हे रूप पाहून..
"तुझ्या मनाची तयारी खूपच झाली आणि हिंमत देखील आली तुला ...आणि कश्यावरून हे माझेच आहे? माझं आहे तर एवढ्या दिवस का नाही सांगितलंस??"
तो ओरडून तिचा हात झटकून म्हणाला ...
"तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात कुणीच नाही.. मी खोट बोलत नाही हे तुझंच आहे. मी आजच चेक केलय. मला देखील आताच समजलं. पण ऐक ना रिषभ राहू दे ना रे, तुझंच तर आहे हे.."
ती काकुळतीला येऊन त्याच्या पायाशी बिलगून रडत म्हणाली..
"वेड लागलं आहे का तुला.. तुझ्या ह्या पापाला नाव लावायच्या नादात माझा संसार मोडेल.. माझी दोन्ही मुलं अनाथ होतील आणि ते मला नको आहे. तू हे अबॉर्ट कर,असं हि हे बाळ तुझ्या आणि माझ्या करिअरमध्ये अडथळा होईल.. सो काहीच विचार न करता इमिजिएटली अबॉर्ट कर.."
ते ऐकून ती एकदम सुन्न झाली, तो आवरायला निघून गेला.. विभा तिथे जागेवरच काय करायचं ह्या अवस्थेत बसून होती, तेव्हाच रिषभ समोर बॅग घेऊन आला व काही पैसे तिच्या समोर टाकत म्हणाला..
"विभा, हे पैसे घे आणि अबॉर्ट कर. यापुढे तुझा न माझा काहीच संबंध नाही .... "
ह्यात त्याला अडवण्याचा देखील तिला सुचलं नाही. त्यानंतर तिने त्याला काही वेळा कॉन्टॅक्ट केला, पण त्याच्याकडून तिला काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला. त्याने त्याच दिवशी स्वतःची ट्रान्सफर करवून घेतली व मोबाइल नंबर देखील बदलून घेतला.
शेवटी दोन दिवस विचार करून आज ती अबॉर्ट करण्यासाठी निघाली होती.
हातात एक पिशवी आणि चेहऱ्यावर शून्य भाव घेऊन ती ठाण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली. दुपारची वेळ आणि वर्किंग दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. विषण्ण मनाने ती खिडकी जवळ जाऊन बसली. विचाराचं काहूर तिच्या मनात माजल असताना एका कानातले विकणाऱ्या मुलीने तिला आवाज दिला.
"ताई, नये लेटेस्ट झुमके हैं... देखना है क्या...?"
आणि तिच्याकडून काहीही उत्तराची अपेक्षा न करता तिच्या समोर आणून तिने झूमके लटकावले देखील.. पण त्याकडे न बघता ती त्या मुलीकडे पाहत होती.. साधारण एकोणीस-वीस वर्षांची ती मुलगी असावी.. आणि तिच्या कमरेला ओढणीमध्ये तिने एक तान्हे मूल गच्च बांधून घेतलं होतं. त्याच्या कडे तिचं लक्ष वेधलं गेलं.. ते बाळ शांतपणे त्याच्या आईच्या खांद्यावर विसावलं होतं... हाताच्या मुठीत-मध्ये चोखत होतं आणि डोळे मिटत होतं. त्याची आई अगदी सऱ्हाईतपणे एकाच झालं की दुसऱ्याला ते कानातले दाखवत होती....
"ताई घेणार का? बघा, पन्नासला दोन देईन..."
त्या मुलीने पुन्हा विचारलं, तस ती तंद्रीतून बाहेर आली आणि त्या बाळावरून आपली नजर दुसरीकडे वळून
"नको..."
एवढंच तोंडातच पुटपुटली.. तस त्या मुलीने ते कानातले तिच्या इथून उचलून दुसरीकडे नेलं.. आणि ते बाळ तिच्याकडे पाहून खुद्कन हसलं, तशी ती शहारली...
पण त्या ट्रेनमध्ये फिरण्याऱ्या मुलीला आणि त्या बाळाला पाहून तिने तिचा विचार बदलला.
"ही मुलगी तिच्या कडे काहीही नसून सुद्धा तिच्या बाळाला सांभाळते, मग आपण का नाही? मीपण सांभाळू शकते, मी नाही मारू शकत माझ्या बाळाला..."
मनात निर्धार करून तिने पोटावरून हात फिरवला.
तसही आता तिच्यासोबत तिचे घरचे नव्हते हे येणारे बाळ तिचं सुद्धा होतच, त्यामुळे तिने त्याला वाढवण्याचा निर्णय घेतला आणि सगळं मागे टाकून ती ते शहर सोडून कायमच निघून गेली.
यथावकाश दिवस भरताच तिने योग्य वेळी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
त्या गोड पाखीकडे पाहत तिने आलेले सगळे दिवस ढकलले. ह्यात तिला कधी कधी लोकांकडून टोमणे देखील ऐकायला मिळत होते. पण ती पाखीच्या बाळलीला मध्ये सगळं विसरून गेली होती. ज्या दिवाळीला रिषभ तिच्या आयुष्यात अंधार करून गेला, त्यानंतर तिने एकदाही दिवाळी साजरी केली नाही.
पाखी तिला नेहमी विचारायची, इतरांच्या घरात दिवाळी साजरी करतात, पण आपण का नाही करत साजरी?? त्या वेळेस ती तिला काहीतरी थातुरमातुर उत्तर देऊन शांत बसवायची, पण जेव्हा पाखी कळत्या वयाची झाली, तेव्हा विभा ने तिला सगळं खरं सांगितलं. तेव्हाच पाखीने तिला प्रॉमिस केलं होतं, जेव्हा मी माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करेन, तेव्हा त्याच दिवशी आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करूया. त्या नुसार आज त्या दोघी त्यांची दिवाळी साजरी करणार होत्या. पाखीने विभाच्या आयुष्यात प्रकाश आणला होता. आज खऱ्या अर्थाने त्या दोघींची दिवाळी साजरी होणार होती.
पण ह्यात फक्त रिषभ ची चूक होती का? विभाला त्याच्या बद्दल सगळं ठाऊक असून देखील ती वाहवत गेली. कौतुक पाखीच तिने तिच्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवली व तिला समजून घेतलं. म्हणून मोहचे क्षण नेहमीच टाळावेत.
समाप्त...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा