Login

मिस्टेकन आयडेंटिटी भाग. ३. Surprise Impact

खूनाचा तपास जारी
मिसटेकन आयडेंटिटी
भाग ३ सर्प्राइज इंपॅक्ट

पाहाता पाहता वर्ष उलटलं. सुरवातीला पाटील चौकशी करत होते पण त्यांनीही आता येणं बंद केलं होतं. अशीच दोन तीन पाच आणि १० वर्ष उलटली. दर वेळेस नवीन इंस्पेक्टर साहेब आले, की पेंडिंग केसेस चा गठ्ठा उघडायचे आणि हाती काही लागलं नाही की परत ठेवून द्यायचे.
१० वर्षा नंतर अशी एक घटना घडली की ज्यामुळे केस पुन्हा ओपन झाली. घटना तशी सामान्यच होती पण तिने चौकशीला चालना दिली.
भाईंदर च्या एका बार मधे तिघं मित्र बसले होते. बऱ्याच दिवसांनी भेटले म्हणून गेट टु गेदर दारू पिऊन साजरा करत होते. बार गच्च भरला होता. शेजारचं टेबल रिकामं झाल्यावर लगेच तिथे दोन जण येऊन बसले. त्यांचंही पेय पान सुरू झालं. खरं तर बार मध्ये कोणाचंच कोणाकडे लक्ष नसतं. पण आधी जे तिघं बसले होते, त्यातला कृष्णा, सांताक्रूझ पोलिसांचा खबरी होता. अचानक त्याचं लक्ष शेजारच्या सांभाषणांकडे वेधलं गेलं.
“अरे कालची बातमी वाचलीस का?” – शेजारच्या टेबल वरचा एकजण
“कोणची?” – दूसरा.
“ती रे, गर्ल फ्रेंड ने लग्नाला नकार दिला म्हणून त्याने तिला गळा चिरून संपवलं शेजाऱ्यांनी आरडा ओरडा ऐकून त्याला पकडलं.” -पहिला.
“अशा बातम्या बऱ्याच येत असतात. एक तर आपल्या माहितीतल्या माणसाने केलेलं कृत्य असावं असा मला दाट संशय आहे.” – दूसरा.
हे ऐकल्यावर कृष्णाने कान टवकारले. त्याने आपला मोबाइल काढला आणि टेबलाच्या अगदी कडेवर ठेऊन रेकॉर्डिंग चालू केलं. तो स्वत:ही कान देऊन संभाषण ऐकत होता. बारमधे दोन पेग रिचवल्यावर सगळे मोठ्या आवाजात बोलायला लागतात. गोंधळ खूप होता. कृष्णा खूप सराईत होता, अर्थात तो काय करतो आहे, ते त्यांच्या मित्रांनाही कळलं नाही त्यामुळे शेजारच्या टेबलावर बसलेल्या दोघांना कळणं शक्यच नव्हतं. सांभाषणातला कृष्णाच्या दृष्टीने महत्वाचा भाग संपल्यावर त्याने रेकॉर्डिंग बंद केलं आणि मित्रांना म्हणाला की त्याला एक अर्जंट कॉल करायचा आहे, आणि तो बारच्या बाहेर आला. त्याने सांताक्रूझ चे इंस्पेक्टर भोसले यांना फोन लावला.
रात्रीचे अकरा वाजले होते, आणि फोन आल्यामुळे भोसले जरा वैतागले. त्यांनी कृष्णाचं नाव पाहीलं आणि ते आधी उचलणार नव्हते, पण मग विचार केला की काही तरी महत्वाची खबर असल्याशिवाय कृष्णा एवढ्या रात्री फोन करणार नाही, म्हणून फोन उचलला.
“साहेब मी कृष्णा बोलतो आहे.” – कृष्णा
“अरे आधीच डिपार्टमेंट रात्री झोपू देत नाही त्यात तू कशाला भर घालतोस? किती वाजले आहेत हे बघितलं का? बोल काय काम काढलं एवढ्या रात्री?” – भोसले
“साहेब मी मित्रांबरोबर भाईंदरच्या एका बार मधे आहे. शेजारच्याच टेबलावर जे दोघं बसले होते, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष गेलं आणि महत्वाचं वाटलं म्हणून मी ऑडिओ रेकॉर्डिंग केलं आहे. ते तुम्हाला पाठवतो. आत्ताच ऐका आणि काही अॅक्शन घ्यायची असेल तर सांगा.” – कृष्णा
“कुठल्या केसच्या संदर्भात आहे?” – भोसले.
“साहेब, कुठल्या केसच्या संदर्भात आहे हे नाही सांगता येणार. आणि ही केस तुमच्या एरीयातली पण नाहीये. पण मी तुमच्याशिवाय कोणाला सांगणार? आता त्याचं पुढे काय करायचं ते तुम्हीच ठरवा. फक्त लगेच ऐका आणि मला त्याप्रमाणे सूचना द्या. मी तुमच्या फोनची वाट पाहतो.” – कृष्णा.
भोसले पुन्हा एकदा वैतागले. पण त्यांनी रेकॉर्डिंग ऐकलं. पुन्हा एकदा ऐकलं आणि कृष्णाला फोन केला.
“ती दोघं कुठली आहेत भाईंदरचीच आहेत का?” – भोसले.
“नाही साहेब एक भाईंदरचाच आहे पण दूसरा मुंबईचा आहे” – कृष्णा.
“ठीक आहे, काहीतरी आयडिया कर आणि दोघांची नावं जाणून घे. जो भाईंदरचा आहे त्यांच्या मागावर रहा आणि घर पाहून ठेव. घराचा फोटो काढ आणि लोकेशन घे आणि दोन्ही नावासकट मला पाठवून दे. बाकी मी बघतो काय करायचं ते. खबर महत्वाची आहे. मला येऊन भेटून जा.
बार मध्ये एकमेकांना माचिस किंवा लायटर मागणं एक सामान्य गोष्ट असते, खरं म्हणजे माचिस आणि सिगरेट पाकीट सहसा टेबल वरच असतं. कृष्णाने पाकीटांतून सिगारेट काढली आणि शेजारच्या माणसाला माचिस मागितली. थोडं संभाषण सुरू केलं आणि थोड्याच वेळात त्या दोघांची पूर्ण कुंडली माहीत करून घेतली. त्याचं काम झालं होतं. सर्व माहिती त्याने भोसले साहेबांना whats app वर पाठवून दिली.
दुसऱ्या दिवशी भोसले साहेबांनी मेसेज पाहिला. त्यांना समाधान वाटलं. कृष्णाने आपलं काम अगदी चोख केलं होतं. सकाळच्या वेळेस पोलिस स्टेशन मधे खूपच वर्दळ असते. ती जरा निवळल्यावर, दुपारी त्यांनी नाशिकला फोन लावला.
“हॅलो, मी इंस्पेक्टर भोसले बोलतो आहे. सांताक्रूझ पोलिस स्टेशन मुंबई. तिथे इनचार्ज कोण आहेत? मला त्यांच्याशी जोडून द्या.” – भोसले.
“विसपुते साहेब इनचार्ज आहेत. पण आत्ता ते ACP साहेबांबरोबर मीटिंग मध्ये आहेत. मॅटर अर्जंट असेल तर विचारतो.” – कॉंस्टेबल
“मॅटर अर्जंट नाहीये, पण खूप महत्वाचं आहे. तुम्ही विचारा साहेबांना.” – भोसले.
“साहेब, सांताक्रूझ पोलिस स्टेशन मधून फोन आहे, तिथले इंस्पेक्टर साहेब म्हणताहेत की मॅटर महत्वाचं आहे फोन जोडून द्या.” – कॉंस्टेबल.
“ठीक आहे करा कनेक्ट.” – विसपुते.
“हॅलो… विसपुते बोलतोय.”
“मी भोसले. इंस्पेक्टर सांताक्रूझ पोलिस स्टेशन.”
“बोला भोसले साहेब.”
“साहेब, काल मला एका खबऱ्याकडून एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे. त्यात एका खुनाच्या सुपारीचा उल्लेख आहे. टाइम लाइन १० वर्षांपूर्वीची आहे आणि एरिया देवळालीचा आहे. तो तुमचा एरिया आहे त्यामुळे मी तुमच्याशी संपर्क करतोय.”
“देवळाली?”
विसपुते थोडे थांबले.
“भोसले साहेब तुमचा मोबाइल नंबर द्या. इथे ACP शेंडे साहेब आले आहेत. १० वर्षांपूर्वी तेच या ठाण्याचे इनचार्ज होते. मी तुम्हाला फोन करतो आणि फोन स्पीकर वर टाकतो.” – विसपुते.
मग विसपुते साहेबांनी शेंडे साहेबांना भोसले काय म्हणाले ते सांगितलं. ACP साहेबांनी मान डोलावली आणि म्हणाले की “ठीक आहे लावा फोन.” विसपुते साहेबांनी फोन लावला. भोसले लाइन वर आले.
“हूं बोला भोसले साहेब.” – विसपुते.
“काल रात्री आमचा एक खबरी भाईंदरच्या बार मध्ये मित्रा बरोबर बसला होता. शेजारच्या टेबल वर जे संभाषण चाललं होतं ते त्याला संशयास्पद वाटलं म्हणून त्याने ते रेकॉर्ड केलं. आणि क्लिप मला पाठवून दिली.
“क्लिपमध्ये नेमकं काय आहे?”
“मी तुम्हाला आत्ताच ती क्लिप फॉरवर्ड केली आहे. त्या क्लिपमध्ये दोन मित्र बोलत आहेत. त्यात एक जण सांगतो की देवळालीच्या राजा कोसलेने औरंगाबादच्या एका कॉलेजमधल्या मुलीसाठी पन्नास हजाराची सुपारी दिली होती. कारण त्या मुलीने त्याचं लग्नाचं प्रपोजल नाकारलं होतं. पुढे काय झालं हे त्यालाही माहीत नाही असं तो सांगतो.” तुम्ही क्लिप ऐका आणि मग आपण बोलू.” – भोसले.
ACP साहेब आणि विसपुते दोघेही गंभीर झाले.
“ओके. आम्ही ऐकतो. आणि मग तुम्हाला कॉल करतो.” – विसपुते. त्यांनी क्लिप चालू केली.
क्लिप :-
“तुला आठवतं, राजा कोसले, त्यांच्या वडिलांचं कोसले मिठाई दरबार हे दुकान आहे? देवळालीला रे.” – दूसरा मित्र
“हो न आठवायला काय झालं, आपल्या बरोबर होता तो शाळे मध्ये. पण मग तो पुढे शिकला की नाही हे माहीत नाही.” – पहिला.
“शाळा सोडली त्याने, तो औरंगाबादला एका इंजीनीरिंग कॉलेज मध्ये चपराशी म्हणून रुजू झाला. तिथे त्याचं कॉलेज मधल्याच एका मुलीशी सूत जमलं.” – दूसरा.
“तुला काय माहीत? तू तर पुण्याला आला होतास.” – पहिला.
“मी अधून मधून देवळालीला जायचो तेंव्हा एक दोनदा भेटला होता.” – दूसरा.
“बरं मग काय झालं?” – पहिला.
“त्याने त्या मुलीला प्रपोज केलं पण तिने नकार दिला. तू चपराशी आणि मी इंजीनियर असं म्हणाली. राजा भयंकर संतापला, त्याने एका ला, तिला संपवण्याची सुपारी दिली त्या साठी त्याने ५०००० मोजले. पुढे काय झालं ते माहीत नाही त्यानंतर आमची भेट झाली नाही. भेटावसं पण वाटलं नाही.” – दूसरा.
क्लिप संपली.
“म्हणजे गुन्हा घडल्याची खात्री दिली नाही. पण सुपारी दिल्याचा उल्लेख आहे.” – शेंडे
“हो साहेब. आणि क्लिपमध्ये मुलीचं नाव नाही. केस कुठे घडली तेही नाही. फक्त देवळालीचा राजा कोसले एवढाच ठोस धागा आहे.” - विसपुते विचारात पडले.
त्यांनी भोसल्यांना फोन लावला.
“भोसले साहेब… अशा प्रकारची सुपारी दिल्याची गोष्ट जर खरी असेल, तर ती कुठल्या तरी अनसॉल्व्हड केसशी जुळू शकते.”
“माझाही तोच अंदाज आहे साहेब. म्हणूनच मी थेट तुमच्याशी संपर्क केला. देवळाली तुमच्या हद्दीत येते.”
विसपुते थोड्या वेळाने म्हणाले,
“मी आमच्या मागील दहा–पंधरा वर्षांच्या शोध न लागलेल्या केसेस तपासतो. विशेषतः तरुण मुलींच्या खुनांच्या केसेस. कारण ही क्लिप स्वतः काही सिद्ध करत नाही. पण ती तपास सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.” – विसपुते.
“हो. आणि राजा कोसलेचा सध्याचा पत्ता, पार्श्वभूमी, कॉलेजमधील काळ — हे सगळं शोधून काढावं लागेल.” - भोसले म्हणाले,
“म्हणजे आत्ता आपण एका संशयापासून सुरुवात करतोय… गुन्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी.”
विसपुते म्हणाले,
“आणि कधी कधी भोसले साहेब… अशाच संशयातून दहा वर्ष जुने सापळे बोलायला लागतात.” – ACP शेंडे. “तुमच्या त्या खबरीला चांगलं बक्षीस द्या.”
क्रमश:-----
दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all