Login

मिस्टेकन आयडेंटिटी भाग ४ अनपेक्षित वळण

मारेकऱ्यांचा शोध सुरूच
मिसटेकन आयडेंटिटी
भाग ४ अनपेक्षित वळण
“मी आमच्या मागील दहा–पंधरा वर्षांच्या शोध न लागलेल्या केसेस तपासतो. विशेषतः तरुण मुलींच्या खुनांच्या केसेस. कारण ही क्लिप स्वतः काही सिद्ध करत नाही. पण ती तपास सुरू करण्यासाठी पुरेशी आहे.” – विसपुते.
“हो. आणि राजा कोसलेचा सध्याचा पत्ता, पार्श्वभूमी, कॉलेजमधील काळ — हे सगळं शोधून काढावं लागेल.” - भोसले म्हणाले,
“म्हणजे आत्ता आपण एका संशयापासून सुरुवात करतोय… गुन्ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी.”
विसपुते म्हणाले,
“आणि कधी कधी भोसले साहेब… अशाच संशयातून दहा वर्ष जुने सापळे बोलायला लागतात.” – ACP शेंडे. “तुमच्या त्या खबरीला चांगलं बक्षीस द्या.”
“साहेब मी लगेच कामाला लागतो. बघतो कोणच्या केसचा संदर्भ या गोष्टीशी जुळतो ते. मग कारवाई करायला बरं पडेल.” – विसपुते.
“हा राजा कोसले म्हणजे ज्यांची नाशकात १०-१२ मिठाईची दुकानं आहेत तोच असणार. बरीच खारी मिठाई पण बनते त्यांच्याकडे. त्यांच्या दुकानातले प्रोडक्टस उत्तम असतात. आम्ही बरेच वेळेस ते घेतो. फेमस आहेत.” – शेंडे.
“हो सर तोच आहे. मोठी आसामी आहे, एकदम हात नाही लावता येणार..” – विसपुते.
“बरोबर मला तेच म्हणायचं होतं. आधी बाहेरून त्यांची सर्व कुंडली शोधून काढा मगच आपल्याला काही ठरवता येईल. औरंगाबादच्या कॉलेज मध्ये पण चौकशी करा. त्यांची गर्ल फ्रेंड कोण होती ते पण शोधा. पण हे सगळं गुप्तता बाळगून करा. तो जर कशात गुंतला असेल, तर सावध होईल. ती रिस्क आपल्याला घेता येणार नाही. या चौकशीत जर काही आढळलं तरच आपल्याला अॅक्शन घेता येईल.” – शेंडे.
“जुन्या फायली बघितल्या तर थोडा आधार मिळेल.” – विसपुते.
“ते तर तुम्ही बघालच पण मला असं वाटतं की तुम्ही आधी राजा कोसलेची पडताळणी करावी. काय आहे की जुन्या फाइल वरुन आपण हा तोच आहे असा निष्कर्ष काढला तर सगळा तपास चुकीच्या दिशेने पण जाण्याची शक्यता असू शकते. म्हणून मी म्हंटलं की आधी राजा कोसलेची कुंडली काढा मग कोणच्या फाइल मधल्या माहितीशी ती जुळते का ते बघू.” – शेंडे
“हो साहेब, तसंच करतो. आधी कोसले मग फाइल.” – विसपुते.
मग विसपुते साहेबांनी आपले खबरी राजाची माहिती काढण्यासाठी लावले. औरंगाबाद कॉलेज मधे चौकशी केली. कुठेही कोणीही राजाच्या चारित्र्यावर एवढासा पण ओरखडा उमटवला नाही. सर्वांनी त्यांच्या स्वच्छ चारित्र्याची ग्वाही दिली. उलट एक अतिशय सहृदय आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा माणूस आहे असंच सांगितलं. आता विसपुते धर्म संकटात सापडले. नाशकात राजाचं मोठं नाव होतं. त्याला कसा हात लावायचा हाच प्रश्न पडला. ते शेंडे साहेबांना भेटले. त्यांना सर्व अपडेट दिलं. आणि म्हणाले,
“साहेब हा तर यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. काय करायचं आता?” – विसपुते.
शेंडे पण विचारात पडले.
“साहेब, आपण राजाला भेटू आणि समक्षच सर्व सोक्ष मोक्ष लावून येऊ.” – विसपुते.
“काही तरी तर मार्ग काढालाच पाहिजे. मोठी आणि चांगली माणसं सुद्धा पूर्वायुष्यात गुन्हा करून बसतात आणि मग तो उन्माद ओसरल्यावर धडा घेतात. असच काहीसं झालं असावं.” – शेंडे.
“मग बोलावू नका त्याला?” - विसपुते.
“नको, शहरात त्या माणसाची पत आहे. एकदम हात लावला तर अंगलट येण्याची शक्यता आहे. आपण साध्या वेशात जाऊ आणि गोडी गुलांबीने काही धागा मिळतो का ते बघू. मगच ठरवू.” – शेंडे.
“केंव्हा जायचं? त्यांचं ऑफिस मुख्य दुकानात आहे. संध्याकाळी त्यांच्या दुकानात खूप गर्दी असते. त्यावेळेस जाणं योग्य दिसणार नाही. उद्या दुपारी जायचं का? जरा निवांत बोलता येईल.” – विसपुते.
दुसऱ्या दिवशी दुपारी शेंडे साहेब आणि विसपुते दोघेही राजाच्या मेन ब्रँच मध्ये गेले. तुरळक गर्दी होती. त्यांनी काऊंटर वर विचारलं की राजाभाऊ कुठे भेटतील म्हणून. त्याने ऑफिस दाखवलं.
“नमस्कार राजाभाऊ साहेब.” – विसपुते.
“नमस्कार. बसा. मी आपल्याला ओळखलं नाही.” – राजा
“मी इंस्पेक्टर विसपुते आणि हे आमचे साहेब ACP शेंडे साहेब.” – विसपुते.
“अरे बापरे काय झालं साहेब?” – राजा.
“आम्हाला काही प्रश्न पडले आहेत आणि तुम्ही त्यांची खरी उत्तरं द्यावीत अशी अपेक्षा आहे.” – शेंडे.
“पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची वेळ यावी असं काही माझ्या आयुष्यात घडल्याचं मला स्मरत नाही. पण ठीक आहे विचारा तुम्ही.” राजा कपाळाला आठ्या घालत बोलला.
“तुम्ही बारावीत शाळा सोडली. काय कारण झालं?” – विसपुते.
“मला शाळेत कधीच इंट्रेस्ट नव्हता. बाबांची इच्छा होती की मी किमान बारावी पर्यन्त शिकाव. मी तेवढं केलं आणि शाळा सोडली.” – राजा.
“पण काय साध्य केलात? औरंगाबादला एका कॉलेज मध्ये प्यून म्हणून नोकरी केली. हेच ध्येय होतं का?” – विसपुते.
“साहेब पैशांची कमी नव्हती. मला अनुभव घ्यायचा होता. अजून काही नाही. दोनच वर्षात मी ती सोडली आणि इथे बाबांच्या बरोबर दुकानात आलो.” – राजा.
“तिथे असतांना तुमचं एका कॉलेजच्यांच एका मुली बरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं असं आम्हाला कळलं आहे. त्या मुलीचं नाव आणि पत्ता देवू शकाल का?” – विसपुते.
“नाव आणि पत्ता द्यायला काहीच हरकत नाहीये. पण कशाला हवा आहे तो हे कळल्या शिवाय मी देणार नाही. ही माझी खाजगी बाब आहे.” – राजा.
“हीच तुमची खाजगी बाब आमच्या साठी महत्वाची आहे. कारण काय आहे ते आम्ही निश्चित सांगू. चिंता करू नका.” – शेंडे.
“म्हणजे असं काय आहे नावात की जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे?” – राजा.
“आम्ही आधीच सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला अंधारात ठेवणार नाही म्हणून. पण आधी नाव आणि पत्ता सांगा. फोन नंबर असेल तर तो ही द्या.” – शेंडे साहेबांचा स्वर आता गंभीर झाला होता. राजाच्या ते लक्षात आलं. तो म्हणाला.
“ठीक आहे.” आणि त्याने हाक मारली “स्वाती जरा येतेस का?” –
स्वाती बाहेर काऊंटर वर होती, ती आत ऑफिस मधे आली. एक सुस्वरूप आणि तरतरीत अशी तिशीतली महिला बघून शेंडे आणि विसपुते जागीच उडाले.
“ही स्वाती, माझी पूर्वाश्रमीची गर्ल फ्रेंड. आणि आत्ताची पत्नी. हिच्याशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकता.” – राजा.
शेंडे आणि विसपुते स्तंभित झाले. याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती.
“म्हणजे औरंगाबादच्या कॉलेज मधे ज्या मुलीशी तुमचं सूत जमलं होतं ती हीच मुलगी आहे का?” – शेंडे.
“स्वाती तूच सांग.” – राजा
“हो मीच ती. पण हे काय चाललं आहे ते मला कळेल का?” – स्वाती.
“आता साहेब मला कारण कळेल का? स्वाती हे ACP शेंडे साहेब आणि हे इंस्पेक्टर विसपुते. हे आपल्या लव स्टोरी ची खात्री करून घ्यायला आले आहेत.” – राजा.
“आम्ही तुमच्या लव स्टोरी साठी आलेलो नाहीये. मी तुम्हाला सविस्तर सांगतो. आम्हाला अशी टीप मिळाली की १० वर्षा पूर्वी तुम्ही मागणी घातली आणि स्वाती मॅडमने ती धुडकावून लावली. दोघांच्या लेव्हल बद्दल बोलली. मग रागाच्या भरात तुम्ही मॅडमचा खून केला. म्हणून ही चौकशी सुरू झाली.” – शेंडे.
“काय? अहो पण हे कसं शक्य आहे? असं काहीच झालं नाही. मी इथे जीवंत तुमच्या समोर बसली आहे. ही कोणी टीप दिली हे कळलं का?” - स्वाती.
“ही क्लिप ऐका.” – विसपुते.
क्लिप ऐकल्यावर दोघंही हादरले. मग त्यांची जागा संतापाने घेतली.
“अशी बदनामी करायला लाज कशी नाही वाटली? कोण आहेत ही दोघं? – स्वाती.
“त्याचाही शोध आम्ही लावला आहे पण अजून हातात आले नाहीयेत. पण स्वाती मॅडम त्यावेळेस नक्की काय झालं होतं?” - शेंडे
“आमचं कॉलेज संपल्यानंतर आमची भेट झाली. मला वाटलं होतं की हा तेंव्हाच मला प्रपोज करेल, पण यांची काही हिम्मत झाली नाही. मग मला नाशिकच्या एका कंपनीत इंटरव्ह्यु ला बोलावलं. तेंव्हा मला चान्सच मिळाला. मी याला देवळालीला जाऊन भेटली. तिथे दुकानातच याने मला प्रपोज केलं. मला तेच हवं होतं मी हो म्हंटलं आणि मग मी म्हंटलं की की मी आता इंटरव्ह्यु देत नाही. काही कारणच नव्हतं. जे हवं होतं ते साध्य झालं होतं. पण राजा म्हणाला की असं नको करू, इंटरव्ह्यु दे. एवढं ज्ञान घेतलं आहे ते वाया घालवू नकोस. मग दुसऱ्या दिवशी राजा आणि मी त्या कंपनीत गेलो. राजा परत गेला आणि मी इंटरव्ह्यु न देताच तिथूनच परतले आणि वापस नगरला गेली. मग वर्षभरात आमचं लग्न झालं.” – स्वाती.
“नाशिकला कुठल्या कंपनीत इंटरव्ह्यु होता?” – शेंडे.
मी जर तो इंटरव्ह्यु दिलाच नाही तर कशाला विचारता आहात?” – स्वाती.
“कारण त्याच तारखेला दुपारी २ वाजता एका मुलीचा बसस्टॉप वर चाकूने भोसकून खून झाला आहे. हा फोटो. बघा ओळखीचा आहे का?” – विसपुते.
स्वातीने आणि राजाने फोटो पाहिला. राजाने तर ओळखलं नाही पण स्वातीने ओळखला. म्हणाली,
“ही तर निर्मला. चाळीसगावची. आमच्याच बरोबर होती. पण हिला का कोणी मारलं? बिचारी साधी सरळ नाका समोर चालणारी मुलगी होती.” – स्वाती.
“तुमचं बरोबर आहे ही निर्मलाच आहे. आणि १० वर्ष झाले अजून मारेकरी सापडला नाही. – विसपुते.
“क्लिप मधले दोघं कोण होते ते कळलं का?” – राजा.
“हो त्यांची माहिती काढली आहे. एक जो ऐकतो आहे तो आत्माराम आहे आणि दूसरा जो बोलतो आहे, तो राघव आहे.” – विसपुते.
“साहेब हे दोघ तर शाळेमध्ये माझ्याच बरोबर होते आणि देवळालीचेच आहेत. त्यांनी असं का करावं समजत नाही. मित्रच असे वागू शकतात?” – राजा.
त्यानंतर राघव किंवा आत्माराम तुम्हाला केंव्हा भेटला होता?” – शेंडे.
“हां आठवलं. स्वाती आली त्याच दिवशी दुपारी राघव आला होता. मी आनंदात होतो, त्याला पण ही बातमी दिली आणि गुलाब जाम पण खिलवला. बस.” – राजा.
परत पोलिस स्टेशन वर जातांना विसपुते म्हणाले,
“साहेब, हे तर अनपेक्षितच घडतंय. आता पुढे काय? त्या बार मधल्या दोघा जणांना चौकशीला बोलवायचं का? जो कोणी बोलला असेल त्यालाच आपल्या पद्धतीने विचारू. कदाचित तो बोलेल.
क्रमश:-----
दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all