Login

मिस्टेकन आयडेंटिटी भाग ६ अंतिम

खूप तपास करून मारेकरी हातात आला पण..
मिसटेकन आयडेंटिटी
भाग ६ फायनल इंपॅक्ट
“साहेब त्याला ताबडतोब उचला” – विसपुते.
“साहेब, असं कसं उचलणार? त्यांच्यावर आरोप नाही FIR सुद्धा नाही पण त्यांच्या मागावर राहू शकतो. पण शेवटी पुढे काय?” – बखले.
“त्यांच्यावर ३ लाखांची चोरी करून पळाल्याची FIR मुंबईच्या एका पोलिस स्टेशन मध्ये झालेली आहे. मी तुम्हाला FIR ची कॉपी पाठवतो. या ग्राउंड वर तुम्ही नक्कीच त्याला अटक करू शकता. मी उद्या दुपार पर्यन्त तिथे पोचतो. त्याला सोडू नका.” – विसपुते.
“ठीक आहे साहेब. या तुम्ही उद्या . मी वाट पाहतो.” – बखले.
विसपुते साहेब तांबडतोब शेंडे साहेबांना भेटले. त्यांना सर्व अपडेट दिलं.
“विसपुते तुम्हीच स्वत: कोल्हापूरला जा. रात्रीच निघा म्हणजे सकाळीच O FIR दाखल करता येईल. असं केल्याने आपल्याला रीमांड घेण सोपं होईल. आपल्या पोलिस स्टेशनला ती FIR ट्रान्सफर पण करून घ्या.” – शेंडे.
“त्यापेक्षा साहेब, गुन्हा आपल्या हद्दीत घडला आहे. मीच FIR करतो. ती रेग्युलर FIR होईल, मग प्रश्नच मिटला.” – विसपुते.
“करेक्ट. माझ्या हे कसं लक्षात आलं नाही? लगेच करा आणि उद्या सकाळी कोल्हापूरला पोहोचा. रात्रीच निघा १० तासांचा प्रवास आहे. रीमांड घ्या आणि लगेच त्याला इथे घेऊन या.” – शेंडे.
विसपुते कोल्हापूरला पोचले तेंव्हा तिथे मुंबई पोलिस आधीच येऊन बसले होते. राघवला रात्रीच जेरबंद केलं होतं पण त्यांच्याशी रात्री कोल्हापूरचे पोलिस काहीच बोलले नव्हते. मुंबईचे आणि नाशिकचे पोलीसच त्यांच्याशी बोलतील असा विचार त्यांनी केला. आता कोर्ट रूम.
मुंबई पोलिसांच्या वतीने वकिलाने न्यायाधीश महोदयांना सांगितलं की चोरीची फिर्याद त्यांच्या कडे आधी पासून आहे तेंव्हा राघवची कस्टडी मुंबईला मिळावी. तर नाशिकच्या वकिलांचं म्हणण असं होतं की आरोपीवर खुनाची FIR असल्याने गुन्ह्यांची गंभीरता बघून त्याला नाशिक पोलिसांकडे सुपूर्त करावं अशी कोर्टाला विनंती आहे.
राघवच्या वकिलाने म्हंटले की त्यांच्यावरचे सर्व आरोप निराधार आहेत कुठलाही पुरावा दोन्ही पोलिसांकडे नाहीये तेंव्हा माझ्या आशिलाला निर्दोष सोडण्यात यावं. यावर नाशिक पोलिसांनी संक्षेपात सर्व घटना विषाद केली. आणि मुंबई पोलिसांनी त्यांनी कंपनीत गोळा केलेल्या काही साक्षी वाचून दाखवल्या.
कोर्टाने विचार करून निर्णय दिला की,
“मुंबई पोलिसांना आरोपीची TRANSIT REMAND ३ दिवसांकरता देण्यात येत आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांना खुनाच्या गुन्ह्या साठी स्वतंत्र कस्टडी मिळेल. त्यांनी इथे येऊन तसा अर्ज करावा.” – कोर्ट.
मुंबई पोलिस राघवला घेऊन गेले. विसपुते हात हलवत नाशिकला. आता राघवला मुंबईला नेल्या वर, मुंबईच्या कोर्टात रीतसर अर्ज करून राघवची रेग्युलर कस्टडी घेतली. ती त्यांना तीन दिवसांची मिळाली. नाशिकच्या पोलिसांना आता मुंबईच्या कोर्टात हजर राहून स्वतंत्र पणे राघवची कस्टडी मागावी लागणार होती.
तीन दिवसांनंतर नाशिक पोलिस मुंबईला पोचले. पण मुंबई पोलिसांनी अजून दोन दिवसांची कस्टडी वाढवून मागितली. ती कोर्टाने त्यांना पांच दिवस पुरेसे असल्याने पुन्हा कस्टडी वाढवून मिळणार नाही अशी तंबी देत दोन दिवसांची कस्टडी दिली. नाशिक पोलिस परतले.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना कळवलं की त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे तेंव्हा उद्या सकाळी येऊन आरोपीला कोर्टात रीतसर अर्ज करून ताब्यात घ्या. विसपुते त्याप्रमाणे सकाळीच ५ वाजता जीप ने मुंबईला निघाले. साधारण १० वाजे पर्यन्त पोहोचू असा अंदाज होता.
११ वाजता कोर्टात मुंबई पोलिस राघवला घेऊन हजर होते. ते नाशिक पोलिसांची वाट पाहत होते. पण नाशिक पोलिसांचा पत्ता नव्हता. फोन पण लागत नव्हते. कळायला काही मार्ग नव्हता. शेवटी सव्वा अकरा वाजता केस उभी राहिली. मुंबई पोलिसांनी सांगितलं की त्यांचा तपास पूर्ण झाला आहे पण आरोपी वर अजून एका गुन्ह्यांची नोंद आहे आणि त्याकरता नाशिक पोलिस आरोपीला ताब्यात घ्यायला नाशिकहुन निघाले आहेत. कोर्टाने सर्व ऐकू घेतल्यावर असा निर्णय दिला की आरोपीने आज दिवसभर पोलिसांच्या ताब्यातच कोर्टात राहावे. जर नाशिक पोलिस नाही आले तर संध्याकाळी त्याला जामीन मंजूर करण्यात येईल. त्यानुसार राघवच्या हाताला दोरी बांधून एक पोलिस कोर्टाच्या आवारात नाशीक पोलिस येण्याची वाट बघत बसला.
इकडे कासारा घाटात एक ट्रक आडवा झाल्याने वाहतूक पूर्ण पणे थांबली होती. गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.१० वाजता विसपुते मुंबईला पोचणार होते पण प्रत्यक्षात ते दुपारी २ वाजता पोचले.
इकडे कोर्टात भलतंच कांड झालं होतं. मुंबईचा पोलिस आणि राघव एका बाकावर बसले होते हळू हळू त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. हे नेहमीचच असतं. वेळ जाता जात नाही. थोड्या वेळाने राघव म्हणाला की चला साहेब चहा पिऊ दोन तास झालेत कंटाळा आला आहे. मग दोघेजण आवारातल्याच एका टपरीवर गेले. चहावाल्याने त्यांना ग्लास मध्ये गरम गरम चहा दिला. राघव ने एक ग्लास उचलला आणि पोलिसाला दिला. दूसरा आपण घेतला आणि पोलिसाने ग्लास तोंडाला लावल्या बरोबर आपल्या हातातला ग्लास पोलिसांच्या चेहऱ्यावर रिकामा केला. तो गरम गरम चहा डोळ्यात गेल्यामुळे पोलिस किंचाळायला लागला. राघवने त्यांच्या हाताला हिसडा मारला आणि तो फुरर. पोलिसांची किंचाळी ऐकून लोकं धावले चहावाल्याने पाण्याचा मग आणला आणि पोलिसांच्या चेहऱ्यावर रिता केला. कोणी तरी विचारलं की असं कसं झालं तेंव्हा चहा वाल्याच्या लक्षात आलं की कैदी पळाला. मग लोकं शोधायला लागले पण तो पर्यन्त राघव चौकात पोचला होता आणि एका टॅक्सी ला हात करून थांबवत होता.
“कोल्हापूरच्या रस्त्यावर घे. थेट नाक्यापर्यंत. जिथे शेअरिंग टॅक्सी मिळतील.”
टॅक्सी पण लगेच मिळाली. आणि नाक्यावर शेयरिंग टॅक्सी घेऊन राघव कोल्हापूरच्या वाटेला लागला. कोल्हापूरला पोचल्यावर राघव रिक्शा करून घरी गेला. आपली बॅग काढली. बॅगेत ३ लाख सुरक्षित आहेत हे पाहून समाधानाने हसला. बॅग भरून बाहेर आला शेजाऱ्यांकडे रूमची किल्ली सोपवली आणि रूम सोडतो आहे असं सांगून रिक्षात बसला. कोल्हापूर स्टँड वर सोलापूरची बस लागली होती त्यात बसला. बस सोलापूरच्या वाटेला लागली आणि राघवने सुटकेचा श्वास सोडला. सोलापूरला पोचल्यावर तो स्टेशनवर गेला आणि मिळालेली पहिली ट्रेन पकडून हैदराबाद च्या वाटेला लागला. आता त्याला कसलीच भीती नव्हती. आता तो एक आझाद पंछी होता.
विसपुते जेंव्हा कोर्टात पोचले तेंव्हा त्यांना हा सगळा प्रकार कळला. मुंबई पोलिसांची टीम आधीच तिथे पोचली होती आणि चौकशीला सुरवात झाली होती. जखमी झालेल्या पोलिसाला हॉस्पिटल मधे पाठवलं होतं. नशिबाला दोष देण्या पलिकडे विसपूते काहीच करू शकत नव्हते. मुंबई पोलिस राघव वर नवीन गुन्हा दाखल करून अटक वारंट काढतीलच पण त्याचा आत्ता विसपुते साहेबांना काहीच उपयोग नव्हता. त्यांनी एक काम केलं. त्यांनी कोल्हापूर पोलिसांना फोन लावला आणि परिस्थिती सांगून राघव त्यांच्या घरी जाण्याची शक्यता बोलून दाखवली. बखले साहेबांनी लगेच आपली माणसं राघवच्या घरी पाठवली. तिथे त्यांना कळलं की राघव तासभरा पूर्वीच रूम सोडून गेला आहे. कुठे गेला हे सांगितलं नाही. बखल्यांनी बस स्टँड वर माणसं पाठवली. पण काहीच पत्ता लागला नाही. त्यांनी विसपुते साहेबांना फोन करून वस्तुस्थिती कळवली. विसपुते आता नाशिकच्या वाटेवर होते.
दुसऱ्या दिवशी शेंडे साहेबांच्या ऑफिस मधे,
“इतका कसा हलगर्जीपणा केला त्या पोलिसाने? मुंबईची पोलिस देशात प्रसिद्ध आहेत, त्यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती.” – विसपुते.
“झालंय खरं असं पण साध्या चोरीचा आरोप असलेला आरोपी होता तो, असले भुरटे चोर इतकी मोठी मजल मारत नाहीत. त्यामुळे जरा त्या पोलिसाने हळक्यात घेतलं असावं. पोलिसांना सतत दक्ष राहावं लागतं हे तो विसरला. आता यापुढे अशी चूक तो करणार नाही.” – शेंडे.
“पण साहेब तो खुनाचा संशयित होता. आपण गामावलं. आता कधी गावसेल हे सांगता ये नाही.” – विसपुते.
“काही प्रश्न उभे राहिले आहेत. पण उत्तर मिळण्याची शक्यता नाहीच.
राघवने खरंच निर्मलाचा खून केला असेल का?” – शेंडे.
“शक्यता कमी आहे. त्यांचा कधी संबंध आला होता हे तपासात दिसलं नाही पण मग त्याने तिची सुपारी दिली असेल का?” – शेंडे
“मला असं वाटतं की त्याने स्वातीची सुपारी दिली असावी.” – शेंडे.
“स्वातीची सुपारी? पण तो असं का करेल?” – विसपुते.
“जेलसी. राजा सारख्या एका निव्वळ बारावी पास मुलाला स्वाती सारखी इंजीनियर झालेली रूपसुंदरी होकार देते हे त्याला पाहवलं नसेल.” – शेंडे.
“पण त्याने तर स्वातीला पाहिलं पण नव्हतं.” -विसपुते.
“राजा म्हणाला नाही का त्याच दिवशी राघव राजाला भेटला होता आणि त्यावेळेस राजाने सांगितलं असेल की उद्या स्वाती इंटरव्ह्यु ला जाणार आहे. कदाचित तो त्यांच्या मागावर गेला असेल. स्वाती तर लगेच माघारी फिरली. पण निर्मला नंतर तिकडेच गेली होती. ज्याने सुपारी घेतली होती त्याने निळ्या ड्रेस मधली मुलगी पाहिली आणि काम करून टाकलं. काही असो, हा चॅप्टर आत्ता सध्या पुरता तरी संपला आहे. पुढे मागे काही सुगावा लागला तर बघू.” – शेंडे.
*****समाप्त*****