पोपटाचे रहस्य (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
पोपटाचे रहस्य

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दरबार भरला. आजही दोन्ही राण्या दरबारात आल्या होत्या.

“महाराज! शमशेर खान आज महाराजांना भेटू इच्छितात.” महामंत्री म्हणाले.

लगेचच त्याला बोलवण्यात आले. तो त्याच्या पोपटासोबत हजर होता.

“शमशेर खानचा विजयनगरच्या महाराजांना सादर प्रणाम.” तो म्हणाला पण त्याचा आवाज बसलेला असल्याने राजाला काहीच ऐकू गेले नाही आणि तो काय बोलतोय हेही कळले नाही.

“काय बोलत आहात तुम्ही शमशेर खान? आम्हाला काही ऐकू येत नाहीये. जरा मोठ्याने बोला.” राजा म्हणाला.

तो पुन्हा तेच बोलला पण राजाला काही ते ऐकू गेले नाही.

“महाराज! त्यांचा आवाज बसला आहे त्यामुळे ते काय बोलतायत हे ऐकू येत नाहीये पण आपल्याला तो पोपट खरेदी करायचा आहे ना मग त्याची प्रक्रिया सुरू करूया.” आचार्य मध्येच उठून म्हणाला.

छोटी महाराणी लगेच खुश झाली. राजाने देखील पुढची प्रक्रिया करण्यासाठी संमती दिली.

“महाराज दोन दिवस आम्ही अगदी व्यवस्थित या पोपटाची प्रतिभा तपासली. महाराजांनी जो पोपट विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे तो अगदी उचित आहे. आमच्या तीक्ष्ण बुध्दीने या पोपटाला दोन दिवस आम्ही नीट पारखले आहे त्यामुळे यांना पाच लाख सुवर्ण मुद्रा देऊन हा व्यवहार पूर्ण करावा.” आचार्य म्हणाला.

इतक्यात रामा स्वतःच्या जागेवर उठून उभा राहिला; “माफ करा महाराज मी काही बोलू इच्छितो.” तो म्हणाला.

“बोला पंडित रामा.” राजा म्हणाला.

तसा रामा पुढे आला.

“आम्ही तेच म्हणलं अजून तुमचा आवाज आला कसा नाही? आमच्या कामात अजून तुमचे कींतु परंतु आले कसे नाहीत? आज जरा उशीरच केलात बोलायला.” आचार्य खोचकपणे म्हणाला.

“नाही प्रभू तुमचा निर्णय तर झाला आहे. तुम्ही स्वतः या पोपटाची पारख केली आहे म्हणजे तो तेवढा प्रतिभावान नक्कीच असणार. फक्त महाराज माझी एक विनंती आहे की यांना यांचे मूल्य देण्याआधी एकदा आपण पोपटाची वाणी ऐकू.” रामा म्हणाला.

“दोन दिवसांपूर्वी झालेला अपमान कमी पडला म्हणून अजून ऐकून घ्यायचे आहे का?” आचार्य म्हणाला.

“पण एकदा ऐकून घ्यायला हरकत काय आहे?” रामा म्हणाला.

“आम्हालाही पंडित रामाकृष्णा म्हणतायत ते पटतंय.” महामंत्री म्हणाले.

त्यांच्या बोलण्याने शमशेर खानचे तोंड पडले होते. त्याला जे व्हायला नको होते ते होत होते.

“जर पंडित रामा आणि महामंत्र्यांना असे वाटत असेल तर एकदा पुन्हा पोपटाची वाणी ऐकण्यात काही अडचण नसावी.” राजा म्हणाला.

त्यांनतर आचार्य देखील लगेच तयार झाला.

“शमशेर खान तुमच्या पोपटाला बोलायला सांगा.” आचार्य म्हणाला.

“पण माझा आवाज बसला आहे.” शमशेर खान कसाबसा म्हणाला.

“मग काय झालं? आम्हाला तुमचा नाही तुमच्या पोपटाचा आवाज ऐकायचा आहे.” रामा म्हणाला.

“पण तो फक्त आमचा आवाज ऐकून बोलतो.” तो म्हणाला.

“काय? अरेरे! मग तर मोठी समस्या आहे. महाराज! जर असे असेल तर आपल्याला या पोपटासोबत यांनाही इथेच ठेवून घ्यावे लागेल.” रामा म्हणाला.

एक क्षण शांत गेला आणि पोपट बोलू लागला; “खोटं! मी फक्त तुझा आवाज ऐकून बोलतो? महाराज हा माणूस खोटारडा आहे, अधर्मी आहे. हा माझ्या तोंडून तेच काढून घेतो जे याला बोलायचं असतं. जर मी तसे केले नाही तर माझे अन्न, पाणी बंद करतो.” पोपट बोलत होता आणि शमशेर खान आ वासून त्याच्याकडे बघत होता.

त्याला विश्वास बसत नव्हता पोपट कसा बोलतोय.

“घे मणी आता धनराशी तर गेली पण हा म्हातारा पण दरबारातून बाहेर.” धनी कुजबुजला.

“हो. आता सगळेच बिंग बाहेर पडणार.” मणी म्हणाला.

“शमशेर खान! हे काय बडबडतोय तुझा पोपट?” महामंत्री ओरडले.

पोपट पुढे बोलू लागला; “त्याला काय विचारता महामंत्री जी मी सांगतो ना. त्या दिवशीही यानेच मला हे उभे आहेत ना तुमचे राजगुरू त्यांच्याबद्दल सांगितले. आचार्य म्हणजे वाईट, अधर्मी, संधीसाधू, छळ आणि कपट ज्याच्या नसानसात भरले आहे असे आहेत, अंधश्रद्धा पसरवून लूट करतात, राजकोषावर वाईट दृष्टी ठेवून आहेत आणि संधी मिळताच तो खाली करतील. यांच्यापेक्षा लोभी आणि धूर्त माणूस अजून जन्माला पण आला नाही.” पोपट बोलत होता पण त्याला तोडत राजा मोठ्याने ओरडला; “बास! शमशेर खान तुझ्या पोपटाला आवर. आम्ही आचार्य तथाचार्यंबद्दल एकही अवाक्षर खपवून घेणार नाही मग ते कोणीही असो.”

“माफ करा महाराज पण मी काय करू? खरा अपराधी हा माझा स्वामी आहे. मी तेच बोलतो जे याला बोलायचे असते. याला शिक्षा द्या महाराज. खऱ्या शिक्षेचा अधिकारी हाच आहे. यानेच मला सांगितले होते महालात गेल्यावर सगळ्यात आधी पंडित रामाबद्दल देखील खोटे बोलून त्याचा पत्ता साफ करायचा. याने हेही सांगितले होते जोवर महामंत्री त्या दरबारात आहेत तोवर याचे षडयंत्र सफल होणार नाही.” पोपट बोलला.

“षडयंत्र? कसले षडयंत्र?” महामंत्री म्हणाले.

“तुमच्या राज्यावर आक्रमण करून ते हस्तगत करण्याचे षडयंत्र महामंत्री जी. हा काही पक्षी विशेषज्ञ नाहीये. हा दुसऱ्या राज्याचा एक गुप्तहेर आहे जो सगळ्या राज्यात जाऊन असेच षडयंत्र रचतो आणि त्या त्या राज्यावर आक्रमण करून ते मिळवतो.” पोपट म्हणाला.

“नाही महाराज हे खोटं आहे. मी फक्त एखाद्या साधारण पोपटाला असाधारण दर्शवून त्याची मोठी रक्कम वसूल करतो.” शमशेर खान म्हणाला.

“म्हणजे तुमचा पोपट खोटं बोलतोय तुम्ही गुप्तहेर आहात?” रामा म्हणाला.

“नाही महाराज हे शक्य नाही. पोपट बोलत नाहीये.” तो म्हणाला.

“असं कसं? आम्ही सगळ्यांनी ऐकलं. परवाही ऐकलं आणि आत्ताही ऐकलं.” रामा म्हणाला.

“नाही.” तो म्हणाला.

दोघात वाद होऊ लागले आणि रामाने त्याच्या तोंडून कबूल करून घेतले की हा स्वतःच ते आवाज काढत होता.

“महाराज हीच ती गोष्ट आहे ज्याने मी एका साधारण पोपटाला असाधारण दर्शवून विकत होतो. मी काही गुप्तहेर वैगरे नाही.” तो म्हणाला.

“पण मग तुझा आवाज तर बसला आहे. मग आज कोणी आवाज काढला? तुझ्या ऐवजी पोपट कसा बोलला?” राजा म्हणाला.

“तोच विचार मीही करतोय. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी आवाज काढला.” तो म्हणाला.

राजा संपूर्ण दरबारात नजर फिरवून बघत होता. सगळेच विचारात होते. त्याने रामाकडे पाहिले. रामा खाली मान घालून स्मित करत होता आणि राजाला समजले हे काम रामाचे आहे. राजा त्याच्याकडे पाहू लागला.

“महाराज तो माझा आवाज होता.” रामा हात जोडून म्हणाला.

शमशेर खानने त्याला खुणेने तू? असे विचारले आणि रामाने होकारार्थी मान हलवली.

“पण तुमचे तर…” महामंत्री बोलत होते पण त्यांना तोडत रामा बोलू लागला; “हो माझे ओठ हलत नव्हते. या कलेला पक्षी भाषा म्हणतात. दुर्मिळ आणि खूप अभ्यासानंतर प्राप्त होते ही कला. यात पोटातून बोलले जाते. असे…”

असे म्हणून रामा पुन्हा त्या कलेचा उपयोग करून बोलू लागला; “सोपी नाहीये ही कला शिकणे पण कसेतरी शिकलो.”

सगळेच ते पाहून आश्चर्यचकित झाले आणि राजा खुश झाला.

“अद्भुत पंडित रामाकृष्णा! अद्भुत! पण एवढी दुर्मिळ कला तुम्ही एवढ्या लवकर कसे शिकलात?” राजाने विचारलं.

“सगळी देवी आईची कृपा आहे महाराज. तिची कृपा असताना काय अशक्य आहे आणि याला पकडण्यासाठी ही कला शिकावी तर लागणार होती.” रामा म्हणाला.

“आता याचे काय करायचे महाराज?” महामंत्र्यांनी विचारले.

“याला घेऊन जाण्यात यावे आणि….” राजा बोलत होता पण मध्येच शमशेर खान बोलू लागला; “यात फक्त मी नाही तर अजून सामील आहे…”

असे म्हणून तो आचार्यकडे इशारा करत होता. तो काही पुढे बोलणार एवढ्यात आचार्य बोलू लागला; “काय? आमच्याकडे काय बघतोस? आता आमच्याकडे काही छत्र छाया मिळणार नाहीये. आमच्या महाराजांना लुटायला आलास आणि आता मदतीची अपेक्षा ठेवतोस? जर आम्हाला आधी माहित असते या कलाकाराच्या मुखवट्या मागे एक धोकेबाज लपला आहे तर तेव्हाच आमच्याच हाताने तुझा वध केला असता.”

“आचार्य तुम्हाला त्या धनाचा अर्धा हिस्सा…” तो बोलत होता पण त्याला तोडत आचार्य बोलू लागला; “आम्हाला लालच देतोस?” आणि त्याच्या थोडे जवळ जाऊन कुजबुजला; “जरा बुध्दीने काम चालव, नंतर काहीतरी चक्र चालवून तुला बाहेर काढू. गप्प बस.”

त्यानंतर तोच पुढे बोलू लागला; “महाराज! हा आम्हाला लाच द्यायला बघतोय. जा याला तुरुंगात टाका.”

राजाने देखील याला संमती दर्शवली आणि लगेच त्याला तिथून नेण्यात आले.

“महाराज! ही होती या फसवेकऱ्याची कहाणी, पंडित रामाकृष्णाची जुबानी. याचे कामच होते वेगवेगळ्या राज्यात जाऊन साधारण पोपटाला असाधारण दाखवून त्याची मोठी किंमत वसूल करणे. त्याच्या कलेचा चुकीचा वापर करून त्याने हे केले आणि इथेही तो त्याचसाठी आला. बिचाऱ्या भोळ्या भाबड्या आचार्यना त्याने त्याच्या घोळात घेतले आणि गोडगोड बोलण्याने फसवले. आचार्य आपले सरळ साधे! त्यांना काही त्याचा डाव कळला नाही.” रामा म्हणाला.

आचार्य गरीब बिचारे असल्या सारखे तोंड करून उभा होता आणि बोलू लागला; “हो महाराज पंडित रामा बरोबर बोलतायत आम्हाला जर आधी माहित असते तर आम्ही त्याचा वध केला असता.”

“हो आचार्य आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मगाशीही तुम्ही म्हणालात.” राजा म्हणाला.

“माफ करा आचार्य मगाशी तुमच्याबद्दल थोडे कटू बोल बोलावे लागले. आशा आहे तुम्ही परिस्थिती समजून माफ कराल.” रामा विनम्रपणे म्हणाला.

त्यानेही लगेच रामाला माफ करून टाकले. एवढ्यात पोपट; “रामा रामा रामा रामा” बोलू लागला.

“पंडित रामा?” राजाने तो आवाज काढत असेल या हेतूने विचारलं.

“नाही महाराज. मी यावेळी काहीच केलं नाहीये खरंच.” तो म्हणाला.

एवढ्यात पुन्हा पोपट बोलला आणि सगळ्यांचा विश्वास बसला.

“देवाचे नाव घेतोय तो. ते तर कोणीही घेऊच शकते. हो ना आचार्य?” रामाने विचारलं.

आचार्य आणि त्याच्या शिष्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

“पंडित रामा! आज तुम्ही जे केलं आहे त्यामुळे राज्याची एवढी मोठी रक्कम वाचली आहे. आज आम्ही तुम्हाला काहीतरी उपहार देऊ इच्छितो ज्यावर फक्त आणि फक्त तुमचा हक्क आणि नाव असेल.” राजा म्हणाला.

रामाने हात जोडले. आचार्य आणि त्याच्या शिष्यांचे तोंड पुन्हा पडले.

“आज आम्ही तुम्हाला हा पोपट भेट स्वरूपात देत आहोत.” राजा म्हणाला.

रामाने तो पोपट स्वतःच्या हातावर घेतला. दरबार संपला आणि रामा घरी पोहोचला. झोपाळ्यावर तो पोपटाला घेऊन बसला होता. त्याने जे काही घडले ते सर्व घरी सांगितले.

“लामा पन तू आचाल्यचे खले का नाही सांगितले?” गुंडप्पाने विचारलं.

“नाही गुंडप्पे. महाराजांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. त्यांच्या डोळ्यावरची आंधळ्या विश्वासाची पट्टी जेव्हा हटेल तेव्हाच त्यांना आचार्यचे खरे रूप दिसेल आणि जर मी हे सिद्ध जरी केले असते तरीही त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास झाला असता. विश्वासघात हा एक असा त्रास आहे ज्यामुळे भलेभले बिथरतात आणि कसं आहे ना खोट्याची साथ म्हणजे कागदाच्या होडी सारखी असते जी जास्तवेळ टिकू शकत नाही. एक ना एक दिवस ही होडी बुडणार.” रामा म्हणाला.

बोलता बोलता त्याने पोपट हातात घेतला आणि तोही उडवून लावला. हे पाहून अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “हे काय केलं? भेट स्वरूपात फक्त पोपटच मिळाला होता आणि तोही उडवून लावलास?”

“अम्मा यांचे खरे जग तर ते निळे, खुले आकाश आहे. त्यांनाही हक्क आहे त्यांचे आयुष्य स्वच्छंदी जगण्याचा.” रामा म्हणाला.

एवढ्यात अम्माला काहीतरी आठवले आणि ती पुन्हा खुणा करू लागली; “त्या बकरीला आणून ते तुझे पिताश्री आहेत असं सांगून आमची सगळ्यांची मजा घेतलीस ना?” शारदाने सांगितलं.

“अम्मा पण ते तर झालं ना आता? आता मध्येच हा विषय?” रामाने थोडं घाबरून विचारलं.

“हो कारण तू आत्ता हाताला लागला आहेस ना.” अम्माने खुणा करत त्याचा हात धरला आणि शारदाने सांगितलं.

“उचला.” शारदा म्हणाली.

“मी तेच समजोय का जे तू मला उचलायला सांगत आहेस?” रामा म्हणाला आणि त्याने पटकन धोतर वर धरून पळ काढला.

अम्मा त्याच्या मागे काठी घेऊन लागली होती. अश्यातच रात्र झाली आणि रामा त्याच्या खोलीत पलंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकत होता.

“अम्मा लवकर झोपू दे नमः, शारदा लवकर येऊ दे नमः” असे बडबडत तो पाकळ्या टाकत होता.

एवढ्यात त्याला कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला. या आवाजाने अम्मा जागी राहील म्हणून तो बाहेर बघायला आला. त्याने एक दगड उचलला आणि आजूबाजूला पाहिले पण कसलाच आवाज आता येत नव्हता. असे दोन तीन वेळा झाले.

‘कोण असेल?’ तो स्वतःशीच म्हणाला.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all