Login

गैरसमज आणि प्रेम

गैरसमज आणि प्रेम
आज सई आणि प्रशांतचं लग्न थाटामाटात पार पडलं. दोन्ही घराण्यांचं आधीपासून ओळखीचं नातं होतं. दोघंही चांगली सेटल झाल्यावर घरच्यांनी लग्न ठरवलं. दोघांनीही होकार दिला… पण त्यांच्यात एक गोष्ट मात्र झाली नव्हती ती म्हणजे दोघांचा एकमेकांशी मनापासून संवाद.

सई एक डॉक्टर होती.

ड्युटी, नाइट शिफ्ट, कोविडनंतरचा प्रेशर त्यामुळे सईचं आयुष्य हॉस्पिटल आणि घर एवढ्याच रस्त्यांवर धावत होतं. त्यात लग्न ठरलं, पण तिला कधी प्रशांतसोबत मनमोकळं बोलायला वेळच मिळाला नाही.

प्रशांत एक बिझनेस मॅन होता.

त्याचा मोठा स्टार्टअप, देशभर शाखा, सतत मीटिंग्ज, क्लायंट्स… फोनवर मेल्स आणि घरी शांतता असं आणि एवढंच त्याचं जग होत. लग्न ठरलं, पण मुलीशी नीट वेळ घालवण्याचं सुख त्याला मिळालंच नाही.

दोघांचीही वर्षानुवर्षांची ओळख… पण एकमेकांची “जुजबी माहिती”.


लग्न ठरल्यावर एकाच गोष्टीने दोघांची रात्री झोप उडायची ते म्हणजे..

“त्याला/तिला खरंच माझ्यात इंटरेस्ट आहे का?”

कारण…

सईचा गैरसमज झाला होता.

काही महिन्यांपूर्वी सईने प्रशांतला त्याच्या ऑफिसच्या कॅफेमध्ये एका मुलीसोबत हसत खेळत बोलताना पाहिलं होतं. ती मुलगी खूप सुंदर, कॉन्फिडंट दिसत होती. बोलताना प्रशांतने त्या मुलीचा हात हातात घेतलेला आणि ती मुलगी खुप प्रेमाने त्याच्याकडे बघत होती.

सईनं स्वतःच मनात ठरवून टाकलं की, “बहुतेक त्यांचं काहीतरी असेल... आणि मला फक्त घरच्यांसाठी होकार दिला असेल.”

त्या दिवशीपासून सई प्रशांतशी अंतर ठेऊ लागली.

प्रशांतचाही गैरसमज झाला होता.

प्रशांतनेही सईला हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरसोबत खूप जवळून बोलताना पाहिलं होतं. दोघांच्या चेहऱ्यावरच हसू बघून प्रशांतला प्रचंड ईर्ष्या वाटली.

पण त्यानं मनात म्हटलं —“तिच डॉक्टर्स लाईफ आहे… कदाचित त्याच्यावर तिचं मन गेलं असेल.”

आणि तोही शांतपणे दूर झाला.


लग्नाचा दिवस

दोघंही मंडपात सजलेले, पण मनात एकाच प्रश्नाचं ओझं घेऊन होते.

“त्याचं/तिचं दुसऱ्या कुणावर प्रेम असेल तर?”

पण… सत्य काही वेगळंच होतं.

लग्न, पुजा सगळं झाल्यावर आज पहिल्यांदा ते दोघंही एका रूममध्ये येतात. पहिल्यांदाच ते दोघे एकटे असतात. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. दोघांनाही काय बोलाव ते सुचत नव्हतं.

प्रशांत हळूच बोलला “सई… मला एक प्रश्न विचारायचा आहे?”

“विचारा...” ती सावधपणे बोलली.

“तुझं… त्या डॉक्टरसोबत काही होतं का?” प्रशांतचा आवाज थोडा आत ओढल्यासारखा झालेला.

सई त्याच बोलणं ऐकून स्तब्ध झाली.

“काय?? नाही! तो माझा बॅचमेट आहे. त्याची पत्नी पण डॉक्टर आहे!”

दोघं सेकंदभर एकमेकांकडे पाहत राहतात.

सईच्या मनातली भीती उफाळून येते.

“आणि तुम्ही? त्या मुलीसोबत…? ऑफिसमध्ये हसत होता… उजेडात चमकत होती ती…”

प्रशांत हसत स्पष्टीकरण देतो.

“ती माझ्या कंपनीची फायनान्स हेड आहे. तिचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालं. ती तर मला भाऊ म्हणून राखी बांधते!”

दोघंही अवाक् झाले.

आणि अचानक…

गैरसमजांचं धुकं पूर्ण बाजूला झालं.

क्षणभरात दोघांच्या डोळ्यांत पाणी आलं.

सई हळूच म्हणाली

“मला वाटलं होतं… तुम्हाला मी आवडतच नाही.”

प्रशांत तिच्या हातावर हात ठेवतो,

“मी तर तुझ्यावर पहिल्या दिवसापासून प्रेम करतो… फक्त तुला वेळ देता नाही आला.”

सई लाजत म्हणते,

“मला पण तुम्ही खूप दिवसांपासून मनातून आवडता पण व्यक्तच करू शकले नाही.”

दोघंही एकमेकांना आनंदाने मिठी मारतात.

पहिल्यांदाच त्यांनी मनातलं सगळं बोलून दाखवलं आणि गैरसमज संपले…

एका नव्या नात्याची, नव्या प्रेमाची सुरुवात झाली.

त्यांचं लग्न दोन दिवसांपूर्वी झालं होतं, पण त्यांचं खरं आयुष्य आजपासून सुरू झालं.