Login

मला काही सांगू नका भाग 1

यापुढे मला सासुबाईंच काहीच काम सांगू नका

मला काही सांगू नका भाग 1

©️®️शिल्पा सुतार

लताताई खोकलून अर्ध्या झाल्या होत्या. मोहन त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. दोघं थोड्या वेळाने परत आले. तोपर्यंत रमाचा स्वयंपाक झाला होता. ती रोहित सोबत आत बसून होती. त्याचा अभ्यास घेत होती.

बाहेर रिक्षा थांबली. मोहन आवाज देत होता. "रमा रमा बाहेर ये आईला आत ने."

"नुसता सर्दी खोकला तर आहे. त्यात काय इतक हात धरून आत आणण्यासारखं? तुमचे तुम्ही या. मला सारखं काम सांगू नका." रमा आतून ओरडली. ती उठून आली नाही.

लताताई ऐकत होत्या. मोहन काही म्हणाला नाही. दोघं आत आले.

"आई बस. स्वेटर काढू नको. थंडी वाजते का? " मोहन त्यांना मदत करत होता. लताताईंनी पिशवी टेबल वर ठेवली. मोठ्या कष्टाने त्या कॉटवर बसल्या. मुलगा बघतो आहे हे त्या जाणून होत्या.

" आई हे सफरचंद, सगळे खायचे. तब्येतीची काळजी घे."

" मला जेवण जात नाही रे मोहन. " लताताई म्हणाल्या.

" अस चालणार नाही आई. ताकद हवी ना. " त्याने फळ नीट ठेवले.

ही रमा काय करते आहे समजत नाही? एकदाही उठून बाहेर आली नाही. तिला आईची काळजी आहे की नाही? डॉक्टर काय म्हणाले ते ही विचारलं नाही.

"रमा..." त्याने परत आवाज दिला.
"आईला पाणी गरम करून दे. ह्या गोळ्या औषध बघून घे. याप्रमाणे द्यायच्या आहेत." मोहन सांगत होता.

"जे काही आहे ते तुम्हीच बघा. मला काही सांगू नका. मी रोहितचा अभ्यास घेते आहे." रमाला इंट्रेस्ट नव्हता. तिने आतून सांगितलं.

मोहन आत आला. तो तिच्याकडे रागाने बघत होता." हे काय सुरू आहे रमा?"

"कुठे काय? मी रोहितचा अभ्यास घेते आहे. हळू बोला." तिने उलट उत्तर दिलं.

मोहन रागाने किचन मधे गेला. त्याने पाणी गरम केलं. आईला दिलं. दोघ पुढे बसून होते. रोहितचा अभ्यास झाला. त्याने उद्याची बॅग भरली.

" आई जेवायला दे. "

रमाने रोहितच ताट वाढलं. तो पुढे बसला. लताताई टीव्ही बघत होत्या. रमा आली त्यांच्या कडून रीमोट घेवून मुलाकडे दिलं. रोहित कार्टुन बघत जेवत होता.

ही रमा अशी वागते ना... लताताई बडबड करत होत्या.

तिने लक्ष दिलं नाही.

" रमा अग आई टीव्ही बघत होती ना? " मोहन म्हणाला.

"दिवस रात्र त्याच त्याच सिरियल बघतात, उगीच सुनेला त्रास द्यायच्या आयडिया मिळत रहातात. काही गरज नाही ते बघायची." ती डाफरली. मोहन, लताताई गप्प बसल्या.

रमाने थोड्या वेळाने ताट वाढले. त्यांच जेवण झालं. मोहन आईला गोळ्या काढून देत होता.

"इतक्या गोळ्या घ्यायच्या का रे मोहन? नको ना. " लताताई म्हणाल्या.

" हो आई घ्याव्या लागतील. तुला लवकर बर व्हायचं ना. " मोहन प्रेमाने म्हणाला.

रमा ऐकत होती. या लवकर बर्‍या होतील म्हणजे बर आहे मला त्रास द्यायला मोकळ्या. काहीही करा यावेळी मी लक्ष देणार नाही.

लताताईंचा फोन वाजत होता. मामा फोनवर होते. प्रेमाने तब्येतीची चौकशी सुरू होती. रमा हॉल मधे आली." आई एक मिनिट माझ्याकडे फोन द्या. मामा तुम्ही येऊन आईंना घेऊन जा."

" काय?" मामा विचारत होते.

" आईंना बर नाही. त्यांना तुमच्याकडे घेवून जा. बर वाटल की परत पाठवा. आम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये नेल आहे. यापुढे तुम्ही बघा." रमा परत म्हणाली.

मोहन, लताताई तिच्याकडे बघत होते. त्याने पटकन रमा कडून फोन काढून घेतला." मामा मी नंतर फोन करतो."

"काय रे काय झालं? "

"काही विशेष नाही. सासू सून वाद. "

" ठीक आहे. ताईची तब्येत सांभाळ. "

"हो मामा."

" रमा इकडे ये. मी काही म्हणत नाही म्हणून तू जास्त करतेस का? फोनवर काय मूर्खा सारखं बोलत होतीस? " मोहन चिडला.

"का काय झालं? यांना बर नाही. त्यांना तिकडे जावू द्या त्यांच्या माहेरी. मामा त्यांची ट्रीटमेंट करतील."

"रमा तुला वेड लागलं आहे का? काहीही बोलतेस." मोहन चिडला.

" काय झालं? बरोबरच बोलते आहे ना. आपल्याकडे तीच पद्धत आहे ना. मला पण बर नसल की तुम्ही माहेर पाठवतात. माझं सगळं आई बाबा करतात. माझा भाऊ घेवून जातो सोडवून देतो. तसच मी म्हटलं. आता ही तसच करा. मी सासुबाईंच करणार नाही. त्यांना मामांकडे जावू द्या." रमा म्हणाली.

"याला काय अर्थ आहे? तुला काही लग्न करून सासरी नुसतं बसून ठेवायला आणलं आहे का?" लताताई म्हणाल्या.

" हे तर तुम्ही बोलूच नका. कारण असं वागायचं तुम्हीच मला दाखवलं आहे. माझ्याकडून तुमच काम होणार नाही. "

" रमा गप्प बस. आत जा. " मोहन ओरडला.

" मी जाणार नाही. आता सांगते ज्याचे आई-वडील आहेत त्यांनी सेवा करा. त्यांनी कधीच मला प्रेमाची चांगली वागणूक दिली नाही. मी काही करणार नाही. " रमा आत गेली.

मोहन गप्प बसला. कारण हे खरं होतं. रमा बरोबर बोलत होती. आई तिच्याशी जसं वागली तसच रमा परत करते आहे. किंबहुना रमा बरच चांगलं वागते आहे. आईने तिला खूप त्रास दिला आहे. मी पण आईच्या सुरात सूर मिळवत होतो. आम्ही सुरवाती पासून वागायला चुकलं आहोत. आता काय म्हणणार?


0

🎭 Series Post

View all