मला काहीच कळत नाही?

गोष्ट ती ची
"अहो, सर्वेशला इंजिनियरिंगला प्रवेश घेऊ दे. मला वाटतं त्याला ते उत्तम जमेल." आकांक्षा मुलाची मार्कशीट न्याहाळत आपल्या नवऱ्याला म्हणाली.

हे ऐकून ओंकार आपल्या मुलाकडे पाहून किंचितसा हसला.
"का? काय झालं?" हे पाहणाऱ्या आकांक्षाच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं.

"आई, तुला काय कळतं यातलं?" सर्वेश आता व्यवस्थित हसत म्हणाला.

"म्हणजे? मी इंजिनियर झाले नसले तरी तुझा कल कळण्याइतपत नक्कीच समज आहे मला."

"तुमचा काळ वेगळा आणि आत्ताचा काळा वेगळा. मला असं वाटतं त्यांना भरपूर पैसा मिळेल असंच शिक्षण घ्यावं." ओंकार मध्येच म्हणाला.

"पण मला वाटतं त्यांन त्याला झेपेल तेच करावं. अगदी तू बी.एससी. एम.एस.सी, पी.एचडी. केलीस तरी माझी काही हरकत नाही." आकांक्षा.

"तुला यातलं नेमकं काय कळतं ते तरी सांग. तसंही दिवसभर तू घरात असतेस. घरची काम करतेस, थोडी फार बाहेरची काम करतेस. बस् झालं.. बाकी सध्या मार्केटमध्ये, जगात काय चाललंय? याची तरी माहिती असते का तुला?" ओंकार उपहासाने म्हणाला आणि आकांक्षा उठून स्वयंपाक घरात गेली.

आजकाल हे नेहमीच झालं होतं. सर्वेश आणि ओंकार मिळून आकांक्षाला एकटं पाडत. ती दिवसभर घरात असते म्हणून तिला बाहेरच्या जगाची काहीच माहिती नाही असं या दोघांना वाटायचं. तसं पाहायला गेलं तर ओंकारकडे भरपूर पैसा होता. अर्थातच तो पैसा कष्टाचा असला तरीही ओंकारला काही अंशी त्याचा गर्व होता. पैसा टाकला की आपल्या मुलाला कुठेही ऍडमिशन मिळेल असं त्याला मनोमन वाटायचं. पण आकांक्षाच्या मनाला हा विचार सुद्धा शिवला नव्हता.
ती सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मगच निर्णय घेत असे. मात्र या तिच्या निर्णय प्रक्रियेवर 'तुला कशातलं काहीच कळत नाही' असा शिक्का बसला होता म्हणूनच ओंकार तिला आपल्या कुठल्याही व्यवहारात फारशी किंमत देत नसे. आता त्याचं बघून सर्वेशही हेच शिकला होता.

नकळत आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. 'पुरी एकोणीस वर्ष नीट संसार केला. आपल्या संसाराला ना सासू-सासऱ्यांनी हातभार लावला ना माझ्या आई -वडिलांनी! आजपर्यंत नवरा म्हणून ओंकारला न कुरकुर करता साथ दिली. सर्वेश झाला तेव्हा अक्षरशः पैसे साठवून संसार केला. पण त्याची जाण आज कोणालाच उरली नव्हती.'
आकांक्षाने स्वतःसाठी कॉफी केली. हॉलमध्ये बसलेल्या बाप -लेकाचं तुटक बोलणं तिच्या कानावर पडत होतं. ऍडमिशन संबंधी ते दोघेही कोणाशी फोनवर बोलत होते.

सर्वेश घरात हॉस्टेलवर राहिल्यासारखा राहत असे. कधीही घरात यायचा. कधीही बाहेर जायचा. आपण कुठे जातोय, काय करतोय? याचा घरातल्यांना जराही पत्ता लागू देत नसे. नको म्हणत असतानाही ओंकारने गाडी घेऊन दिली होती. शिवाय दर महिन्याला भरपूर पॉकेट मनीही त्याला मिळायचा.
इतक्या लहान वयात अशाच सवयी चांगल्या नव्हेत असा आकांक्षाला सारखं वाटायचं. पण तिचं दोघेही ऐकत नव्हते. आकांक्षा जरा सर्वेशला ओरडली, की तो आता मोठा झाला आहे. ओंकारच्या या वाक्यावर तिला गप्प बसावं लागे.

काही वेळाने ओंकार आत आला. "मला वाटतं, सर्वेशला इतक्या मार्कांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळणं देखील कठीण आहे. तरी मी तुला सांगत असतो, काम होण्याआधी आपलं तोंड कधीच उघडायचं नाही. नाट लागतो मग.."

यावर आकांक्षा काहीच बोलली नाही. कॉफी पिता- पिता तिने बराच विचार केला होता. आजवर या घरासाठी नवरा आणि मुलगा या दोघांसाठी तिने खूप काही केलं होतं. आपलं करिअर, हुशारी, बुद्धिमत्ता तिने जणू पणाला लावलं होतं. पण आता नाही. 'माझ्या आवडी-निवडी पुन्हा एकदा जपायला मला खूप आवडतील.' मनातला विचार घट्ट करून ती ओंकार पाठोपाठ बाहेर आली.

"खरंच मला कशाला काहीच कळत नाही. किराणा सामान, दूध बिल, पाणी- लाईट बिल, कामवाल्या मावशी, भाजी, गॅस, गोळ्या - औषधं, बाकी सगळा खर्च महिन्याच्या महिन्याला कोण बघतं? शिवाय बँकेची काम कोण करतं? तुमच्या आई -वडिलांना दर महिन्याला पैसे पाठवायला लागतात. ते आजवर तुम्ही कधी पाठवलेत? सर्वेश आता मोठा झाला आहे असं म्हणता ना! मग त्याने यातली कुठली तरी जबाबदारी आपणहून घेतली आहे? त्याला दोन-चार काम सांगितली की गाडी काढून तो लगेच बाहेर निघून जातो.

ओंकार, तुम्हाला फक्त काम आणि पैसा इतकंच सांभाळावं लागलं. बाकी घरच्या जबाबदाऱ्या आजवर तुम्ही कधीही घेतल्या नाहीत. कधी पै - पाहुणा आला म्हणून स्वयंपाक घरात राबला नाहीत किंवा अनेकदा जवळच्या नातेवाईकांच्या समारंभाला हजेरी देखील लावली नाहीत. कोणाला आहेर काय द्यायचा? कोणासाठी कुठली भेटवस्तू आणायची? या गोष्टीची चर्चा देखील आपण दोघांनी मिळून कधी केल्याचं मला आठवत नाही. सर्वेशचा अभ्यास घेतल्याचा तरी तुम्हाला आठवतंय का बघा आणि प्रसंगानुरुप माझी यादी खूप मोठी आहे हं!"
आता ओंकारकडे बोलायला काहीच जागा उरली नव्हती. तो नुसताच सर्वेशच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि सर्वेश खाली मान घालून आपल्या आईचं बोलणं कधी नव्हे ते निमूटपणे ऐकत होता.

आकांक्षाचं बोलणं बरोबर होतं. 'आजवर आपण फक्त पैसा मिळवत आलो आणि तिने आपल्याला साथ देत त्या पैशांचा सगळा हिशोब व्यवस्थित ठेवला. एक आई आणि बायको म्हणून ती कुठेही कमी पडलेली नाही.' ओंकार आजपर्यंतचे दिवस आठवत मनातल्या मनात म्हणाला.

"मला कशातलं काहीच कळत नसतं तर इतकी वर्ष संसार केला नसता." आकांक्षा रागाने म्हणाली. "सर्वेश, आपल्या आईला काहीच कळत नाही असं समजून आता इथून पुढचे तुझे सगळे निर्णय तू स्वतः घ्यायचे. तुझी आई आता संसारातल्या जबाबदाऱ्यातून थोडी स्वतंत्र होऊन स्वतःसाठी काहीतरी करणार आहे आणि ओंकार, तुम्हीही आता घरची, संसारातली जबाबदारी वाटून घ्या. मलाही स्वतःसाठी काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे.

"बाबा!" ओंकारने यावर काहीतरी बोलावं म्हणून सर्वेश त्याच्याकडे पाहून हाक मारत म्हणाला.

"तुझ्या बाबांचं म्हणणं काहीही असलं तरी त्यांच्या बोलण्याचा आता माझ्यावर काही परिणाम होणार नाही." इतकं बोलून आकांक्षा आपल्या खोलीत आली. हे सगळं आपण या आधी का बोललो नाही? हेच तिला समजत नव्हतं. पण आता मन मोकळं झाल्याने इतकी वर्ष मनात साठलेलं मळभ दूर झाल्यासारखं तिला वाटायला लागलं. 'आपलाच नवरा आहे आणि मुलगाही आपलाच आहे. कधीतरी समजून घेतील. या विचाराने आपण खूप काही मागे सारलं. पण आता नाही.' आकांक्षाने खोलवर श्वास घेतला.

"बाबा, आईला काही कळत नसलं तरीही तिचं सगळं बरोबर असतं." बाहेर सर्वेश ओंकारला म्हणत होता. 'मी कसा काय चुकू शकतो?' ओंकार मात्र इतक्या वर्षांचा हिशोब जुळवण्यात मग्न असल्याने आपल्या लेकाचं बोलणं त्याच्या कानापर्यंत पोहोचलं नाही.
आता आई शिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही, हे त्याला उमगल्याने सर्वेशची पावले मात्र आईच्या खोलीकडे आपसूकच वळली.
समाप्त.
©️®️ सायली धनंजय जोशी.