मनातला पाऊस भाग 1

कथा स्त्री मनाची

मनातला पाऊस भाग 1

©️®️शिल्पा सुतार

संध्याकाळची वेळ होती. निशा एकटीच अंगणात बाकावर बसलेली होती. मोठा बंगला होता त्यांचा. आजुबाजूला बरेच फुलझाडं, भाजी लावली होती. बागकाम तिची आवड होती. तिथे तिचा वेळ छान जात होता. ही तिची आवडती जागा होती. तिथे बसायला मिळावं म्हणून तिने छोटा बाक तयार करून घेतलेला होता. ती फुला पानांना गोंजारत होती. त्यांच्याशी छान बोलत होती. तेच तर आजकाल तिचे सोबती होते. त्यांच्या सोबत ती खुश असायची.

पावसाळा लागून बरेच दिवस झाले होते. म्हणावा तसा पाऊस काही पडला नाही. या बागेची अशी अवस्था झाली होती माझ्या मना सारखी. नेहमी पाणी तर टाकतो आपण झाडांना. पण ज्याची आस आहे तो पाऊस पडत नाही. आपण टाकलेल पाणी पुरेस नाही. झाडे मलुल झाले होते.

साडेसहा झाले तिला आत मध्ये जायची इच्छा नव्हती. आजकाल तिला काहीच करावसं वाटत नव्हत. सगळ्यांनी आपल रूटीन ठरवुन घेतल होत. ते बिझी होते. मला त्यात स्थान नाही. ती एकटी राहून कंटाळली होती.

तरी बर घरात पाच लोक होते. निशा, आकाश, त्यांचा मुलगा रोहित. सासुबाई, सासरे. सगळे असून पण नीरस आयुष्य आहे अस तिला वाटायचं.

रोहित बारावीत होता. एकदम मेहनती हुशार. तिचा एकमेव आधार. तो थोड्यावेळाने क्लास मधून येईल. त्याला भूक लागून जाते म्हणून ती किचनमध्ये गेली. फ्रिज मध्ये काय काय भाज्या आहेत त्या बघितल्या. बाकीच्यां साठी वरणातला पालक केला. रोहित साठी थोड पालक पनीर केलं. भात झाला. पोळ्या झाल्या. कोशिंबीर केली.

रोजची कामे. सराईत पणे तिचे हात चालत होते. कधी कोणती चूक नाही. मीठ तिखट कमी जास्त नाही. कोणाला बोलायला जागा नव्हती. पूर्वी पासून अशी परफेक्ट होती ती. घर सांभाळण असे ना की मुलाचा अभ्यास. नेहमी सगळ आरामात केल तिने. सगळ्यांना सवय झाली होती त्यामुळे रोज काय सांगायच छान झाल. त्यामुळे त्यात तिला शाबासकी मिळत नव्हती.

बाहेर सायकलचा आवाज आला रोहित आला. त्याचा मोठा आवाज पुढच्या खोलीतुन येत होता. तो आजी आजोबां सोबत बोलत होता. त्यांच खूप जमत होत.

तिला थोडं हसू आलं. हीच तर एक गडबड आहे घरात. नाहीतर दिवसभर पूर्ण घर शांत असत. सासू-सासरे त्यांच्या रूममध्ये असत. निशा तिच्या कामात. ज्याला जे हवं ते देऊन दिल्या तर नंतर ती मोकळी असायची.

आकाश आठ वाजेपर्यंत घरी यायचे. मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर होते आकाश. अतिशय महत्त्वाकांक्षी. वेळ वाया गेलेला त्यांना आवडायचा नाही. गप्पा ही त्याच कंपनी, जॉब, शिक्षण, फ्युचर प्लॅनिंग, लेटेस्ट टेक्नॉलॉजी. एकदम प्रॅक्टिकल.

रोहित आणि ते तासनतास बोलू शकत होते या विषयावर. निशा ऐकत बसायची. तस तिला इंट्रेस्ट होता. पण तरी ती या सगळ्यांच्या कम्पॅरिझन मध्ये कमीच पडत होती. ते तिला गप्पांमध्ये सामावून घ्यायचे नाही. तिला ते लक्षात आलं होतं. ती मधे बोललं तरी ते बोलायचे नाही किंवा तिने सांगितलेलं कसं चुकीचं आहे हे सांगायचे त्यामुळे नंतर नंतर ती भाग घ्यायची नाही. त्या वेळात आराम केलेला बरा. झोपून घ्यायची.

या सगळ्यात निशा, आकाशच नातं मागे पडलं होतं. त्यांना ही गोष्ट लक्षातच येत नव्हती. जास्त नाही पण थोडं तरी आकाशने तिच्यासोबत बोलायला पाहिजे. तिच्यासोबत बागेत वेळ घालवायला पाहिजे. कधीतरी संध्याकाळी फिरायला जायला पाहिजे. प्रेमाने तरी बोललं पाहिजे असं तिला वाटायचं. पण अस काही होत नव्हत.

आकाश लवकर आले म्हणजे एक तर आई-वडिलांशी बोलणार. रोहितशी बोलणार. नाही तर काहीतरी ऑनलाईन बघत बसणार. समोर असूनही एकदम गप्प. कायम इयर फोन लावलेले. टीव्ही बघायला ही चान्स नव्हता.


🎭 Series Post

View all