श्रुतिका अग हे काय तू घडी नाही मोडलीस का अजून ही साडीची माझ्या ???
मोठी समिधा तिच्या बहिणीला म्हणाली.
बहीण त्या साडीकडे बघत विचार करू लागली .
हम्मम्म्म ,मोडू का ?? नको मोडू हा विचार करते ग मी !! श्रुतिका
हा आता काय मुहूर्त बघायचा आहे का तुला ?? समिधा रागात
"नाही ग दरवेळी आपण शॉपिंग करून आलो की सासरी न जाता माहेरी येतो..इथे साड्या ठेवतो आणि मग दिवाळीला ह्याच साड्या सासरी घेऊन जातो..आणि काय सांगतो दादाने घेतली..
वहिनीने घेतली.." श्रुतिका
वहिनीने घेतली.." श्रुतिका
"हो मग काय त्यात ,आपण आपल्या पैश्याने घेतो ,आणि सासरी सांगतो माझ्या माहेरच्यांनी घेऊ दिली.." समिधा
"तसं नाही ताई ,आपण काय सांगतो तिकडे ते नाही ग म्हणत..मी म्हणते कधी कधी आपण सांगतो की वहिनीने तिच्या असलेल्या पैशातून घेतली ही साडी..पण वहिनीला कधी दिली ना ग आपण साडी घडी मोडायला.."
"कळतंय मला ही तुझा ओघ बोलण्याचा..आलो की आपणच आपल्या एकमेकींना आग्रह करून करून घडी मोडायला लावतो ,पण हे विसरतो जिच्या मुळे आपण माहेरी सहज येतो ,बसतो ,आराम करतो त्या वहिनीला कधीच म्हणालो ही नाही की तू ही घडी मोड म्हणून..तिला ही आग्रह करून करून मोडायला लावायला हवी होती घडी आपल्या साड्यांची.." समिधा
"हम्मम ,आता कसे बोललीस दीदी तू.." श्रुतिका
"आपल्या सासरी कसे वागतो ना आपण ,तिकडे ननंद असू दे ,जाव असू दे ,सासू असू दे किती लगेच मिसळून एकरूप नसलो तरी त्यांचे मन आणि मान राखण्यासाठी लगेच म्हणतो तुम्ही घडी मोडावी म्हणजे मला बरे वाटेन..मग आपल्याच वहिनीला का कधी म्हणत नाही..ती तर किती काय काय करते आपल्यासाठी आपण माहेरी आल्यावर.. आपण किती सहज गृहीत धरतो तिला..तिला राबवून घेतो ,तिचे कामच आहे म्हणतो मग आपले तिच्या प्रति काहीच काम नसते का ?? " समिधा म्हणाली
"हो ग ताई अगदी हाच विचार आला होता माझ्या मनात साडी घेताना ,की ह्यावेळी फक्त मीच ,फक्त तूच साडीची घडी मोडायचा एकमेकिंना का आग्रह करायचा ,ह्यावेळी ,ह्या वेळी नाही ह्यावेळी पासून तिला ही आग्रह करायचा घडी मोडायचा "
"मी काय म्हणते फक्त घडी मोडायचा आग्रहच नको ,तर ह्यावेळी तिला आपण ह्यातली एक साडीच देऊन टाकू..ती खूप करते आपल्यासाठी मग इतके तर व्हायलाच पाहिजे आपल्या कडून दरवेळी..नाहीतर आहोतच नेहमी काही न करणाऱ्या त्या सासरच्या नात्यांसाठी करायला पुढे ,ज्या आपल्यासाठी काहीच करत नाहीत.." समिधा म्हणाली
समिधा आणि श्रुतिका ने लगेच आपल्या वहिनीला बोलावून घेतले आणि म्हणाल्या वहिनी आज आमच्या साड्यांची घडी तुम्हीच मोडायची..आणि ह्यापैकी कोणती ही साडी जी तुम्हाला आवडेल ती ,जो रंग तुमच्या कडे नसेल ती साडी निवडायची ..
वहिनी लगेच म्हणाली ,"ताई अहो ह्याची काही गरज आहे का ,तुम्ही मोडा ना घडी मी कश्याला हवी आहे त्यासाठी..?"
"वहिनी तुम्ही आई गेल्यापासून अगदी आईच्या मायेने आमचे करतात ,पोटीकडीने जीव ओतून आमचे पाहुणचार करतात..तुम्ही कधी ही तक्रार केली नाही..त्याबदल्यात आम्ही तुम्हाला काहीच दिले नाही..तुम्ही हा विचार करू नका की आम्ही द्यायचे असते ,तुम्ही का देतात तर तो आई वडिलांना रिवाज लागू होता ,ते मोठे होते पण आता आम्ही दोघी तुमच्या पेक्षा मोठ्या आहोत..तर मोठ्याने छोट्याना दिले तर चालते..तिथे छोट्यांनी ते प्रेमाने घ्यायचे असते.." श्रुतिका
"आता घेतली नाही जर साडी तर मग दादाचे कान भरू आम्ही दोघी मिळून ,मग तो तुम्हाला सांगेलच माझ्या बहिणींचा हुकूम ऐकण्याचा वहिनीचा धर्म आहे .."
वहिनीला आज हे नाते जरा अजूनच जवळचे वाटले..थोडे अंतर कमी झाले आणि प्रेम जिव्हाळा वाढला असे वाटले.. नाहीतर वहिनी आणि त्या दोघी नंदा फक्त औपचारिक नाते वाटत होते..त्यात जीव ना जिव्हाळा होता..त्यात नुसत्या नियम आणि शर्ती ..आणि कर्तव्य जास्त होते.. पण आज श्रुतिकाच्या सांगण्या वरून पूर्ण रितच बदलली होती..आता त्या दोघी नव्हत्या आता त्या तिघी झाल्या होत्या.
मी तर म्हणते ननंद वहिनीचे नाते असेच असावेत...आम्ही आणि तुम्ही विसरून आपण होऊन रहावे. मग माहेरपणाला वेगळी झळाळी येईल..जिव्हाळा वाढीस लागेल..काय बरोबर ना
©®अनुराधा आंधळे पालवे