Login

मॉडर्न सून

मॉडर्न सून
मॉडर्न सून


"शर्वरी... अग ए शर्वरी. कुठे कडमडली ही? मी केव्हाची आवाज देतेय हिला, ऐकू कस येत नाही? बहिरी झाली की काय ही! की मुद्दाम माझा आवाज ऐकून न ऐकल्या सारखे करते कुणास ठाऊक."
मंगल ताई ओरडून बोलत होत्या.

"नुसत त्या फोनमधे बघायच आणि फिदीफिदी हसायच. तोंडावर लाली पावडर थापायची आणि तोकडे ड्रेस घालून मिरवायच. बास! हेच येत ह्या आजकालच्या सुनांना. सासुचा जरा म्हणून धाक नाही. इतका वेळ झाला आवाज देतेय तरी अजून साधा ओ सुद्धा दिला नाही."
मंगल ताई पुन्हा त्यांचं त्यांचं चिडून बोलल्या. त्यांचा बोलण्याचा आवाज ऐकून शर्वरी घाईगडबडीने किचन मधून बाहेर आली.

             
"आले, आले आई. तुमच्यासाठी चहाच घेऊन येत होते."
शर्वरी सासूबाईं समोर चहाचा कप पुढे करत बोलली.

"अगं मग एव्हडा वेळ का? तुला आवाज देऊन घसा कोरडा पडला माझा."
सासूबाईंनी तिच्या हातून चहाचा कप हातात घेत बोलल्या.

"हो आई, ते चहा जरा जास्त आल घालून केलाय चांगला उकळून.
ह्याने बरं वाटेल तुम्हांला. तुम्हाला सर्दी झालीये आणि डोके पण दुखत होते ना! ते ही जरा थांबेल आता; म्हणून जरासा उशीर झाला."
शर्वरी त्याच्याकडे बघत बोलली.

"बरं बरं ठिक आहे. जा तू, आता बाकीचे काम कर."
असे म्हणून सासू चहा घेऊ लागली आणि स्वतःशीच पुटपुटली.
'छान चहा केलाय हिने.'


शर्वरी... उंचपुरी, गोरीपान, नाजूक, चांगली शिकलेली. नव्या विचारांची. अगदी नक्षत्रासारखी सून मिळाली होती मंगल ताईला. तिचा मुलगाही अगदी छान आहे दिसायला.
समीर... उंचपुरा, राजबिंडा, रुबाबदार असे व्यक्तिमत्व. तसे बघायला गेलं तर प्रत्येक आईला आपला मुलगाच जास्त चांगला वाटतो. म्हणून त्याची जरा जास्त तारीफ.

      
समीर आणि शर्वरी दोघांचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणा सारखा होता. समीर कायम शर्वरीला मदत करायचा. तिला अधूनमधून बाहेर फिरायला ही न्यायचा, हवे ते करू द्यायचा. पाहिजे तसे कपडे घालू द्यायचा; पण शर्वरी सुद्धा सगळ्यांचा मान ठेवून वागायची.
मंगल ताई जरी तिच्या सुनेला बोलायची; पण सासरे कायम तिच्याबाजूने असायचे. तिचा खुप लाड करायचे. अगदी पोटच्या लेकीप्रमाणे. शर्वरी ही दोघं सासू सासर्यांची खुप सेवा करायची. ती लग्न होऊन जशी आली तसे सासुने किचनमधे जाणे बंद केले होते. घरातले बाहेरचे होईल ते सगळे काम शर्वरीच बघायची.
    

घरात सगळ्या सुखसोयी होत्या. अगदी सगळेच होते. म्हणजे कणिक मळायला ही मिक्सर होते; पण सासू कायम बोलायची तिला, की 'आमच्या वेळेस कुठे होते हे सगळे! आम्ही तर पाट्यावर मसाला वाटायचो. तुम्हांला तर सगळे मिळते आता बसल्या जागी.'
शर्वरीला सासूचे टोमणे वजा बोलणे समजून जायचे; पण तिने कधीच त्यांना उलट बोलले नाही. ती अगदी शांतपणे तिचं कामं करत राहायची.
           
घरात फर्शी पुसायला आणि भांडी घासायला ही एक मावशी यायच्या. शर्वरी त्यांच्याशी पण अगदी प्रेमाने बोलायची. त्यांना रोज चहा पाणी करायची; त्यामुळे सासू जरा चिडायचीच. मग म्हणायची की 'या अशा कामवाल्या बायकांना डोक्यावर बसवून ठेवू नको. त्यांच काम करू देत आणि जाऊ देत जा त्यानां. रोज रोज असले लाड नको करू त्यांचे.' मग शर्वरीला वाईट वाटायचे, की ती पण एक माणूस आहे तिला ही तिचा संसार आहे. फक्त जरा काम करून चार पैसे मिळवून पोरांना चांगले शिकवायचे आहे; त्यासाठी ती हे सगळे करतेय. मग तिच्याशी निदान चांगले बोलले तर ती आपले कामही चांगलेच करेल ना! पण सासूला तिचे हे बोलणे काही पटायचे नाही. 
          
एक दिवस सासर्याना त्रास व्हायला लागला. बहुतेक त्यांनी बीपीची गोळी घेतली नसावी. अचानक छातीत दुखू लागले आणि ते जमीनीवर कोसळले. आवाज ऐकून शर्वरी धावत बघायला गेली तर त्यांना असे बघून जोरात ओरडली. समीर ऑफिसमधे होता. शर्वरीने हुशारी दाखवत लगेच ॲंब्युलंसला फोन लावला आणि ताबडतोब बोलावून घेतले. समीरला पण फोन करून कळवले आणि दोघी सासू सुना त्यांना घेऊन हॉस्पिटलमधे गेल्या.

सासू तर खुप रडत होती. काही कळत नव्हते त्यांना काय करावे. शर्वरीने त्यांना सांभाळले, धीर दिला. त्यांच्या हातात हात घेऊन बोलली.
"आई काही होणार नाही बाबांना. तुम्ही नका त्रास करून घेऊ. डॉक्टर बघतील त्यांना. लवकरच बरे होतील बाबा, मग आपण घरी घेऊन जाऊ त्यांना."
तरीही मंगल ताई काही ऐकायला तयार नव्हत्या. सारख्या रडतच बसल्या होत्या. देवाचे नाव घेत होत्या. इतक्यात समीर आला आणि पहिले डॉक्टरांकडे गेला. बाबांची विचारपूस केली आणि एकदम मटकन खालीच बसला. शर्वरी त्याच्या जवळ आली. त्याला विचारले,
"काय झालेय बाबांना? कधी पर्यंत बरे होतील ते? काय बोलले डॉक्टर? सांगा तरी काही."
शर्वरी खूप काळजीने विचारत होती समीरला; पण समीरला काय बोलावे काहीच कळत नव्हते.

"नाही..."
समीर एव्हडच बोलला आणि शर्वरीचा अश्रूंचा बांध सुटला; पण तिने स्वतःला सावरले आणि सासू जवळ गेली. त्यांना आता खरी तिच्या आधाराची गरज होती. समीर पार खचला होता. मंगल ताई तर एकदम शांत राहायची. शर्वरी दोघांना सांभाळून घेत होती.
          

बाबांना जाऊन आता सहा महिने झाले असतील; पण मंगल ताई जशीच्या तशी अबोल. तिचा चेहरा खुप उतरला होता. एकदम खिन्न असायची. नेहेमी कपाळावर भलीमोठी लाल टिकली लावणारी, केसांचा आंबाडा त्यात फुल लावणारी. छानशी साडी घालून मिरवणारी तिच मंगल ताई आज अगदी भेसूर दिसत होती. चेहऱ्यावरील तेज नाहीसे झाले होते. शर्वरीला त्यांच्याकडे बघवत नव्हते. खुप वाईट वाटायचे त्यांना असे बघून. शर्वरीने खुप प्रयत्न केला त्यांना बोलत करण्याचा. त्यांना पुन्हा पहिल्यासारखे करण्याचा; पण त्या काही लवकर त्यातून बाहेर पडत नव्हत्या.
       
 
हळूहळू दिवस पुढे जात होते; पण मंगल ताई जशीच्या तशी होती. शर्वरी पण त्यांना सांभाळून घ्यायची, फिरायला घेऊन जायची, देवळात घेऊन जायची, डॉक्टरांकडे घेऊन जायची, खुप काळजी घ्यायची.
       
त्यांना सारखे असे बघून तिला खूप वाईट वाटायचे. त्यांच्याकडे बघितले की तिलाही रडू यायचे. न राहवून शेवटी एक दिवस शर्वरी बोलली त्यांच्याशी.
"आई तुम्ही आधी जश्या होत्या अगदी तश्याच मला हव्या आहात. कायम बडबडणार्या, घरात काय हवे काय नको सगळे बघणाऱ्या, तसेच तुमचा आधीचा पेहेरावही तसाच हवा आहे. आधी सारखे कपाळावर टिकली, आंबाडा घालणाऱ्या, साध्याच पण छान साडी घालून तयार होणाऱ्या. तुम्ही तशाच छान दिसतात. असे नाही ओ बघवत मला तुमच्याकडे. निदान आमच्यासाठी तरी तुम्ही आम्हांला त्याच आधीच्या आई हव्या आहात. तुम्ही आधी जश्या होत्या तश्याच रहा."

      
शर्वरीचे बोलणे ऐकून मंगलला खुप भरून आले. खुप रडल्या दोघी एकमेकींच्या कुशीत. शर्वरीच्या डोक्यावरून हात फिरवत मंगल ताई तिला म्हणाल्या,
"खुप बोलले ना गं मी तुला! पण तू कधीही मला उद्धट उलट बोलली नाहीस की माझा राग राग केला नाही. मी काय आमच्या जुन्या विचारांची बाई. तु नवीन विचारांची, चालीरीतीची; पण तरीही तु सगळे अगदी उत्तम पार पाडलेस. अगदी कोणालाही न दुखावता. खर तर तुझी आज मनापासून माफी मागावीशी वाटतेय मला."
सासूबाईंनी चक्क तिच्यापुढे हात जोडले. 

"आई काहीही काय?" शर्वरी त्यांचे हात हातात घेत बोलली.

"नाही ग बोलू दे मला. तु खरचं खुप सांभाळून घेतलेस आम्हांला. तुमची पिढी जरी आम्ही मॉडर्न म्हणत असू; पण राहणीमान नुसत मॉडर्न नाही तर तुमचे विचार ही तसे हवे आणि ते अमलांत आणावे. सगळ्यांची मनं सांभाळून तु खुप छान करतेस हे सगळे आणि मी उगाच तुला बोल लावत असते."

ऑफिस मधून घरी आलेल्या समीरला दोघींना असे बघून खूप बरे वाटले. शर्वरी त्याची बायको जरी असली तरी आज तिने संपुर्ण घराला सांभाळुन तिची जबाबदारी अगदी चोखपणे सांभाळत होती. खचलेल्या समीरला देखील तिने तिच्या प्रेमाने सहारा दिला होता.

घरातले वातावरण आता पुन्हा हळूहळू पूर्वीसारखे होऊ लागले होते. दोघी सासू सूना अगदी खेळीमेळीने बोलायच्या. कामही दोघी मिळून करू लागल्या.
      
आज शर्वरी आणि तिची सासू मंगल... एका जुन्या पिढीचा आणि नवीन मॉडर्न पिढीचा सासु सुनेचा मिलाप झाला होता. मंगल ताई ही आता तशाच पुर्वीप्रमाणे तयार झालेल्या. दोघी सासु सुना तयार होऊन बागेत फिरायला निघाल्या होत्या.