Login

मोडलेली नाती ( भाग एक )

खरचं का या स्त्री देहाचा कोणाला ईतका मोह पडतो की त्या साठी माणूस कोणत्याही थराला जावू शकतो


मोडलेली नाती ( भाग एक )

विषय; तिचं आभाळ 


" सकाळी अकरा वाजता, लवकर आवरायला हवं.उगीच उशीर नको व्हायला. "

स्वतःशीच पुटपुटत तिने स्वतःच न्हाण वगैरे लवकर लवकर आवरलं. केस विंचारले. सवयीने तोंडावर पावडरचा हात फिरवला. टिकली लावली. आणि मुलांची तयारी करून ती जायला निघाली.

" येते मी" सासूबाईंचा निरोप घेत ती पुटपुटली.

" डब्बा नेतेस का त्याला. काल रात्र भर जागून दळबेसनाचे लाडू बनवले मी "

" आई, तिथं त्यांना भेटायला फक्त मला पाचच मिनिटं मिळणार आहेत. त्यात ते गजाच्या पलीकडे असणारं त्या मुळे हे लाडू वगैरे काही देता येणारं नाहीत. चला निघते मी " तिने कसंबस स्वतःला सांभाळत मूलांना घेतलं. धाकटी मुलगी कड्यावर घेतली. मोठया मुलाचा हात हातात घेऊन ती जेलच्या दिशेने निघाली.

तो भेटण्याच्या कल्पनेन ह्रदय एव्हढ जोरात धडधडत होतं की ते फुटून बाहेर येईल की काय असं वाटतं होतं. मुलांना या कशाचीच कल्पना नव्हती. आज तब्बल एक वर्ष तिचा नवरा जेल मध्ये होता.

माहेरच्यांच्या विरोधात जावून तिनं लग्न केलं होतं. त्या मुळे माहेर कित्येक वर्ष तुटलच होतं. बघता बघता चार वर्ष गेली. या काळात तिचा संसार चांगलाच फुलला. मुलाचं करता करता दिवस कसे पुढं सरकत होते तिलाच समजत नव्हतं. तिचा नवरा तिला खूप जपत असे. जगातली सगळी सुखं जणू तिला प्राप्त झाली होती, इतकी ती सुखी होती. त्यातल्या त्यात भर म्हणून तिला तिच्या माहेरी बोलावलं होत.

" लागो न दृष्ट माझी, माझ्याच वैभवाला" स्वतःशी गुणगुणत ती दोघी मूलांना घेवून माहेरी आली. नवरा स्टँड वर सोडायला आला होता.

तिनं बस मधे बसल्यावर त्याला हात हलवून निरोप दिला. त्या वेळी तिला हा आपला शेवटचा निरोप आहे याची कल्पनाच नव्हती.

ती एक आठवड्या नंतर सासरी परत आली तेंव्हा सगळ काही बदललेल होत. नवरा घरी नव्हता. तिला सांगण्यात आलं की तो कामावर गेलेला आहे. तिला ते खरं वाटलं. पणं संध्याकाळ झाली. त्याची घरी यायची वेळ होवून गेली होती. पण तो आला नव्हता. तिने त्याला फोन केला. तो देखील स्वीचं ऑफ येतं होता. बराच वेळ झाला. मुलं देखील बाबांची वाट बघत झोपून गेली. ती देखील वाट बघत बघत झोपून गेली.

" आई, हे अजून कंपनीतून आले नाहीत" तिने काळजीने विचारलं.

" अग काही दौरा वगैरे असेल " सासूबाईंनी कशीबशी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. कोणीच व्यवस्थीत बोलतं नव्हत की सांगत नव्हत. घरातलं वातावरण कुठं तरी बदलल्या सारख होतं.

दुसरा दिवस गेला. तिसरा दिवस देखील गेला. असे हळू हळू दिवस पुढे सरकायला लागले. मग एक दिवस तिचा धीर सुटला. तेंव्हा तिच्या दिराने तिला ते भयंकर सत्य सांगितलं.

" वहिनी, भाऊला बलात्काराच्या एका खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो जेलं मधे आहे. काळजी करू नको. मी लवकरच एका चांगल्या वकिलाला भेटणार आहे. "

तिच्या कानात जणू उकळत्या शिशाच पाणीच ओतलं गेलं. पायाखालची जमीन जणू निसटून चालली आहे असं तिला वाटलं. ती मटकन खाली बसली. तिच्या अंगाला थरथर सुटली.

कसलं हे भयंकर प्राक्तन तिच्या पदरी आलं होतं. पणं आता आलेल्या नशिबाला भोगण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.

बघता बघता एक वर्ष झालं. तिलाच काय पणं तिच्या घरातल्या कोणालाच तिच्या नवऱ्याला भेटता आलं नाही. तिने खूप धडपड केली. पणं व्यर्थ. वकील नुसता पैसे उकळत होता. पूर्ण वर्षा नंतर तिला फक्त पाच मिनिटाची भेटण्यासाठी परवानगी मिळाली. आणि आज ती मुलांना सोबत घेऊन त्याला भेटण्यासाठी निघाली होती.