Login

मोगऱ्याचा दरवळ

अव्यक्त प्रेम

आज सकाळी मिहिरला लवकर जाग आली. त्यामुळे त्याने ठरवलं की आज जरा लवकरच मॉर्निंग वॉकला जायचं. त्याने आपल सगळं आवरलं आणि बागेत जायला निघाला. सकाळी सकाळी वातावरण एकदम उत्साही आणि छान होतं. त्याला सुद्धा फिरायला छान वाटत होतं. तेवढ्यात त्याची नजर एका मुलीवर गेली.ती दिसायला छान आणि देखणी होती. त्या मुलीशी मैत्री करावी असा विचार त्याच्या मनात आला. तसही आपण एकटेच दररोज वॉक करतो अजून कोणी ओळखीचं असेल आणि जी आपली मैत्रीणही असेल तर जरा अजून छान वेळ जाईल असं त्याला वाटलं. एवढ्यात मिहिरला लक्षात आलं की त्याला ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून तो घरी आला. घरी आल्या आल्या आईने लगेच विचारलंच , ‘ अरे मिहिर लग्नाचा काय विचार केलायस? अरे तुला असं विचारलं की लगेच निघून तरी जातोस नाहीतर ‘ऑफिसला जायचंय आलो की बोलू’ असं म्हणून विषय तरी टाळतोस. आज मला काय ते कळलंच पाहिजे. अरे तुला एखादी मुलगी आवडली असेल तर तसं सांग मला काही अडचण नाही.’ आईने असा प्रश्नांचा मारा केल्यावर नेहमी विषय टाळणारा मिहिर आज चक्क हसला आणि म्हणाला , ‘ काय ग आई तुझं नेहमी लग्न लग्न सांगतो थोडे दिवसांनी.’ नेहमी हा विषय काढल्यावर चिडणारा मिहिर आज हसला हे बघून आईला वाटलं काहीतरी फरक तरी पडलाय, बघूया आता काय होतंय ते.
दुसऱ्या दिवशी मिहिर लवकर उठला आणि मॉर्निंग वॉक साठी गार्डन मध्ये गेला. आज सुद्धा त्याला ती मुलगी दिसली. पण तिच्याशी बोलायचं कसं हे त्याला काही सुचेना. आज सुद्धा ओळख न होता तो घरी आला. आणि आज आईने सुद्धा काही विचारलं नाही. पण गेल्या दोन दिवसापासून आपल्या मुलात काहीतरी बदल झालाय असं आईला लक्षात आलं. जवळपास आठवडाभर मिहिर लवकर बागेत जाऊन त्या मुलीशी बोलता येते का हे पाहत होता. आणि एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे मिहिर लवकर वॉकला गेला होता ती मुलगी सुद्धा आली होती. परंतु मिहिरला ती दिसली नव्हती. अचानक खूप वारा आणि पाऊस आला. बागेतच एक छोटीशी शेड होती. तिथे मिहिर पटकन धावत धावत गेला. मिहिरने बाजूला बघितलं तर तीच मुलगी जवळ उभी असल्याचे त्याच्या लक्षात आले. मिहिरला वाटलं आता आपण ओळख वाढवू शकतो. तो तिला म्हणाला, ‘ हल्ली कधीही पाऊस येतो नाही का?’ त्यावर ती त्याला म्हणाली, ‘ हो. त्यामुळे काही माणसांना बोलायची संधी पण मिळते. नाही का?’ मिश्किल हसत मिहिरकडे तिरपा कटाक्ष टाकत ती म्हणाली. हे ऐकल्यावर मिहिर जरा हिरमुसला त्याला वाटलं झालं आता आपली ओळखही होणार नाही. त्याचबरोबर मिहिर थोडासा घाबरलाही त्याला वाटल आता ह्या मुलीला आपल्या मनात काही वाईट आहे असं तर वाटणार नाही ना. तेवढ्यात ती मुलगी हसायला लागली आणि म्हणाली, ‘ एवढं गोंधळून जाऊ नका. मी काही तुम्हाला दोष देत नाहीये. मी फक्त तुमची मज्जा केली. मला माहिती आहे तुम्ही आठवडाभर बागेत येताय आणि मला पाहताय ते.’ हे ऐकून मिहिर अजून गोंधळला आणि म्हणाला, ‘ नाही हो माझ्या मनात काही वाईट विचार नव्हता. सहज मैत्री व्हावी तुमच्याशी असं वाटत होतं बाकी काही नाही तुम्हाला काही वेगळं वाटलं असेल तर तसं काही माझ्या मनात नाही. मला माफ करा.’ तर ती मुलगी त्याला हसून म्हणाली, ‘ अहो खरच नका माफी मागू. तुमच्या मनात काही वाईट विचार आहे असं मला वाटलं नाही आणि वाटणारही नाही. मुलींना वाईट नजर कळते. आणि तुमच्या नजरेत मला तसं काही जाणवलं नाही. तर आता मी तुम्हाला माझी ओळख करून देते. हॅलो, मी नेहा. तुमचं नाव काय?’ मिहिर म्हणाला, ‘ माझं नाव मिहिर. मी दररोज येतो ह्या बागेमध्ये मॉर्निंग वॉक साठी. उद्यापासून आपण दोघे एकत्र वॉक करूया का?’ नेहा चालेल म्हणाली आणि अशा रीतीने त्यांची ओळख व्हायला लागली. दररोज ते दोघे एकत्र वॉकसाठी भेटू लागले. दोघांच्यात खूप चांगली मैत्रीही व्हायला लागली. एक दिवस गप्पा मारताना मिहिरला कळले की नेहाला मोगरा खूप आवडतो. आणि हळू हळू नेहा त्याला आवडायलाही लागली होती. नेहालाही आपल्याविषयी असच वाटते का हे त्याला माहित नव्हते कारण ती खूप बोलायची पण तिच्या आवडीनिवडींविषयी किंवा तिला कसा मुलगा हवाय ह्याविषयी काही त्यांच्या गप्पा झाल्या नव्हत्या.
एके दिवशी सकाळी बागेत येण्यापूर्वी मिहिरने नेहाला आवडतात म्हणून मोगऱ्याची फुले घेतली. आणि मनात ठरवले की आज तिला सांगायचे की आपल्याला ती आवडते. तो बागेत आला तर नेहा अजून आलेली नव्हती. त्याने तिची बराच वेळ वाट बघितली आणि एकटाच वॉक करून घरी आला. त्याला थोडी काळजी वाटली तो विचार करत होता की नेहा बरी असेल ना? का बरं आली नसेल आज? तिला कळलं तर नसेल ना की आपल्याला ती आवडते? पण नाही आपण तर कधी अस सांगितलं नाही. बघू उद्या येईल तेंव्हा विचारू असा विचार करून त्याने ऑफिसच्या कामावर आपल लक्ष केंद्रित केलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा असच झालं. मिहिर एकटाच वॉक करत होता नेहा आलीच नाही. त्याही दिवशी त्याने मोगरा नेला होता. परंतु ती आलीच नसल्यामुळे त्याला खूप वाईट वाटलं. त्याने मधेच एकदा तिच्या ऑफिसचा पत्ता तिने सांगितला होता त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली तेव्हा तिथे अस कळलं की ती गावाला गेली आहे. अजून चौकशी करणं बरोबर दिसणार नाही अस वाटून तो काहीच न बोलता तिथून परत आला. असे बरेच दिवस गेले तरी नेहा आलीच नाही. काही दिवसांनी ह्याची मिहिरलाही सवय झाली. त्याला वाटल कदाचित झालं असेल काहीतरी म्हणून नाही येत ती बागेत. येईल तेंव्हा मात्र विचारायचं की नक्की काय झालं?
ह्या प्रसंगाला आता ५ ६ वर्ष होऊन गेली. मधल्या २ वर्षात मिहिरची आई त्याच्या खूप मागे लागल्याने शेवटी मिहिरने स्थळ बघायला होकार दिला होता. आईने लगेच त्याच्यासाठी अनुरूप स्थळे शोधून आणायला सुरुवात केली होती. कारण मिहिरच्या आईला भीती होती की परत ह्याचा विचार नको बदलायला. एक छान मुलगी मिहिरला सांगून आली. मिहिरला सुद्धा ती पसंत पडली आणि त्यांच लग्न झालं. आता लग्नाला साधारण 3 वर्ष होत आली होती. मिहिरला आणि त्याच्या बायकोला म्हणजेच नेत्राला बाळाची चाहूल लागली होती. एकंदरीत दोघांचा संसार अगदी सुखाचा चालला होता. मिहिरची मॉर्निंग वॉकला जायची सवय मात्र तशीच होती. आता त्याला नेहाची आठवण येत असे पण ती येतच नसल्यामुळे त्याला ती नसण्याची सवय झाली होती. पण तरीही तो बागेमध्ये आला की सवयीने ती दिसते का ते बघत असे.
एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मिहिर बागेत आला आणि अचानक नेहमीच्या जागी त्याला नेहा दिसली. तो तिच्याकडे जाणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं नेहाला मोगरा आवडतो तो पटकन जाऊन मोगऱ्याची फुले घेऊन आला. आणि नेहाकडे गेला. नेहाने त्याला बघितलं आणि तिनेही त्याला ओळखले. खूप वर्षांनी एकत्र भेटत असल्यामुळे दोघांना काय बोलाव काही सुचत नव्हतं शेवटी मिहिरनेच तिला विचारलं , ‘ नेहा, कुठे होतीस तू मी खूप दिवस वाट पाहिली तुझी. तूझ्या ऑफिसच्या पत्त्यावर गेलो तेंव्हा कळलं की तू गावाला गेली होतीस. काय झालं होत? गावी सगळ नीट आहे ना? तू कशी आहेस?’ हे सगळ ऐकून आणि मिहिरला इतक्या वर्षानंतरही आपली किती काळजी आहे हे बघून नेहा भारावून गेली. ती म्हणाली, ‘ अरे त्या दिवशी अचानक गावावरून फोन आला की आईची तब्येत बरी नाहीये गावी ये. अचानक घरी गेले ऑफिसमध्येही कळवता आलं नाही. गावी जाऊन ऑफिसमध्ये फोन करून आठवड्याभराची सुट्टी घेतली. आईला अचानक पॅरालिसिस चा अटॅक आला होता. त्यामुळे मला तिथून लवकर येता आलं नाही. ऑफिसमध्ये पण जास्त सुट्टी घेता येत नव्हती. शेवटी ऑफिसमध्ये राजीनामा दिला. आणि गावी एक नोकरी केली. घरी पण आईला सांभाळायला कोणी नव्हतं. पण आता ती बरी झाली. आणि आता तिला घेऊनच इकडे राहायला आले. सगळ आवरण्यात आठवडा गेला. आणि आता आजपासून पुन्हा वॉकला आले. बाकी तू कसा आहेस?’ मिहिरने तिला त्याचे लग्न झाल्याचे सांगितले. आणि एकदा घरी आईला घेऊन ये असे निमंत्रणही दिले. नेहाला मिहिरच्या लग्नाची बातमी ऐकून खूप आनंद झाला.
मिहिरच्या मनात आले की नेहा आपल्याला आवडत होती हे आपण तिला सांगावे का? पण अचानक त्याला वाटले की नको कदाचित आपल्या मनात तेंव्हा नेहाविषयी प्रेम होते आणि आता माझे लग्न झालेले असूनसुध्दा मी तिला हे सांगितल्यावर तिने आपल्याशी असलेली मैत्री कमी केली तर आपण एका खूप चांगल्या मैत्रिणीला गमावू आणि मिहिरला ते होऊ द्यायचे नव्हते. त्याने ठरवले की आपल्याला ही मैत्री जास्त महत्वाची आहे. त्याने हातात असलेल्या मोगऱ्याकडे पाहिले. समोर नेहा खूप दिवसांनी भेटल्यामुळे खूप बोलत होती. मिहिरने हातात असलेली मोगऱ्याची फुले नेहाला दिली. त्या फुलांचा सगळीकडे छान दरवळ पसरला होता. नेहाला मोगरा बघून आनंद झाला. मिहिर आपल्याला मोगरा आवडतो हे विसरलेला नाही ह्याचे नेहाला आश्चर्य वाटले. खूप दिवसांनी नाही वर्षांनी भेटलेले मिहिर आणि नेहाच्या खूप गप्पा झाल्या. उद्यापासून परत आपण एकत्रच वॉक साठी यायचं अस ठरवून ते दोघे घरी निघाले. पुढे गेलेल्या नेहाकडे बघून मिहिर हसला. तिला दिलेल्या मोगऱ्याच्या फुलांमधून एक फुल त्याने स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्याकडून असलेल्या एकतर्फी प्रेमाची आठवण म्हणून. मिहिरने त्या फुलाकडे पाहिले आणि हसून घरी जायला निघाला. आज त्याला खूप छान वाटत होते.