"ओ काका जरा लवकर चालवा ना टॅक्सी मला खूपच उशीर होतोय". हातातील घड्याळाकडे पाहत मीराने पुन्हा एकदा टॅक्सी ड्रायव्हरला थोडा वेग वाढवायला सांगितला.
"ओ ताई मी वेगात चालवतोय पण तुम्हाला तर मुंबईचे ट्रॅफिक माहित आहेच की मी तरी कायं करणार?" टॅक्सी चालवणाऱ्या काकांचे बोलणे ऐकून मीराने मूक गिळले आणि ती खिडकीच्या काचेतून बाहेर पहायला लागली मन मात्र अस्वस्थ होते तिचे जरा कारण आज ऑफिसच्या कामानिमित्त तिला एका मिटींगसाठी पोहचायचे होते, कधी नव्हे ते तिच्या बॉसने तिला एवढी मोठी जबाबदारी दिली होती आणि आजच नेमके तिला खूप ट्रॅफिक लागले होते.
'हे बाप्पा.. आजची मिटींग खूप महत्त्वाची आहे प्लीज मी त्या कॅफेमध्ये पोहचण्याअगोदर समोरचे क्लायंट नको पोहचू देऊ नाहीतर माझा बॉस मला खूप ओरडेल.. प्लीज बाप्पा आज सांभाळून घे. " गळ्यातील चेनसोबत खेळत मीरा एकसारखा देवाचा धावा करत होती आणि आरशातून तिची दिसणारी धावपळ पाहून ते टॅक्सी चालवणारे काका ही क्षणभर तिला पाहंत राहिले.
" ताई मला माहित नाही तुम्ही एवढ्या काळजीत का आहात ते? पण सगळे ठीक होईल आपण पोहचू लवकरचं. "
"थँक्यू काका" टॅक्सीवाल्या काकांचे आभार मानून मीरा डोळे किलकिले करत त्यांच्याकडे पाहून हसली.
'किती गोड मुलगी आहे.' त्या टॅक्सीवाल्या काकांच्या मनांत क्षणभर विचार येऊन गेला.
मीरा अगदीच कोणालाही आवडेल अशीच तर होती. नावाप्रमाणेच साजिरी अगदी या आधुनिक जगांत देवांवर श्रद्धा असलेली, पुजा करणारी, जीन्स, स्कर्ट च्या जगांत ही कॉर्पोरेट ऑफिस मध्ये साडी नेसणारी, स्वभावाने लाघवी अशी. तिच्या गोड बोलण्याने ऑफिसमध्ये देखील तिने सगळ्यांना आपलेसे केले होते. कामांत हुशार असल्यामुळेच आज बॉसने तिच्यावर जबाबदारी दिली होती आणि या मिळालेल्या संधीचे सोने करायचे होते मीराला म्हणूनच आज ती एवढी अस्वस्थ होत होती.
मीरा एकदा काचेतून बाहेर तर एकदा घड्याळात पाहत होती इतक्यात तिचा फोन वाजला.
"हॅलो वहिनी बोलss" मीराने जरा नाखुशीने फोन उचलला आणि फोनवर बोलायला सुरुवात केली आणि समोरून वहिनीचे बोलणे ऐकताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडत गेला.
"वहिनी मी आत्ता महत्त्वाच्या मिटींगसाठी जात आहे तु आईशी बोलं मी ठेवते फोन" असे म्हणतं मीराने फोन कट केला तशा तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
'बाप्पा माझं कायं चुकलं आहे रे ? का वागतात लोक माझ्याशी असं? वहिनीचा स्वभाव नवीन नाही मला पण हल्ली आई देखील वहिनी सारखं बोलायला लागली आहे. मी माझ्या कामात खूप आनंदी आहे रे. मला आता पुन्हा नात्याच्या बंधनांची कैद नको आहे पण घरचे सगळे पुन्हा मला त्या बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
बाप्पा तुला सगळेच तर ठाऊक आहे ना रे मगं तूच सांग माझं म्हणणं चुकीचं आहे का? मला ना कळतच नाही आहे की मी कसं समजावू या सगळ्यांना? ' मीरा मनातल्या मनांत विचार करत होती. ती विचारांत इतकी हरवली होती की टॅक्सी थांबली होती हे देखील तिच्या लक्षात आले नव्हते.
"ताईss.." टॅक्सीवाल्या काकांनी जोरात आवाज दिला तशी मीरा भानावर आली.
"कायं झालं?" मीराने गोंधळून विचारले.
"अहो ताई तुम्हाला जिथे जायचे होते आपण तिथेच आलो आहोत." त्या टॅक्सीवाल्या काकांचे बोलणे ऐकून मीराने काच खाली करून पाहिले आणि कॅफेचे नाव पाहून ती लगबगीने खाली उतरली. काकांच्या हातात पैसे देऊन ती कॅफेच्या दिशेने चालायला लागली.
मीरा ऑफिसने तिच्यासाठी बुक केलेल्या टेबल वर जाऊन बसली. अजून क्लायंट आले नसल्याचे पाहून तिच्या अस्वस्थ मनाची घालमेल तात्पुरती का होईना पण थांबली.
मीराने पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवली आणि लॅपटॉप बॅगमधून काढून तिने टेबलवर ठेवला. इतक्यात तिथे वेटर आला.
वेटरला थोड्या वेळाने ऑर्डर देते असे सांगून मीराने एकदा प्रेझेंटेशन चेक केले आणि लॅपटॉप पुन्हा बंद करून तिने घड्याळात पाहिले.
'एव्हाना क्लायंट यायला हवे होते खरंतर..' मीराच्या मनांत विचार चमकून गेला. ती सहज इकडे तिकडे कॅफेमध्ये पाहू लागली आणि अचानक तिची नजर एका जागेवर जाऊन स्थिरावली. केव्हापासून ते दोन डोळे तिच्याकडे नजर रोखून होते, मीराचे लक्ष गेले आणि आता त्या दोन नजरांची एकमेकांशी नजरानजर झाली.
मीरा स्तब्ध झाली. भर एसी मध्ये ही तिच्या चेहऱ्यावरून घामाचे ओघळ यायला लागले आणि हदय तर धावायला लागले होते अगदी. मीराने टेबलवरचा ग्लास तोंडाला लावला, गटागटा पाणी पिऊन टाकले आणि तिने आपली नजर वळवली.
' हा इथे कायं करतोय? आणि माझ्याकडे का पाहतोय हा? बोलू का याच्याशी की नको?' मीरा स्वतःलाच प्रश्न विचारत होती आणि दुरूनच तिची चलबिचल पाहत असलेला तो तिच्या टेबलकडे जायचे की नाही या विचारांत कितीवेळ उभा राहून तिच्याकडेच एकटक पाहंत होता.
क्रमशः
कोणं आहे तो? नक्की कायं नातं आहे मीराचं त्याच्याशी? मीरा च्या आयुष्यात असे कायं घडले आहे ज्यामुळे मगाशी ती इतकी अस्वस्थ आणि दुःखी झाली या सगळ्या गोष्टींचा कथेत उलगडा होईल त्यासाठी कथा वाचत रहा.
©ऋतुजा कुलकर्णी