मीराने एक हळूच तिरपा कटाक्ष दिला तेव्हा तिच्यापासून काहीच अंतरावर उभ्या असलेल्या त्याची आणि तिची नजरानजर झाली. त्याची पाऊले मीराच्या दिशेने येऊ लागली होती इतक्यात मीरा च्या टेबल जवळ दोन - तीन व्यक्ती येऊन उभ्या राहिल्या तसे त्याने त्याची मीराच्या दिशेने चाललेली पाऊले मागे घेतली.
"हॅलो मिस मीराss" अचानक आलेल्या आवाजाने मीरा भानावर आली आणि तिने समोर पाहिले. आज ज्या कंपनी सोबत तिची मिटींग होती ते क्लायंट तिच्या समोर उभे होते. मीराने तिची नजर वळवली आणि त्या तिघांना अभिवादन केले.
"प्लीज सीटss" मीराने सगळ्यांना बसायला सांगितले. मीरा देखील तिच्या खुर्चीवर बसली आणि लॅपटॉप ओपन करताना तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला.
"मिस मीरा सॉरी आम्हाला लेट झाला थोडा"
"मिस्टर मेहता काही हरकत नाही.. तुम्ही कायं घेणार? कॉफी, टी, ज्युस..?" मीराने मनातले भाव चेहर्यावर न येऊ देता अगदी हसून विचारले.
मीराने मिस्टर मेहतांची ऑर्डर ऐकून वेटरला कॉफी आणायला सांगितली आणि ती त्यांच्या सोबत बोलण्यात बिझी होऊन गेली.
तो मात्र अजूनही तिच्याकडे एकटक नजर लावून बसला होता. मीरा मात्र तिच्या कामात गुंतली होती अगदीच.
'ही नक्की मीरा आहे ना? हो आहे तर मीराच पण ज्या मीराला मी ओळखत होतो ती मीरा ही नाहीच मुळी. ही इथे कायं करतेयं?
इतक्या वर्षांनी आम्ही पुन्हा अशा रुपात समोरासमोर येऊ असे वाटले नव्हते कधीही.
इतक्या वर्षांनी आम्ही पुन्हा अशा रुपात समोरासमोर येऊ असे वाटले नव्हते कधीही.
ही नियती पण कमाल खेळ खेळते कधीकधी म्हणजे आत्ता कुठे मी नव्याने आयुष्य सुरू करायच्या विचारांवर ठाम झालो होतो पण या नियतीने पुन्हा मीराला माझ्या समोर आणून उभे केले. का? कशासाठी? ' तो त्याच्याच विचारांत अडकला होता इतका की त्याला समोर वेटर उभा आहे हे देखील लक्षात आले नाही.
"ओ साहेबss" शेवटी वेटरने न रहावून त्याला एक जोरात हाक मारली तसा तो भानावर आला.
"ह्म्म्म" उत्तरा दाखल तो एवढेच बोलला.
"ओ साहेब तुम्ही अजून काही ऑर्डर केले नाही. तुम्हाला काही ऑर्डर द्यायची आहे का?"
"मी वेट करतोय माझ्या मित्राचा तो आला की देईन मी ऑर्डर" त्याचे उत्तर ऐकून वेटर तिथून निघून गेला तसे त्याचे लक्ष पुन्हा मीराच्या टेबलवर गेले.
ती तिच्या क्लायंट सोबत बोलत होती. तिच्या चेहर्यावरचा तो प्रत्येक भाव याच्या मनातला गोंधळ वाढवत चालला होता. तिची बोलण्याची लकब, चेहर्यावरचा तो भाव सगळं काही बदललं होतं अगदी.
त्याने त्याचा फोनची गॅलरी ओपन केली आणि प्रायव्हेट फोल्डर मधला तिचा फोटो झुम करून तो पुन्हा पुन्हा पहायला लागला.
'इतके दिवस तू समोर नव्हती तेव्हा तुझा फोटो पाहत रहायचो पण आज समोर आहेस तरी अनोळखी वाटतं आहेस खूप तू' फोटोकडे पाहताना त्याच्या मनांत विचार तरळला आणि त्याला हसू आले. त्याने पुन्हा मीराच्या
टेबलवर नजर फिरवली तेव्हा लॅपटॉप बॅगेत टाकून ती निघायच्या तयारीत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
टेबलवर नजर फिरवली तेव्हा लॅपटॉप बॅगेत टाकून ती निघायच्या तयारीत असल्याचे त्याच्या लक्षात आले.
फोन पुन्हा खिशात टाकून त्याने तिच्या टेबलच्या दिशेने धाव घेतली अगदी.
मीरा खुर्चीवरून उठायला आणि त्याने तिला गाठायला एकच वेळ.
मीरा खुर्चीवरून उठायला आणि त्याने तिला गाठायला एकच वेळ.
त्याला इतक्या वर्षांनी समोर पाहून मीराच श्वास वरखाली होऊ लागले.
"हायsss" त्याने तिला अभिवादन केले त्यावर ती फक्त हसली.
"तू इथे?" त्याने काहीतरी विचारायचे म्हणून सुरूवात केली बोलायला.
"हो एक क्लायंट मिटींग होती म्हणून आले होते. बरं मी निघूss" तिने तिथून निघायचा प्रयत्न केला खरा पण पाऊले तर तिची देखील जड झाली होती.
"मीराss" त्याच्या तोंडातून स्वतःचे नाव इतके वर्षांनी ऐकून तिचं उरल सुरलं अवसान ही गळालं.
" ह्म्म"
"एक एक कप कॉफी घेऊया प्लीज" त्याची ती आर्जव तिला मोडता आली नाही आणि ती पुन्हा खुर्चीवर बसली.
तो मात्र तिच्या सोबत कॉफी घ्यायची या विचारानेच खूश होता खूप. त्याने वेटरला हाक मारली.
"दोन हॉट कॉफी प्लीज आणि मॅडमसाठी थोडी स्ट्रॉन्ग विथ एक्स्ट्रा क्रीम " त्याने ऑर्डर दिली तसा वेटर तिथून जायला लागला तेव्हा मीराने त्याला थांबवले.
"वेट फक्त हॉट कॉफी.. जास्त स्ट्रॉन्ग नको आणि क्रीम ही नको" वेटर तिथून गेला पण तो मात्र तिच्याकडे अनामिष नजरेने पाहत होता.
" मीरा अगं तुला तर स्ट्रॉन्ग कॉफी आवडते ना? "
" मला स्ट्रॉन्ग कॉफी आवडते नाही आवडायची घनश्याम" तिने एक उसासा घेतला आणि तिच्या तोंडातून स्वतःचे नाव ऐकताना त्याचा चेहरा मात्र उतरला.
" श्याम वरून घनश्याम... इतक्या वर्षात आपलं नातं एवढं बदललं का गं खरचं?" त्याने नजरेनेच तिला विचारले.
'बदललं तर खूप काही आहे पण याला मी एकटीच जबाबदार नाही आणि खरंतर तेव्हाही नव्हते. " तिच्या नजरेने उत्तर दिले.
" हो खूप बदलली आहेस तू अगदी अनोळखी वाटत आहेस"
"अनोळखी असणं बरं आहे कारण ओळखीचा चेहरा आणि ओळखीची माणसं खूप त्रास देतात कधी कधी नजरेला " तिच्या नजरेने पुन्हा त्याच्या प्रश्नाला उत्तर दिले.
दोघांच्याही मनांत खूप काही होतं पण मनातले शब्द ओठांवर न येता नजरेनेच बोलत होते.
क्रमशः
नक्की कोणं आहे घनश्याम? कायं नातं आहे मीरा आणि घनश्यामचे? नक्की कायं घडले आहे त्या दोघांच्या बाबतीत हे पाहण्यासाठी कथा वाचत रहा.
©®ऋतुजा कुलकर्णी