मोहाचा सापळा (भाग २)
लेखन - अपर्णा परदेशी
सुरुवातीला कमी अधिक फरकाने नकुल काही रक्कम जिंकत होता. ती जिंकलेली रक्कम पाहून तो आनंदून जायचा. अशीच जिद्द आणि चिकाटीने खेळत राहिलो तर एक दिवस आपण या खेळात कुशल होऊ आणि मोठे डाव सहज जिंकू असे त्याला वाटायला लागले होते. विदेशी नोटा त्याच्या डोळ्यांपुढे फेर धरुन नाचू लागल्या. तो आता झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागला होता.
जास्त पैसे जिंकण्याच्या हेतूने तो दिवसरात्र खेळण्यात दंग व्हायचा. त्याला वारंवार अधिक पैसे टाकण्याच्या सूचना येत. त्या मोहाला बळी पडून त्याच्या गुंतवणुकीचा आकडा वाढत चालला होता. त्यात छोटे डाव तो सहज जिंकायचा. मात्र मोठे डाव कधीतरीच जिंकत असे. त्यामुळे बहुतांशी रक्कम तो हरत चालला होता. आभासी जगातला हा एक प्रलोभनरुपी सापळा आहे, हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. सर्व जमापुंजी खेळात घालवत असल्याने त्याची आर्थिक बाजू दिवसेंदिवस ढासळत चालली होती.
श्रीमंत होण्याच्या नादात त्याचे घरा-दाराकडे दुर्लक्ष व्हायला लागले. अर्धवट डाव सोडता येऊ नये म्हणून तो ग्राहकांना विनाकारण वाट बघायला लावत असे. त्याची उदासीनता पाहून त्यांनी त्याच्या दुकानाकडे पाठ फिरवायला सुरूवात केली होती. हळूहळू त्याचे दुकान ओस पडायला लागले. परंतु, याचे त्याला काहीच सोयरे सुतक नव्हते.
खेळाच्या अधीन झालेल्या नकुलला नंतर अपयश येऊ लागले. खिशात एकही दमडी शिल्लक नव्हती. त्यातल्या त्यात दुकानातली आवक पूर्णपणे बंद झाल्याने तो मित्रांकडून, ओळखीच्या लोकांकडून पैशाची उसनवारी करू लागला. हॉटेलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे उकळू लागला. त्याच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत चालले होते.
त्या दरम्यान त्याच्या घराची स्थिती पूर्णपणे बिघडली होती. त्याची बायको सिध्दी त्याला ह्या वाईट सवयी पासून वारंवार परावृत्त करत होती. परंतु डोळ्यांवर लोभाची काळी पट्टी बांधून बसलेल्या नकुलसाठी सर्व काही 'पालथ्या घड्यावर पाणीच' होते. या सर्व नादात त्याचे आर्थिक आणि वैयक्तिक नुकसान होत असल्याचे त्याच्या लक्षात येत नव्हते.
कालांतराने दिलेले पैसे मागण्यासाठी लोक त्याच्या घरीदारी चकरा मारू लागले. याचा परिणाम अजयच्या हॉटेलवर देखील होऊ लागला होता. त्यामुळे नाईलाजास्तव अजयने त्याला त्याची पान टपरी तिथून काढायला लावली. एकाएकी त्याचे घर उघड्यावर पडले होते. त्याचे मागचे कर्तृत्व पाहता त्याला कुणी कामधंदा देईना. तो घरातच बसून राहू लागला.
संसाराचा डोलारा सांभाळण्यासाठी नाईलाजास्तव सिद्धीने पुढाकार घेतला. ती लोकांच्या घरी पडेल ती कामे करू लागली. तिला मिळालेल्या तुटपुंजा पैशात कसेबसे घर चालत होते. नकुल मात्र त्याच विळख्यात अडकून पडला होता. गमावलेला पैसा परत मिळवण्यासाठी तो मार्ग शोधू लागला. खेळ खेळण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. विचाराधीन होऊन तो नैराश्याकडे झुकू लागला.
म्हणतात ना 'विनाशकाले विपरीत बुद्धिः' माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस सारासार विचार करणे सोडून देतो. खचलेल्या मनःस्थितीत कुठल्यातरी एका स्वयं घोषित पंडिताला त्याने आपला हात दाखवला. त्या पाखंडी पंडिताने त्याला लवकरच त्याच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल असे सांगितले.
नकुलच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. पंडिताने सांगितलेल्या मुहूर्तावर एक शेवटचा मोठाच डाव टाकायचा. म्हणजे आपण एका रात्रीत श्रीमंत होऊन जाऊ व सर्व प्रश्न चुटकीसरशी मिटतील याची त्याला खात्री पटली. त्यासाठी मोठी रक्कम लागणार होती. काहीतरी खटाटोप करावा लागणार होता. त्यासाठी कोणी त्याला पैसे देईल का याचा तो विचार करू लागला. एकंदरीत पाहता त्याच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे त्याने अजयचा सहारा घ्यायचे ठरवले. बायकोचा अपघात झाल्याची खोटी बतावणी करून त्याने अजयकडून पैसे उकळले. ती संपूर्ण रक्कम त्याने डावासाठी वापरली.
पण....हाय रे कर्मा! त्याचे ग्रह आधीच फिरलेले होते. इतकी मोठी रक्कम तो पहिल्याच डावात हरून बसला. पंडिताने केलेले भाकित फोल ठरले होते. धनलक्ष्मी तर घरात आलीच नव्हती. परंतु दुसऱ्याने दिलेली लक्ष्मी देखील तो गमावून बसला होता. अगदी काही पैशांसाठी त्या पंडिताने त्याला मोठ्याच अडचणीत टाकून दिले होते.
नकुलची भावनिक व आर्थिक फसवणूक झाल्याने तो कोलमडून गेला होता. अजय तर सोडाच पण त्याला मित्रमंडळी व नातेवाईकांना देखील तोंड दाखवायची लाज वाटू लागली. तो आपले दुःख कुरवाळत बसू लागला. अपयश व एकाकीपणा घालवण्यासाठी हळूहळू तो व्यसनाधीन व्हायला लागला होता.
सिद्धी पोटापाण्यासाठी काबाडकष्ट करायची. मात्र दारुपायी नकुल तिच्याकडून ते ही हिसकावून घेत असे. दोघांमध्ये यावरून खटके उडायला लागले होते. घरात दिवस-रात्र होणारे भांडण तंटे आणि वादविवाद यामुळे विपुलच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम व्हायला लागला होता. पैश्याची चणचण ही रोजच्या वादाला कारणीभूत आहे, हे त्याच्या मनात ठासून भरले जात होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा