Login

मोहात अडकवणारा तो एक क्षण ३

पहिल्या नजरेचे प्रेम होणार काय


भाग ३

"ए दाद्या,मला बुद्धीबळ खेळायला शिकव पटकन."श्रीमेघ आपल्या भावाच्या मागे भुणभुण करत होता.

"थांब रे.अभ्यास होऊ दे."जयेश म्हणाला.

"नाही तेव्हा खेळ खेळ म्हणून मागे लागतो.आता शिकव म्हणालो तर तुला अभ्यास सुचतोय."

"मग जेव्हा शिकवतो म्हणत होतो,तेव्हा आला नाही.

"दादा आता एवढा भाव नको खास यार.माझ्याकडे जास्त वेळ नाही."

"म्हणजे कोणावर?हा कोणावर इम्प्रेशन पाडायला जायचं आहे?"जयेश त्याला चिडवू लागला.

"असं काही नाही.तू चुपचाप शिकव."

"बरं ये." जयेशने बोर्डवर खेळ मांडला.सगळ्या गोट्यांची ओळख करून देऊ लागला.

"यार किती बोर गेम आहे.किती किचकट.हा काय तर सरळ चालतो.हा काय तर तिरपा.अन् याला राजा कोणी बनवले रे? शक्तिहीन, स्वतःचे पण रक्षण करू शकत नाही, राणीच सोबत लागते." श्रीमेघचे पाणचट जोक्स सुरू झाले.जयेशला सुद्धा हसू येऊ लागले.

"अन् हाघोडा तर सगळ्यात भारी साडे तीन डब्बे सोडून लंब्या उड्या मरतो म्हणे."श्रीमेघ स्वतःच पोट धरून हसत होता. "झालं? आणि ते अडीच घर आहे, साडे तीन नाही." जयेश.

"हो हो. तू पुढे सांग."

श्रीमेघ थोडेफार बुद्धीबळ खेळायला शिकला होता. आणि ठरल्याप्रमाणे रविवारी तो स्वस्तिका सोबत खेळायला गेला.

"बरं झाला आलास.मनु सोबत खेळ. मला थोडे काम आहे." सागर.

"कळलं काय काम आहे ते.जर्नल्स लिहायचे असतील ना? तू तर पक्का जोरू का गुलाम बनणार आहेस."श्रीमेघ त्याला चिडवत म्हणाला.

"तुझी वेळ येऊ दे, मग सांगतो." म्हणत सागर तिथून पळाला.

स्वस्तिका आणि श्रीमेघ दोघेही बुद्धीबळ खेळत बसले.

"यार,ही किती स्लो खेळते.इतका वेळ तर मी अभ्यास करायला सुद्धा कधीच बसलो नाही. किती बोर करतेय." श्रीमेघ तिच्याकडे बघत विचार करत होता.

"मनु फास्ट फास्ट खेळ."

"थांब रे. विचारपूर्वक खेळायचा असतो. डोक्याची एक्सरसाईज पण होते."

"माझ्या डोक्याला मुंग्या येताय."मनोमन विचार करत होता. त्याला इतका वेळ एका जागेवर बसायची सवय नव्हती.

"ते ठीक आहे.पण मी काय म्हणतो शारिरक खेळ पण खेळायला हवे. त्याची पण तेवढीच गरज असते."

"हो."ती खेळण्यात मग्न होती.

"हो?चल मग."तो जागेवरून उठत म्हणाला.

"ते नंतर बघू.आधी हे पूर्ण कर."

"गेम ज्या पद्धतीने सुरू आहे,महिनाभर तरी संपणार नाही." तो डोक्याला धरून चुपचाप बसला.

येताजाता सगळ्यांना त्याला असे बसलेले बघून खूप हसू येत होते.

"आता कळले का कोणी हिच्यासोबत खेळत नाही." तो स्वतःशीच बडबडत होता.

"काकू ओ काकू, शुक् शुक्.." बिचारासा चेहरा करून तो स्वस्तिकाच्या आईला हळू आवाजात हात जोडत हिला बोलवा असे इशारे करत होता. आईला हसू येत होते.

"स्वस्तिका चल जेवायची वेळ झाली. आता नंतर खेळा." आईने आवाज दिला तसे स्वस्तिका गेम सोडून उठली.

"श्रीमेघ, मी जेवते आता.आपण नंतर खेळू."

"हो हो अगदी आरामात. काही घाई नाही. आपण दोन चार पाच दिवसांनी, महिन्यांनी खेळू हा.जा तू." तिच्या उत्तराची वाट न बघता त्याने बाहेर धूम ठोकली.

******

श्रीमेघचे सागरच्या घरी सगळ्यांसोबत छान संबंध प्रस्थापित झाले होते. त्याच्या खेळकर स्वभावाने सगळ्यांची मने जिंकली होती. तो आता त्यांच्या घरातीलच एक सदस्य झाला होता. सागर, सारंग सारखे घरातील सगळे त्याचा सुद्धा लोभ करत.

*****

"का रे,हिचा का एवढा गोंधळ सुरू?" श्रीमेघ घरात येत होता तर त्याला स्वस्तिकाचा आवाज येत होता.

"तिला शाळेकडून दाखवणार आहे तो मूव्ही बघायला जायचे." सागर.

"मग जाऊ द्या की. सगळेच जातात. तिला एवढे रडवत का आहे?"श्रीमेघ.

"आई नाही म्हणतेय." सागर.

"मग काकूंकडून तू तिला परमिशन घेऊन दे."

"नाही देणार ती. तुला माझी आई माहिती नाही."

"यार काकू एवढया हिटलर नाही वाटत रे. त्यांच्यापेक्षा तर आजी हिटलर आहेत." श्रीमेघ मस्करी करत म्हणाला. तसे दोघंही हसू लागले.

"मनुच्या बाबतीत ती अशीच हिटलरपणा करते."

"हम्म. मनुला मूव्हीला आपण घेऊन जाऊ."

"नाही. तिला स्कूलफ्रेंड सोबतच जायचे आहे."

"एक आयडिया."

"काय?"

" तिच्या फ्रेंड्सला इथे घरी बोलव. मूव्ही घरी लावूयात."

"तुला माहिती आहे, आमच्या घरी मित्र आलेले चालत नाही."

"मला ना हा रुलच नाही पटला. म्हणजे बघ तुझ्या, सारंग दादाच्या मैत्रिणी घरी आल्या तर चालतात आणि तिचे मित्र मात्र घरी आलेले चालत नाही. हा भेदभाव आहे. मनुला सांगतो याच्या विरोधात धरणा दे."

"ए आधीच तिचे बिनसले आहे.आणखी तिला भडकवू नको."

"नो. मुलामुलीमध्ये होणाऱ्या या भेदभावाच्या विरोधात लढायलाच पाहिजे. मी तिला साथ देणार."

"हा,मग तू डायरेक्ट घराच्या बाहेर."

"हिटलर फॅमिली. बिचाऱ्या माझ्या मैत्रिणीवर किती अन्याय करतात."तो खोटे खोटे अश्रू पुसायचे नाटक करत म्हणाला.

"मनु, हा मेघा चेस खेळायचा आला." सागर आवाज देत म्हणाला.

"अबे ए.." श्रीमेघने त्याचे तोंड दाबत त्याला बाहेर आणले.

काही दिवसांनी श्रीमेघने स्वस्तिकाच्या पूर्ण वर्गाला त्याचा घरी बोलावून एकत्र चित्रपट बघण्याचा कार्यक्रम आयोजित केला. स्वस्तिकाने सुध्दा सगळ्यांसोबत खूप आनंद लुटला. स्वस्तिकाला आनंदी बघून त्याला सुद्धा खूप आनंद होत असे.


हळूहळू श्रीमेघ आणि स्वस्तिकाची मैत्री बहरू लागली होती. त्यांच्या निरागस मैत्रीचे दोन्ही घरात सगळेच साक्षीदार होते. दोघेही एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी वाटत होते. अगदी अभ्यासापासून ते कोण कोणाला कोणत्या नावाने चिडवतात, वर्गात कोण आवडते, अशा त्यांच्या गप्पा रंगत. जे तिचे भाऊ तिला करू देत नसे, त्या सगळ्या गोष्टी ती श्रीमेघकडे मागत. आणि तो पण आनंदाने तिचा सगळा हट्ट पुरवत असे.तो तिच्यासाठी सर्वांच्या शिव्या खायचा पण तिच्या झोळीत तिला हवा असणारा सगळा आनंद टाकायचा. त्या दोघांमध्ये ती मुलगी, तो मुलगा आहे असे कधीच वाटत नसे. दोघे फक्त छान मित्र वाटत होते.


सगळी मुलं सोबतीने मोठी होत होती. श्रीमेघ इंजिनिअर झाला. मग पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तो परदेशात गेला. जयेशचे लग्न झाले, तो परदेशात स्थायी झाला. सारंगने घरच्या व्यवसायात लक्ष घातले. तर सागर एमबीए करत होता. स्वस्तिकाने तिच्या बाबांच्या ओळखीच्या कॉलेज मध्येच आर्ट घेतले होते. त्यामुळे तिला कॉलेजला जाण्याची फार गरज पडत नव्हती. फक्त परीक्षेपूर्ती ती कॉलेजला जात होती.

*****

"बे मेघ्या, दादाचे लग्न आहे. तू आम्हाला इथे पाहिजे." सागरने श्रीमेघला फोन केला होता.

"अबे आमंत्रण देत आहे की धमकी देत आहे?" श्रीमेघ.

"जे समजायचं समज, पण तू इथे पाहिजे. नाहीतर डायरेक्ट घराबाहेर व्हायचं." सागर.

"काय राव तुमचं, डायरेक्ट घराबाहेर काढायची धमकी देत असतात."

"तीन वर्ष झालीत, आला नाही. भेटला नाही. घरी सगळे तुझी आठवण काढतात."

"ओ मिस्टर, जेवढे तू घरी फोन करत नाही, तेवढे मी करतो जरा. आला मोठा.."

"तू येत आहे की नाही?" सागरचा पारा वाढला.

"चील! येतोय."

****"*"


"स्वस्तिका"मध्ये सारंगच्या लग्नाची खूप धामधूम सुरू होती. घरातील पहिले लग्न होते. पै पाहुणे जमले होते. तेवढयात बाहेर बँडचा आवाज येऊ लागला. चार दिवसाआधीच कोण वरात घेऊन आले म्हणून सगळे बघायला बाहेर आलेत. तर समोर श्रीमेघ मागे बँड वाजत होता. श्रीमेघ जबरदस्त भांगडा करत होता. त्याला बघून आनंदाने पळत जात सागर पण त्याच्या जोडीने नाचू लागला. कोणीतरी सारंगला सुद्धा ओढत आणले. नंतर घरातील सगळी तरुण मंडळी, लहान मुलं सुद्धा त्यांच्यात शिरली. सगळ्यांची धमाल मस्ती सुरू होती. स्वस्तिकाने सुद्धा जागेवर उभ्या उभ्या दोन चार ठुमके मारले होते. घरातील आनंद द्विगुणित झाला होता.


सर्वांची भेट घेऊन श्रीमेघ स्वस्तिकाकडे गेला.

"काय आजकाल पंजाबी गर्लफ्रेंड वाटते?" स्वस्तिका त्याला चिडवत म्हणाली. तो जरासा लाजला.

"ओयेहोये! पोरीने लाजणं पण शिकवले वाटते?"

"हायला तू पण मोठी झाली ग. कसली सॉलिड दिसतेय. एकदम ऐश्वर्या." श्रीमेघ तिच्याकडे बघत एक सिटी मारत म्हणाला.

"थँक्यू थँक्यू."

"पण मला बिपाशाच आवडते.सो हॉट!" तो मस्करी करत म्हणाला.

"नालायक." तिने त्याचा दंडावर दोन फटके मारले.

"यार, तुम्हा मुलींना ही मारायची फारच घाण सवय आहे. गर्लफ्रेंड छातीवर बुक्क्यांचा मार देतात आणि तुम्ही मैत्रिणी हात पाय सोडत नाहीत. मर्द को भी दर्द होता है की राव." तो आपला हात चोळत म्हणाला.

"मर्द को भी दर्द होता है म्हणे. ही एवढी बॉडीशोडी कशाला बनवली मग?"

"म्हणून काय मुलींचा मार खायचा?कुछभी यार!"

"मुलींना नुसतं इंप्रेस करायला पाहिजे, दुसरं काही नाही."

"मनु, मला ती रिताची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली."

"कोण ती तुझ्या वर्गातली?"

"हो तीच."

"असे हिरो सारखे प्रोफाइल पिक्चर लावतोस. त्यात भर म्हणजे बॅकग्राऊंडला फॉरेन लोकेशन. मज्जा आहे बाबा तुझी."

"जाम गप्पा करते. इम्प्रेशन पाडायचा प्रयत्न करते. आता मी तिला नकार देणार आहे."

" तुझी क्रश होती ना?"

"हो पण आता नाही. तिला प्रपोज केले होते तर मला हड्डी म्हणून नकार दिला होता."

ते ऐकून स्वस्तिका जोरजोराने हसू लागली.

"म्हणून हा जीमशिमचा घाट घातला होतास तर तू? काय रे ही पंजाबन कितवी गर्लफ्रेंड म्हणायची?"

"चौथी." तो कॉलर टाईट करत म्हणाला.

"एवढया अभिमानाने सांगतोय, लाज नाही वाटत तुला?"

"हा त्यात काय? जे आहे ते आहे. अपनी लाईफ खुली किताब हैं."

"पहिल्या तीन सोबत का ब्रेकअप केला?"

"पहिली वाली जामच एक्सपेन्सिव्ह होती यार. भिकारी व्हायची वेळ आली होती." तो बिचारा चेहरा करत म्हणाला.

"असेच पाहिजे. दुसरी?"

"ती जामच सावित्री होती. दिवसातून शंभर कॉल्स.बाबू खाना खाया?झोपला?उठला?ऑफिसला गेला? अती काळजी. फक्त शी करून आला का? एवढेच विचारायचे राहिले होते."श्रीमेघ

"अन् तिसरी जाम हॉट होती. मलाच सांभाळल्या गेली नाही." तो स्वतःवरच हसत म्हणाला.

"हा हा हा.." ती पोट धरून हसू लागली. " काय लव्ह स्टरीज आहेत तुझ्या!"

"याला लव्ह कुठे म्हणतात ग. वो प्यारवाली घंटी अभि बजी नही हैं."

"अजून बाकीच आजे? मग का टाईम पास करत असतोस?"

"असेच आपले. यू नो,गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची सध्या अशीच क्रेझ सुरू आहे. ते सोड तुझं काय म्हणते कॉलेज? कोणी बॉयफ्रेंड वगैरे?"

" नाही. मी डायरेक्ट लग्न करणारे.आणि दादा लोकांच्या भीतीने कोणी मुलगा बोलायला माझ्या जवळ येत सुद्धा नाही."

" ओह. तुझं नशीबच फुटकं !" तो तिला चीडवू लागला.

"पुरे. चल सगळे वाट बघत असतील."

****

सारंगचे लग्न धूमधडाक्यात सुरू होते. लग्नाचे प्रत्येक कार्यक्रम आनंदात पार पडत होता. अशातच स्वस्तिकाच्या बाबांच्या चुलत बहिणीने स्वस्तिकासाठी तिच्या नंदेचा मुलगा प्रेम सुचवला. तो सुद्धा लग्नाला आला होता. ही बातमी स्वस्तिका, श्रीमेघ पर्यंत सुद्धा पोहचली होती.

"ओयेहोये! प्रेम ही पूजा हैं.प्रेम ही जमीन, प्रेम ही आसमान, प्रेम ही हवा हैं. " तो मुलगा समोरून गेला तसा श्रीमेघ स्वस्तिकाला कोपराने धक्का मारत चिडवत होता.

"गप रे." स्वस्तिका सुद्धा लाजत होती.

"मनु, मुलगा छान आहे.मी त्याची पूर्ण कुंडली काढली आहे. तुला नक्कीच खूप सुखात ठेवेल."श्रीमेघ.

"इश्श!"

"आई आई ग!त्याच्यासमोर अशीच लाजशील तर बिचाऱ्याचा जीव जायचा.

दोघांचही पूर्ण लग्नभर एकमेकांच्या खोड्या काढणे सुरू होते.

*******
होईल का स्वस्तिका आणि प्रेमचे लग्न?

क्रमशः

🎭 Series Post

View all