Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०१)

कथा त्या अदृश्य सावल्यांची, ज्या सूड घेण्यासाठी मानवी जगात प्रवेश करत आहेत.
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०१) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे. त्याचा वास्तवाशी, कोणत्या व्यक्ती अथवा स्थळाशी काहीही संबंध नाही. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. कथा केवळ मनोरंजनात्मक उद्देशाने लिहिण्यात आलेली आहे.
_________________________________________

रात्रीची वेळ होती. किर्रर्र काळोखातसुद्धा चाहूल लागत होती. नुसती म्हणायला पौर्णिमेची रात्र होती. अगदी काळरात्र भासावी इतकी शांतता आसमंतात भरून राहिली होती. शहरापासून थोडी दूरवर छोटीशी वस्ती होती. जास्त नाही; जेमतेम दहा-बारा घरे असावीत. मात्र सर्वजण अतिशय श्रीमंत लोक होते. त्या वस्तीपासून पश्चिमेला दाट जंगल होते. पौर्णिमेच्या रात्रीही जंगलात अंधार होता. अतिउंच वृक्षांमुळे त्या जमिनीला कधी प्रकाशाचा स्पर्शही झालेला नसावा. त्या जंगलात मध्यभागी एक विस्तीर्ण तलाव होता. तलावाकाठी असणारा एक मजबूत वृक्ष आणि भयाण शांतता दर्शवणारे स्तब्ध पाणी! वरून शांत दिसणारा; परंतु उरात त्या वनांचे सर्वात मोठे रहस्य दडवलेला तो तलाव! त्या तलावाजवळील वृक्षाखाली पर्णशय्येवर ती बसली होती. तिच्याभोवती मोजताही येणार नाहीत इतक्या–म्हणजेच कदाचित लाखोंच्या संख्येत अनेक युवती जमलेल्या होत्या. तिच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या त्या लाखो युवती तिच्या सेविका होत्या.

आणि ती...
दुर्धरवनात असणाऱ्या मोहिनींच्या अदृश्य साम्राज्याची युवराज्ञी!

ती युवती स्वतःच्या पायाच्या अंगठ्याकडे पाहत विचारात मग्न होती. सर्वांना काही सांगावे या उद्देशाने तिने वर पाहिले. विलक्षण संमोहित करणारे तिचे निळेशार, जर्द जांभळी झाक असणारे डोळे पाहून सर्व मोहिनींना वातावरण प्रसन्न होत असल्याचा आभास होत होता. तिच्या गहिऱ्या डोळ्यांमध्ये त्यांचे विश्व सामावले होते. अनुपम सौंदर्य, क्षणांत संमोहित करू शकणारे डोळे आणि दैवी ताकद लाभलेली ती उठून उभी राहिली.

“सूड sss!”

तिच्या मुखातून केवळ एकच शब्द बाहेर पडला होता. जो म्हटले तर मोहिनींसाठी इशारा होता अथवा म्हटले तर आदेश! तिचे नेत्र क्रोधाने कंपित होत होते.

“केवळ मला नाही, तर आपल्या संपूर्ण साम्राज्याला सुख गमवावे लागले आहे. त्यांना असेच मुक्त करणे शक्य नाही. सूड! मला सूड हवा आहे. ज्या वेदनांनी माझ्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, तशाच... किंबहुना त्याहून दाहक वेदनांमध्ये मी त्यांना तडफडताना पाहू इच्छिते."

आपल्या युवराज्ञीच्या आदेशासाठी जीव की प्राण करण्याची तयारी ठेवणाऱ्या त्या राजनिष्ठ मोहिनी, क्षणांत कार्याला रवाना झाल्या होत्या. पायाखालील दगड अंगठ्याने तलावात उडवत ती क्रोधाने पेटून उठली होती.

“मी तुमच्या आयुष्यातील काळरात्र आहे. तुमच्यासाठी मी वेदनेचे दुसरे रूप बनेन. यापुढे क्षणोक्षणी तुम्ही केवळ पश्चाताप कराल.
केवळ पश्चाताप!
यापुढे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र मी घनघोर काळरात्र बनवेन. स्सस...!
सावध रहा.
ही रात्र वैऱ्याची आहे.”

तिची नजर गर्रकन दूर असणाऱ्या वस्तीकडे फिरली होती. तिची नजर जणू कोणापर्यंत तरी तिच्या अस्तित्वाची चाहूल पोहोचवू पाहत होती!
________________________________________
क्रमशः.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
0

🎭 Series Post

View all