डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच शलाका देवाची पूजा करून देवघरातून बाहेर येत असताना तिच्या कानावर परिचित आवाज पडला. तिची नजर चटकन बंगल्याच्या दाराकडे गेली. परिचित असा तो चेहरा पाहताच तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ती धावतच बंगल्याच्या दारापाशी आली.
“गुरुदेव!”
दारात उभी असणारी प्रौढ व्यक्ती शलाकाकडे पाहून हलकीशी हसली. पांढरीशुभ्र दाढी आणि साधी करड्या रंगाची सुती वस्त्रे असा वेश असणारे गुरुदेव शांत चेहऱ्याने तिच्यासमोर उभे होते. केसांच्या जटा मोकळ्या सोडलेल्या असल्यामुळे वाऱ्याच्या लहरींवर त्या झुलत होत्या. शलाकाने बाजूला होत त्यांना वाट मोकळी करून दिली. गुरुदेव आत येऊन त्यांच्यासाठी नेहमी सज्ज असणाऱ्या वेगळ्या आसनावर बसले. शलाकाने भरभर नोकरांना दूध आणि फळं घेऊन येण्याचा आदेश दिला आणि ती गुरूदेवांच्या आसनासमोर जमिनीवर बसली.
“बरेच दिवसानंतर आगमन झाले, गुरुदेव.”
“खरे आहे. बरेच दिवसांत तुझे क्षेमकुशल कळले नाही. म्हणून स्वतः जातीने आलो आहोत.”
“गुरुदेव, आपण कधी आलात?”
विक्रमदेवसुद्धा गडबडीने खाली येत म्हणाले.
“ते आताच आले. क्षमा करा गुरुदेव, मी आपल्या आगमनाच्या आनंदात इतरांना सांगणे विसरूनच गेले.”
शलाका ओशाळून म्हणाली.
“असो. मी काही महत्वाचे सांगण्यासाठी येथे आलो आहे.”
गुरुदेव गंभीरपणे म्हणाले. शलाका लक्षपूर्वक गुरुदेव काय सांगतात हे ऐकू लागली.
“तुझ्या नशीबातील सर्वात दुर्धरकाळ समीप येत आहे. हा येणारा काळ मृत्यूयोग आहे. येत्या काही दिवसांत तुला अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. संकट येताना सांगून येणार नाही; मात्र पूर्णतः विनाश करून निघून जाईल.”
“याकरिता काय करणे आवश्यक आहे, गुरुदेव?”
“घरातून बाहेर पडताना चौकस रहा. येणाऱ्या संकटाच्या ताकदीची कल्पना लागणे शक्य नाही.”
एवढं बोलून गुरुदेव उठून उभे राहिले. त्यांनी शलाकाकडे एक कटाक्ष टाकला व नजरेनेच तिला आशीर्वाद देत ते बाहेर पडले. तो संपूर्ण दिवस शलाका अतिशय उद्विग्न झालेली होती. तिच्या कामात सतत छोट्या-मोठ्या चुका होत होत्या. सकाळपासून पाच-सहा कप फोडून झाले होते.
रात्रीची वेळ होती. डिनरच्या वेळेला सर्वांनाच जाणवलं, की शलाका फार अस्वस्थ आहे. मात्र तिचा चेहरा पाहून कोणालाही तिला विचारायचं धाडस झालं नाही. रात्री शलाका आपल्या बंगल्याच्या सज्ज्यात उभी होती. सुंदर शांत रात्र होती. वातावरण फार प्रसन्न आणि आल्हाददायक होतं. तरीही ह्या शांत रात्री शलाकाचं मन बेफाम विचारांच्या गर्तेत हरवलं होतं. शलाका आपल्या विचारात मग्न झाली होती. इतक्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिने दचकून मागे पाहिलं.
“काय झालं गं? एवढी का दचकलीस?”
“नाही, सहजच विचारात हरवले होते. तुम्ही कधी आलात?”
“मी आताच आलो. काय झालं?सकाळपासून खूप अस्वस्थ दिसत आहेस.”
“गुरूदेवांच्या शब्दांमुळे व्यथित आहे. काय कारण असेल त्यांनी असं सांगण्याचं?”
शलाका खूप काळजीत दिसत होती.
“अर्थात कारण त्यांनाही माहित नाही. नाहीतर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं.”
“मी खूप काळजीत आहे, विक्रम. आपली तिन्ही मुलं... त्यांना काही झालं तर? मला भीती वाटत राहते. बरं, कुठे आहेत ते तिघे?”
“दिवसभराच्या श्रमाने तिघंही थकलेत. त्यामुळे थेट झोपी गेले आहेत. त्यांना काही होणार नाही. तू कशाला एवढी काळजी करतेस? शांत हो.”
विक्रमदेव तिच्या खांद्यावर हात ठेवत आश्वस्त नजरेने पाहत तिला म्हणाले.
“खरंतर अशा शांत रात्री चंद्राला पाहणं म्हणजे किती आल्हाददायक नाही का? पण हा चंद्र आज माझ्या मनाला अशांत करतो आहे. कोण जाणे का; पण ही रात्र मला काळरात्र भासते आहे. ही शांतता मला वादळापूर्वीची शांतता वाटत आहे.”
शलाका थरारून बोलत होती. तिचा कापत असणारा आवाज विक्रमदेव यांना जाणवत होता.
“तू उगीचच अती विचार करत आहेस. मनी चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ना अगदी तसं! चल, खूप रात्र झाली आहे. आपणही झोपूया.”
विक्रमदेवांसोबत शलाका ही आतमध्ये निघून गेली. पण ‘ही रात्र वैऱ्याची आहे!’ असे शब्द सतत कानात गुंजत असल्याचा भास तिला होत होता. गेली तीस वर्षे याच सज्जातून शलाकाने अनेकदा चांदण्यांनी भरलेलं आभाळ पाहिलं होतं; पण आजची रात्र चंद्र असूनही तिला जणू अमावस्याच भासत होती. शलाका आत जात होती; पण भूतकाळ वर्तमानात काय वाढून ठेवणार आहे ह्या कल्पनेने तिचं मन बैचेन झालं होतं. कदाचित भाग्य तिच्याविरुद्ध खेळ खेळायला तयार होतं.
_______________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा