Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०४)

कथा त्या सावल्यांची, ज्या सूड घेण्यासाठी मानवी जगात प्रवेश करत आहेत.
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सर्वजण नाश्ता करायला बसले. आज विक्रमदेव नाश्ता लवकर उरकून आपल्या खोलीत निघून गेले. तिन्ही मुलं आज आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होती. शलाकालाही आज त्यांच्या वागण्यात काहीतरी विचित्र वाटत होतं. अर्णव आणि सिद्धांत नाश्ता आटपून बाहेर निघून गेले. नचिकेतला आजही एके ठिकाणी मुलाखतीला जायचं होतं. त्यामुळे तोही आवरायला निघून गेला. घरातली कामं आटोपत असताना अचानक शलाका उठून उभी राहिली आणि धावतच बाहेर गेली. मालकिणीला असं धावताना पाहून सुधाही तिच्यामागोमाग धावत बाहेर आली.

“काय झालं मालकीन? धावत का बाहेर आल्यात?”

“सुधा, तुला हाक ऐकू येतेय का? दिसतेय का तुला ती?”

शलाका बंगल्याच्या बाहेर थरारून पाहत म्हणाली.

“न्हाई मालकीन. कोन दिसतंय तुमास्नी?”

सुधा बाहेर पाहत म्हणाली.

“सुधा... सुधा... मला वाचव. ती बघ, ती माझ्याच दिशेने येतेय. तिला माझा जीव घ्यायचा आहे. तिला माझं कुटुंब संपवायचं आहे. ती दिवसाही माझ्या कानात ओरडून सांगतेय, की ही रात्र वैऱ्याची आहे.”

शलाका जोरजोरात ओरडत होती. बोलता बोलता शलाका धाडकन खाली कोसळली. सुधाने धावतच विक्रमदेव आणि नचिकेतला बोलावून आणलं. सगळ्यांनी मिळून तिला तिच्या खोलीत झोपवलं आणि डॉक्टरांना कॉल केला.

_________________________________________

सिद्धांत आणि अर्णव बाहेर गेले होते. बंगल्यापासून थोडं दूरवर येत अर्णवने सिध्दार्थला जीप थांबवायला सांगितली व हातात काही साहित्य घेऊन तो खाली उतरला.

“दादा, अरे काय झालं? चालत येणार आहेस का?”

“नाही रे. तू पुढे हो, मी येतो थोड्या वेळाने; मला मंदिरात जायचं आहे.”

“का रे दादा, काय गरज आहे? खरोखर तूही हे मंदिरात जाणं वगैरे यावर विश्वास ठेवतोस?”

सिद्धांत वैतागत म्हणाला.

“हो. माझा थोडाफार विश्वास आहे आणि मॉमने जायला सांगितलंय. तू तर येणार नाहीस; मग निदान मी जाऊन येतो.”

“मॉमने सांगितलंय का? बरं, तू जाऊन ये. मी इथेच तुझी वाट पाहत थांबतो. लवकर ये.”

अर्णव निघून गेला. सिद्धांत जीपमध्ये बसूनच अर्णवच्या परतण्याची वाट पाहत होता. अर्णव येईपर्यंत काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. तो काहीवेळ मोबाईलवर काहीतरी पाहत बसला होता; पण काही वेळात त्याला त्याही गोष्टीचा कंटाळा आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. दूरवर त्याला एक जंगल दिसत होतं. त्याने आज पहिल्यांदाच त्या जंगलाकडे पाहिलं होतं. ते जंगल त्याला खुणावत होतं. जंगलातून एक प्रचंड शक्ती त्याला संमोहित करत होती. ते जंगल त्याच्याही नकळत त्याला स्वतःकडे खेचत होतं. त्याने जीप जंगलाच्या दिशेने वळवली. वेगाने त्याची जीप जंगलाच्या दिशेने जात होती. मात्र हे सर्व त्याच्या मनाने होत नव्हतं. तो भानावर नव्हताच. एका कळसूत्री बाहुलीप्रमाणे त्याला नियंत्रित केलं जात होतं.

_________________________________________
क्रमशः.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all