Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०५)

कथा सावल्यांची! अनोख्या सूडाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

शलाकाने म्लान अवस्थेतच डोळे उघडले. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड ताण जाणवत होता. डॉक्टर तिच्याकडे पाहून हसले. विक्रमदेव आणि नचिकेत डॉक्टरांकडे पाहत उभे होते.

“काही नाही. अती मानसिक तणावामुळे त्यांना चक्कर आली होती. त्यांना मी इंजेक्शन दिलं आहे. मिसेस राठोड, तुम्ही कृपया कसलाही ताण घेऊ नका. तुमची प्रकृती फारच खालावली आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे.”

शलाकाने डॉक्टरांकडे पाहून होकारार्थी मान डोलावली. विक्रमदेव डॉक्टरांसोबत बोलत बाहेर निघून गेले. तिने पाहिलं तर नचिकेत तिच्या पायाजवळ बसला होता. तिने नचिकेतला आपल्याजवळ येण्याचा इशारा केला.

“मॉम, तुला काही हवंय का?”

“नाही, काही नको. ऐक ना, तू आताच्या आता अर्णवला कॉल कर.”

“तू आता आराम करणं गरजेचं आहे.”

“दर वेळेस मी तुझं ऐकणार नाही, सोनू. लाव म्हणतेय ना? उगाच तुला माझी काळजी वाढवायची आहे का?”

“नाही गं. बरं, मी त्याला कॉल करतो.”

नचिकेतने अर्णवला कॉल केला. एक-दोन रिंगमध्ये अर्णवनेही कॉल उचलला.

“हॅलो अर्णवदादा!”

“ऐक ना नचि, तुला नंतर कॉल करू का? मी जरा गडबडीत आहे.”

“दादा, मॉमला तुझ्याशी लगेच बोलायचं आहे. ती माझं ऐकत नाही.”

नचिकेतच्या हातून शलाकाने मोबाईल जवळपास खेचूनच घेतला.

“अर्णव, तू आणि सिद्धांत कुठे आहात? बरे आहात ना? तुम्ही आताच्या आता घरी निघून या.”

“हो गं मॉम. आम्ही बरे आहोत. आमचं थोडंसं काम आहे. ते झालं की येतोच.”

“तुला सांगितलेलं कळत नाही का? आताच्या आता घरी या. कामं वगैरे राहू देत.”

“मॉम पण...”

“पण नकोय, अर्णव. आताच्या आता घरी ये. समजलंय का?”

“ठीक आहे. आम्ही लगेच येतो. जरा नचिकडे दे.”

नचिकेतने मोबाईल हातात घेतला.

“हा, बोल ना दादा.”

“नचि, मॉमच्या खोलीमधून जरा बाहेर येऊन बोलशील का?”

नचिकेत सहज चालतोय असं दाखवत रूमपासून थोडं दूर आला.

“हो, मी बाहेर आलोय. आता बोल.”

“ऐक. मी मंदिरात गेलो होतो. सिद्धांतला जीपमध्येच बसायला सांगून गेली होतो; पण सिद्धांत आता इथे नाही. त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला; मात्र नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असल्याचं दाखवतंय. आता असाच घरी आलो आणि सिद्धांत कुठे आहे असं मॉमने विचारलं, तर काय करायचं ही काळजी आहेच. त्यापेक्षा तू मॉमला समजावून सांग, की आम्ही घरापासून बऱ्याच लांब अंतरावर गेलोय. त्यामुळे यायला उशीर होईल. काहीही करून तुला मॉमला समजवावं लागेल.”

“तू काळजी करू नकोस. मी पाहतो. मला अपडेट कळवत रहा. सर्वात आधी तुझं लोकेशन मला शेअर करून ठेव. काही मदत लागली तर लगेच कॉल कर.”

होकार दर्शवत अर्णवने कॉल कट केला. नचिकेत पुन्हा खोलीत आला. शलाका त्याची वाटच पाहत होती.

“काय झालं?”

“काही नाही, मॉम. रेंज कमी जास्त होत होती. त्यामुळे बाहेर जावं लागलं. ते थोडे लांब गेले आहेत. त्यामुळे यायला थोडा उशीर होईल; पण निघालेच आहेत.”

“बरं, ठीक आहे. मला माझा मोबाईल दे जरा.”

शलाका टेबलवर ठेवलेल्या आपल्या मोबाईलकडे बोट दाखवत म्हणाली. नचिकेतने मोबाईल शलाकाच्या हातात दिला.

“मॉम, जरा वेळ आराम कर.”

“हो. काळजी करू नकोस. मला माझ्या एका मैत्रिणीला कॉल करायचा आहे. त्यानंतर आराम करेन.”

“बरं. काही लागलं तर हाक दे. मुलाखतीची वेळ तसंही टळून गेली आहे. मी घरातच आहे.”

नचिकेत दार ओढून घेत खोलीतून बाहेर गेला. शलाकाने लावलेला कॉल पलीकडून लगेच उचलला गेला.

“हॅलो!”

“हॅलो शलाका! किती दिवसांनी कॉल करत आहेस, राणी. किती बरं वाटलं!”

“अगं हो, हो. जरा हळू बोल. मुलं घाबरतील ना, जर एवढ्या मोठ्याने बोलू लागलीस.”

“नाही गं. ती घरात कुठे आहेत? ती बाहेर फिरायला गेलीत.”

“फिरायला कशी काय गेली? तू त्यांना असं फार वेळासाठी बाहेर पाठवतेस का?”

“म्हणजे? ती काय लहान आहेत का? तुला काय म्हणायचं आहे नक्की?”

शलाकाने तिला आतापर्यंत काय घडलं हे सांगितलं.

“मी काही वेळापूर्वीच शुद्धीवर आलेय. माझ्या मनात पहिलं तुला कॉल करायचं आलं.”

“शलाका, मला असा काही आभास होत नाही गं; पण मी ऑफिसला जाते ना, तिथे मला सतत माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्र घडत आहे असं वाटत राहतं.”

“म्हणजे? नक्की कसं वाटतं?”

“असं वाटतं की भले मी इतक्या माणसांत आहे, तरी कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून आहे. खूप अस्वस्थता वाटत राहते.”

“शाश्वती, मी तुला हेच सांगतेय. मोहिनी परत आल्या आहेत.”

“म...मोहिनी...”

“हो, मोहिनीच. अर्थात त्यांची ताकद तितकीही नाही, जेवढी आधी होती; परंतु त्यांच्या संमोहनात आपले प्राण कधी गमावले जातील हे कळणारही नाही.”

“आता काय करायचं? गुरुदेवांची भेट झाली म्हणालीस. ते काय म्हणाले?”

“ते म्हणाले, की संकट फार मोठं आहे. चौकस राहायला सांगितलं आहे.”

“बापरे! शलाका, दिग्विजयला माहित आहे का हे सगळं?”

“नाही. विक्रम सकाळी त्याला कॉल करत होते; पण त्याचा मोबाईल नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर आहे.”

“मीही प्रयत्न करत राहीन. त्याच्याशी काही संपर्क झाला तर तुला कळवते. तू नीट रहा. काळजी घे.”

शाश्वती म्हणाली.

“तूही स्वतःला जप. मुलांची काळजी घे आणि शक्यतो रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पाऊल टाकणं टाळा.”

शलाकाने मनातलं सगळं शाश्वतीला सांगितलं; पण तिचं मन अजूनही उद्विग्न होतं.

‘का मला इतकी चिंता वाटत आहे? का मन उद्विग्न होत आहे? खरंच काही घडणार आहे का?’

शलाकाचं डोकं विचार करून फारच दुखू लागलं होतं. शेवटी ती मोबाईल बाजूला ठेवत झोपी गेली.

_________________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all