Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ०८)

कथा सावल्यांची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ८) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

वनात जाऊन अरुंधती धावत तलावापाशी पोहोचली. त्या तलावाकाठी हात जोडून मोहिनी उभ्या होत्या. म्हणजे युवराज्ञी येथेच उभ्या आहेत, हे अरुंधतीच्या लक्षात आले होते. पाठमोऱ्या असणाऱ्या तिच्याकडे पाहून अरुंधती बोलत होती.

“आपल्या आज्ञेचे यथायोग्य पालन झाले आहे, युवराज्ञी. मी कार्य पूर्ण करून परतले आहे.”

“काय ठरले?”

“मी उद्यापासून बंगल्यावर राहायला जाणार आहे. शलाकाने तसे आग्रहाने सांगितले आहे. वनात माझ्यासोबत माझी लहान बहीणही राहते, हे मी तिला सांगितले आहे. त्यामुळे आपणासही तिथे यावे लागेल. आपण जसे ठरवले, तसेच सर्व होत आहे. आणखी काही आज्ञा असल्यास सांगावी.”

अरुंधती मान खाली घालून तिथे उभी होती. तिने अरुंधतीला हातानेच जाण्याचा इशारा केला. तिच्यामागे वळलेल्या नजरेसरशी इतर तिघीही दूर गेल्या. ती किंचित हसली आणि दूरवर दिसणाऱ्या बंगल्याकडे पाहत ती म्हणाली.

“शलाका... आज माझा आवाज तुझ्यापर्यंत नाही पोहोचणार. मी पोहचू देणार नाही; पण हे आजन्म निश्चित आहे, की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र हेच सांगेल– ‘ही रात्र वैऱ्याची आहे’. तुझी वैरी तुझ्याच समोर येण्याची वेळ समीप येत आहे.”

तिने दोन्ही हात खांद्याला समांतर आणले. तसे तिचे पाय जमिनीपासून वर जात जात ती त्या अंधारात विरून गेली.
_________________________________________

सकाळ झाली होती. सूर्याची किरणे हळूहळू आसमंत व्यापत होती. शलाका मात्र आज भल्या पहाटेच उठून धावपळ करत होती. तिची होणारी सून आणि सुनेची बहीण आजपासून बंगल्यावर राहायला येत होत्या. अर्णवसाठी शाश्वतीने सुचवलेली तरुणीही आज संध्याकाळी येणार होती. त्यांच्यासाठी दोन खोल्या व्यवस्थित लावून ठेवल्या होत्या. राहून राहून अरुंधतीची खोली अधिक सुरेख सजली आहे की नाही, याकडे शलाका अगदी डोळ्यांत तेल घालून लक्ष देत होती. कारण अर्णवची पत्नी कोणी असो; परंतु अरुंधती आपली भाग्यलक्ष्मी आहे यावर शलाकाचा विश्वास बसला होता.

“सुधा, अगं त्या मुलीसाठीही खोली व्यवस्थित लावून ठेवलीस ना? ती संध्याकाळी येणार आहे.”

“व्हय मालकीन. समदं झालया.”

इतक्यात सिद्धांतही वरच्या मजल्यावरून खाली आला.

“गुड मॉर्निंग, मॉम. मला बोलवलंस का?”

“हो. अरे त्या काय एवढ्या दूर चालत येणार का? तुला माहिती आहे ना त्या कुठे राहतात? नचिकेतला सोबत घेऊन जा आणि त्या दोघींना घेऊन ये.”

“अं...मॉम, मला नक्की माहित नाही. मी त्यांचं घर पाहिलं नाही. अरुंधती तर मला तलावाजवळ भेटली होती. तिला घर कुठे आहे हे विचारायचं विसरूनच गेलो.”

“अरे देवा! काल गडबडीत मीही विचारायचं विसरून गेले. काय रे सिद्धांत, छोट्या-छोट्या गोष्टींतही तुझं लक्ष नसतं.”

“सॉरी मॉम!”

“मालकीन, वहिनीसायब आनि तेंचि बहिन आल्यात.”

सुधा आत येऊन सांगत म्हणाली. शलाका आणि सिद्धांत हसतच हॉलमध्ये आले. हॉलमध्ये नचिकेत आणि अर्णव कसल्याशा फाईल्स घेऊन काहीतरी पाहत होते. अर्णव नचिकेतला काही गोष्टी समजावत होता. त्या दोघींना पाहताच तेही उठून उभे राहिले. शलाकाने दाराकडे पाहिलं. अरुंधती तिथे शांत उभी होती. सिद्धांतची नजर तिच्यावर अगदी खिळून राहिली होती.

“अगं ये ना आत.”

अरुंधतीने मागे मान वळवली व मागे उभ्या तिला पुढे यायचा इशारा केला. एव्हाना घरातील नोकरांनी त्यांचं सामान आत आणलं होतं. गर्द केशरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेल्या अरुंधतीने बंगल्यात प्रवेश केला व पुढे होऊन ती शलाकाच्या पाया पडली. ती खूप साधी; परंतु सुंदर दिसत होती. शलाकाच्या चेहऱ्यावर स्मितलकेर झळकली.

“देवीजी, ही माझी लहान बहीण आहे.”

अरुंधतीने तिच्याकडे इशारा केला. अरुंधतीला तिला आशीर्वाद घ्यायला खुणावावं असं वाटत होतं; पण तिला आशीर्वाद घ्यायला सांगायला ती धजावली नाही. इतके धाडस कुठून आणणार होती?

“अगं असुदे बाळा, सुखी रहा.”

शलाका अरुंधतीला म्हणाली.

“माफ करा. आम्हांला यायला उशीर झाला.”

शलाकाचं मात्र अरुंधतीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. निळाशार पायघोळ ड्रेस घातलेली ती, मान खाली घालूनच उभी होती. सर्वांच्या नजरा आपल्यावरच आहेत, हे लक्षात आल्यावर ती पुढे आली आणि तिने शलाकाच्या पायांना स्पर्श केला. रोमारोमांतून प्रसन्नता बहरत गेल्याचा एक आल्हाददायक अनुभव शलाकाला आला. तिच्या शरीरातील प्रचंड दिव्य ऊर्जा शलाकाला जाणवली होती.

“सुखी रहा! तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.”

शलाकाच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द ऐकून तींत मंद स्मित केलं आणि ती बोलली,

“मी मधुरिमा.”

तिच्या तोंडातून फक्त दोनच शब्द बाहेर पडल्यानेही वातावरण एकदम प्रसन्न झालं होतं. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या होत्या. मधुरिमा अजूनही नजर झुकवूनच उभी होती. तिच्या मनात भीती नव्हती. ती आपल्या नजरेची ताकद पूर्णतः जाणत होती.

“बाळ, तू नजर झुकवून उभी का आहेस? घाबरू नकोस. याला स्वतःचंच घर समज.”

शलाका मधुरिमाकडे पाहत म्हणाली. शलाकाच्या शब्दांनी आश्वस्त झाल्यासारखं दाखवत तिने नजर वर उचलली आणि तिथे उपस्थित सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचे डोळे निळेशार, पाणीदार डोळे होते. पाहताक्षणी कोणीही हरवून गेलं असतं. तिच्या डोळ्यांत सगळं विश्व सामावलं असावं अशा नजरेने शलाका तिच्याकडे पाहतच होती. तिच्या डोळ्यांमध्ये कोणालाही सहज सगळं विसरायला लावणारं प्रचंड संमोहन होतं. कोणालाही नजर दुसरीकडे वळवावी असं वाटत नव्हतं. अचानक काहीतरी मोठ्या आवाजाने सर्वांची तंद्री तुटली. अचानक गडगडाट सुरू झाला होता. तुफानी पाऊस कोसळू लागला होता. अधूनमधून विजाही चमकू लागल्या होत्या. वातावरणात अचानक झालेला बदल खरंच आश्चर्यकारक होता.

“बरं झालं तुम्ही लवकर पोहोचलात. आज वातावरण काही ठीक दिसत नाही. उद्या आपण लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलूया. आता तुम्ही विश्रांती घ्या. सुधा, त्यांना त्यांची रूम दाखव.”

सुधा त्या दोघींना आत घेऊन निघून गेली. शलाकाने मागे वळून पाहिलं. अर्णव, सिद्धांत आणि नचिकेत तिघेही तंद्री लागल्याप्रमाणे त्या गेल्या त्याच दिशेने अजूनही पाहतच होते. ते पाहून शलाकाला हसू आवरत नव्हतं.

“सिद्धांत, कामं नाहीत का तुला? ती तुझीच होणारी बायको आहे. किती पाहशील?”

“मॉम, किती निळेशार डोळे आहेत तिचे! बघता बघता सगळ्याचा विसर पडतोय. तिला सोडून कोणालाच बघू नये असं वाटतंय.”

सिद्धांत हरवला होता.

“सिद्धांत, काय बोलत आहेस? अक्कल तर ठिकाणावर आहे ना तुझी? मी अरुंधतीबद्दल बोलत होते.”

शलाका खूपच जास्त रागावली होती. शलाकाच्या चढलेल्या आवाजाने तिघांचीही तंद्री तुटली. तिघेही काहीही न बोलता आपापल्या खोलीत निघून गेले. शलाकाच्या मनातूनही मधुरिमा जातच नव्हती. तिचे ते निळेशार डोळे राहून राहून आठवत होते. तिने सर्वांना संमोहित केलं होतं.

____________________________________

क्रमशः.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all