Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ११)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग ११) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

इकडे गच्चीवर मधुरिमा एकटीच उभी होती. तिला आपल्यामागे कोणाची तरी चाहूल जाणवली. तिला जाणीव होती, की तिच्या संमोहनाच्या ताकदीवर तो नक्कीच न राहवून तिथे येणारच होता. मधुरिमा मागे वळली.

“काही हवं आहे का?”

“न... नाही. मी सहज आलो होतो. एवढ्यात तुम्ही दिसलात.”

नचिकेत हसत म्हणाला.

“हं.”

“मी तुम्हांला काही विचारू शकतो का?”

“हो, विचारा ना.”

“तुम्ही शिकला नाहीत का?”

“नाही. दुर्दैवाने आम्हांला आईवडील नाहीत. लहानपणापासून त्या वनातच राहत आलो. त्या घनदाट वनात पक्षी, प्राणी यांच्यापासून जितकं शिकता आलं तेवढंच.”

“परिस्थिती खरंच बरंच काही शिकवून जाते. चिंता करू नका. वहिनी आणि तुम्ही काही शिकायचं असेल तर यापुढे शिकू शकता. दादा शिक्षणाला अजिबात विरोध करणार नाही. मॉमलासुद्धा आनंदच होईल.”

“हं.”

“तुम्हांला बोलायचं नाही का?”

तिचा थंड प्रतिसाद पाहून नचिकेत म्हणाला.

“हं. मला काही वेळ एकटं राहायचं आहे. घडणाऱ्या साऱ्या घटना माझ्या आयुष्याला कलाटणी देणार आहेत. मला आत्मचिंतनाला थोडा काळ हवा आहे.”

“ठीक आहे. आपण नंतर कधीतरी बोलू.”

मधुरिमा जे काही बोलली त्यातील एकाही वाक्याचा अर्थ नचिकेतला कळला नव्हता. फक्त तिला नाही म्हणायची ताकद तिथे कोणामध्येच नव्हती. मधुरिमाकडे पाहून स्मितहास्य करून नचिकेत खाली निघून गेला.

“मला अधिक बोलताही येणार नाही, नचिकेत. घडणाऱ्या साऱ्या घटना माझ्या नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहेत. कोणावरही दया येऊन मी माझा प्रतिशोध अपूर्ण ठेवणार नाही. शलाकाच्या आयुष्यातली प्रत्येक रात्र कायम काळरात्रच राहील.”

मधुरिमा आपली तीक्ष्ण नजर समोर एकाग्र करून दूरवर पाहत होती.

______________________

शलाका विमानतळावर उभी होती. ती फक्त दिग्विजयच्या येण्याची वाट पाहत होती. दुरूनच तिला एक ट्रॅव्हल बॅग खेचत येणारा दिग्विजय दिसला.

“हेय शलाका!”

तो तिला पाहून आनंदाने म्हणाला.

“हाय डिअर! कसा आहेस?”

शलाका त्याला मिठी मारत म्हणाली.

“मी मस्त. हे काय तू एकटीच? मला वाटलेलं विक्रमसुद्धा येईल.”

“नाही रे. ते कसल्याशा डीलसाठी बाहेर गेले आहेत. चल, आपण कारमध्ये बसून बोलू.”

ते दोघेही शलाकाच्या कारजवळ आले. ड्रायव्हरने सामान उचलून कारमध्ये ठेवलं. प्रवास सुरु झाल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या.

“किती दिवसांनी येतो आहेस! दहा वर्ष झाली. आम्ही सर्वच तुझी नेहमी आठवण काढतो.”

“मलाही तुमची फार आठवण येते; पण खरंतर परत यायची इच्छाच नव्हती. ते मोहिनी आणि ऑल... त्या त्रासापासून दूर जावंसं वाटत होतं; पण आता बघ ना, डीलसाठी परत यावंच लागलं.”

“हं. मग तसं म्हटलंस, तर तुझी परत यायची वेळ चुकली आहे.”

शलाका अचानक गंभीर झाली होती.

“म्हणजे?”

दिग्विजयने कुतूहलाने विचारलं. शलाकाने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. गेल्या महिन्यापासून सुरू झालेला त्रास, गुरुदेवांचं बोलणं, सिद्धांतही अवस्था... दिग्विजयचे डोळे विस्फारले होते. मोहिनींच्या मुळावर घाव घालूनही त्या हे कसं करू शकत होत्या, हे सर्वांच्याच कल्पनेबाहेरचं होतं. काही वेळाने दोघेही काहीही न बोलता शांत बसून होते. विचारांच्या गर्तेत खोल खोल जात होते.

_________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all