डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १२) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
आज वनातल्या यज्ञाला आरंभ होणार होता. त्यामुळे मधुरिमा आणि अरुंधती फार व्यथित होत्या. ह्या मानवांना काहीतरी कारण सांगून इथून निसटणे आवश्यक होते. मधुरिमाने कारण सुनिश्चित करून अरुंधतीला तसे सांगून ठेवले. काही वेळात शलाका आणि दिग्विजय येणार होते. ते आल्यानंतर सायंकाळच्या सुमाराला तिला बाहेर पडायचे होते. दुपारच्या सुमाराला दिग्विजय आणि शलाका घरी आले होते. अरुंधतीने पाण्याचे ग्लास आणून समोर ठेवले. वेदश्री आणि मधुरिमाही आजूबाजूलाच होत्या.
“दिग्विजय, ह्या दोन माझ्या होणाऱ्या सुना आहेत आणि ती अरुंधतीची बहीण.”
दिग्विजयची नजर जशी मधुरिमावर गेली, तीही त्याच्याकडेच पाहत होती. त्याला तिच्याकडे पाहून प्रेमाची अनुभूती होत होती. आपली नजर तिच्यावरून हटवूच नये इतका तो तिच्या निळ्याशार डोळ्यांत हरवला होता. मधुरिमाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते.
“ही अरुंधती. सिध्दार्थची होणारी बायको आणि ही वेदश्री. ती आणि अर्णव सध्या एकमेकांना वेळ देत आहेत. त्यांचे विचार पटले, तर त्यांचेही लग्न लावून देऊ.”
शलाका त्याला सगळं सांगत होती.
“आणि ती तिसरी?”
दिग्विजयची नजर अजूनही मधुरिमावरून हटली नव्हती. अरुंधती तर त्याच्याकडे ह्याचे डोळे हातात काढून घ्यावे, अशा नजरेने पाहत होती.
“ती अरुंधतीची लहान बहीण आहे–मधुरिमा.”
“मधुरिमा!”
दिग्विजय आपल्याच तंद्रीत होता.
“तू काय इथेच बसणार आहेस का? उद्या दुपारी गुरुदेव येणार आहेत. मग दोन्ही सुना आणि दोन्ही मुलांचे हात पाहून ते भविष्य वर्तवतील व पुढे लग्नाचा मुहूर्त काढून देतील. उद्या गुरुदेवांशी आपल्याला इतरही चर्चा करायची आहे. त्यामुळे आज आराम कर.”
शलाकाने त्याला सांगितलं.
“हो.”
शलाका दिग्विजयला खोली दाखवायला जाणार तोच मधुरिमाची हाक तिच्या कानावर पडली.
“देवीजी...”
“काय झालं मधुरिमा? काही हवं आहे का तुला?”
शलाकालाही विचारल्याशिवाय राहवलं नाही.
“देवीजी, आमच्या मातेने माझ्या बहिणीच्या विवाहासाठी बनवलेले दागिने आम्ही आमच्या घरातच विसरून आलो आहोत. अरुंधतीची अशी इच्छा होती, की तिने ते दागिने घालावेत. मी आज जाऊन ते दागिने घेऊन येऊ इच्छिते. रात्रीपर्यंत परत येईन.”
“ठीक आहे. हवं तर ड्रायव्हरला सोबत घेऊन जा.”
“नको. त्या भागात जीप चढत नाही. चिंता करण्याची आवश्यकता नाही. माझ्या ओळखीचा रस्ता आहे. मी सुरक्षितपणे येईन.”
“ठीक आहे. सांभाळून जा. चल रे, तू का थांबला आहेस?”
शलाका आणि दिग्विजय निघून गेल्यावर मधुरिमाने अरुंधतीकडे पाहिले. तिला कळले होते, की युवराज्ञीने नेमके कारण शोधले आहे. जाता-जाता तिथे उभ्या असणाऱ्या वेदश्रीवर नजरकटाक्ष टाकून मधुरिमा त्या बंगल्याच्या बाहेर आली. वनाच्या सीमेपर्यंत येताच तिने हात पसरले व वायुमार्गाने ती वनात पोहोचली. सूर्य मावळतीला झुकला होता. मोहिनींनी समिधा गोळा करून यज्ञकुंड सज्ज केले होते. मधुरिमाने वनात प्रवेश केला. समोर झालेली सर्व सज्जता पाहून तिने स्मितहास्य केले. लाखो मोहिनी तिथे जमल्या होत्या. मधुरिमाने आधी अनुष्ठान केले. निसर्गातील सर्व शक्तींना प्रार्थना केली. निसर्गातील शक्ती मोहिनींना शक्ती प्रदान करतात अशी मान्यता होती. त्या सन्मानार्थ अनुष्ठान केले जायचे. त्यानंतर ती यज्ञकुंडाजवळ आली. त्यांच्या विद्येचे मंत्र पुटपुटायला सुरू करून यज्ञकुंडात पहिली आहुती दिली. तसेच मंत्रपठण करून दुसरी आहुती तलावाच्या पाण्यात दिली. आहुतीचे द्रव्य त्या पाण्याला स्पर्श करताच त्या तलावाच्या पाण्यातून अंतराग्नी जणू उसळला होता. त्या पाण्यात काही क्षणांसाठी सागराप्रमाणे लाटा निर्माण झाल्या होत्या. ते पाहून आहुती सफल झाली हे सर्वांच्याच लक्षात आले.
“पहिली आणि दुसरी आहुती सफल झाली आहे. हा प्रतिशोधाचा यज्ञ पूर्ण होताच या दुर्धरवनात रक्ताचे सडे पडतील. ह्याचा अंत हा मृत्यूचक्राचा आरंभ असेल. पद्मिनी, या यज्ञात अहोरात्र यज्ञकुंडाजवळ बसून दर प्रहरी तुला आहुती द्यायची आहे. आजपासून पुढच्या पाच दिवसापर्यंत हे चक्र अविरत चालू राहील ही जबाबदारी तुम्हां सर्वांची आहे.”
सर्वांनी होकारार्थी माना डोलावल्या. पद्मिनीने यज्ञकुंडाजवळचे आसन ग्रहण केले होते. इतर सर्व मोहिनींनी मधुरिमासोबत आपल्या शक्ती एकत्र करत दुर्धरवनाच्या मध्यभागी असणारा तो मोहिनींचा प्रदेश शक्तीकवचाने सुरक्षित केला. मोहिनींच्या आज्ञेशिवाय आता एक चिटपाखरूही त्या प्रदेशात प्रवेश करू शकणार नव्हते. मोहिनींनी आपल्या ताकदीने अफाट संघर्षाला सुरुवात केली होती.
सर्व काही पार पडल्यावर रात्रीच्या सुमाराला मधुरिमा परत बंगल्यात जायला निघाली. याहून काही महत्वाची कार्ये तिला पार पाडणे आवश्यक होते. रात्री साडेआठच्या सुमाराला हातात एक-दोन दागिने घेऊन ती परतली. ती आतमध्ये आली तेव्हा सर्वजण डायनिंग टेबलजवळ जमले होते.
“मधुरिमा, कुठे गेला होतात?”
नचिकेतने तिला एवढ्या उशिरा परतताना पाहून विचारले.
”मी घरी गेले होते. हे दागिने आणले आहेत.”
त्या दागिन्यांकडे पाहून इतरजण अवाक झाले होते. दोनच हार होते ते; पण इतक्या गरीब असूनही इतके बहुमोल आणि दुर्मिळ रत्नांचे हार तिच्या हातात होते.
“तुझ्याकडे रत्नहार कोठून आले?”
“मला ज्ञात नाही, देवीजी. आमच्या मातापित्याने आमच्या विवाहासाठी बनविले होते. ते कोठून आले हे ज्ञात नाही.”
मधुरिमाने भोळेपणाचा आव चांगलाच वठवला होता.
“वॉव! किती अमेझिंग नेकलेस आहेत हे! मधुरिमा, नेकलेस तर दोन आहेत ना तुझ्याकडे... एक अरुंधतीला ठीक आहे, एक मला देशील का?”
वेदश्री पुढे येत म्हणाली. तिकडे अर्णवने डोक्यावर हात मारला. काय पण जोडीदार भेटली होती! एका हिऱ्यांच्या व्यापाराशी लग्न करणार असून एका हाराचा काय तो मोह!
“मी देणार नाही. ते माझ्या मातापित्याने बनवलेले आहेत. मला तुला नाही द्यायचे.”
अरुंधती मधुरिमाच्या हातून हार घेत म्हणाली.
“ते इतकेही काही बहुमोल नाहीत. तसंही मी ह्या घरची होणारी मोठी सून आहे. तुम्ही माझा अपमान नाही करू शकत.”
वेदश्री रागातच म्हणाली.
“मी देणार नाही. काय करायचे ते कर.”
अरुंधतीही हट्टाला पेटली होती.
“वेदा, अगं मी तुझ्यासाठी छान नेकलेस बनवून आणेन. मॉमकडेही आहे. तोही आम्हीच बनवला आहे. डायमंड नेकलेस आणू. चालेल ना? उगाच भांडू नका.”
अर्णव वेदश्रीला समजावत म्हणाला. तीही तोंड फुगवून खुर्चीवर बसली. दिग्विजयसमोर त्यांनी असं भांडणं शलाकाला आवडलं नव्हतं; पण मधुरिमाकडे पाहून पुन्हा तिचा मूड ठीक झाला.
“मॉम, गुरुदेव कधी येणार आहेत?”
सिद्धांतला अचानक आठवलं.
“उद्या दुपारी.”
“का रे? तुला लग्नाची जास्तच घाई झालेली दिसतेय.”
दिग्विजय हसत म्हणाला.
“तसं नाही, काका. मी फक्त विचारलं. मग उद्या ऑफिसला जाता येणार नाही.”
हसत, गप्पा मारत जेवण करून सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले होते. शलाका विक्रमदेवांना कॉल करत होती. कामानिमित्त बाहेर गेलेले ते अजून आले नव्हते. अरुंधतीने मधुरिमाला आपल्या खोलीत येण्यास खुणावले. खोलीत गेल्यावर दरवाजा बंद करत अरुंधती म्हणाली,
“युवराज्ञी, आपल्याशी काही बोलायचे आहे.”
इतक्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला. अरुंधतीने दरवाजा उघडला. बाहेर वेदश्री उभी होती.
“मूर्ख आहेस का तू? ह्यावेळी एवढ्या मोठ्याने आवाज करून सर्वांना उठवायचे आहे काय?”
अरुंधती तिला आत घेत म्हणाली.
“काय वैजयंती, एका हारासाठी तुम्ही घर डोक्यावर घेतले.”
मधुरिमा हसत म्हणाली.
“युवराज्ञी, तुमचीच आज्ञा होती, की शाश्वतीच्या त्या ऑफिसमध्ये काम करायला लागायचे आणि इथे आल्यावर अरुंधती आणि माझ्यात सतत वादग्रस्त वातावरण दिसणे आवश्यक आहे. माझे कुठे चुकले का?”
वेदश्रीच्या अवतारात असलेल्या वैजयंतीने विचारले.
“नाही. अभिनय उत्तम करत आहात. आदर्श सुना!”
मधुरिमा हसत म्हणाली.
“असो. युवराज्ञी, मी आपणाला हे विचारण्यास आले होते की आता काय करावे? त्या गुरुदेवाला माझा आणि वैजयंतीचा हात पाहता येणार नाही हे आपण जाणता. आपण मोहिनी आहोत. एक यत्किंचित सावली! आपणाला तोपर्यंत शरीर प्राप्त करता येणार नाही, जोपर्यंत आपला विवाह होत नाही; पण जर त्याने माझ्या किंवा वैजयंतीच्या हातालाही स्पर्श केला तरी तो ओळखेल की आम्ही मानव नाही.”
अरुंधती अतिशय व्यथित होऊन बोलत होती.
“चिंता नको. मी आहे. ह्याचा बंदोबस्त...”
इतक्यात मधुरिमाने कानोसा घेतला व तिने वायूवेगाने येत दरवाजा उघडला. बाहेर सुधा थिजल्यासारखी उभी होती. सर्व बंगला झोपला असून सुधा जागी होती. ती काहीतरी घ्यायला पुढच्या खोलीत जात होती. इतक्यात तिला ह्या खोलीतून आवाज ऐकू आला. तिच्या चेहऱ्यावरून तिने अरुंधतीचे बोलणे ऐकले आहे ह्याची मधुरिमाला खात्री पटली. तिने सुधाला हाक मारली.
“सुधा.”
मधुरिमाने अतिशय मधुर आवाजात हाक मारली. सुधाने तंद्री भंग करून तिच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यांत पाहताच ती तिच्या हुकुमाची ताबेदार झाली होती. मधुरिमाने तिला आत येण्यास सांगितले. ती आत आल्यावर तिने दार लावून घेतले.
“वैजयंती, हिला घेऊन तू ताबडतोब निघ. हिला जंगलाच्या मध्यभागातील मोहिनींकडे सुपूर्त कर व येताना तलावाकाठच्या वृक्षांची काही पाने घेऊन ये.”
वैजयंतीने आज्ञापालन करत एक हात खांद्याला समांतर आणला. दुसऱ्या हाताने सुधाला पकडून ती आकाशमार्गे वनात पोहोचली. इकडे मधुरिमाने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. आभाळाकडे बोट करत तिने पाण्याच्या तलावात फिरवावे तसे हवेत बोट फिरविले. ती जणू निसर्गाला इशारा देत होती. त्यांचे कार्य पूर्ण होणे अती आवश्यक होते. क्षणात आभाळ भरून आले व ढगांच्या कडकडाटासह तुफानी पाऊस पडू लागला. पर्जन्याच्या धारा तुफान वेगाने कोसळत होत्या. अर्थातच शक्तीकवचाने बद्ध प्रदेशात प्रवेश करण्याची त्यांची ताकद नव्हती. यज्ञ पूर्णत्वाला जाणे कोणी रोखू शकणार नव्हते.
“रागिणी.”
मधुरिमाने हाक दिली. तिचा मधुर आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोहचू शकला नाही; पण जिला तिने आवाहन केले तिच्या कानापर्यंत पोहोचला होता. तिच्यासमोर खोलीत एक काळा धूर पसरला. हळूहळू त्या धुराने एकत्र होत मानवरूप धारण केले. ती सावली, तिची एकनिष्ठ मोहिनी तिच्यासमोर आली होती.
“काय आज्ञा आहे, युवराज्ञी?”
रागिणीने विचारले.
“रागिणी, मी तुला आदेश देते, की या बंगल्याच्या आसपास कोणीही साधू, मुनी, ज्योतिषी, तांत्रिक अशा कोणालाही फिरकू देऊ नकोस. त्या मांत्रिकाला तर नाहीच नाही. कोणीही मानव अथवा पशुही बंगल्याच्या आसपास फिरकता नये. पुढील तीन दिवस तुला अहोरात्र ही कामगिरी पार पाडायची आहे.”
“जशी तुमची इच्छा!”
क्षणात ती तिथून गायब झाली. ती आपले कार्य व्यवस्थित करेल ह्याबद्दल मधुरिमा निःशंक होती. अरुंधतीने अतीव निष्ठेने मधुरिमाकडे पाहिले व डोळे मिटून हात जोडले. तिची युवराज्ञी गेली बारा वर्षे अतिशय कष्टाने हा योग जुळून यायची वाट पाहत आहे, ह्याची तिला जाणीव होती. अरुंधतीच्या पापण्या लवतात न लवतात तोच मधुरिमा तिथून अदृश्य झाली होती. निश्चित मनाने अरुंधती कामाला लागली.
वैजयंतीने सुधाला मोहिनींच्या हाती सोपवून, हातात तलावाकाठच्या झाडाची पाने घेऊन, पहाटे आकाशमार्गेच खोलीत प्रवेश केला. तिथे एका मंचकावर मधुरिमा बसली होती. वैजयंती तिच्यासमोर हात जोडून उभी राहिली. मधुरिमाने आपले डोळे उघडले. तसे वैजयंतीने तिच्यासमोर दोन्ही हात पुढे करत, त्यात असलेली पाने तिला दाखवली. मधुरिमाने मंद स्मित केले.
“पावसामुळे तू भिजली आहेस. तू जाऊन वस्त्र वाळव. निदान आपण मनुष्यवस्तीत असताना त्यांना संशय येऊ शकतो. दुसरी वस्त्रे परिधान करून मग तू आपल्या खोलीत जा आणि ती पाने त्या तबकात ठेवून जा.”
मधुरिमा समोर असणाऱ्या तबकाकडे पाहत इशारा करत म्हणाली. वैजयंती आज्ञेप्रमाणे निघून गेली. मधुरिमाने ती पाने हातात घेतली. तिच्या हातातील अंगठीचा स्पर्श होताच त्या पानांचा हिरवाजर्द रंग, गडद लाल रंगात परिवर्तीत झाला. तिने हातातील निळ्या खड्याच्या बहुमोल अंगठीकडे पाहिले. असा हिरा शोधून सापडणे नाही, हे तिला माहित होते. ह्या अंगठीकडे पाहता पाहता तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील प्रसंग तरळून गेला व तिच्या डोळ्यांत अवचितच पाणी आले. निग्रहाने ते अश्रू पुसत तिने ती अंगठी एकवार पाहिली. तिने तसे निरखून पाहताच ती अंगठी हवेतल्या हवेत अदृश्य झाली. वैजयंतीही दुसरी वस्त्रे परिधान करून वेदश्रीच्या रूपात आली होती. मधुरिमाच्या हातातील लाल पाने पाहून ती काय समजायचे ते समजली. भयाण मध्यरात्री मोहिनी खेळाचे नवे फासे टाकत होत्या.
“अलकनंदा.”
मधुरिमाने पुन्हा साद घातली. पुन्हा एकदा खोली काळ्या धुराने भरून गेली व अलकनंदा तिच्यासमोर मानवरूपात प्रगटली. अलकानंदाने मानवरूप धारण करताच तिच्यासमोर मान झुकवून हात जोडले.
“अलकनंदा, ही लाल पाने तुला तुझ्या कमरबंदात नीट गुंफायची आहेत. तू तसे करताच तुला रूप बदलता येईल. मी सांगेन ते रूप धारण करायचे आहे.”
तिने आज्ञेचे पालन करत ती पाने आपल्या कमरबंदात नीट गुंफली. मधुरिमाने तिला सुधाचे रूप धारण करायला सांगितले व वैजयंतीला तिने अलकनंदाला सुधाचे स्वरूप समाजावून सांगायला सांगितले व ती खोलीतून बाहेर पडली.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा