Login

मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १३)

कथा सावल्यांच्या प्रतिशोधाची!
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १३) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई

दुसरा दिवस उजाडला. सर्व काही आटोपून सर्वजण निवांत दिवाणखान्यात बसले होते. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस अजूनही पडतच होता. एवढा वादळी पाऊस अचानक कसा सुरू झाला, ह्याचा विचार करून करून शलाकाही थकली होती.

“श...ला...का...”

          शलाकाच्या कानावर हाक पडली. ती धावतच अंगणात आली. विक्रमदेव बंगल्याच्या पायरीवर पडून होते. त्यांची अवस्था पाहून शलाका घाबरली. ते पूर्णतः भिजले होते. ते तापसवेशात होते. गडद केशरी रंगाची ती वस्त्रे जागोजागी फाटली होती. केस पिंजारले होते. शलाकाने सिद्धांत आणि अर्णवला हाक देत बोलवले. त्यांच्या साहाय्याने शलाका विक्रमदेवांना खोलीपर्यंत घेऊन गेली. ते थोडे फ्रेश झाल्यावर सर्वजण त्यांच्या खोलीत एकत्र आले होते. काय झाले हे जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच होती. मधुरिमाही काहीशी साशंक नजरेने पाहत विचार करत होती. अचानक तिला काहीतरी आठवल्यासारखे झाले व परत तिच्या चेहऱ्यावर नितांत शांतता दिसू लागली.

“विक्रम, काय झालं? काय हालत करून घेतलीय स्वतःची? कालपासून सतत कॉल करतेय. कॉल रिसिव्ह का नाही केला? तीन-चार दिवस बाहेर गेला आहात, ते आज परतत आहात. तेही ह्या वेशात...”

“मॉम, रिलॅक्स! त्यांना उत्तर द्यायला वेळ तर दे.”

अर्णव वैतागत म्हणाला.

“शलाका, मी शहरातून परवाच निघालो. एका मोठ्या असामीसोबत हिऱ्यांचे डील झाले आहे. त्यांना हवे तशा घडणावळीचे हिरे पाहण्यासाठी मी पुन्हा घरी परतत होतो; पण हा तुफानी पाऊस आणि वादळी हवामानामुळे मी घरी न येता गुरुदेवांच्या आश्रमात गेलो. माझी वस्त्रे भिजलेली असल्याने मी तापसवस्त्रे परिधान केली आणि पावसाचा प्रभाव थोडा कमी झाल्यासारखा वाटल्यावर मी घरी यायला निघालो. मात्र जंगलाची सीमारेषा पार करताच पावसाचा जोर परत वाढला; पण मला तिथून आपला बंगला दिसत होता. म्हणून मी नेटाने पुढे यायला निघालो, आणि...”

           विक्रमदेव घाबरल्याचे शलाकाच्या लक्षात येत होते. तिने त्यांना ग्लासातून पाणी प्यायला दिले. पाणी पिऊन विक्रमदेव पुढे सांगू लागले.

“मला समोर दिशा धुरकट दिसत होत्या. समोर काळा धूर पसरला होता, जो मला अफाट ताकदीने बंगल्यापासून दूर नेऊ पाहत होता. माझ्या शरीरातील त्राण संपले होते. काही वेळाने तो काळा धूर निघून गेला व मी कसातरी धडपडत इथपर्यंत पोहोचलो.”

           रागिणी आपले काम अतिशय योग्यरीत्या पार पाडत आहे, हे पाहून मधुरिमाच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. अरुंधतीने सिद्धांतचा तर वैजयंतीने म्हणजेच वेदश्रीने अर्णवचा विश्वास संपादन केला होता. अलकनंदा सुधाच्या रूपात घरात वावरत होती आणि रागिणी काळ बनून बंगल्याच्या आसपास येण्यापासून प्रत्येकाला रोखणार होती. मोहिनींनी आपले जाळे योग्यप्रकारे पसरवले होते.

“किती वाट बघायची तुझी, विक्रम??मी काल दुपारी आलोय; पण तुझा काही पत्ताच नव्हता.”

दिग्विजय म्हणाला.

“काय करू मित्रा? आपल्याला नियतीने विचित्र फेऱ्यात अडकवले आहे.”

विक्रमदेव गुढपणे म्हणाले; परंतु ते काय म्हणू पाहत आहेत हे दिग्विजय आणि शलाकाला कळले होते.

“डॅड, हे काळा धूर काय होतं? माझ्या मनात अजून एक प्रश्न आहे. मागच्या वेळेस मॉम म्हणाली त्याप्रमाणे ते दोघेच हे सर्व करत आहेत. ते दोघे कोण आहेत, डॅड?”

            नचिकेतच्या प्रश्नासरशी शलाकाच्या चेहऱ्यावर चलबिचल दिसू लागली.

“नचिकेत, तुझ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची ही वेळ आहे का? तुमचे डॅड खूप थकून आले आहेत. त्यांना आराम करू द्या. तुम्ही सगळे बाहेर जा.”

शलाकाला रागावलेले पाहून सर्वजण खोलीतून बाहेर पडले.

“विक्रम, ही गोष्ट माझ्या ध्यानात आलीच नव्हती. हे ती दोघे तर करत नसतील?”

“कसं शक्य आहे?”

“का शक्य नाही, विक्रम? तुला काय वाटतं एवढा प्रखर संघर्ष इतर कोण करू शकतं?”

दिग्विजयलाही शलाकाच बोलणं पटलेलं होतं.

“विक्रम, मी आज दुपारी गुरुदेवांना अरुंधती-सिद्धांतचा आणि वेदश्री-अर्णवचा विवाह योग जुळवून आणायला बोलावले होते. ते बंगल्यावर पोहचू नयेत आणि घरात शुभकार्य होऊ नये म्हणून तर हे त्या दोघांचे कारस्थान नसेल ना?”

“कदाचित शुभकार्य पार पडल्याने त्यांच्या कामाला अडथळा निर्माण होऊ शकतो.”

दिग्विजय शांतपणे म्हणाला.

“तुमच्या बोलण्यात मला तथ्य जाणवू लागले आहे.”

विक्रमदेवसुद्धा विचारांत पडले.

“आता मला सर्व स्वतःच करावे लागेल.”

शलाका विचार करत म्हणाली.

“काय करणार आहेस तू?”

“कळेलच. विक्रम, बरं वाटत असेल तर माझ्यासोबत बाहेर चला. दिग्विजय, तूही ये.”

       विक्रमदेव, दिग्विजय आणि शलाका खोलीतून बाहेर आले. सर्व मुले दिवाणखान्यात चिंताग्रस्त चेहऱ्यांनी बसून होती.

“विक्रम, अरुंधतीला तर तुम्ही पाहिलेच आहे. मी तुमची अर्णवच्या होणाऱ्या पत्नीशी ओळख करून देते. ही वेदश्री, अर्णवची होणारी पत्नी. शाश्वतीच्या ऑफिसमध्ये  काम करत होती आणि...”

वैजयंतीने पुढे होऊन विक्रमदेवांचा आशीर्वाद घेतला.

“अरुंधती, मधुरिमा कुठे आहे?”

शलाकाने विचारलं.

“ती आपल्या खोलीत असेल, देवीजी. आपण थांबा. मी बोलावून आणते.”

            अरुंधती आत जायला निघणार तोच तिला पैंजणांचा मधुर आवाज ऐकू आला. मधुरिमा त्यांच्याच दिशेने येत होती. मधुरिमाच्या रोमारोमात भारलेल्या मोहिनीने सर्वच आकर्षित होत होते. हे पाहून अरुंधती आणि वेदश्रीच्या चेहऱ्यावर मात्र हास्य उमटले होते.

“विक्रम, ही मधुरिमा.”

शलाकाने म्हटलं. मधुरिमानेही पुढे होऊन विक्रमदेवांच्या पायांना स्पर्श केला. त्यांनाही शरीरातून एक रोमहर्षक लहर गेल्याचे जाणवले. रोमारोमांतून पवित्रता वाहत असल्याचा भास झाला. मधुरिमाने त्यांच्याकडे पाहिले. त्यांनाही तिच्या नजरेत समुद्र सामावला असल्याप्रमाणे तिचे डोळे खूप गहिरे आणि खोल असल्याप्रमाणे वाटले.

“सिद्धांत आणि अर्णव, तुमचे उद्याच लग्न होईल आणि गुरुदेव येऊ शकत नसले तरी आपण कोणा पंडिताला बोलावून तुमचा विवाह लावून देऊ. या घरात शुभकार्य होणे आता गरजेचे झाले आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या घरातील एक सदस्य पौरोहित्य करतात. आपण त्यांना बोलवून लग्न लावून देऊ.”

“पण मुहूर्ताचं काय मॉम?”

नचिकेत शलाकाच्या अचानक झालेल्या निर्णयाने गोंधळला होता.

“कसला मुहूर्त आणि काय? सर्वच दिन शुभ मानायचे. ते काही नाही. आज हे होणे अतीव आवश्यक आहे.”

            शलाकाच्या म्हणण्यानुसार उद्या विवाह होणार हे ठरल्याचे पाहून दिग्विजयच्या मनात चलबिचल होऊ लागली. जणू काहीतरी विचित्र घडू पाहत होते याचा आभास होता तो! शलाकाने अरुंधती आणि वेदश्रीला आपल्याजवळ बोलावलं. एवढ्या तुफान पावसात बाहेर जाणे, लग्नाची खरेदी करणे तर शक्य नव्हते.

“मुलींनो, तुमची लग्न मला फार थाटामाटात करायची होती; परंतु निसर्ग साथ देऊ पाहत नाही. काही झालं तर तुमची लग्न उद्याचं होणं गरजेचं आहे. तेव्हा मी स्वतःसाठी मागवलेल्या काही महागातल्या साड्या तुम्ही पाहून घ्या. त्यातील तुम्हाला जी आवडेल ती पसंत करा. चालेल ना?”

“मला काहीच हरकत नाही, देवीजी. जी तुम्हांला आवडेल ती मला दिलीत, तरी चालेल.”

             शलाकाला अरुंधतीचा साधेपणा फार भावला होता. वेदश्री मात्र कुठली साडी घ्यावी याचा विचार आतापासूनच करताना दिसली. शलाका त्या दोघींना घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. विक्रमदेवही आराम करायला निघून गेले. तिन्ही मुलंही उद्याची तयारी करण्यासाठी निघून गेली. दिवाणखाण्यात आता फक्त मधुरिमा आणि दिग्विजय बसले होते. मधुरिमाही जायला निघणार, इतक्यात दिग्विजयची हाक तिच्या कानावर पडली.

“आपण हाक दिलीत का?”

मधुरिमाने मागे वळत विचारलं.

“हो. तुझ्याशी काही बोलायचे होते.”

‘मूढ मानवा, तुला माझ्याशी का बोलायचे आहे? तुला ज्ञात तरी आहे का, की तू कोणाकडे ह्या विखारी नजरेने पाहत आहेस? शक्य असते तर इथेच तुझा अंत करता आला असता; परंतु मी तसे करणार नाही. माझ्या एकाही मोहिनीने तुझी माझ्याकडे असणारी ही नजर पाहिली, तर त्या तुझी दृष्टी नाहीशी करून टाकतील.’

मधुरिमा आपल्या मनात विचार करत होती; परंतु तिचे डोळे अजूनही त्याच्यावरच रोखलेले होते.

“काय झालं? तू ठीक आहेस ना?”

दिग्विजय उठत म्हणाला.

“हो. बोला ना... काय बोलायचे होते तुम्हांला?”

“आता इथे नाही. आज रात्री सर्वजण झोपल्यावर मला वरती भेटशील का?”

“का? इथे बोलायचे नाही असे काय बोलायचे आहे तुम्हांला?”

मधुरिमा आपली नजर शांत करत म्हणाली. तिची शांत आणि गूढ नजर समोरच्यावर सगळ्यात मोठा वार होता. दिग्विजयला कुठेतरी खोल समुद्रात डुंबत असल्याचा आभास सतत होत होता.

“ते आता नाही सांगता येणार. भेटशील ना? फक्त इतर कोणालाही न सांगता भेट.”

“ठीक आहे. प्रतीक्षा करा. मी येईन.”

           होकारार्थी मान डोलावत दिग्विजय खुशीतच आपल्या खोलीत निघून गेला. तिथेच साफसफाई करत असणारी सुधा मधुरिमासमोर आली.

“युवराज्ञी, तुम्ही आज्ञा तर द्या. या अधमाला क्षणांत नष्ट करून टाकू.”

सुधाच्या रूपात असणारी अलकनंदा मुठी आवळत म्हणाली.

“अलकनंदा, शांत हो. आल्यापासून ह्याचे आणि शलाकाचे संवाद प्रमाणापेक्षा जास्त वाटत आहेत. तेव्हा ह्याचाही त्या घटनेशी काहीतरी संबंध नक्कीच आहे. तो शोधण्यासाठी मला याला भेटणे आवश्यक आहे. तू चिंता करू नकोस. हा मर्त्य मानव मला हानी पोहचवू शकेल का?”

मधुरिमा क्रूर हसत म्हणाली. तिला प्रतीक्षा होती रात्रीची! त्यांच्या संघर्षाचे खूप मोठे वळण त्यांची प्रतीक्षा करत होते.

_______________________________________
क्रमशः.


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all