डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १४) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. दिग्विजय भिजत गच्चीवर उभा होता. रात्रीचे दीड वाजून गेले होते. सगळे शांत झोपले असल्यामुळे बंगल्यात नितांत शांतता होती. राहून राहून दिग्विजयचे लक्ष समोरच्या वनाकडे जात होते. ते वन अतिशय गूढ आणि भयाण दिसत होते. आपण भिजू नये म्हणून मधुरिमा अरुंधतीकडून छत्री घेऊन वर आली होती. कारण तिला माहित होते, ती अशीच आली तर पावसाचे थेंब तिला वगळून इतर सर्वत्र पडतील. त्यामुळे दिग्विजयला सहज लक्षात येईल की ती मोहिनी आहे.
“दिग्विजयजी.”
तिने हाक दिली.
“या. किती वेळ वाट पाहतोय तुमची! आता याल असं मला वाटलंच नव्हतं.”
“मी दिलेला शब्द पाळते. वचन हे पूर्ण करण्यासाठीच असते. मला आयुष्यातले प्रत्येक वचन पूर्ण करायचे आहे.”
दिग्विजयला ती नक्की कशाबद्दल बोलत आहे हे लक्षात न आल्याने तो फक्त हसला.
“आपण कशाकरिता बोलावले होते?”
“मधुरिमा, तुला माहित आहे विक्रम, शलाका, मी आणि शाश्वती आम्ही चौघे मित्र गेली बारा वर्षे या व्यवसायात भागीदार आहोत. शाश्वती, विक्रम आणि शलाका हे लग्न करून सेटल झाले. मीही सेटल व्हायचा विचार केला होता. माझी एक गर्लफ्रेंड होती—मालिनी. मात्र तिचा लग्नाआधीच अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे इतकी प्रचंड संपत्ती माझ्यानावे असून, माझ्यामागे त्या संपत्तीसाठी कोणी नाही.”
“मग आपण मला त्या संपत्तीचे वारस बनवू इच्छिता काय?”
मधुरिमा मुद्दाम त्याला डिवचत म्हणाली.
“नाही. मी तुला एवढा म्हातारा वाटतो काय? मी जास्त नाही... तीस-पस्तीस वर्षांचा असेन. मला तुला त्या संपत्तीची राणी बनवावं असं वाटलं. ज्याक्षणी तुला पाहिलं तेव्हापासून सतत डोळ्यांसमोर तुझाच चेहरा येतोय. म्हणून मी तुला खास विचारायला इथे बोलवलं.”
“मी जेमतेम एकोणीस वर्षांची असेन. संपत्तीची राणी बनण्याच्या तर मी पात्र नाही. माझे हे विवाहाचे वयही नाही.”
मधुरिमा उदास चेहरा करत म्हणाली.
“असे कोण म्हणाले? प्रेमाला वयाचे बंधन नाही. मला काहीच समस्या नाही. इतर कोणाला समस्या असेल, तर आपल्याला काय करायचं आहे? तुझी संमती असेल, तर मी उद्या तुला इथून घेऊन जाईन.”
“उद्या माझ्या ज्येष्ठ बहिणीचा विवाह आहे. मी उद्या येणे शक्य नाही. ठीक आहे. आपण उद्या पुढे जा. मला आपल्या बंगल्याचे स्थान सांगून ठेवा. मी स्वतःहून दोन-तीन दिवसांत तिथे येईन.”
“चालेल. जशी तुझी इच्छा!”
“परंतु काय पुरावा आहे तुमच्याकडे की तुम्ही खरंच इतके धनवान आहात? आपण काही वेळापूर्वी मी आणलेले हार पाहिलेत का? भलेही आम्ही धनवान नाही, तरी आमच्या मातापित्याने ते दुर्मिळ आणि किमती रत्नांचे हार बनविले आहेत. त्याहून अधिक संपत्ती खरेच आहे का तुमच्याकडे?”
“हो राणी. आजपर्यंत मी कोणाला दाखवले नाही; पण तुला दाखवू शकतो.”
दिग्विजय मोबाईल अनलॉक करत म्हणाला. त्याने एक फोटो तिच्यासमोर धरला. ते अतिशय सुंदर आणि दुर्मिळ रत्ने ज्यावर जडवली गेली आहेत, असे एक कंकण होते.
“ह्या कंकणाला खरेदी करू शकेल इतका मोठा असामी मला भेटला नव्हता. आज मी फॉरेनवरून दहा वर्षांनी फक्त याचं डील करायला आलो आहे. हे कंकण विकले गेले, की माझ्या पैशाला आणि माझ्या संपत्तीला माप राहणार नाही. तू खुश आहेस ना?”
“मी अतिशय आनंदात आहे.”
तिच्या नजरेतला गूढपणा त्याला समजलाच नाही.
“चल, पावसाचा जोर वाढत आहे. खाली जाऊया.”
“नाही, तुम्ही जा. उद्या तसा मोठा दिवस आहे. विवाहसोहळा असल्यामुळे धांदल असेल. तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. मला तसेही झोप येत नाही आहे. मी थोडा वेळ थांबून मग खाली येईन.”
दिग्विजय होकारार्थी मान डोलावत खाली निघून गेला. मधुरिमाने छत्री फेकून दिली. तसेही तिच्या शरीरावर पावसाचा एक थेंबही पडत नव्हता. तिने निर्माण केलेल्या तुफानाचा तिला स्पर्श होणे अशक्य होते. इतर मोहिनी मात्र त्या पावसात भिजू शकत होत्या. निसर्ग तिला सुरक्षित ठेवत होता, कारण ती सर्वोच्च मोहिनी होती, युवराज्ञी होती. अलकनंदा भिजतच येऊन मागे उभी राहिली होती.
“युवराज्ञी, काय झाले?”
“ह्या कटात फक्त शाश्वती, शलाका आणि विक्रमदेवच नाही, तर हा दिग्विजयही सामील आहे. त्याने स्वतःच्या हाताने मला दाखवले, की कंकण त्याच्याकडे आहे. तो मूढ मला राणी बनवू इच्छितो. मी त्याच्या बंगल्यावर नक्कीच जाणार आहे. कंकणाचे स्थान तिथेच कोठेतरी आहे हे निश्चित!”
“युवराज्ञी, तो आपल्याशी अपमानास्पद बोलला नाही ना? नाहीतर तो बंगल्यावर पोहोचण्याआधी त्याला छोटासा झटका देऊन पाठवणे फार कठीण नाही.”
अलकनंदा रागाने हाताच्या मुठी आवळत म्हणाली. अनमोल रत्नाला जपावे तसे त्यांनी आयुष्यभर आपल्या युवराज्ञीला जपले होते. तिच्याशी कोणी येऊन उद्दामपणे, असे प्रेमाचे आव आणून बोलणे मोहिनींच्या सहनशक्तीचा अंत करत होते. त्या केवळ यज्ञ संपण्याची वाट पाहत होत्या. पुढच्या पौर्णिमेला यज्ञ संपणार होता. तोपर्यंत त्यांच्या हातात केवळ प्रतीक्षा होती. ना त्या कोणाला मारू शकत होत्या आणि ना ही सूड घेऊ शकत होत्या. अलकनंदाने परत मधुरिमाकडे पाहिले. मधुरिमाच्या डोळ्यांत अश्रू आणि क्रोध एकत्र दाटून आला होता आणि त्याचे कारण माहित असलेली अलकनंदा दुःखी नेत्रांनी फक्त पाहत होती. मधुरिमाने दूरवर असणाऱ्या आपल्या वनाकडे दृष्टिक्षेप टाकला.
“दिग्विजयसुद्धा या खेळातला एक मोहरा आहे. एकूणच सर्व मोहऱ्यांचा शोध मला लागला आहे. तुम्ही माझ्या अशा कित्येक रात्री अश्रूंत भिजवल्या आहेत. आता काळ आणि नियती दोन्हीही माझ्या बाजूने उभे आहेत. सावध राहण्याचा काळ कधीच टळून गेला आहे.
जागे रहा.
ही रात्र वैऱ्याची आहे!”
जागे रहा.
ही रात्र वैऱ्याची आहे!”
__________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा