डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
दीर्घकथा लेखन स्पर्धा
मोहिनी – अदृश्य संमोहित साम्राज्य (भाग १५) ©तनुजा संतोष प्रभुदेसाई
प्रातःकाळ झाली होती. संपूर्ण बंगला अजूनही निद्राधीन होता. मोहिनींचे शक्तीकवच अजूनही नेटाने बंगल्यात प्रवेश करण्यापासून सूक्ष्म प्राण्यालाही रोखत होते. मधुरिमाने खोलीत प्रवेश केला.
“रागिणी.”
मधुरिमाचा आवाज कानी पडताच रागिणी क्षणांत तिच्यासमोर आली.
“आज्ञा द्या, युवराज्ञी.”
“तुला आता माझे रूप घ्यायचे आहे. कारण विवाह होईपर्यंत तो मांत्रिक इथे पोहोचता कामा नये. कदाचित त्या मानवापुढे तू दुर्बल ठरू शकतेस. त्या मांत्रिकाची ताकद तुझ्यावर हावी होणे योग्य नाही.”
“मी आपल्या आज्ञेचे पालन करीत येथे आपले रूप घेऊन सज्ज राहीन; परंतु आज सुर्यास्तानंतर आपणास तलावाकाठी जाणे भाग आहे. मग त्यावेळेस काय करणार आहात?”
“त्याआधी विवाह होणे अत्यावश्यक आहे. तुम्ही लगेच तयार व्हा. आता विलंब झाला, तर आपल्याला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. कदाचित आपला प्रतिशोध अपूर्ण राहील.”
“असे आम्ही होऊ देणार नाही, युवराज्ञी. निश्चिंत होऊन प्रस्थान करावे.”
रागिणी निर्धाराने म्हणाली. होकारार्थी मान डोलावत मधुरिमा वायूस्वरूपात बंगल्याबाहेर येऊन सज्ज राहिली. तिच्या ताकदीचा प्रभाव इतर मोहिनींपेक्षा अफाट असल्याने ती मांत्रिकाला फारच सहजतेने रोखू शकत होती. इकडे शलाकाची मात्र सतत चिडचिड सुरू होती. बाजूच्या बंगल्यात राहणारे पंडित केव्हाचे आले होते. बाजूच्या बंगल्यात राहणारे शलाकाचे शेजारी तसे परिस्थितीने सधन होते; पण त्या दोन भावांतील एकाला पौरोहित्य करणे अतिशय आवडत असल्याने ते गेली कित्येक वर्षे पौरोहित्य करत होते.
“हे काय, कोणीच तयार नाही झालात अजून? लगेच तयार व्हा. विवाह अगदी मुहूर्तावर होणे गरजेचे आहे. काय चालले आहे? अरुंधती, वेदश्री काय करत आहात एवढा वेळ?”
“मॉम, अगं साडेबाराचा मुहूर्त आहे. आतासे बारा वाजलेत. धीर धर जरा. वहिनी तयार होत आहेत.”
नचिकेत हसत म्हणाला.
”तुला सांगितलं आहे तेवढं कर, नचि. तुझीही धड तयारी झालेली नाही आहे. जा पळ, आटप लवकर. दिग्विजय, विक्रम आवरलं की नाही तुमचं?”
इतक्यात तिला हातातून मंगळसूत्र आणि इतर साहित्य घेऊन जाणारी सुधा दिसली.
“सुधा, अगं किती संथ काम सुरू आहे. आवरा जरा लवकर. आजच आहे लग्न असं वागा जरा.”
“जी मालकीन.”
अलकनंदा तर सुधाच्या वेशात येऊन पार वैतागली होती. शलाकाचा अवतार पाहून नचिकेत शांतपणे आपल्या खोलीत निघून गेला. पंधरा मिनिटात सर्वजण तयार होऊन बाहेर आले. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दिवाणखान्यातच मंडप तयार करून लग्नसोहळा पार पडणार होता. अरुंधती-सिद्धांत व वेदश्री-अर्णव एकमेकांना अनुरूप दिसत होते. खरंतर राजेशाही थाटामाटात त्याचा विवाह व्हावा, अशी शलाकाची इच्छा होती; पण आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगामुळे सध्यातरी हा विवाह लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. शलाकाने पंडिताला इशारा करताच विवाहाचे विधी सुरू झाले होते. हवामान परत बदलू लागले होते. शलाकाने नोकरांना सांगून दारे, खिडक्या बंद करविल्या. परंतु तुफानामुळे सतत कडाडून आवाज येत होते.
******
इकडे आश्रमात ध्यानस्थ असलेले गुरुदेव क्षणात भानावर आल्यासारखे जागे झाले.
इकडे आश्रमात ध्यानस्थ असलेले गुरुदेव क्षणात भानावर आल्यासारखे जागे झाले.
“प्रचंड हाहाकार! मोहिनीचं सावट शलाकाच्या कुटुंबावर पसरलं गेलंय. येणारं संकट दुसरंतिसरं कोणी नसून मोहिनी होत्या. काहीतरी अघटित व्हायच्या आत मला तिथे गेलं पाहिजे.”
गुरुदेव लगेचच आश्रमातून तडक शलाकाच्या बंगल्याकडे निघाले. त्यांनी आश्रमाबाहेर पाऊल टाकताच पावसाचा प्रकोप अजून जोरात सुरू झाला होता. आभाळ काळ्याकुट्ट मेघांनी भरून गेले होते. समोर वाटही दिसू नये इतका अंधार दाटला होता; पण गुरूदेव नेटाने पुढे चालत राहिले. त्यांच्या लक्षात आले होते, की ही मोहिनींची अफाट ताकद आहे; पण त्यांच्याकडेही प्रचंड मंत्रविद्या होती. कोणतीही साधीसुधी मोहिनी आपलं काहीही बिघडवू शकणार नाही, हे त्यांना ज्ञात होतं. पाय खेचत, वाऱ्याच्या त्या प्रचंड वेगावर स्वतःला सावरत ते बंगल्याच्या जवळ आले होते. सर्व विधी पूर्ण होईपर्यंत आता त्यांना रोखणे गरजेचे आहे हे मधुरिमाच्या लक्षात आले. दुरून तापसी वेशात येणाऱ्या मांत्रिकाला तिने क्षणांत ओळखले होते. ती कोणी साधीसुधी मोहिनी नव्हती. प्रचंड शक्तींचा ओघ तिच्यात सामावला होता. गुरुदेवांच्या समोर क्षणात काळा धूर पसरला. धुराने हळूहळू मानवरूप धारण केल्याचे पाहताच गुरुदेव ही मोहिनी आहे हे जाणून स्तब्ध उभे राहिले. तिचा सामना आपण करू शकतो असा दृढ आत्मविश्वास त्यांच्या मनात होता. संपूर्ण काळ्या वेशात ती त्यांच्यासमोर प्रगटली होती. तिच्या तेजामुळे आणि वादळाच्या प्रखरतेमुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसून येत नव्हता. गुरुदेवांनी तिच्यावर विविध मंत्रशक्तीचा मारा सुरू केला; परंतु कोणत्याही शक्तीचा तिच्यावर तिळमात्र परिणाम होत नव्हता. शेवटी गुरुदेवांनी तिच्यावर निद्राधीन करणारी संमोहन मंत्रावली उच्चारली. ही विद्या मोहिनीचं शस्त्र मानलं जायचं. कोणतीही मोहिनी स्वतः त्यात फसू शकत होती; पण ती मधुरिमा होती. मोहिनीचंच शस्त्र मोहिनींच्या युवराज्ञीवर काम करणं अशक्य होतं. या मंत्रावलीचा तोड ती जाणत होती. त्याचा तोड तिने सिद्ध केला असल्याने तिच्यावर किंचितही परिणाम होणे शक्य नव्हते. इतका वेळ शांत असणारी ती गालातल्या गालात मंद हसली. तिचे फक्त डोळे प्रकाशझोतात आले होते.
“गुरुदेव.”
मधुरिमाने हाक दिली. मधुरिमाचा आवाज येताच त्यांनी नजर उचलून तिच्याकडे पाहिलं आणि त्याचक्षणी त्यांचं अस्तित्व विस्मृतीत गेलं. ते तर तिच्या हातातलं खेळणं झाले होते. तिच्या डोळ्यांत बघणं ही घोडचूक त्यांनी केली होती. अनावधानाने का होईना पण तिच्या डोळ्यांतील संमोहन त्यांना मात देऊन गेलं होतं. त्यांच्यावर या मोहिनीचा प्रभाव एक तासापेक्षा जास्त राहणार नाही हे मधुरिमा जाणून होती. त्यांच्याठायी असणाऱ्या शक्ती तेवढ्या कालावधीनंतर त्यांना जागृत करतील; पण त्यापूर्वी सर्व कार्य झालेले असेल. गुरुदेव जागीच मूर्च्छा आल्याप्रमाणे निद्राधीन झाले होते. मधुरिमा परत बंगल्यात परतली. खोलीतून तिने रागिणीकडे पाहुन इशारा केला. तिच्या रुपात उभी असणारी रागिणी लगेच खोलीत गेली.
“रागिणी, तुला आता वनात जाऊन सुधाला इथे घेऊन यायचे आहे तेही लगेच. मग तू आणि अलकनंदा येथून प्रस्थान करा. तो मांत्रिक बंगल्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तो शुद्धीवर येऊन बंगल्यात यायच्या आत तुम्ही प्रस्थान करणे आवश्यक आहे.”
“जशी आज्ञा.”
रागिणी सुधाला आणायला जंगलाकडे निघून गेली. मधुरिमाने आपला वेश क्षणात बदलला व ती बाहेर आली. लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले होते. उभयतांनी सर्वांचे आशीर्वाद घेतल्यावर अरुंधती आणि वेदश्रीचे सामान सिद्धांतच्या आणि अर्णवच्या खोलीत शिफ्ट करायचे कारण देऊन सर्व मोहिनी एकत्र आल्या.
“मी काय सांगते लक्षपूर्वक ऐका. अरुंधती आणि वैजयंती, तुम्हांला आता मानवी रूप प्राप्त होईल. त्याबरोबर तुम्ही मोहिनी आहात हे तुमच्या विस्मृतीत जाईल. तुमच्या मोहिनी रूपाची जाणीव आपला प्रतिशोध पूर्ण होईपर्यंत तुम्हांला राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मी आणलेली ही तलावाकाठच्या वृक्षाची पाने तुम्हांला कमरबंदातल्या छोट्या कुपीत जपून ठेवायची आहेत.”
“परंतु युवराज्ञी, मानव झाल्यावर त्यांना किती दिवस हे स्मरण राहणार?”
अलकनंदाने विचारले.
“तोपर्यंत, जोपर्यंत माझा राज्याभिषेक होत नाही. माझा राज्याभिषेक झाल्यावर त्या जेव्हा वनाची सीमा ओलांडतील तेव्हा त्या विसरून जातील, की त्या मोहिनी आहेत. त्यांना त्यांचे मोहिनी स्वरूप पुन्हा योग्यवेळी लक्षात येईल हे माझे वचन आहे.”
मधुरिमा शांत नजरेने दोघींकडे पाहत म्हणाली. अरुंधती आणि वैजयंतीने तिच्यासमोर मस्तक झुकवले व हात जोडून त्या उभ्या राहिल्या. त्या दोघींनीही कमरबंदात ती पाने परिधान केली होती. मधुरिमाने एक हात हवेत उंचावताच तिच्या हातात राजदंड प्रगटला. तो राजदंड तिने दोघींच्या मस्तकावर टेकवताच त्यांच्या अंगातून काळा धूर बाहेर पडू लागला व काहीच क्षणांत त्या मूर्च्छित झाल्या.
“अरुंधती आणि वैजयंतीला, काही वेळाने शुद्ध येईल. तेव्हा त्यांना त्या मोहिनी असल्याचे लक्षात राहणार आहे. तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. रागिणी कोठे राहिली?”
इतक्यात रागिणीही खोलीत मोहिनींच्या प्रभावाखाली असणाऱ्या खऱ्या सुधाला घेऊन आली होती. रागिणी तिच्या कानात म्हणाली,
“दोन्ही विवाह झाले आहेत. ह्याची सर्व तयारी तू केली होतीस. लक्षात ठेव.”
विशिष्ट उद्देशाने सुधाच्या मनावर हे बिंबवले गेले होते. कारण ती शुद्धीत झाल्यावर तिला काहीच आठवले नाही, तर सर्वांना संशय येऊ शकत होता. तीसुद्धा काही वेळाने त्या प्रभावाखालून बाहेर पडणार होती.
“रागिणी, अलकनंदा तुम्ही आता प्रस्थान करा.”
“आणि आपली सुरक्षा?”
अलकनंदाने पुन्हा विचारले.
“हो, आपण मोहिनी असल्याचे त्याने जाणले तर?”
“तो मांत्रिक कितीही ताकदवान असला, तरी मला ओळखू शकेल इतकी शक्ती त्याच्यापाशी नाही. मोहिनींच्या युवराज्ञीला ओळखण्याची ताकद त्याच्यापाशी कधीच येणे शक्य नाही. तसेही मी मानवी अंश आहे. तेव्हा तुम्ही निश्चित मनाने प्रस्थान करा. यज्ञाची शेवटची आहुती आज रात्री पडणार हे निश्चित आहे. एकदा आपल्या सर्व वस्तूंचा शोध लागला की राज्याभिषेक पार पाडून मृत्यूचक्राचा आरंभ करता येईल.”
मधुरिमा निश्चयी नजरेने पाहत म्हणाली. रागिणी आणि अलकनंदा तिला पुनश्च वंदन करून निघून गेल्या. काही वेळानंतर अरुंधती, वैजयंती, सुधा आणि गुरुदेव चौघेही मोहिनींच्या प्रभावातून बाहेर पडले होते. अरुंधती आणि वैजयंतीला सर्व काही व्यवस्थित आठवत होते. त्यांनाही कल्पना होती की काही दिवसांनी त्या पूर्णतः मानव बनून त्यांच्यातील मोहिनी स्वरूपाला विसरून जाणार आहेत.
___________________________________
क्रमशः.
क्रमशः.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा